21 February 2019

News Flash

सावरकर

मराठी भाषेविषयीचं कोणतंही लिखाण सावरकरांच्या उल्लेखाशिवाय पूर्णत्वास जाऊ  शकत नाही.

सावरकर

शब्दांचीच ‘रत्ने’
मराठी भाषेविषयीचं कोणतंही लिखाण सावरकरांच्या उल्लेखाशिवाय पूर्णत्वास जाऊ  शकत नाही. त्यांनी मराठी भाषेबाबत इतकं काम केलं आहे आणि तेदेखील इतक्या विविध पातळ्यांवर!

सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणून सगळेच ओळखतात. ते बॅरिस्टर होते हे ही बऱ्याच जणांना माहीत असतं. अंदमानच्या तुरुंगात त्यांनी भोगलेल्या नरकयातना आणि मार्सेला त्यांनी बोटीतून मारलेली उडी या घटनादेखील सर्वपरिचित आहेत.

इथे थोडं विषयांतर केलं पाहिजे. ज्या बंदरात ही रोमांचकारक घटना घडली त्या बंदराचं नांव रोमन लिपीत Marseille असं लिहिलं जातं. पण हे बंदर आहे फ्रान्समध्ये. आणि फ्रेंच भाषेत शब्दांचे उच्चार कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षा खूप निराळे होतात. उदाहरण द्यायचं तर colonel या फ्रेंच शब्दाचा उच्चार चक्क कर्नल असा होतो किंवा rendezvous या शब्दाचा उच्चार रांदेवू असा होतो. कसा, विचारू नका. होतो खरा. तसंच त्या Marseille चा उच्चार मार्से असा होतो.

पण मग सावरकरांनी मार्सेलीसला बोटीतून उडी मारली असं आपण ऐकलं वाचलेलं असतं. त्याचं काय? आता नेमकं काय झालं असेल सांगता येत नाही. पण माझा आपला एक अंदाज आहे तो सांगतो.

सर्वसामान्य भारतीय माणूस Marseille चा उच्चार मार्सेली किंवा असा काही तरी करेल. आणि म्हणून ‘सावरकरांनी बोटीतून उडी मारली ती कुठे?’ या प्रश्नाचं उत्तर ‘मार्सेलीस’ असं दिलं गेलं असावं. हे जरा जुन्या वळणाचं मराठी झालं.. ‘श्रीमंत पुण्यास परतले तोवर खूप उशीर झाला होता’ अशा पद्धतीचं. मग आधुनिक काळातल्या कोणी तरी ते उत्तर वाचलं आणि त्याला ‘मार्सेलीस’ हेच त्या गावाचं नाव वाटलं. म्हणून मग त्या महात्म्याने ‘सावरकरांनी बोटीतून उडी मारली ती कुठे?’ या प्रश्नाचं उत्तर ‘मार्सेलीसला’ असं दिलं असावं.

हे म्हणजे,

प्रश्न – टिळकांचा जन्म कुठे झाला?

उत्तर – चिखलीस

हे वाचून टिळकांचा जन्म चिखलीसला झाला म्हणण्यासारखं आहे!

असो. पण हे विषयांतर झालं. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात डोंगराएवढी कामगिरी करणाऱ्या सावरकरांचं भाषा आणि साहित्य क्षेत्रातही अपूर्व योगदान आहे हे दुर्दैवाने फार कमी जणांना माहीत असतं. आज आपला भर याच क्षेत्रांमधल्या त्यांच्या कामगिरीवर असणार आहे.

सावरकरांनी मराठीत त्यांनी उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती केली. साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची प्रतिभा अर्निबध संचार करी. त्यांनी काय लिहिलं नाही? त्यांनी कविता लिहिल्या. ‘ने मजसी ने’, ‘हे हिंदूुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा’, ‘जयोऽस्तुते जयोऽस्तुत’सारख्या कविता तर जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाला माहीत असतील आणि कित्येकांना मुखोद्गत! त्या ऐकताना अंगावर रोमांच उभे राहात नाहीत असा माणूस विरळा. पण केवळ कविताच काय, त्यांनी ‘कमला’सारखं महाकाव्य लिहिलं. ‘संन्यस्तखङ्ग’, ‘उत्तरक्रिया’ यांसारखी उत्तम नाटकं लिहिली, ‘सहा सोनेरी पाने’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ अशी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली. अबब! केवढी ही साहित्यसंपदा!

पण भाषेबाबत त्यांनी याहूनही अधिक मूलभूत योगदान दिलं आहे. त्यांनी केलेले भाषाशुद्धीचे प्रयत्न हा त्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्याचा एक भाग अरबी, फारसी, इंग्रजी मूळ असलेल्या शब्दांचा वापर टाळून त्या जागी मराठी किंवा संस्कृत चपखल प्रतिशब्द वापरणे हा आहे. त्यांच्या साहित्यनिर्मितीत याचं पुरेपूर प्रतिबिंब पडलेलं दिसतं. जेव्हा त्यांचे समकालीन कवी आणि लेखक सर्रास उर्दू शब्दांचा वापर करत होते तेव्हा सावरकरांचं वाङ्मय मात्र मराठी आणि संस्कृत शब्दांनी आशयघन होत होतं. वर उल्लेखलेल्या कोणत्याही कवितेमधली कोणतीही ओळ मनाशी गुणगुणून बघा म्हणजे सहज पटेल माझं म्हणणं. पण केवळ स्वत:च्या साहित्यामधून असे शुद्ध मराठी किंवा संस्कृत शब्द वापरून थांबते तर ते सावरकर कसले! त्यांनी विविध क्षेत्रांतल्या परक्या शब्दांसाठी अतिशय अर्थपूर्ण मराठी किंवा संस्कृत शब्दांवर बेतलेले शब्द योजले. ते इतके चपखल होते की जनसामान्यांनी ते अगदी सहज स्वीकारले. हे शब्द आता इतके रुळले आहेत की त्यांचा अर्थ असा वेगळा सांगावा लागत नाही. उदाहरणादाखल राजकीय व्यवस्थेशी संबंधित हे शब्द बघा- संसद, विधिमंडळ, अर्थसंकल्प, विधेयक. किंवा क्रिकेटच्या मैदानावरचे हे- यष्टीरक्षक, झेलबाद, चौकार, षट्कार. किंवा सिनेसृष्टीशी संबंधित हे-ध्वनिमुद्रण, चित्रीकरण.

सावरकरांनी लिपीसुधाराबाबत देखील असंच अत्यंत मूलगामी काम केलं आहे. आकार, इकार, उकार, एकार, ऐकार, ओकार आणि औकार  दाखवण्यासाठी व्यंजनांना आपण काना, मात्रा, वेलांटय़ा जोडतो. पण ‘अ’च्या बाबतीत मात्र काही अपवाद आहेत. ‘आ’ दाखवताना आपण ‘अ’ला काना जोडतो. ‘ओ’ आणि ‘औ’देखील इतर व्यंजनांप्रमाणेच काना आणि मात्रांचा वापर करूनच लिहिले जातात. पण ‘इ’, ‘ई’, ‘उ’, ‘ऊ’ आणि ‘ए’, ‘ऐ’ या स्वरांसाठी मात्र आपण वेगळी चिन्हे वापरतो. सावरकरांचं म्हणणं असं होतं की असं करण्याचं काही कारणच नाही. ही सहा अक्षरं अि, ई, अु, अू, अे आणि अै अशी लिहिता येतील की! आणि हे अत्यंत तर्कसुसंगत असल्यामुळे लिहिताना होणाऱ्या कित्येक चुका टळतील की! पण हे केवळ एक उदाहरण झालं. असे अन्य किती तरी बदल त्यांनी सुचवले होते. पण का कोण जाणे लिपीमधले हे बदल फारसे रुजले नाहीत.

२६ फेब्रुवारी हा या महान कवीचा, भाषेबाबत अत्यंत मूलगामी विचार करणाऱ्या विचारवंताचा आणि तो विचार निष्ठेने आचरणात आणणाऱ्या बुद्धिनिष्ठाचा स्मृतिदिन. म्हणून या लेखाचं विशेष औचित्य आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला सादर वंदन.
संदीप देशमुख – response.lokprabha@expressindia.com@ShabdRatne

First Published on February 23, 2018 1:04 am

Web Title: savarkar