जन्माला आलेले अपत्य सर्वाच्याच असीम आनंदाचा ठेवा असते. पण, त्याच्या हालचाली सर्वसाधारण मुलासारख्या होत नसल्याचे जाणवायला लागते आणि आई-बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. इतरांपेक्षा काहीशी दुबळी ठरलेली ही ‘विशेष’ पाखरे.. त्यांच्या पंखांमध्ये बळ आणण्याचे आव्हान ‘आविष्कार’ नेटाने पेलते आहे. गरज आहे ती पाठीवर थाप मारून ‘लढ’ म्हणण्याची!

खाद्या कुटुंबात नवीन ‘पाहुणा’ येणार असल्याची चाहूल लागली की, सारं घर कसं आनंदाने फुलून जातं. या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होते. आगमनाचा दिवस जवळ येऊ लागतो तशी साऱ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचते. ‘पाहुणा’ अवतरतो. आनंदाला उधाण येतं. जन्माला आलेलं अपत्य सर्वाच्याच असीम आनंदाचा ठेवा असतं. पण थोडय़ाच महिन्यांमध्ये त्याच्या हालचाली सर्वसाधारण मुलासारख्या होत नसल्याचं जाणवायला लागतं आणि आई-बापांच्या काळजाचा ठोका चुकतो. अशा जन्मत:च व्यंग असलेल्या किंवा दुर्धर आजाराने पछाडलेल्या मुलामुळे त्या कुटुंबाच्या सुखाला जणू दृष्ट लागते. सुखाची साय करपून जाते. पण, म्हणून स्वस्थ बसून उपयोग नसतो. तज्ज्ञ डॉक्टरांकडे खेपा सुरू होतात. विविध तपासण्या होतात. मुलाच्या मेंदूची वाढ योग्य प्रकारे न झाल्याचं निदान होतं. आता पुढे काय? सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी रत्नागिरीत हा संकटमय प्रश्न कोणासमोर उभा ठाकला असता तर त्यावर ठोस उत्तर नव्हतं. पण १९८६ मध्ये काही समविचारी संवेदनशील मंडळींनी एकत्र येत या प्रश्नाला भिडायचं ठरवलं आणि गेल्या सुमारे तीन दशकांच्या अविरत श्रम आणि बांधिलकीमधून ‘आविष्कार’ या संस्थेची उभारणी करत त्यावर आपल्या परीने परिणामकारक उपाय शोधण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला आहे.

अर्थात अशा स्वरूपाच्या इतर कोणत्याही संस्थेप्रमाणेच ही वाटचाल सोपी नव्हतीच. पण, संस्थापक सदस्यांची नि:स्वार्थ बुद्धी, जिद्द व चिकाटीमुळे इतरांचाही हातभार लागत गेला आणि आज ही संस्था कोकणातील अशा ‘विशेष’ मुलांसाठी मोठा आधार बनली आहे. सुमारे ३४ वर्षांपूर्वी मनोविकारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे आणि शमीन शेरे हे तरुण दाम्पत्य रत्नागिरीत आलं. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत येथील मनोरुग्णालयात डॉक्टर काम पाहू लागले, तर मानसशास्त्राच्या पदवीधर असलेल्या शमीन यांची इथल्या बालनिरीक्षणगृहामध्ये ‘केस वर्कर’ म्हणून नियुक्ती झाली. या कामाच्या निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी फिरत असताना शमीन यांना या समस्येची प्रथम तीव्रपणे जाणीव झाली. कारण त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये अल्प काळातच अशा प्रकारची विशेष उपचारांची गरज असलेली सुमारे शंभर मुलं त्यांना आढळून आली आणि त्या अस्वस्थ झाल्या. याचबराबर निरीक्षणगृहामध्ये येणाऱ्या समस्याग्रस्त मुलांपैकी अनेक मुलांची खरी समस्या, सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी बुध्दय़ांक (मतिमंदपणा), हीच असल्याचं आढळून आलं. अशी मुलं घेऊन येणाऱ्या आई-बापांच्या चेहऱ्यावरील हताशपणा आणि निराशा शेरे पती-पत्नींना आणखीच अस्वस्थ करू लागली. या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं तीव्रपणे वाटू लागलं. सुरुवातीला त्यांनी त्या काळात रत्नागिरीत असलेल्या शैक्षणिक संस्थांकडे याबाबत चाचपणी केली. पण अन्य व्यापांमुळे कोणी फारसा रस दाखवला नाही. अखेर आपणच अशी संस्था काढावी, असं या दाम्पत्याला वाटू लागलं. पण अशा मुलांना शिकवायचं तर त्यासाठी खास प्रशिक्षण घ्यायला हवं, हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे शमीन यांनी पुण्यातील सिंधुताई जोशी यांच्या ‘कामायनी’ या संस्थेत एक वर्षभर प्रशिक्षण घेतलं. याचदरम्यान योगायोगाचा आणखी एक दुवा जोडला गेला. शासनातर्फे रत्नागिरीत नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक म्हणून डॉ. यशवंत माईणकर रुजू झाले. त्यांच्या पत्नी मीना माईणकर यांनीही ‘विशेष शिक्षिका’ म्हणून प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे शेरे आणि माईणकर या दाम्पत्यांनी एकत्र येऊन जिल्ह्य़ातील मतिमंद मुलांसाठी बालमार्गदर्शन केंद्र व शाळा काढण्याचा निर्णय १९८६च्या जुलैमध्ये घेतला. त्यापाठोपाठ काही समविचारी मंडळींची बैठक घेऊन १७ नोव्हेंबर १९८६ रोजी जिल्ह्य़ातील या पहिल्या शाळेचं कामकाज तत्कालीन जिल्हाधिकारी दिवंगत रमेशचंद्र कानडे यांच्या सहकार्यामुळे त्या वेळच्या अल्पबचत सभागृहात सुरूही झालं.

शमीन शेरे यांनी पूर्वी केलेल्या सर्वेक्षणामुळे अशा सुमारे १०० गरजू मुलांची यादी तयारच होती. त्यांच्या पालकांना पत्र पाठवून या उपक्रमाची माहिती आधीच देण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात सुरुवातीला फक्त नऊ मुलं दाखल झाली. पण महिनाभरात ही संख्या दुप्पट झाली. त्यामुळे सभागृहाची जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे नगर परिषदेच्या टिळक विद्यालय या शाळेत स्थलांतरित व्हावं लागलं. बालमार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या मुलांपैकी १८ वर्षांवरील मुलांसाठी व्यवसायाभिमुख कार्यशाळेची गरज होती. सुरुवातीला टिळक विद्यालयातच हाही उपक्रम सुरू झाला. पण, त्यातील गैरसोय लक्षात घेऊन डॉ. शेरे यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपलं वडिलोपार्जित घर उपलब्ध करून दिलं. इथे मुलांना भेटकार्ड-मेणबत्त्या तयार करणं, सुतारकाम इत्यादीचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं.

स्थापनेपासून अवघ्या पाच वर्षांत शाळेतील मुलांची संख्या ५६ वर गेली. त्यामुळे स्वत:च्या मालकीच्या, अशा उपक्रमासाठी आवश्यक आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारतीची निकड तीव्रपणे जाणवू लागली. त्या दृष्टीने चालू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश येत सध्या असलेल्या वास्तूचं १९९७ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन झालं आणि दशकपूर्ती केलेल्या ‘आविष्कार’च्या वाटचालीतील मोठा टप्पा पूर्ण झाला. नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर गेल्या सुमारे दोन दशकांमध्ये संस्थेचं कार्य विविधांगांनी विस्तारलं आहे. संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांची मार्गदर्शन केंद्रामध्ये संपूर्ण तपासणी केली जाते व त्यांच्या गरजांनुसार संस्थेच्या विविध विभागांमध्ये प्रवेश दिला जातो. शमीन शेरे मुख्याध्यापिका असलेल्या सविता कामत विद्यामंदिर या संस्थेच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर गेली आहे. इथे सात प्रशिक्षित विशेष शिक्षक आणि तीन हस्तकला शिक्षक या मुलांना जीवनावश्यक कौशल्यं आत्मसात करण्यासाठी मदत करत आहेत.  या मुलांची प्रगती घडवण्याचं प्रचंड आव्हान हे शिक्षक यशस्वीपणे पेलत आहेत. आत्तापर्यंत इथून सुमारे ८०० मुलं बाहेर पडली आहेत. १८ वर्षांवरील मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचं समाजात पुनर्वसन करण्यासाठी श्यामराव भिडे कार्यशाळेमध्ये स्टेशनरी, कागदी व कापडी पिशव्या, भेटकार्ड, मेणबत्त्या बनवणं, घरकाम, सुतारकाम, शिवणकाम, बागकाम इत्यादींचं प्रशिक्षण दिलं जातं. दोनशेपेक्षा जास्त मुलांना या प्रकारे प्रशिक्षित करण्यात आलं असून त्यापैकी सुमारे ४० जण स्वत:चे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झाले आहेत. तसंच इथे तयार होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचे खास स्टॉल वर्षांतील निरनिराळ्या सणांच्या काळात लावले जातात. जागतिक मानसिक अपंग दिनाचं औचित्य साधत ३ डिसेंबर २०११ रोजी शमीन शेरे यांच्या पुढाकाराने या वस्तूंची खास ‘कलाजत्रा’ आयोजित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त  तीन वर्षांखालील बालकांसाठी शीघ्र उपचार विभागांतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवेदना चेतना कार्यक्रम आणि ३ ते ६ वयोगटांच्या मानसिक अपंगत्व, बहुविकलांग किंवा स्वमग्न मुलांची शालेय पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्वतंत्र विभाग -अ‍ॅस्पिरेशन सेंटर- आहे. संस्थेत आलेल्या मुलांच्या सर्वागीण पुनर्वसनासाठी शिक्षक घेत असलेल्या परिश्रमांमुळेच नऊ जणांचे विवाह होऊन ते सर्वसामान्य जीवन जगत आहेत.

नीला पालकर यांच्याबरोबरच  डॉ. शेरे पती-पत्नी, संस्थेचे दोनवेळा अध्यक्ष राहिलेले डॉ. शरद प्रभुदेसाई, सचिव उमा बिडीकर, उपाध्यक्ष दीप्ती भाटकर, खजिनदार बिपीन शहा, कार्यशाळा समिती प्रमुख नितीन कानविंदेअशी निरनिराळ्या  क्षेत्रांतील मंडळी इथे एकत्र येऊन निरपेक्षभावनेने कार्यरत आहेत. समाजाची सद्भावना त्यांच्या पाठीशी आहे आणि तेच या संस्थेचं मुख्य संचित आहे. नियतीच्या फटक्यामुळे काहीशी दुबळी झालेल्या ‘विशेष’ पाखरांच्या पंखांमध्ये बळ आणण्यासाठी चाललेल्या या अथक प्रयत्नांना गरज आहे, कोणी तरी पाठीवर उदारमनस्कतेची थाप मारून ‘लढ’ म्हणण्याची!

ल्लसतीश कामत

 

‘आविष्कार सोसायटी फॉर डेव्हलपमेंट ऑफ मेंटली हॅण्डीकॅप्ड’

मुंबई-गोवा महामार्गावरून हातखंबा येथे रत्नागिरी शहरात जाण्यासाठी वळल्यानंतर सुमारे ७ किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर मिरजोळे एमआयडीसी वसाहतीमध्ये ‘आविष्कार’ची टुमदार इमारत आहे.

 

धनादेश – ‘आविष्कार सोसायटी फॉर डेव्हलपमेंट ऑफ मेंटली हॅण्डीकॅप्ड’

((AVISHKAR SOCIETY FOR DEVELOPMENT OF MENTALLY HANDICAPPED)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा.

 

देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

५० टक्के विद्यार्थ्यांचा खर्च विनाअनुदानित आहे. तसेच कार्यशाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या कौशल्याला जास्त चांगल्या प्रकारे वाव देण्यासाठी कायमस्वरूपी उत्पादन केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय आहे.

 -नीला पालकर, अध्यक्ष