सुहास जोशी – भक्ती परब – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2 @writerbhakti

करमणुकीची गरज मानवाला कायमच असते, मग तो कोणत्याही युगातील असो. मानवाच्या इतिहासात डोकावून पाहिले असता सुरुवातीच्या टप्प्यावर त्याची करमणुकीची साधने ही समूहाने केलेल्या उपक्रमांत होती. नाटक, संगीत कार्यक्रम हे नंतरच्या काळातील उपक्रम राजेशाही व्यवस्थेत अधिक विकसित झाले. २० व्या शतकात चित्रपटांनी ही रचना बदलली. पसे मोजायचे आणि तीन तास करमणूक मिळवायची ही ती रचना; पण त्यासाठी घरातून बाहेर जावे लागायचे. दूरचित्रवाणीने करमणुकीची संकल्पना  क्रांतिकारकरीत्या बदलली. थेट दिवाणखान्यात येऊन विराजमान झालेल्या दूरचित्रवाणीने घरबसल्या करमणुकीचे एक साधन मिळवून दिले. भारतात १९५९ साली दूरचित्रवाणीचे आगमन झाले, तर १९९२ साली खासगी वाहिन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. दूरदर्शन ही एकमात्र सरकारी वाहिनी ते आज ८७२  खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या असा भला मोठा पट गेल्या २५ वर्षांत व्यापून आजा हा व्यवसाय २६ व्या वर्षांत आणखीन वेगाने पुढे जात आहे. तब्बल ६६ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला या व्यवसायाने आज चित्रपटसृष्टीच्या व्यवसायाला (१५ हजार कोटी रुपये) देखील मागे टाकले आहे. देशातील मनोरंजन आणि माध्यमांच्या २०१७ च्या व्यवसायाचा आढावा घेताना फिक्कीने ही आकडेवारी मांडली होती. अँटेना लावून पाहिल्या जाणाऱ्या टीव्हीपासून ते उपग्रह वाहिन्या आल्यानंतर थेट घरातील केबलला जोडलेला टीव्ही, नंतर सेटटॉप बॉक्स आणि आता थेट मोबाइलवर पाहता येणारा असा हा त्याचा प्रवास. २०१८ साली १९७ दशलक्ष इतकी अफाट प्रेक्षकसंख्या लाभलेला टीव्ही इतका लोकप्रिय का झाला हे पाहणे नक्कीच रंजक आहे. त्यामागे असलेले अर्थकारण, धोरणं, त्यातून सातत्याने होणारे प्रयोग, काही प्रस्थापित झालेल्या गोष्टी ते आजचा टीव्ही असा हा प्रवास कसा आहे त्याचा २५ वर्षांच्या निमित्ताने आढावा घेणार आहोत.

जोपर्यंत दूरदर्शन नावाचे सरकारी माध्यम होते तोपर्यंत संपूर्ण कुटुंबाची करमणूक या मुद्दय़ाला अधिक प्राधान्य होते. त्यामुळे बातम्या, क्रीडा, शेती, मनोरंजन, चित्रपट, संगीत कार्यक्रम आणि मालिका हे सारे एकाच वाहिनीत होते. उपग्रह वाहिन्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात दूरदर्शननेदेखील रिअ‍ॅलिटी शो नावाच्या प्रकरणात उडी घेतली होती; पण दूरदर्शनची सुरुवात ही काही नफा मिळवून देणारा उद्योग म्हणून झाली नव्हती. तो भाग खूप नंतर कार्यान्वित झाला. दूरदर्शनचे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांना पसे मोजावे लागायचे नाहीत, किंबहुना नागरिकांची करमणूक आणि त्याच वेळी सरकारचे स्वत:चे प्रसिद्धी माध्यम अशी व्यवस्था त्यामध्ये होती. कार्यक्रमाची रचना करताना सरकारी धोरणांचा वरचष्मा असला तरी दूरदर्शनवर दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल होती. ‘हमलोग’, ‘बुनियाद’, ‘मालगुडी डेज’, ‘तेनाली रामन’, ‘विक्रम वेताळ’ अशा अनेक मालिका प्रसिद्ध झाल्या. ‘रामायण’ मालिकेच्या काळात रस्ते ओस पडत इतकी लोकप्रियता दूरदर्शनने मिळवली. आठवडय़ाला एक चित्रपटदेखील पाहायला मिळायचा. त्या वेळी इतर कोणत्याही वाहिन्यांची स्पर्धा नसल्याने दूरदर्शनवरील कार्यक्रम हेच घरबसल्या करमणुकीचे साधन होते. आजच्या मालिका, डेली सोप्स, क्रीडा समालोचन या सर्व बाबींचे बीजारोपण दूरदर्शनच्या काळात झाले.

दूरदर्शन हे सरकारी माध्यम असल्यामुळे दूरदर्शनबाहेरील निर्मात्यांकडून कार्यक्रम तयार करून घेणे आणि त्याद्वारे जाहिरातींचा महसूल मिळवणे हे व्हायला १९९० साल उजाडावे लागले. ज्येष्ठ निर्माते नितीन वैद्य सांगतात की, दूरदर्शनच्या या बदलत्या धोरणात निर्मात्यांना तो ठरावीक स्लॉट विकत घ्यावा लागायचा. त्या स्लॉटमध्ये मालिका दाखवायची आणि त्याचबरोबर जाहिरातीदेखील. जाहिराती विकणे हे काम निर्मात्यांना करावे लागायचे. मालिकानिर्मितीचा खर्च आणि जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न या खर्चाचा मेळ काही जमत नव्हता. याला ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका अपवाद म्हणाव्या लागतील. दूरदर्शनचे हे गणित तुलनेने वाहिन्यांसाठी फारसे लाभदायक ठरले नाही. त्यामुळे मराठीत निर्मिती उद्योग तयार व्हायला हवा होता तसा निर्माण झाला नाही; पण िहदीला त्यांनी नंतर चांगलाच हातभार लावला. विशेषत: ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या जाहिरातींना िहदी मालिकांनी पाठबळ पुरवलं.

दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातून एकाच वेळी देशभरात होणारी जाहिरात, त्यातून मिळणारे उत्पन्न ही व्यवसायाची एक चांगली संधी अनेकांना दिसत होती. त्यातच १९९१ साली नरसिंह राव सरकारने सुरू केलेल्या आíथक सुधारणांमध्ये ब्रॉडकािस्टग क्षेत्रात खासगी कंपन्यांनादेखील दूरचित्रवाणी सेवा मर्यादित स्वरूपात सुरू करण्याची परवानगी दिली. ही संधी १९९२ मध्ये झी आणि स्टार यांनी साधली. पुढच्याच वर्षी दक्षिणेतील इनाडू आणि सन टीव्ही हेदेखील या व्यवसायात उतरले.

झी वाहिनीने सुरुवात िहदीपासून केली असली तर त्यांचा साचा हा सुरुवातीच्या काळात सर्व कार्यक्रम एकाच वाहिनीत असा होता. पण १९९६ मध्ये झी सिनेमा आणि झी न्यूज या दोन स्वतंत्र वाहिन्या सुरू झाल्या. १९९९ मध्ये तर पाच वाहिन्यादेखील सुरू झाल्या. अल्फा मराठी ही त्यापकीच एक. झीने नंतर प्रचंड विस्तार केला. आज १० भाषांमध्ये ५४ च्या आसपास वाहिन्या अशी त्यांची व्याप्ती आहे.

दुसरीकडे स्टार वाहिनीनेदेखील भारतात प्रवेश केला होता. या वाहिनीची मूळ कंपनी ही जागतिक स्तरावरील मीडिया मुगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपर्ट मरडॉक यांची. स्टार प्लस ही वाहिनी झीबरोबरच १९९२ मध्ये सुरू झाली. पण २००१ ते २०१० हा स्टार इंडियाचा वाढीचा काळ होता. स्टारने दाक्षिणात्य प्रेक्षक मिळवण्यासाठी स्टार सुवर्णा, विजय सुपर अशा कन्नड आणि तामिळ भाषांमध्येदेखील वाहिन्या सुरू केल्या. आज तीन िहदी, सात प्रादेशिक, क्रीडा अशा मिळून स्टार समूहाच्या २६ वाहिन्या आहेत. स्टारने गुजराती आणि मराठी वाहिन्यांचे प्रयोग केले पण त्यात त्यांना पुरेसे यश मिळाले नाही.

१९९५ ला सोनी वाहिनी सुरू झाली. त्यांचा प्रादेशिक वाहिन्यांपेक्षा शहरांवर अधिक भर होता. त्यांनी बंगाली वाहिनी सुरू केली पण ती फारशी चालली नाही. तर चित्रपटांसाठीच्या सुरू केलेल्या सेटमॅक्सने नंतर खेळातदेखील शिरकाव केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मराठीत प्रवेश केला आहे.

‘वायकॉम १८’ हा समूह तसा उशिराच आला. त्यांनी १९९७ मध्ये ‘एमटीव्ही’ सुरू करून भारतीय बाजारात प्रवेश केला. त्यांची ही सुरुवात वेगळी होती. तोपर्यंतच्या दूरचित्रवाणीच्या मार्केटमध्ये हा सेगमेंट पूर्णपणे दुर्लक्षित होता. पुढे वायकॉमने व्हीएच १, निकलोडियन सुरू केले. पण जनरल एन्टरटेनमेन्ट या सेगमेन्टमध्ये त्यांनी आक्रमकपणे सुरुवात केली ती २०१० नंतर कलर्स या नावाने वाहिन्या सुरू केल्यावर आणि ईटीव्हीच्या मनोरंजन वाहिन्या ताब्यात घेऊन.

याशिवाय सीएनएन, आयबीएन, इंडिया टुडे, एनडीटीव्ही असे वृत्तवाहिन्यांचे समूहदेखील येत होतेच. जोडीला डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिकसारखे माहितीपर कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्यादेखील भारतीय बाजारात उतरल्या. क्रीडा वाहिन्या उशीरा आल्या, पण त्यांनी अनेक प्रस्थापित रचना मोडीत काढून एक नवीन बाजारपेठ तयार केली. मुख्यत: मनोरंजनाचे सारे अवकाश सुरुवातीला व्यापले ते झी आणि स्टार यांनी. सोनी काही प्रमाणात स्पर्धेत होते. आणि आता त्या जोडीला वायकॉमदेखील उतरले आहे. या वाहिन्यांची गर्दी वाढू लागली तशी त्यांच्यातील स्पर्धा, चुरस वाढू लागली. नवनवीन प्रयोग होऊ लागले.

मनोरंजन वाहिन्यांचे प्रयोग

जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल (जीईसी) ही टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकांची सर्वात लाडकी संकल्पना. प्रचंड मोठा वाव त्यामध्ये दडलेला असतो. खासगी वाहिन्यांनी ही जागा  खूप वेगाने आणि अतिशय स्पर्धात्मक पद्धतीने काबीज केली आहे. किंबहुना जीईसी हा टेलिव्हिजनचा चेहरामोहरा बदलणारा घटक होता. १९९२ मध्ये आणि नजीकच्या काळात ज्या वाहिन्या आल्या त्यांचा पूर्ण फोकस हा जीईसीवरच होता. त्यामुळे ज्यांनी सुरुवातीला बातम्या, क्रीडा, चित्रपट अशा सर्व प्रकारांना हात घातला होता, तो त्यांनी हळुवारपणे स्वतंत्र करून केवळ मनोरंजन याच प्रकारावर भर दिला.

मनोरंजनाच्या साम्राज्यात सर्वाधिक लोकप्रिय झालेले प्रकार दोन. एक म्हणजे मालिका आणि दुसरा रिअ‍ॅलिटी शोज. या दोन्ही प्रकारांत आजही असंख्य प्रयोग होत असतात. काहीजण वेगवेगळ्या प्रयोगांची नक्कल करत असतात. पण या दोहोंशिवाय भारतीय मनोरंजन टेलिव्हिजन पूर्ण होऊ शकत नाही हे नक्की.

खासगी वाहिन्यांच्या प्रवेशानंतर त्यांनी मालिकांचे स्वरूप बदलायला सुरुवात केली होतीच, पण काही मालिकांनी लोकांना जणू काही तहानभूक हरपून टीव्हीला चिकटून बसण्याची सवय लावली ती म्हणजे क्यों की सास भी कभी बहू थी आणि कहानी घर घर की. दूरदर्शनच्या काळातील मेगा सीरियलमध्ये रामायणाची परिस्थिती हीच होती. पण तेथे धार्मिक भावना हा मुद्दा अधिक होता. पण ‘क्योंकी.’ आणि ‘कहानी..’ या दोन मालिकांनी सगळी गणितचं बदलून टाकली. याचे श्रेय स्टार प्लसला जाते. श्रीमंती थाटाची घरं, चकाचक ऑफिसेस, २४ तास प्रचंड मेकअप करून वावरणारी पात्रं अशा एका वेगळ्या दुनियेत नेणाऱ्या मालिकांची भुरळ पडली की प्रेक्षकांना असेच पाहायची सवय झाली हे नेमके गणित पुरते उलगडणे कठीणच आहे. ‘लोकप्रभा’ने २०१३ साली मालिका पाहण्याच्या सवयीवर महिलावर्गामध्ये एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून जाणवलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही या सर्व प्रेक्षकवर्गाची टीव्हीशी आभासी मैत्री झाली आहे. अगदी मोजक्याच मालिका सोडल्या तर आभासी मैत्रीचे वास्तव अगदी ठळकपणे आजदेखील दिसून येते.

गेल्या काही वर्षांत टीव्हीवरील मालिकांवर प्रचंड टीका होत असली तरी त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग आणि अर्थातच त्यामुळे मिळणारा जाहिरातींचा फायदा हा अगदी ठळकपणे दिसून येतो. किंबहुना म्हणूनच आजदेखील कोणत्याही जनरल एन्टरटेनमेंट चॅनलला त्यांच्या एकूण बजेटच्या ५०-६० टक्के रक्कम ही मालिकांच्या निर्मितीसाठी ठेवावी लागते.

रिअ‍ॅलिटी शोज हा प्रकार तसा भारतीय प्रेक्षकांसाठी पूर्णत: नवीन होता. रिअ‍ॅलिटी म्हणजे प्रत्यक्ष समोर होणारी परीक्षा. असा एक प्रकार भारतीयांना माहीत होता तो बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्टमुळे. १९७२ साली कॅडबरीने सुरू केलेला हा प्रयोग नंतर रेडिओवर ऐकायला मिळायचा. १९९२ मध्ये ‘झी’ने हा प्रयोग थेट टीव्हीवर आणला. हा थेट बुद्धिमत्तेचा कस पाहणारा प्रकार होता. २००० साली  आलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा जरी अमेरिकी टीव्हीवरून बेतला असला तरी त्यातील ग्लॅमर आणि पैसा सोडले तर बुद्धिमत्ता हाच त्यातील महत्वाचा घटक होता. पण यात संगीत, नृत्य आणि त्याचबरोबर झगमगीतपणा ज्यातून लोकांना काहीतरी आकर्षक पाहायला मिळेल अशा गोष्टींची कमतरता होती. मुख्यत: मनोरंजन नव्हते. ते ‘झी’वरच्या अंताक्षरी या प्रत्यक्ष गायनाच्या कार्यक्रमातून करता आले. हा फॉम्र्युला हिट होता. छोटय़ा पडद्यावर जे काही सुरू आहे त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवण्याचे यामागचे धोरण साध्य झाले. म्हणजेच प्रेक्षकवर्ग वाढवणे आणि त्याचबरोबर जाहिराती मिळणे. भविष्यात येणाऱ्या सांगीतिक रिअ‍ॅलिटी शोजचे हे अगदी बाळबोध रूप म्हणता येईल. त्यानंतर ‘सारेगमपा’ आले.

खासगी वाहिन्यांवरील पहिला रिअ‍ॅलिटी शो म्हणून १९९७च्या ‘कोलगेट जेल बुगीवुगी’चा उल्लेख होत असला तरी १९९६ साली मुंबई दूरदर्शनवर ‘क्लोजअप ताक धिना धिन्’ हा सांगीतिक रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला होता. दूरदर्शनच्या चाकोरीबद्धतेत प्रायोजक मिळवून असा शो करणे हे कठीणच होते. त्यानंतर २००० साली आलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ने खूप मोठा प्रेक्षकवर्ग बांधून ठेवला. याला टेलिव्हिजन गेम शो म्हणायचं की रिअ‍ॅलिटी शो हा मुद्दा वेगळा. पण २००० पासून सुरू झालेला हा कार्यक्रम आजही त्याच जोमाने सुरू आहे. सुरुवातीची १० वर्षे स्टार प्लसने हा शो केला तर त्यानंतर आजपर्यंत तो सोनी टीव्ही सादर करत आहे. या धर्तीवर पुढे अनेक शोज आले, अगदी मराठीतदेखील, पण एकालाही कौन बनेगाची सर आली नाही की यश लाभले नाही. २००४ मध्ये ‘अमेरिकन आयडॉल’च्या धर्तीवर सोनीवर ‘इंडियन आयडॉल’ सुरू झाले. त्यालादेखील अशीच तुफान लोकप्रियता लाभली.

खासगी वाहिन्यांना या रिअ‍ॅलिटी शोजमधून काय मिळाले, तर थेट जनमानसापर्यंत पोहोचण्याची संधी. मालिका पाहणे हे म्हणजे छोटय़ा पडद्यावर गोष्ट पाहण्यासारखे होते. ती गोष्ट कदाचित प्रेक्षकाच्या वैयक्तिक अनुभवाला जोडणारी असेल, आणि नसली तरी त्यातून स्वप्नरंजनाची संधी होती. पण त्यापलीकडे प्रेक्षक मालिकेशी जोडला जायचा नाही. पण रिअ‍ॅलिटी शोजनी थेट काही तरी सादर करायची संधी सर्वसामान्यांना मिळू लागली. वाहिन्यांचा यामागील धोरण, हेतू हा व्यावसायिक आणि अर्थातच त्यातून जाहिरातींच्या, प्रायोजकत्वाच्या स्वरूपात पैसे मिळवणे असला तरी होतकरू प्रेक्षकांसाठी हे शोज म्हणजे नशीब अजमावून पाहण्याची थेट संधी होती. आणि त्यातून अनेकांना पुढे गायन, अभिनय व इतर कलाक्षेत्रांत व्यावसायिकरीत्या नशीब अजमावता आले हे निश्चित.

खरे तर रिअ‍ॅलिटी शोज ही जवळपास अमेरिकी टीव्हीची कॉपी होती. फक्त त्यातील जे भारतीय पद्धतीने रुजले ते पुढे वाढत गेले. ज्या वाहिन्यांनी हे धोरण अवलंबले तेच टिकले. मग हे शोज सादर करणारा कोण आणि किती मोठा अभिनेता हा प्रश्न अलाहिदा राहतो. पण तरीदेखील रिअ‍ॅलिटी शोजमध्ये कॉपी करण्याचा मोह आपल्याला अजूनही सोडवत नाही. बहुतांश शोज हे कुठूनतरी हक्क विकत घेऊन त्याचे भारतीय रूप असेच दिसतात. ते यशस्वी होत असले तरी हे मूळ शोज नाहीत हे वास्तव नाकारता येत नाही. अगदी नुकत्याच यशस्वी झालेल्या ‘मराठी बिग बॉस’मध्येही हेच दिसून आले.

क्रीडा वाहिन्यांची चुरस

सर्व विषय हाताळणारी एकच वाहिनी हा साचा खासगी उपग्रह वाहिन्यांनी मोडून काढला. तरी केवळ खेळांसाठी वाहिन्या हे तसे काहीसे उशिराच सुरू झाले म्हणावे लागेल. स्टार आणि ईएसपीएन यांनी एकत्रितपणे १९९४ मध्ये ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स ही वाहिनी सुरू केली आणि नुकतेच २०१४ मध्ये ईएसपीएन स्टारचा हात सोडून सोनीबरोबर एकत्र आले. िहदी मनोरंजन वाहिन्यांमध्ये जसे टीआरपीचे घमासान युद्ध असते तसेच खेळाच्या वाहिन्यांमध्ये जास्तीत जास्त खेळ आपल्याकडे यावेत यासाठी युद्ध होत असते. त्याचे अगदी सोप्पे कारण म्हणजे या कार्यक्रमांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रॅण्ड्सकडून जाहिराती मिळतात आणि हा व्यवसाय तर अगदी थेटपणे अशा ब्रॅण्डच्या जाहिरातींवरच आधारित आहे. डीडी स्पोर्ट्सचा यामध्ये सहभाग असला तरी सोनी आणि स्टार या दोहोंकडे असणाऱ्या खेळांची चर्चा अधिक असते.

सोनी वाहिनीने भारतातील सुरुवात १९९५ ला केली असली तरी त्यांचा भर शहरांवर अधिक होता. सोनीने २००० साली सोनी मॅक्स (सेटमॅक्स) ही वाहिनी सुरू केली. सेटमॅक्स ही खरे तर चित्रपट वाहिनी म्हणून जन्माला आली होती. पण त्यांनी आयपीएलचे सामने सर्वप्रथम दाखवले. सेटमॅक्सने सामन्यांना पूरक कार्यक्रम सुरू केले. कपिलदेवला हाताशी धरून सुरू केलेले ‘गली क्रिकेट’, ‘एक्स्ट्रा इिनग्ज’ हे उपक्रम आजही अनेकांना आठवत असतील. त्याच वेळी मंदिरा बेदी हीदेखील निवेदक म्हणून छोटय़ा पडद्यावर आली. क्रिकेट कार्यक्रमात ती पहिली महिला निवेदक ठरली.

सोनी वाहिनीकडे सध्या फुटबॉल, कबड्डी, बॅडिमटन, हॉकी या खेळांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषकाचे सामने ४०० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिले आहेत. क्रिकेटचे प्रसारण भारतात कधीही केले तरी त्याला प्रेक्षकवर्ग लाभतोच, पण इतर क्रीडा प्रकारांनादेखील प्रेक्षक असल्याचे सोनी वाहिन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खेळांच्या संघटनातर्फे होणाऱ्या सामन्यांऐवजी त्यांचे आयोजन वेगळ्या प्रकारे करून एक नवीनच बाजारपेठ निर्माण झाली ती विविध खेळांच्या लीग या प्रकाराने. आयपीएलच्या आधीच्या एका घटनेचा येथे उल्लेख करायला हवा, तो म्हणजे चॅम्पियन्स लीग. ही झी वाहिनीच्या सुभाष चंद्रा यांनी सुरू केली होती; पण तिला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही; पण त्यानंतर आलेल्या आयपीएलने मात्र खेळांसाठी आणि वाहिन्यांसाठीदेखील एक नवीन बाजारपेठ खुली केली. क्रीडा वाहिन्यांना एक नवीन प्रेक्षकवर्ग मिळाला. स्थानिक खेळांची बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने स्टार टीव्हीने त्या खेळातील संस्थांच्या जोडीने हॉकी, फुटबॉल, बॅडिमटन आणि कबड्डी या खेळाच्या लीग सुरू केल्या. हा प्रयोग काही खेळांच्या बाबतीत फसला, पण कबड्डीसारख्या खेळाने मात्र प्रचंड लोकप्रियता मिळवली. खेळांच्या लीग आणि त्यातून निर्माण झालेली बाजारपेठ पाहता मनोरंजन क्षेत्रातील झी युवा वाहिनीनेदेखील आता कुस्ती लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहेत. हे प्रो-रेसिलग लीग, प्रो-व्हॉलीबॉल लीग या सोनी वाहिनीवरील सामन्यांनादेखील चांगला प्रेक्षकवर्ग असल्याचे सोनी वाहिनीचे अधिकारी सांगतात. नुकतेच सोनी वाहिनीने क्रिकेट चॅम्पियन लीगचे तीन वर्षांसाठीचे अधिकार मिळवले आहेत, तर स्टारने आयपीएलचे पुढील पाच वर्षांचे प्रसारणाचे हक्क घेतले आहेत.

क्रीडा वाहिन्यांवरील हा प्रवास एकूणच बाजारपेठेतील स्पर्धा मांडणारा आहे, किंबहुना तो खेळातील चुरशीपेक्षा अधिक उत्कंठावर्धक आहे, असे म्हणता येईल.

वृत्तवाहिन्यांमधील चढाओढ

टीव्ही हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते बातम्या, वृत्तमालिका अशा अनेक गोष्टी एकाच वेळी असंख्य लोकांपर्यत पोहोचवणारे माध्यम आहे याची जाणीव दूरदर्शनच्या काळातच होऊ लागली होती. पण दूरदर्शन हे तर सरकारी माध्यम होते. याच दूरदर्शनवर १९८८ मध्ये ‘वर्ल्ड धिस वीक’ हा कार्यक्रम प्रणव रॉय सादर करायचे. न्यू दिल्ली टेलिव्हिजन या त्यांच्या खासगी कंपनीतर्फे हा कार्यक्रम सादर व्हायचा. पुढे हीच कंपनी एनडीटीव्ही या नावाने खासगी वृत्तवाहिनी म्हणून नावारूपाला आली. आज देशभरात वृत्तवाहिन्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. अगदी छोटय़ामोठय़ा शहरांतदेखील अशा वाहिन्या दिसून येतात. एबीपी नेटवर्क, एनडीटीव्ही, इंडिया टुडे आणि नेटवर्क १८ असे महत्त्वाचे समूह यामध्ये कार्यरत आहेत.

मनोरंजन वाहिन्या आणि वृत्तवाहिन्यांचे अर्थकारण मात्र पूर्णत: वेगळे असते. एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर सांगतात, ‘‘प्रादेशिक मनोरंजन वाहिन्यांच्या तुलनेत प्रादेशिक वृत्तवाहिन्यांची बाजारपेठ कमी आहे. दोघेही तेवढाच कंटेन्ट तयार करतात. पण मनोरंजन वाहिन्यांना जशी पुनप्र्रसारणाची सुविधा आहे तशी वृत्तवाहिन्यांना नसते. काही फीचर कार्यक्रम सोडल्यास बातम्यांमध्ये ताजेपणा लागतोच. तांत्रिकदृष्टय़ा दोन्ही आज समान पातळीवरच आहेत. मराठीत वृत्तवाहिनी सुरू होईल का आणि ती पाहिली जाईल का अशी चर्चा असतानाच अल्फा मराठी आणि पाठोपाठ ईटीव्ही आले. त्यावरून ठरावीक वेळात बातम्या दिल्या जात. पुढे २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या. वृत्तवाहिन्यांना प्रेक्षकवर्ग चांगला आहे, शंभर एक कोटी रुपये गुंतवून नवीन वाहिनी सुरू करता येते, पण ती सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला, वर्षांला आणखी काही कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातच सध्या हे गणित आर्थिकदृष्टय़ा लाभदायक नाही. त्यामुळे वाहिनी सुरळीत ठेवणे हे काम कठीण असते’’

कोणत्याही बातमीचे मूल्य हे ताजेपणात असते. त्यामुळे वृत्तवाहिन्या आल्या तेव्हा घडलेली घटना लगेच पाहायला मिळणे, त्याची माहिती मिळणे हा त्यांच्यासाठीचा महत्त्वाचा घटक होता. पण त्यासाठी टीव्हीसमोर बसावे लागायचे. पण आज तेच काम तळहातावर विसावलेल्या स्मार्टफोनने केले आहे. यापुढील काळातील स्पर्धेबाबत राजीव खांडेकर हाच मुद्दा मांडतात. वृत्तवाहिन्यांचा २५-३० टक्के प्रेक्षक डिजिटल माध्यमांकडे वळल्याचे ते सांगतात. डिजिटल माध्यम हे प्रेक्षकांसाठी सोयीचे आणि फायद्याचे असल्याने हा वर्ग वाढतच जाणार असल्याचे ते नमूद करतात.

वृत्तवाहिन्यांच्या चढाओढीला मनोरंजन वाहिन्यांच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे त्याद्वारे विशिष्ट वर्गाचा, विचारांचा प्रभाव जनमानसावर निर्माण करण्याची यामध्ये असलेली सुविधा. त्यामुळे या क्षेत्रावर पकड मिळवण्यासाठी जशी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच असते तशीच मोठय़ा उद्योग समूहांमध्येदेखील दिसून येते. २०१४ मध्ये रिलायन्सने नेटवर्क एटीन या समूहावर मिळवलेली मालकी हे त्याचेच द्योतक आहे.

मराठी वाहिन्यांची वाटचाल

खासगी वाहिन्या १९९२ मध्ये जरी सुरू झाल्या असल्या तरी त्यांची सुरुवात ही हिंदीमध्ये झाली होती. इतकेच नाही तर ‘झी’ने वृत्तवाहिनी आणि चित्रपट वाहिनी वेगळी केली तीदेखील हिंदीमध्ये. तुलनेने प्रादेशिककडे थोडय़ा उशिराच लक्ष गेले असावे. खरे तर दूरदर्शन या सरकारी माध्यमांचे प्रारूप हे अनेक भाषांमधले होते. पण खासगी वाहिन्यांचा खर्च आणि त्या बाजारपेठेतील व्यवसाय करायची परवानगी हे मुद्दे त्यांनी प्रादेशिकमध्ये तुलनेने उशिरा येण्यामागे असावेत. त्याचबरोबर मराठी प्रेक्षकदेखील हिंदूी वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतात अशी अटकळ त्या वेळी बांधली गेली होती. पण इनाडू आणि सन टीव्ही यांची सुरुवातच मुळी प्रादेशिक भाषांमध्ये झाली होती. त्याचे सरळ सोप्पे कारण म्हणजे थेट त्या भाषांमध्ये असलेला प्रेक्षकवर्ग. १९९९ मध्ये ‘झी’ने प्रादेशिक वाहिन्यांची सुरुवात केली. तेव्हा मराठीला पहिली वाहिनी मिळाली. नंतर ईटीव्ही आले. १९९९ ते २००६ हा कालावधी पाहिला तर दूरदर्शन, झी मराठी (तेव्हाची अल्फा) आणि ई-टीव्ही (आत्ताचे कलर्स मराठी) याच वाहिन्या होत्या. या काळातील मराठीचा एकूण बाजारपेठेतील वाटा आणि अर्थकारण मांडताना कलर्स मराठीचे व्यवसायप्रमुख निखिल साने सांगतात, ‘‘त्या काळात हिंदूीचे प्राबल्य अधिक होतं. वाहिन्यांच्या बाजारपेठेत मराठी वाहिन्यांचा वाटा केवळ सात ते आठ टक्के इतकाच होता, हिंदूीचा ४० टक्क्यांच्या पुढे. तर दाक्षिणात्य व बंगालमध्ये स्थानिक भाषेतील वाहिन्यांना अधिक प्राधान्य होते. आज तामिळनाडूमध्ये तामिळ वाहिन्या पाहण्याचे प्रमाण ९० टक्के आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ५० ते ६० टक्के आणि मराठीत आजही हे प्रमाण २० टक्क्यांच्या खाली आहे.’’

अल्फा वाहिनीचे तत्कालीन प्रमुख नितीन वैद्य सांगतात, ‘‘वाहिनीच्या सुरुवातीच्या काळात काही कार्यक्रम डब केले, काही विकत घेतले, ठरावीक अंतराने बातम्यादेखील असायच्या. २००३ मध्ये मराठी वाहिन्या या तोटय़ात होत्या. हिंदूीसमोर जोरदार स्पर्धा उभी करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे होते. तारा आणि प्रभात या दोन वाहिन्या आर्थिक नुकसानीमुळे बंद पडल्या होत्या. त्यानंतर पहिली मराठी दैनंदिन मालिका (डेली सोप) ‘आभाळमाया’ सुरू झाली. ‘आभाळमाया’ला प्रचंड प्रतिसाद लाभला. मराठी प्रेक्षकाला वळवण्यासाठी त्यांना त्यांचा प्राइम टाइम मिळवून देणे महत्त्वाचे होते. त्या वेळी मराठी चित्रपटदेखील डबघाईला आलेला होता, नाटकांचा डोलारा आर्थिकदृष्टय़ा बळकट नव्हता. तेव्हा मराठी मालिकांना मिळणारे यश जाहिरातदारांना आकर्षून घेणारे होते. त्यातदेखील डेली सोप्सना जाहिरातदारांनी अधिक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.’’ नितीन वैद्य पुढे सांगतात की, तेव्हा मराठी वाहिन्यांचा बाजारपेठेतील वाटा आठ टक्के आणि उत्पन्न केवळ ७० कोटी होते आणि तिन्ही वाहिन्यांचा खर्च १२० ते १५० कोटींच्या आसपास. २००५-०६ च्या दरम्यान मराठी वाहिन्यांचा वाटा हा २१ टक्क्यांवर पोहोचला. वाहिन्यांची उलाढालदेखील वाढली. आज सोनी मराठी आल्यानंतर ही उलाढाल सुमारे ७०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. मालिकांचे अर्थकारण पूर्णपणे बदलले आहे. आभाळमायाचा पहिला भाग हा ६५ हजारांत तयार झाला, तर वर्षांचे बजेट दोन कोटी असायचं. आज हेच बजेट सहा कोटींपर्यंत पोहोचले आहे.

मराठी वाहिन्यांचा विचार करताना सुरुवातीच्या काळात केवळ मनोरंजन क्षेत्रातील वाहिन्या असल्या तरी नंतर मराठी वृत्तवाहिन्यांनी मराठीच्या बाजारपेठेचा विस्तार केला. आज मराठीत मनोरंजन आणि वृत्तवाहिन्या मिळून एकूण १३ वाहिन्या आहेत. त्यापैकी मोजक्याच म्हणजे झी, कलर्स, एबीपी माझा या वाहिन्या आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत आहेत. स्टार प्रवाह ही मध्यंतरी बरीच  सुस्थितीत होती, पण नंतर पुन्हा त्यांचे स्थान घसरले आहे. सध्याच्या वाहिन्यांच्या परिस्थितीबद्दल निखिल साने सांगतात, ‘‘गेल्या दहा वर्षांतील बदलाकडे पाहताना लक्षात येते की नाटक, चित्रपट आणि वृत्तपत्र वाचणारे मराठी प्रेक्षक आवर्जून मराठी वाहिन्या पाहतात. बिग बॉससारखा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांनी आपलासा केला. पण मराठी लोकसंख्येच्या मानाने मराठी वाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या कमीच आहे. काही तर दमदार करून दाखवण्याची वाहिन्यांना संधी आहे. तीन-चार वर्षांत मराठीत कंटेन्ट क्रिएशन हे अधिक चर्चेत राहील. कलर्स मराठीने गेल्या वर्षभरात आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे आणि आर्थिकदृष्टय़ा स्थिर देखील आहे. यापुढे वाहिन्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धेचा फायदा प्रेक्षकांना होणार आहे. स्पर्धा वाढते तेव्हा कल्पकतेला वाव अधिक मिळतो. अर्थकारण बदलते. मालिका निर्मितीवरचा खर्च वाढतो. मराठीपेक्षा हिंदीचे बजेट तिपटीने अधिक असते. पण आता मराठी मालिकादेखील मोठय़ा प्रमाणात आउटडोअर चित्रीकरण करतात, आशयाच्या सादरीकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. हा बदल महत्त्वाचा आहे. वायकॉमच्या बाबतीत बोलायचे तर आम्ही प्रादेशिक भाषांना अधिक महत्त्व देत आहोत. वर्षभरातील प्रादेशिक भाषांमधील गुंतवणूक जास्त असेल. सध्या वाहिन्यांना त्यांच्या बजेटमधील

५०-६० टक्के रक्कम मालिकांच्या निर्मितीसाठी द्यावा लागतो. सर्व वाहिन्यांचा विचार केल्यास ५०० कोटींच्या आसपास रक्कम ही राज्यातील विविध कार्यक्रमांना मिळते. या सर्वातून एक अर्थव्यवस्था तयार होत आहे हे नमूद करावे लागेल.’’

१९९९ साली सुरू झालेल्या मराठी वाहिन्यांचा हा थोडक्यात प्रवास. आजही मराठी प्रेक्षक पूर्णत: मराठी वाहिन्यांकडे वळलेला नाही. किंबहुना ही स्पेस ओळखूनच सोनी वाहिनीनेदेखील मराठी वाहिनी सुरू केली आहे. सध्या झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या तिघांकडे ६५ टक्के प्रेक्षकसंख्या आहे. अशा वेळी सोनी मराठी सुरू झाले आहे. सोनी मराठीचे प्रमुख अजय भालवणकर सांगतात, ‘‘यासाठी सोनीने दोन वर्षे संशोधन केले. प्रेक्षकांची मतं जाणून घेतली. मराठी प्रेक्षक तोचतोचपणाला कंटाळला आहे, त्याला साचेबद्धतेतून बाहेर पडायचे आहे. वाहिनी सुरू करताना याचबरोबर बाजारपेठेचा विचारदेखील करावा लागतो. आपली ब्रॅण्ड इमेज प्रस्थापित करावी लागते. अगदी लोगोपासून, स्क्रीनवर काय कसे दिसते यातील रंगसंगतीपासून अनेक घटकांचा यात समावेश होतो. त्याचबरोबर चांगले कंटेन्ट क्रिएशन महत्त्वाचे असते. त्यामुळे येणारा काळ हा उज्ज्वल आहेच, पण निकोप स्पर्धेमुळे प्रेक्षकांना निवडीचा पर्याय मिळेल.’’

वाहिन्यांचे चित्रपट आणि…

दूरचित्रवाहिनीवरून चित्रपट प्रसारित करण्याची पद्धत ही अगदी दूरदर्शनच्या काळातदेखील होती. पुढे खासगी वाहिन्यांनीदेखील ही पद्धत वापरली, तर काहींनी खास चित्रपटांसाठी स्वतंत्र वाहिन्या सुरू केल्या. पण त्यापुढे जाऊन काही वाहिन्या थेट चित्रपट निर्मितीतच उतरल्या. परदेशी स्टुडिओ आणि वाहिन्यांनी त्यात गुंतवणूक केलीच, पण येथील वाहिन्यादेखील यात मागे राहिल्या नाहीत. झी स्टुडिओ, फॉक्स स्टार स्टुडिओ, वायकॉम १८, सोनी यांनी यात बराच पल्ला गाठला आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला चित्रपट लवकरात लवकर आपल्या वाहिनीवर कसा येईल याची चढाओढ सुरू झाली. सोनी मॅक्सने सर्वात प्रथम वर्ल्ड प्रीमियर सादर केला. वाहिन्यांच्या बॅनरखाली होणारी चित्रपट निर्मिती ही चित्रपटासाठी पथ्यावरच पडणारी ठरली. उपग्रह वाहिन्यांवर चित्रपट दाखवण्याचे हक्क विकणे (सॅटेलाइट राइट्स) हा चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन उत्पन्नाचा मार्ग तयार झाला. अर्थात या व्यवसायात वाहिन्यांचा फायदा नक्कीच होता. कारण सर्वच प्रेक्षक काही चित्रपटगृहांत जात नाहीत. त्यांना टीव्हीवर चित्रपट पाहण्याची एक नवीन संधी मिळाली आणि त्या चित्रपट प्रदर्शनादरम्यानच्या जाहिरातींचा महसूल मिळवण्याची संधी वाहिन्यांना मिळाली.

वाहिन्यांनी केवळ उपग्रह वितरणाचे हक्कच न घेता तयार चित्रपट निवडून, तर कधी चित्रपटाच्या निर्मितीपासून त्यात सामील होऊन चित्रपटाची निर्मिती, प्रमोशन, सादरीकरण, वितरण अशा सर्वच घटकांवर ताबा मिळवला. हा फॉम्र्युला चांगलाच फायदेशीर तर होताच, पण चांगल्या चित्रपटांना एक स्वतंत्र बाजारपेठ या वाहिन्यांनी दिली हे नक्की. मराठीतला तुफान चाललेला सैराट हे त्याचे अगदी ताजे उदाहरण आहे. त्यातून मक्तेदारी तयार झाली असे जरी काहींचे म्हणणे असले तरी तो व्यवसायाचा भाग होता.

हिंदूीमध्ये अनेकदा वाहिन्यांच्या स्टुडिओने चित्रपट निर्मिती करणे यामध्ये स्टार व्हॅल्यू हा महत्वाचा घटक असतो. हिंदूी चित्रपटांचे अर्थकारण स्टार आधारीत अधिक आहे. तरीदेखील काही वाहिन्यांचे स्टुडिओ हे थेट हिंदूी चित्रपट निर्मिती करतात. वायकॉम १८ ने अगदी अलिकडेच मंटो, अंधाधुन या चित्रपटांची संपूर्ण निर्मिती केली होती.

मालिका, रिअ‍ॅलिटी शोच्या बाहेर जाणारे वाहिन्यांचे हे विस्तारीकरण पुढे आणखीनही काही घटकांपर्यत पोहोचले. गेल्या वर्षभरात झी मराठीने तर नाटकांची निर्मिती, दिवाळी अंक आणि विवाह जुळवण्याचे संकेतस्थळदेखील तयार केले आहे. झी मराठीचे व्यवसायप्रमुख नीलेश मयेकर सांगतात, ‘‘झी वाहिनीने मराठी प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. झी वाहिनी ही आज विविध रूपांत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. मराठी चित्रपटासाठी कलाकारांची फौज ‘झी’मुळे मिळाली आहे. पण माझ्यासाठी मराठी कलाकाराला आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डची जाहिरात करण्याइतपत मोठं करायचं आव्हान आहे. मराठीला अजून चांगले दिवस येतील. केवळ मराठी प्रेक्षकच नाही तर आमच्या काही मालिका कन्नड आणि अरबी भाषेतदेखील (अरब देशांसाठी) डब करून प्रसारित केले जातात.’’

खासगी वाहिन्यांच्या सुरुवातीच्या काळात जरी सारा भर हा जनरल एन्टरटेन्मेंट या विषयावर आणि काही प्रमाणात क्रीडा प्रकारावर असला तरी नंतरच्या टप्प्यात इन्फोटेन्मेंट या सेगमेंटला बराच वाव मिळाला. तर फूड आणि लाइफस्टाइल या विभागात सध्या सहा वाहिन्या आहेत. पाककृतींसाठी वाहिलेले फूड फूड हे चॅनल प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी सुरू केले. या वाहिनेने गेल्या सात वर्षांत चांगली प्रगती केली असून सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत हिंदी मनोरंजन वाहिन्यांएवढी व्ह्यूवरशिप मिळवली होती. आता या वाहिनीच्या स्पर्धेत लिव्हिंग फूड्स, एनडीटीव्ही गुड टाइम्स, ट्रॅव्हल एक्सपी, टीएलसी, होम शॉप १८ या वाहिन्या आहेत. सेलिब्रेटी शेफ संजीव कपूर हे एफएमसीजी मार्केटमधील काही फूड उत्पादनांचे अँबॅसिडर होते. त्यांनी वाहिनी सुरू केल्यामुळे अनेक घरगुती स्वयंपाकघरांतील उत्पादने त्यांच्या वाहिनीकडे आली. त्यामुळे वाहिनीच्या नफ्यात पहिल्या तीन-चार वर्षांतच वाढ झाली. इतर वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करणारे शेफ ते स्वत:ची वाहिनी हा त्यांचा प्रवास एकूणच दूरचित्रवाणी क्षेत्रात असणारा प्रचंड वाव दिसून येतो.

बार्कच्या अहवालानुसार २०१७ मध्ये लाइफस्टाइल वाहिन्यांपेक्षा इन्फोटेन्मेंट वाहिन्यांना १५ टक्के अधिक प्रेक्षकवर्ग लाभला आहे.

डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिक आणि त्यांच्या स्वतंत्र वाहिन्या, यांनी भारतीय बाजारात स्वतंत्र स्थान मिळवले. तर सध्या इतिहास वगैरे स्वतंत्र विषयांनादेखील वाव मिळाला आहे. याशिवाय लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून निर्माण झालेली कार्टून वाहिन्या याचा एक वेगळाच अध्याय आहे. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर एका सेगमेंट मात्र कमालीची व्ह्यूवरशिप मिळवली आहे, तो म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक मालिका. या क्षेत्रातील वाहिन्या हा प्रकार सर्वथा वेगळ्या धोरणांवर चालतो.

देशभरातील सर्व वाहिन्यांचा विस्तार इतका प्रचंड आहे की त्या सर्वाची नोंद येथे घेणे शक्य नाही. पण उपग्रह वाहिन्या आल्यानंतरचे काही महत्त्वाचे ट्रेण्ड्स दिसतात त्याचा आपण येथे ऊहापोह केला आहे. आधी हिंदी वाहिन्या, मग त्यातून क्रीडा, वृत्त विभाग वेगळा करणे, नंतर प्रादेशिक वाहिन्या (त्यातही प्रामुख्याने मराठी, बंगाली आणि दक्षिणेतील चार भाषा) आणि नंतरच्या टप्प्यात चित्रपट, लाइफस्टाइल अशा विषयांना मिळालेले स्थान असा एकंदरीत दूरचित्रवाणीचा प्रवास आहे. त्यातही गेल्या चार वर्षांत प्रादेशिक वाहिन्यांवर  अनेक समूहांचा भर दिसून येतो. दूरचित्रवाहिन्याच्या प्रेक्षकवर्गाची विभागणी पाहिली असता दक्षिण भारतात तर स्थानिक भाषेलाच अधिक महत्त्व आहे. पण त्याच वेळी हिंदी, इंग्रजीमध्ये जोडून मनोरंजनाचे अनेक पर्याय देणे यावरच हा डोलारा उभा आहे. तो येणाऱ्या काळात आणखीन वाढतच जाणार आहे.

भविष्यातील टीव्ही

टीव्ही भारतात आला तेव्हा त्याची हेटाळणी मध्यमवर्गीय घरांत इडियट बॉक्स म्हणून करण्यात आली. टीव्ही पाहण्यावर बंधनं होती. इडियट बॉक्समुळे मुलं बिघडतील अशी साधार भावना पालकांच्या मनात होती. पण तेव्हादेखील टीव्ही लोकप्रिय झाला. ८० आणि ९० च्या दशकात टीव्ही आजच्यासारखा परवडणारा नव्हता. एखाद्या छोटय़ा गावात मोजक्या चार-पाच घरांत असणारा टीव्ही अख्खं गाव पाहायचं. तेथून आज एकाच घरात दोन-तीन टीव्ही असा प्रवास झाला आहे. त्यात परत स्मार्टफोनवर असणारे टीव्हीचे अ‍ॅप्स हवे तेव्हा आवडीचे कार्यक्रम पाहायची संधी देतात ती वेगळीच. टीव्ही पाहणारा समूह हा प्रत्येक स्तरात, प्रत्येक वयोगटात आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टीव्हीने आज सर्वाच्या आवडीनुसार स्वतंत्र वाहिन्या तयार करून तसा कंटेन्ट द्यायला सुरुवात केली आहे. तरीदेखील मुख्य धारेतील काही वाहिन्या, त्यांचे कार्यक्रम यांबाबत टीव्हीबद्दल तक्रारींचा सूर अगदी थेट ऐकायला येतो. त्यापैकीच एक म्हणजे आज प्रेक्षक प्राइम टाइम नावाच्या त्याच त्याच कार्यक्रमांना कंटाळले आहेत. आणि अनेकांना न्यू मीडियाचे आकर्षण आहे. भविष्यातील टीव्हीला डिजिटलचा धोका आहे का, हा प्रश्न हल्ली सतत चर्चेत असताना दिसतो. वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत डिजिटल मीडियाने हा प्रेक्षकवर्ग काही प्रमाणात खेचल्याचे त्या क्षेत्रातील लोक सांगतातच. पण याकडे काहीजण वेगळ्या दृष्टीने पाहतात. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप (वाहिन्यांच्या मार्फत प्रक्षेपण न करता इंटरनेटच्या माध्यमातून कंटेन्ट थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणे) हा प्रकार टीव्हीसाठी स्पर्धा नसून ही दोन्ही माध्यमं वेगळी आहेत असंदेखील मत आहे. झी टीव्हीच्या व्यवसायप्रमुख अपर्णा भोसले सांगतात, ‘‘सुरुवातीला स्पर्धेचे हे चित्र तयार झाले होते, पण ही दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे टीव्ही किंवा ओटीटीऐवजी टीव्ही आणि ओटीटी असे म्हणावे लागेल.’’

टीव्ही वाहिन्यांची सध्याची गळेकापू स्पर्धा या वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. तंत्रज्ञान आज सर्वाकडेच आहे. ओटीटी असो किंवा दिवाणखान्यातील टीव्ही, आव्हान असणार आहे ते चांगल्या आशयनिर्मितीचे. त्यामुळे सध्याची स्पर्धा ही चांगला आणि जास्त सकस आशयनिर्मितीची असल्याचे अपर्णा भोसले यांना वाटते.

ओटीटी आणि टीव्ही यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे हे सध्या काही प्रमाणात मान्य करण्यासारखी बाब आहे. पण भविष्यात हीच परिस्थिती राहील याची काय शक्यता असेल. हे माध्यम पूरक असे आहे हे जास्त सुयोग्य ठरेल. कारण आजही ओटीटी कंटेन्टमध्ये सर्वकाही ओरिजनल म्हणजे मूळ कंटेन्ट नसतो. पण जेव्हा असा मूळ कंटेन्ट तयार करणं त्यांना परवडेल तेव्हा गणितं बदलली असतील. आज अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम अ‍ॅप्सवर मोफत पाहायला मिळतात. आणि दुसरीकडे अशा वाहिन्यांसाठी केबल अथवा डीटूएच माध्यमात पैसे भरावे लागतात. अजून आपल्याकडे आयपी टीव्ही (इंटरनेट टीव्ही) रुजला नाही. पण अ‍ॅप्स आधारित टीव्ही आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याची सोय मात्र मोठय़ा प्रमाणात आहे. अ‍ॅमेझॉन भारतीय बाजारपेठेत येत होते तेव्हा अ‍ॅमेझॉनचे भारतीय प्रमुख कृपलानी यांनी सशुल्क अ‍ॅपबाबत मोठे मार्मिक विधान केले होते. ‘लोकप्रभा’शी संवाद साधताना ते म्हणतात, ‘‘आम्ही लोकांना पाणीपुरीच्या पैशात चित्रपट दाखवत आहोत. आम्ही लोकांना पैसे देऊन व्हिडीओ पाहण्याची सवय लावू. लोकांच्या सवयी बदलू.’’

टीव्हीचा आजवरचा प्रवास पाहिला तर त्यातदेखील सवय बदलणे हाच भाग महत्वाचा आहे. अगदी मोजक्या घरांना परवडणारा टीव्ही आज अगदी तळच्या स्तरातदेखील जाऊन पोहोचला आहे. सर्वाना परवडणारे मनोरंजनाचे साधन हेच त्यामागचे महत्त्वाचे कारण होते. लोकांच्या सवयी बदलण्याचे काम टीव्हीने केले आहे. हेच विधान आज ओटीटी कंटेन्ट देणारे प्लॅटफॉर्म करत आहेत. हे पाहता आज लोकांची सवय झालेले आणि परवडणारे मनोरंजनाचे साधन भाविष्यातदेखील टिकवून ठेवावे लागणार आहे हे नक्की.

मालिकानिर्मितीचे अर्थकारण

दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात मोजक्या मालिका झाल्या असल्या तरी नंतर त्याचे गणित जाहिरातींशी जोडल्यानंतर मालिकानिर्मितीला वेग आला. तेव्हा मालिका केवळ १३ भागांची असायची आणि अगदीच लोकप्रिय वगरे झाली तर तिला मुदतवाढ मिळायची. मराठी मालिकांचे ज्येष्ठ निर्माते विद्याधर पाठारे सांगतात की, निर्मात्यांनाच जाहिरातदार शोधून आणावा लागत असे. निर्मितीचा सारा कारभार सांभाळत मालिका मार्गी लावण्यात खूप वेळ जायचा; पण सध्या ते बरेच सुकर झाले आहे. आता चार मालिका आणि दोन चित्रपटांचे चित्रीकरण एकाच वेळी करता येऊ शकते. मालिकांची लांबी वाढली आहे. एका एपिसोडची गोष्ट १०-१५ मिनिटांत सांगून तिला अंतिम स्वरूप देता येते. तंत्रज्ञानात बदल झाला आहे आणि त्याच वेळी आíथक स्थर्यदेखील आले आहे. सध्या मराठी मालिकांचा एक भाग सुमारे अडीच लाखांत तयार होतो. पूर्वी निर्माता आधी कथानक नक्की करायचा. त्याच्या एका भागाचे पायलट चित्रीकरण करायचा आणि मग त्याला वाहिनीकडून पुढील चित्रीकरणाची परवानगी मिळायची. २००९ नंतर मात्र हे चित्र बदलले. तेव्हा वाहिन्यांनी कार्यकारी निर्माता हे पद तयार केले. २००७ मध्ये वाहिन्यांमधील स्पर्धा वाढू लागली होती. वाहिन्या स्वत: प्रेक्षकांच्या आवडीसंदर्भात संशोधन करतात. त्यानुसार संकल्पना कथा सांगतात आणि मालिकानिर्मितीचे काम निर्मात्याकडे येते. वाहिनीचा कार्यकारी निर्माता हा वाहिनीची भूमिका पुढे नेणारा असतो, तो वाहिनीला वेळोवेळी आपले मत कळवत असतो.

या सर्व प्रक्रियेत एकूणच अर्थकारणदेखील बदलले आहे. आज एका मालिकेची निर्मिती करायची असेल तर किमान तीन कोटी रुपये निर्मात्याकडे हवेत. तेवढय़ा रकमेत मालिकेचे १४० भाग तयार होतात. साधारण साठाव्या भागानंतर वाहिनीकडून निर्मात्यांना निर्मितीखर्च मिळायला सुरुवात होते. २००० पूर्वी साप्ताहिक मालिकांचा काळ होता तेव्हा १८० ते २१० सेकंद जाहिराती असायच्या. दैनंदिन मालिकांची लोकप्रियता वाढू लागल्यावर ट्रायच्या नियमानुसार जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटांच्या जाहिराती असतात.