61-lp-swamiसंत कबीरांचा राम हा नित्य, अरूप, विराट, अमर्याद अशा सत्यत्वाचे रूप आहे. विवेकी बुद्धीने विचार करून माणसाला हे सर्वश्रेष्ठ तत्त्व सापडते. त्याने त्यास परमानंदाचा अनुभव मिळू शकतो.

संत कबीरांनी आपल्या निर्गुण ब्रह्मास ‘राम’ असे म्हटले आहे. ‘रम’ या पवित्र धातूपासून बनलेल्या रामाचा शब्दार्थ व्याप्त वा रमण करणारा असा होतो. सगुणोपासकांनी दशरथपुत्र रामचंद्रास भगवान विष्णूचा अवतार मानून भक्तिसाधना केली आहे. मात्र संत कबीरांचा निर्गुण ब्रह्म हा ते स्वत: निर्गुणोपासक असल्याने निश्चिंतपणे दाशरथी राम नव्हे सगुणातीत श्रीराम हा त्यांचा चतुर्थ राम होय. कबीरदास म्हणतात-

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

‘एक राम का सफल पसारा,
एक राम सबन से न्यारा।
एक राम घट घट में बैठा,
एक राम दशरथ का बेटा॥’

कबीर साग्ांतात, लोक ब्रह्म ब्रह्म म्हणतात; परंतु ते त्या निर्गुण ब्रह्मास ओळखू शकले नाही. त्यामुळे त्यांना मुक्तीचा मार्ग सापडला नाही. विष्णू, शिव आणि ब्रह्माने ओ+म, सो+हं, रा+म इत्यादी दोन अक्षरे घेऊन युक्ती साधली. तसेच त्यांनी ‘रा’ आणि ‘म’ अशी दोन अक्षरे घेऊन ‘राम’ हा शब्द बनवला. हे शब्द अनाहताचे सूचक असून परमज्योती रूपाचे प्रमाण आहे. या अक्षरांच्या माध्यमातून उपासनेचे मार्ग दृढ झाले. सनक, सनंदन इत्यादींनापण हे अक्षर भावले.

सर्वांहुनी न्यारा तो अद्वितीय, अलौकिक, अव्यक्त आणि अनिर्वचनीय असा संत कबीरांचा राम आहे. संत कबीर हे अद्वैतवादी दृष्टिकोनातून सिद्धहस्त कवी असल्याने त्यांचे निर्गुण ब्रह्माचे निरूपण पूर्णपणे अव्यक्त आणि आध्यात्मिक आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या निर्गुण ब्रह्मस्वरूपाचे निरूपण शब्दरूप, शून्यरूप आणि सहजरूपात केले आहे. संत कबीरांनी सांगितलेला ‘ढाई आखर’ हे प्रणवाक्षराचे प्रतीक आहे. त्यायोगे संत कबीरांचा शब्द सुरतियोग म्हणजेच ओंकारब्रह्माच्या साधनेचे स्वरूप आहे.

‘ओअंकार आदि मै जाना॥
लिखि अरु मेटे ताहि न माना॥
ओअंकार लख जउ कोई॥
सोई लखि मेटणा न होई॥’
(आदिग्रंथ, पृष्ठ ३४०)

संत कबीरांचा निर्गुण ब्रह्म हा गुणातीत असला तरी तो गुणविहीन नाही, तो सगुणातीत असून परात्पर ब्रह्म आहे. हे इंद्रियातीत तत्त्व नेती नेतीच्या अमोघ माध्यमातून व्याख्यान्वित होत असते, तर ते कधी अनिर्वचनीयतेचा महिमा दाखवते. संत कबीरांचा निर्गुण ब्रह्म हा असीम, सवरेपरी, सर्वव्यापक, सर्वशक्तिमान आणि ज्योतस्वरूप असल्याचे आढळते. तो पतितपावन असून त्यास मानवमात्राच्या पावित्र्यापासून संतुष्टी आणि प्रसन्नता आहे. या परमात्म शक्तीच्या प्रति त्यांच्या मनात कुतूहल आहे. ते त्यात विलीन होण्यास अधीर आहेत. त्याच्या असिम कृपेविना जीवाची निष्पत्ती अशक्यप्राय आहे, कारण मानवमात्रच नव्हे तर देवीदेवतांनापण तो गावणे दुर्लभ आणि दुर्धर आहे. तो स्वयं या चरावर सृष्टीस कारणीभूत असल्याने त्याच्या वियोगास कबीरदास व्यथित आहेत. त्याच्या प्राप्तीसाठी म्हणूनच ते मानवमात्रास प्रेरित करतात.

संत कबीरांच्या निर्गुण ब्रह्मास ओळखण्यासाठी गुरुवर्याची अनिवार्यता लक्षणीय आहे. त्यायोगे परात्पर ब्रह्माचा परिचय साधकास सहजावस्थेमध्ये तद्रूपीकरण करण्यापावेतो होत असतो. हीच स्वानुभूती निर्गुणातीत, गुणातीत, परात्पर ब्रह्मानुभूती बनून परमात्म्याशी संधान साधत असते. असे हे सुखसमृद्धीचे सोपान आहे.

संत कबीरांचा निर्गुण ब्रह्म हा ज्ञान व ज्ञेय भावाहून पृथक आहे. तो मायारहित आहे. त्यामुळेच धर्मदूत आचार्य रामानंदसारख्या गुरुवर्याच्या रामापेक्षा तो अभिन्न ठरतो. म्हणूनच ते ‘निरगुन राम निरगुन राम, जपहु रे भाई।’ असा उपदेश प्रदान करतात. त्यांची निर्गुणातीत रामभावना सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. त्याची वरील निरीक्षणशक्ती दांडगी आहे. ते आपल्या अपरंपार निर्गुण ब्रह्मासाठी राम, रहीम, केशव, करीम, अल्लाह, सतनाम्, गोविंद, साहिब, निरंजन, स्वामी, साई, हरी इत्यादी शब्दांचा वापर करताना दिसतात. यापैकी राम या पावन नामास निर्गुण ब्रह्मस्वरूपात अंगीकार करून आपल्या भक्तिसाधनेचा केंद्रबिंदू बनवला आहे त्यांनी आपल्या काव्यामध्ये ‘राम’ या शब्दाचा सगळ्यात जास्त वापर केला आहे. त्यायोगे आपण रामनामसंकीर्तनाची कास धरून आपले जीवन सार्थकी लावू या.

संत कबीरांचा राम हा नित्य, अरूप, विराट, अमर्याद अशा सत्यत्वाचे रूप आहे. विवेकी बुद्धीने विचार करून माणसाला हे सर्वश्रेष्ठ तत्त्व सापडते. त्याने त्यास परमानंदाचा अनुभव मिळू शकतो. कबीरांचा राम हा घटाघटांत सामावलेला निर्गुणातीत असून तो अजन्मा आहे. योगसाधना, भक्ती आणि आंतरिक पावित्र्याच्या आधारे त्याची प्राप्ती शक्यप्राय आहे. कबीरांचा राम हा आत्मस्वरूप आणि अव्यक्त असा स्वसंवेद्य आहे. त्यांना अभिप्रेत असलेला राम हा महात्मा गांधी यांनी सांगितला तोच आहे.

संत कबीर नेहमीच एक पद तल्लीन होऊन गात असत. ‘मै अपने राम को रिझाऊ।’ असे ते गात त्या वेळी त्यांचा रामदास नावाचा शिष्य त्यांचे अनंत आणि असीमतेतील शब्दध्वनी शांतपणे ऐकत असे. आज त्याला अजाणताच नवीनच लगन लागली होती. तो गर्भगळीत होऊन कबीरांना म्हणाला, ‘‘साहेब! मला राम दाखवा ना!’’ कबीरांनी त्याला समोर बसवून अनेकदा समजावले की, रामास असे बघता येत नाही; परंतु तो ऐकायला तयार नाही.

तेव्हा कबीर म्हणाले, ‘‘हो दाखवीन.’’

एकदा रामदासाने आपल्या घरी जेवण ठेवले. त्याने अनेक साधूंना आमंत्रित केले. त्याने कबीरांना येण्याची विनंती केली. तेव्हा कबीरदास तेथे आले व म्हणाले, ‘‘हा रामदास आज जेवण देत आहे, कारण त्याला आज राम भेटणार आहे.’’ तसे जमलेले साधुलोक रामाच्या दर्शनास आतुर झाले. त्यांनी कबीरांच्या सोबत भजन गाण्यास सुरुवात केली. अचानक पाकगृहात खडखडाट होऊन सारे तेथे जाऊन बघू लागले. रामदास तर सगळ्यांच्या आधी धावत तिथे पोहोचला. त्याने तिथे पाहिले तर काय! खिरीने भरलेले भांडे उपडे झाले होते आणि सगळी पाकसामग्री मातीत पसरली होती. तेथे एक म्हैस शिरली होती. कोणी रागे भरले, तर कोणी काठी घेऊन धावले. इकडे संत कबीर गात बसले होते. ‘मै अपने राम को रिझाऊ।’ साधू लोक म्हशीला हाकलू लागले. रामदासाने म्हशीस काठीने मारून मारून बेजार करून टाकले. म्हैस कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली आणि कुथत, लंगडत कबीरांच्या समोर जाऊन उभी रहिली. तसा कबीरदासांच्या डोळय़ांतून भक्तिरस आसवांच्या रूपाने वाहू लागला. ते त्या म्हशीच्या गळय़ात पडले आणि हात पसरून म्हणाले, ‘‘हे राम! तुझी कसौटी कधी नाही ती आज झाली’’ तसा रामदासांच्या अंत:करणात नाद उठला ‘मै अपने राम को रिझाऊ।’
संजय बर्वे – response.lokprabha@expressindia.com