03 April 2020

News Flash

मराठी कथेतील भयगारुड आणि ‘घनगर्द’

‘घनगर्द’सह मराठीतील भयकथेच्या प्रांताची सफर...

मराठी भयकथेला चांगले दिवस कोणत्या काळात होते, हा संशोधनाचा विषय आहे.

पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com
टीकायन
मराठी साहित्यविश्वात सांप्रत काळात भयकथा हा साहित्य प्रकार मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ऋषीकेश गुप्ते या लेखकाच्या ‘घनगर्द’ या कथासंग्रहातील शीर्षककथा स्टीव्हन किंगच्या ‘गर्ल हू लव्ह्ड टॉम गॉर्डन’ या कादंबरीवर बेतल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे तयार झालेल्या काहीशा गढूळ वातावरणात  ‘घनगर्द’सह मराठीतील भयकथेच्या प्रांताची सफर…

भयकथांच्या वंचनेचा आरंभिक काळ..

मराठी भयकथेला चांगले दिवस कोणत्या काळात होते, हा संशोधनाचा विषय आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतरची दोन दशके गाडगीळ, भावे, माडगूळकर, गोखले, शांताराम, मोकाशी यांची नवकथा मौजेच्या कारखान्यात ‘रिपेअर’ वगैरे केली जाऊन जोमात बहरत होती. मनोव्यापारांचे तसंच समाजातील सडलेल्या, किडलेल्या वृत्ती-प्रवृत्तींचे विच्छेदन करणाऱ्या आटोपशीर नवकथेचे वजन सामान्य वाचकांमध्ये इतके मोठे होते, की हसविणारे, रिझवणारे आणि चिमटे काढणारे विनोदी साहित्य कायम दुसरे स्थान पटकावून होते. आचार्य अत्रे, पु. ल., जयवंत दळवी यांच्याकडून खुमासदार, पल्लेदार भाषासौष्ठवाचे मासले तयार होत होते. साठोत्तरीच्या दशकात जी. ए. कुलकर्णी, खानोलकर, पानवलकर ही गंभीर कथालेखकांची नामावळ राज्य करीत असताना दुसरी फळी मंत्री, वर्टी यांच्या खुसखुशीत लेखनाच्या भरभराटीची होती. मात्र मराठीतील कथाप्रवाहाच्या सुवर्णकाळात कधीच भयकथा आणि त्याच्या लेखकांना सुगीचे दिवस असल्याचे दिसत नाही.

‘ललित’ मासिकाच्या १९८८ सालातील कथाविशेषांकात नारायण धारप यांनी भयकथांचा तीन दशकांचा आढावा घेणारा एक लेख लिहिला आहे. त्यात या कथा प्रकाराच्या वाटेला आलेल्या उपेक्षेचेच चित्र त्यांनी मांडलेले दिसते. धारपांची कथा कोणत्या वर्षांपासून कुठून सुरू झाली याचा तपशीलही त्यातून प्राप्त होतो. धारप त्यात म्हणतात की, त्यांनी १९५२-५३ सालापासून भयकथा लिहिण्यास सुरुवात केली. नागपूरमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुषमा’ नावाच्या मासिकामधून त्यांच्या ‘दार उघड ना गं आई’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘सदूचे मित्र’,‘ हिरवे फाटक’ या कथा प्रसिद्ध झाल्या. त्याच्या आधीही भयकथा लिहिल्या गेल्या होत्या. मात्र नवकथेच्या वळणाने आटोपशीर असा भयकल्पनाविलास धारपांनीच मराठीत रुजवला, हे म्हणता येईल. कारण धारपांनी रहस्यकथाही लिहिल्या, कौटुंबिक आणि सामाजिक विषयावरील कादंबऱ्याही प्रयोग म्हणून हाताळल्या. मात्र त्यांची खरी ओळख ही मराठीतील भयकथाकार अशीच कायम राहिलेली आहे.

सुरुवातीच्या काळात किंवा पुढे नंतरही त्यांनी लिहिलेल्या कथा परभृत कल्पनेचा विकास करून लिहिल्या गेल्याचा आक्षेप घेत एक वाचकवर्ग कायम धारपांपासून लांब राहिला. तर त्यांच्या भयकथा वाचणाऱ्या वर्गाने सत्तरी ते नव्वदीच्या दशकात भयरसाचा परिपोष करणाऱ्या या साहित्य प्रकाराला इतर साहित्याइतके महत्त्व दिले नाही. मुख्य प्रवाहातील वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धारपांना मोठे कष्ट घ्यावे लागले. नागपूरमधील ‘सुषमा’ नावाच्या मासिकाची साहित्यपटलावरील उलाढाल शोधणे आज अवघड आहे. मात्र त्यात प्रसिद्ध झालेल्या कथा पुढे ‘अनोळखी दिशा’ नावाच्या संग्रहात प्रकाशित झाल्या. हे नारायण धारपांचे कथांचे पहिले पुस्तक १९६३ साली आले, तेव्हा मुख्य प्रवाहात जी. ए. कुलकर्णी, पानवलकर आणि खानोलकरांच्या कथांना प्रचंड वलय होते. मौज, पॉप्युलर, कॉण्टिनेण्टल आणि कुलकर्णी ग्रंथागार यांची कथनसाहित्याच्या पुस्तकांवर पकड होती. पण धारपांच्या वाटय़ाला पहिल्या पुस्तकासाठी यातले कोणतेही प्रकाशक पुढे आले नव्हते. स्वत:च्याच खर्चाने हे पुस्तक काढल्याची नोंद धारपांनी आपल्या लेखामध्ये केली आहे.

शंकर सारडा यांनी वृत्तपत्रात त्यावर लिहिलेल्या विस्तृत परीक्षणानंतर त्यांच्या कथांकडे इतरांचे लक्ष गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे. म्हणजे पहिल्या दशकातल्या धारपांच्या दहा-पंधरा पाने सामावतील इतक्या छोटय़ा आकाराच्या, तरीही मोठा भयपरिणाम करणाऱ्या कथांवर फारसे बोललेच गेले नव्हते. पुढे पहिल्या कथासंग्रहानंतर धारपांची गणना लोकप्रिय लेखकांत झाली, मात्र ती रहस्यकथा शिलेदारांच्या पंगतीत.

सदानंद खाडिलकर यांच्या सदानंद प्रकाशनाच्या रहस्य कथाकारांनी १९६५ ते १९७२ साल गाजविले. गुरुनाथ नाईक, सुभाष शहा, दिवाकर नेमाडे, अनंत तिबिले या लेखकांच्या रहस्यकथांची बावन्नशची (५२००) आवृत्ती छापून पाच ते सात दिवसांत संपत असल्याचा दाखला, रहस्यकथेचे आज उरलेले साक्षीदार देतात. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर खरेदीसाठी ग्रंथविक्रेत्यांसह किरकोळ विक्रेत्यांची प्रचंड रांग लागत असे. दीड दशकापूर्वी जगभर हॅरी पॉटरच्या पुस्तकांसाठी पुस्तकांच्या दुकानांबाहेर लागणाऱ्या रांगांचे जे आश्चर्य आपण व्यक्त केले, ती गोष्ट मराठी वाचकांनी रहस्यकथा खरेदीसाठी फार पूर्वीच केली होती.

१९७५ सालाच्या आसपास दिवाकर नेमाडे, गुरुनाथ नाईक आणि बेळगावच्या पाश्र्वभूमीवर तुफानसिंग हा अफलातून पोलीसमित्र नायक उभा करणारे सुभाष शहा सदानंद प्रकाशनातून बाहेर पडले आणि त्यांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या डझनावरी प्रकाशन संस्था निघाल्या. याच प्रकाशन संस्थांमध्ये बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर यांच्या ग्रामीण जीवनावरच्या कादंबऱ्या, शरश्चंद्र वाळिंबे, एस. एम. काशीकरांच्या रहस्यकथा आणि नारायण धारप यांच्या भयकथा एकाच पंगतीत बसलेल्या दिसतात. दरवाजे (दीपक प्रकाशन), केशवगढी (रसिक प्रकाशन), द्वैत (दीपज्योती प्रकाशन), बहुमनी (विशाखा प्रकाशन), अत्रारचा फास (ज्ञानदा पब्लिकेशन्स) ही नारायण धारपांच्या काही जुन्या प्रकाशनांची नावे. यातली आज कित्येक पुनर्मुद्रित झाली आहेत आणि कित्येक पुनर्मुद्रणाच्या वाटेवर आहेत. कारण गेल्या काही वर्षांमध्ये नारायण धारप यांच्या भयसाहित्याकडे गांभीर्याने पाहणारा वर्ग वाढत असून समाजमाध्यमांवर त्यांचे कथाअनुयायी नव्याने तयार झालेले आहेत.

पण धारपांनी मळवलेली भयकथांची वाट काही सुकर नव्हती. शिफारशीपासून ते वर्षांतील उल्लेखनीय लेखनामध्ये धारपांचा समावेश असला, तरी धारपांच्या भयकथा वाचणारा मध्यमवर्गीय मराठी वाचक विशिष्ट मर्यादेतच होता. साठोत्तरीच्या बंडखोर युगाने मुख्य प्रवाहात भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये यांची तिरकस शैली पचविली. ग्रामीण आत्मकथनांच्या आणि पु. ल. प्रेमाच्या त्या त्सुनामी काळामध्ये मराठीमधील भयकथांची उपेक्षा झाली. लोक एक तर विनोदी साहित्य वाचून पोटभर हसत होते किंवा जी.ए. कुलकर्णीच्या कथेतील दु:खांचे आपल्या आयुष्याशी साधम्र्य पडताळत होते.

भयकथाकार ही पुरेशी ओळख झाल्यावर धारपांच्या कथा ‘नवल’, ‘अद्भुत’, ‘हेर’, ‘पाठलाग’, ‘शेरलॉक’, ‘धनंजय’ या रहस्यकथांना प्राधान्य देणाऱ्या मासिकांमध्ये जोमाने येत होत्या. भयकथेला मुख्य प्रवाहात स्थान मिळावे यासाठी त्यांनी ‘किलरेस्कर’, ‘नवल’, ‘सुगंध’, ‘माणूस’, ‘लोकसत्ता’ या नावाजलेल्या नियतकालिकांच्या दिवाळी अंकांतही कथा देण्यास सुरुवात केली. पण तरीही त्यांना मुख्य प्रवाहातला लेखक म्हणून कधीच मान्यता मिळाली नाही.

‘ललित’च्या कथाविशेषांकातील मुलाखतीमध्ये नारायण धारप स्पष्ट करतात की, रत्नाकर मतकरी, धनंजय जोशी, यशवंत रांजणकर, गजानन क्षीरसागर, पंडित क्षीरसागर आदी काही नावांखेरीज भयकथा हा प्रकार मराठीत चांगल्यापैकी कुणी हाताळलाच नाही. त्यांनी एक आठवण सांगितली आहे, ज्यावरून सत्तरीच्या दशकात मराठी भयकथेकडे नक्की कोणत्या नजरेने पाहिले जाते, हे स्पष्ट होईल.

धारपांनी १९७१ साली ‘निवडक मराठी भयकथा’ हा खंड संपादित केला. त्या संग्रहासाठी कथा जुळवताना त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांना पत्र लिहून त्यांची एक भयकथेकडे झुकणारी कथा मागविली होती. तेव्हा आपली कथा भयकथासंग्रहात छापण्यासाठी मागत आहेत या केवळ कल्पनेनेच जीएंनी संताप व्यक्त केला होता. जीएंची कथा नसलेला आणि त्या काळात भयकथा लिहिणाऱ्या लेखकांना एकत्र करणारा विशाखा प्रकाशनाचा हा संग्रह, आज निवडक वाचनालयांमध्येच अभ्यासायला मिळू शकतो. त्यात दि. बा. मोकाशी, रत्नाकर मतकरी, नारायण धारप यांच्यापासून वसुंधरा पटवर्धन, ग. रा. टिकेकर, अरुण ताम्हणकर, प. ग. सुर्वे, द. चिं. सोमण यांच्या भयकथा सापडतील.

भूतकथांची नारायण धारपांच्याच नजरेतून व्याख्या द्यायची झाली, तर मृत व्यक्तीच्या आत्म्याचा किंवा प्रभावाचा, अतृप्त वासना वा सूड या हेतूने मानवी व्यवहारात प्रवेश झाला तर ती भूतकथा. आणि काही अनैसर्गिक, अतिमानवी वा अमानवी शक्तींचा रोजच्या जगात वावर होऊ लागला तर ती भयकथा. धारपांच्या समकालीन लेखकांच्या भूत तसेच भयकथांना एडगर एलन पो, ब्रॅम स्ट्रोकर, वॉल्टर डी मेअर, एच.पी. लव्हक्राफ्टपासून डझनावरी भयलेखकांचे संदर्भ जोडता येतात. लोकांना पुरते घाबरवून सोडण्याची क्षमता असणाऱ्या आणि अदृश्य शक्तींकडून पुढे काय होणार याची उत्कंठा वाढविणाऱ्या कथांना मराठी मातीत बसविण्याचा प्रयत्न या लेखकांनी केला. काहींनी स्वतंत्र भय आणि गूढ कथा लिहिल्या, तर काहींनी कल्पनेचा एक तुकडा मराठी वाचकांना भावेल अशा पद्धतीने आपल्या वकुबाने सादर केला. हल्ली भयकथांचा हा प्रकार ‘नवल’, ‘धनंजय’ आणि त्या प्रकारच्या दिवाळी अंकांनी सुरू ठेवला आहे.

मेरी श्ॉलीच्या फ्रँकेस्टाईनचे धारपांचे ‘शापित फ्रँकेस्टाईन’ हे रूप जसे मराठीत एकेकाळी लोकप्रिय झाले, तसेच एच. पी. लव्हक्राफ्टच्या ‘कॉल ऑफ कथुलू’चे ‘स्वप्नांचा राजा कुथूलू’ हे रूपांतरही गाजले. स्टीव्हन किंग आणि त्याआधीच्या ब्रिटिश, अमेरिकी कथांच्या मूळ कल्पनांना त्यांनी महाराष्ट्रातील भूमीत, खेडय़ांत, शहर-गावांतील चाळीत जिवंत केले.

यातील दिवाकर नेमाडे हा लेखक हेरकथा लिहिणाऱ्या महत्त्वाच्या लेखकांमधील होता. ‘भुताटकीचा वाडा’, ‘बुद्धविहारातील भिक्षू’, ‘गढीतील वासनाशरीरे’ या त्यांच्या भूतकथा वाचल्या तर अचंबित व्हायला होते. पातंजली नावाच्या नाथपंथीय साधूच्या गुप्त धन आणि संपत्तीसाठी जारण-मारण तंत्र करणाऱ्या मांत्रिकासोबतच्या विदेही लढाया वाचताना भुतांचे कित्येक प्रकार उपप्रकार पात्रं म्हणून भेटतात. मुंजा, आसरा, खविस, झोटिंग तसेच कित्येक भूतप्रकारांची ओळख या भूतरहस्य कथांमधून मिळते. प्रचंड वाचनमूल्य असलेले लेखन करणाऱ्या या लेखकाची माहितीही भयकथांबाबतच्या अनास्थेमुळे साहित्य पटलावरून पुसली गेली आहे.

नुकत्याच आपल्याकडे गाजलेल्या ‘तुंबाड’ या चित्रपटातील धनलालसेची गोष्ट नारायण धारप यांच्या आजी आणि बळी यांवर आधारलेली असल्याचे त्याच्या चित्रकर्त्यांने म्हटले आहे. पैकी आजी ही लव्हक्राफ्टीयन भय परंपरेत विस्तारित झालेली गोष्ट आहे. या परंपरेत घरांमध्ये माणसांसोबत चेटकीणसदृश व्यक्तिरेखेचे असलेले वास्तव्य अनेक लेखकांनी अनेक प्रकारे रंगविले आहे. प्रामुख्याने लहान मुलांच्या पुस्तकांसाठी ओळखल्या गेलेल्या वॉल्टर डी मेअर या लेखकाची ‘सिट्न्स आण्ट’ आणि ज्याच्या कथा-कादंबऱ्यांवर कित्येक हॉलीवूडपट झाले त्या स्टिव्हन किंगची ‘ग्रॅम्मा’ ही कथा या परंपरेतील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली उदाहरणे.

स्टिव्हन किंगच्या ‘ग्रॅम्मा’वरून बेतलेली मराठी मातीतील आजी (सिनेमा पाहताना किंवा कथेत वाचताना) जशी आपल्याला घाबरवून सोडते तशीच मूळ लव्हक्राफ्टीयन परंपरेला आजच्या युगात हाताळू पाहणारी ऋषीकेश गुप्ते यांची ‘गानुआज्जीची अंगाई’ नावाची कथाही वाचकाला हादरवून सोडण्यात यशस्वी होते. मानवी भयसंकल्पनांचा अद्भुत आणि सर्वार्थाने वापर करणारी ऋषीकेश गुप्ते यांची कथा गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये अनेक संक्रमणांतून गेलेली पाहायला मिळते. मुख्य प्रवाहातील साहित्य व्यवहाराने मारलेले शिक्के नारायण धारप हयातभर पुसू शकले नाहीत. पण गुप्ते यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून नाराण धारपांच्या पुढे जात मुख्य प्रवाहात मारलेली मुसंडी ही प्रचंड लेखकीय कामगिरी मानावी लागेल.

द गर्ल हू लव्हड टॉम गॉर्डन आणि घनगर्द..

खरे तर ‘घनगर्द’बाबत खुद्द लेखकाने पुरेसे स्पष्टीकरण केल्यानंतर नव्याने सांगायला काहीच उरत नाही. ‘घनगर्द’ या संग्रहामुळे ऋषीकेश गुप्ते यांना लोकप्रियतेचे वलय, पुरस्कार अशा सगळ्या गोष्टी लाभल्या. त्यानंतर त्यांच्यावरील आरोप-आक्षेप समाजमाध्यमांद्वारे अत्यंत चुकीच्या पद्धतीने उकरून काढण्यात आले. चौर्यकर्माचा नवा शोध लावल्याचा दावा करत साहित्याच्या हिताची गमतीशीर भाषा केली जाऊ लागली.

फेसबुक हे सर्वोच्च न्यायालय असल्यासारखे आणि आपण तेथील न्यायाधीश असल्यासारख्या खंडन-मंडनाच्या अखंडित आणि जुन्याच चर्चाना नव्या वळणावर आणून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून मराठी साहित्याचे किती हित झाले, वाचनालयातून वा दुकानातून ‘घनगर्द’ किती जणांनी वाचली आणि अमेझॉन वा इतर माध्यमातून ‘.. टॉम गॉर्डन’चे किती जणांनी अवलोकन केले यावर हाताच्या बोटांवर मोजणारी मंडळी देखील फेसबुकवर प्रगटली नाहीत.

ऋषीकेश गुप्ते यांच्या लेखनाची ओळख बहुतांश सामान्य वाचकांना बहुधा ‘हजार वेळा शोले पाहणारा माणूस’ या ‘अनुभव’ मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या कथेतून झालेली असते. या कथेद्वारे मुख्य प्रवाहात येण्याआधी त्याचे नाव बराच काळ भयकथांसाठी ओळखीचे होते.

आपल्याकडे साहित्यिक सीमा इतक्या गमतीशीर आणि पूर्वग्रहदूषित आहेत, की एका प्रकारचे साहित्य वाचणारा दुसऱ्या साहित्याकडे ढुंकूनही पाहात नाही. परिणामी विनोदी, खुसखुशीत वाचणारा गंभीर साहित्याकडे वळत नाही. गंभीर वाचणारा आपण फारच उच्चप्रतीचे वाचन करीत असून इतरांना तद्दन फुटकळ संबोधल्याशिवाय राहात नाही. तर यापलीकडे आडगावच्या, शहरगावांतल्या वाचनालयांमधील वाचकांकडून वेगवान कथानकांच्या साहित्याला मागणी अधिक असते. त्याला साहित्यातील या श्रेणीपद्धतीशी काही घेणे-देणे नसते. उपलब्ध होणाऱ्या वाचनीय कादंबऱ्यांच्याच तो शोधात असतो. या वाचकांनीच बाबा कदम, अशोक थोरे, सुहास शिरवळकर, सुभाष शहा, एस.एम. काशिकर, गुरुनाथ नाईकांचे साहित्य लोकप्रिय केले होते. पण सुहास शिरवळकरांपासून जयंत रानडेंपर्यंत तसेच चिंतामणी लागूंपासून ते शरश्चंद्र वाळिंबे यांना कधीही मुख्य प्रवाहातील साहित्यिक म्हणून मान्यता मिळाली नाही. सर्वच प्रकारच्या वेगवान कादंबऱ्या लिहिणाऱ्या या लेखकांच्या पुस्तकात मुखपृष्ठापासून निर्मितीमूल्यात काटकसर केलेली आढळते. पण आतील मजकूर खिळवून ठेवणारा असतो. या लेखकांच्या पुस्तकप्रवाहाच्या शेवटच्या टप्प्यात गुप्ते यांच्या लेखनाचा आरंभ झालेला दिसतो. साधारणत: दोन हजारच्या आसपासपर्यंत या कादंबऱ्या मुंबईतील मनोरमा प्रकाशनासह कोल्हापूर, सातारा, पुण्यातून निघत होत्या. थोडाफार शोध घेतला तर ऋषीकेश गुप्ते यांच्या  नावावर ‘गढूळ’ ही कादंबरी असल्याचे मनोरमा प्रकाशनाच्या कोणत्याही २००८ सालापर्यंत छापून आलेल्या पुस्तकामागच्या जाहिरातीमध्ये दिसू शकते. मात्र त्यानंतर त्यांनी लिहिलेली ‘कालनिर्णय’ ही कादंबरी शोधूनही एखाद्या ग्रंथालयामध्ये सापडणार नाही. गुप्ते यांच्या नावावर या कादंबऱ्या असल्याचे विधान येथे होत असले, तरी गुप्ते यांच्या आज प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर या कादंबऱ्यांचे उल्लेख नाहीत. कारण त्या कादंबऱ्यांवर परकीय कल्पनेची मात्रा अधिक असल्याने त्यांचे श्रेय घेणे त्यांनी पूर्णपणे टाळलेले दिसते.

या कादंबऱ्यांपैकी ‘गढूळ’ ही कादंबरी स्टीवन किंगने टोपणनाव धारण करून लिहिलेल्या ‘रेग्युलेटर्स’ या कादंबरीचे रूपांतर होते, तर ‘कालनिर्णय’वर किंगच्याच ‘लॅन्गोलिअर्स’ या विमानथरार लघुकादंबरीचा मोठा प्रभाव होता. किंगचे सारे साहित्य आज जसे उपलब्ध आहे, तसे तेव्हाही मोठय़ा प्रमाणावर पेपरबॅक आवृत्त्यांच्या स्वरूपात भारतात उपलब्ध होते. छोटय़ा-मोठय़ा दुकानांमध्येच नाही, तर रद्दीच्या दुकानांपासून पदपथावरील ग्रंथविक्रेत्यांकडे नव्वदीच्या दशकात स्टीवन किंग लोकप्रिय होता. किती लेखकांनी या काळामध्ये किंगच्या कित्येक पुस्तकांवर आधारित, रूपांतरित किंवा मूळ कल्पनेला भारतीय तोंडवळा देऊन लहान लहान प्रकाशनांसाठी लिखाण  केले, ते शोधणे अत्यंत अवघड आहे. नारायण धारपांनी किंगच्या बऱ्यापैकी कादंबऱ्या मराठी मातीत रुजविल्या. त्यातल्या काही पूर्ण मराठी वाटतात. तर काहींच्या कल्पना परकीय असल्याचे नजरेतून सुटत नाही.

गुप्तेंच्या त्या दोन आधारित कादंबऱ्या आज जवळपास हद्दपार झाल्या आहेत. त्या लिहून गुप्ते यांनी मराठी साहित्याचे कोणतेही नुकसान केल्याचे आपल्याकडच्या स्वयंघोषित साहित्यहितैशी समाजास दिसून आले नाही. त्यांनी वाचकांशी प्रतारणा केल्याचे किंवा घोर अपराध केल्याचेही कुणाला समजले नाही. कारण समाज माध्यमांवर उच्चरवात खंडनमंडन करणाऱ्या साहित्यप्रेमी व्यक्तींना या पुस्तकांबाबत माहितीच नसावी.

गुप्ते यांच्याशी या पुस्तकाच्या लेखनासंदर्भात दूरध्वनीवर संपर्क केला असता, त्यांनी ‘या कादंबऱ्या मी लिखाणात अगदीच नवखा असताना रूपांतरित केल्या होत्या. माझे स्वतंत्र लिखाण करायला लागेस्तोवर त्या वाचकांकडूनच बाद झाल्या होत्या. तेव्हाही मी त्यांचे श्रेय जाहीरपणे घेत नव्हतो.’ असे सांगितले.

गुप्ते यांच्या पुण्यातील साहित्यिक निकटवर्तीयांशी याबाबत विचारणा केली असता निम्म्या लोकांनी या कादंबऱ्याच माहिती नसल्याचे सांगितले. तर उरलेल्यांनी या आधारित कादंबऱ्यांबद्दलच नाही, तर ज्या कथांवरून साहित्य चोरी केल्याचा आरोप झाला आहे, त्या कथांच्या प्रभावाबद्दलही गुप्ते यांनी अनेक वर्षांपूर्वी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती दिली. मग पुण्यामधूनच गुप्तेंवर आत्ता कथाचोरीचा आरोप होण्याची कारणे काय, हे उमजणे कठीण आहे.

आता ‘गर्ल हू लव्ह्ड टॉम गॉर्डन’ या १९९९ साली प्रकाशित झालेल्या किंगच्या कादंबरीविषयी. ही नॉव्हेला किंगच्या लोकप्रिय किंवा नावाजलेल्या पुस्तकांमध्ये मोडत नाही. आई आणि भावासोबत जंगलात फिरायला गेलेली असताना हरवलेल्या एका नऊ वर्षांच्या मुलीने तब्बल नऊ दिवस जंगलात भरकटताना टॉम गॉर्डन या आपल्या लाडक्या बेसबॉलपटूची मनाने सोबत घेणे, हा या कादंबरीचा महत्त्वाचा भाग.

गुप्ते यांच्या ‘घनगर्द’ या कथेत पुण्यात राहणारी पौगंडावस्थेच्या उंबरठय़ावर असलेली एक मुलगी आहे. ती आपल्या आई-बाबांसोबत माथेरानला गेली असताना कडय़ावरून कोसळून एक रात्र तेथील जंगलात अडकते. त्या रात्री स्वत:च्या भवतालाचा विचार करताना तिला माणसांनी भरलेल्या जंगलाचे आकलन होते, असा हा कथेचा गाभा आहे. दोन्ही कथानकांत कुटुंबातील वातावरण दोलायमान परिस्थितीतले, नायिकांचे मनाने लोकप्रिय खेळाडूसोबत वावरणे हे घटक सारखेच असले, तरी काही घटकांपलीकडे स्टीवन किंगची कादंबरी लांब पल्ल्याची आणि आशयाच्या अंगानेही बऱ्याच वेगळ्या पातळीपर्यंत पोहोचणारी आहे.

कादंबरीच्या गोषवाऱ्यावरून तिच्यातील अनेक घटकांचे ‘घनगर्द’शी साधम्र्य असल्याचे दाखविले ज्या पद्धतीने जात आहे, त्याचप्रमाणे वेगळ्या घटकांचीही जंत्री देता येऊ शकेल. अर्थात वाचनानंतरही ‘दोन्ही कथानकं सारखीच आहेत’ असेच सिद्ध करायचा हेतू असेल, तर त्याला कुणीच थांबवू शकणार नाही.

‘घनगर्द’ दोन हजारोत्तर काळातील पुण्यातील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बदलत्या जीवनशैलीत भयवाटा शोधणारी दीर्घकथा आहे. या काळात आयपीएल क्रिकेट पाहण्याचे वेड देशभरात सारखेच होते. मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी तीव्र होता आणि त्यांच्या प्रमुखांची लफडी-कुलंगडी चर्चेचा मुद्दा होता. अशाच एका वाहिनीप्रमुखाच्या कुटुंबातील नवरा-बायकोच्या संघर्षांत पोळल्या गेलेल्या गार्गी नावाच्या मुलीची ही गोष्ट आहे. आई-बाबांच्या भांडणातील समेटाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत माथेरानला पोहोचलेली गार्गी कडय़ावरून कोसळते, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा बाबाही कोसळला याची माहिती नसणारी गार्गी बचावते. मृत्यूची चाहूल लागलेली असताना आपल्या त्रोटक आयुष्यातील प्रसंगांचे, पुरुषांचे, शाळेतले, मैत्रिणीसोबतचे आणि घराभोवतालच्या परिसरातील घटनांचे संदर्भ तिला नव्याने उलगडू लागतात. क्रिकेटवीर युवराज सिंग याच्यासोबत मनाने केलेली भटकंती आणि संवाद यांचा आधार आठवू लागतो. वयसुलभ बंडखोरी आणि त्यातली अपराधी भावना जाणवू लागते.

या घटनांमध्ये गुप्ते यांनी अत्यंत कारागिरीने भयजाणिवा पेरल्या आहेत. स्नेकओनर, रेपिस्ट, शेणॉय या दुय्यम आणि तिय्यम महत्त्वाच्या पात्रांसोबत कथानकात मुंबई-पुण्यातील जगण्याचे लख्ख तपशील उभे राहिलेले दिसतात. युवराज सिंगने आयपीएल क्रिकेटमध्ये सहा सिक्स मारण्याच्या विक्रमाची देशभरातील क्रिकेटप्रेमींना वेड लावणारी घटना अत्यंत प्रेमाने चित्रित झाली आहे.

गुप्ते यांनी ‘..टॉम गॉर्डन’चा आराखडा उचलला, असे म्हटले, तर दोन-अडीचशे पानांच्या त्या कादंबरीचे ६० पानांमधले हे त्रोटक रूपांतर ठरू शकेल. आधारित म्हणावे, तर दोन्ही कथानकांचा आशय पूर्णपणे वेगळा असल्याचे जाणवते.

गेली २० ते ३० वर्षे सातत्याने स्टीवन किंगचे वाचन करणाऱ्या गणेश मतकरी यांनी किंगचे ‘..टॉम गॉर्डन’ आणि ‘घनगर्द’ यातील कथित साम्याबाबत सांगितले की, ‘घनगर्द’वर किंगच्या टॉम गॉर्डनचा प्रभाव आहे, पण तो अगदी मर्यादित स्वरूपाचा. त्याला प्रभाव म्हणता येईल, मात्र साहित्याची चोरी निश्चित म्हणता येणार नाही. दोन्ही कथानकांमधील साम्य काही घटकांपुरते मर्यादित आहे. दोन्हींची नायिका जंगलात हरवलेली लहान मुलगी असणे, दोन्ही ठिकाणी घरातील वातावरण बिघडलेले असणे आणि दोन्ही कथांमधील खेळाडूचा वापर या प्रामुख्याने सारख्या गोष्टी मानाव्यात. पण मला दोन्ही कथांमध्ये फरक जाणवतो तो आवाक्याचा. किंगची कथा जवळजवळ लघुकादंबरी आहे. पण तिची मांडणी बरीचशी सोपी आणि साहसकथेसारखी आहे. याउलट ‘घनगर्द’मधील मांडणी काळाचा वैशिष्टय़पूर्ण रीतीने वापर करणारी आहे. त्यातला आशय अधिक प्रौढ, समजूतदार आणि वाचकाला जवळचा वाटणारा आहे. मला दोन्ही कथांमधील साम्यस्थळांसह त्यांचे दृष्टिकोन आणि निवडलेले रस्ते वेगवेगळे वाटतात, त्यामुळे मी त्यावर थोडा प्रभाव आहे असे मानूनदेखील तिला स्वतंत्र समजतो.’

गणेश मतकरी यांनी थेटपणे गुप्ते यांच्याविषयी आपले मत स्पष्ट केले.

‘गुप्ते यांच्या सुरुवातीच्या कामावर परकीय प्रभाव आहे, याची मला कल्पना आहे. विशेषत: ‘काळ्या कपारी’ या कथेवर. जी बरीचशी स्टीवन किंगच्या ‘एन’ नावाच्या कथेवर आधारित आहे. या लेखनाचे श्रेय किंगला देणे, निदान मूळ कल्पना परकीय असल्याचा उल्लेख पुस्तकात असणे आवश्यक होते. पुढल्या आवृत्त्यांमध्ये ते करायला हवे. पण त्यामुळे गुप्तेंच्या सगळ्या कथांवर ठपका येऊ नये. कारण नंतरच्या काळात गुप्तेंनी भयकथांचा ढाचा वापरत वेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. ‘दंशकाल’नंतर ते आजच्या महत्त्वाच्या लेखकांमध्ये गणले जातात आणि ‘दंशकाल’ नक्कीच स्वतंत्र आहे,’ असे मतकरी यांनी सांगितले.

‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या कथेनंतर गुप्ते यांचे कल्पितसाहित्य मुख्य प्रवाहात मोठय़ा प्रमाणावर गौरविले गेले. दोन भयकथासंग्रह आणि दोन कादंबऱ्यांनंतर आजच्या घडीचा सर्वाधिक कल्पनाशील लिहिता हात म्हणून त्यांची ओळख आहे. ‘घनगर्द’मधील इतर कथा त्यांच्या लेखनप्रवासाचे धागे शोधण्यासाठी उपयुक्त ठरतात.

‘घनगर्द आणि लेखनमुळांचा शोध

‘पावसात आला कोणी’, ‘पानगळ’, ‘मुआवजा’ आणि ‘रमलवाटा’ या गुप्ते यांच्या आणखी चार कथांबाबत मधल्या काही काळात कोणतीही चर्चा झाली नाही. ‘घनगर्द’ कथेच्या मुळावरून जो काथ्याकूट झाला, तेवढा वेळ पुढील कथा वाचायला संबंधितांनी द्यायला हवा होता. त्यातून गुप्ते यांच्याच लिहिण्यातले दुवे सापडू शकले असते.

‘पावसात आला कोणी’ या कथेमधील रायटर्स ब्लॉक झालेल्या लेखकाकडे भेटायला तरुण येतो आणि तुम्ही लिहिलेल्या कल्पना मला सुचलेल्या असल्याचा असा दावा करू लागतो. म्हणजे निवेदक लेखक असल्यावर थेट आरोपाच्या गोष्टी करू लागतो. लेखकाच्या गाजलेल्या सगळ्या कलाकृती आपल्याला कधी, कशा सुचल्या हे नमूद करू लागतो. वर पीएमटीच्या मंडई ते धायरी बसमध्ये कुणी तरी काचेच्या पेल्यातून स्ट्रॉने फळांचा रस प्यावा तशी मेंदूतून कल्पना शोषून घेण्याच्या प्रक्रियेविषयी सांगू लागतो. भयनिर्मितीचा हा अद्भूत प्रकार आहे. अन् ज्या नैतिक पेचामध्ये कथेमधला निवेदक सापडतो, तोच नैतिक पेच नेमका गुप्तेंच्या कथेविषयी निर्माणकेला जात आहे, ही यातील गमतीशीर बाब मानावी लागेल.

‘पानगळ’ ही आयुष्यभर अपराधगंड बाळगून असलेल्या लेखक निवेदकाच्या मुक्तीची गोष्ट आहे. कोकणातील खेडय़ातील देवधरवाडी, तेथील मूल-बाळ नसलेले, मात्र त्याची आकांक्षा असणारे विजोड जोडपे आणि त्यात निवेदकाची मित्रासह झालेली छोटीशी चूक  या घटकांवर प्रदीर्घ पल्ला गाठणारी कथा गुप्ते यांनी रेखाटली आहे. दिवाकर नेमाडे या एके काळी मराठी रहस्य-भूतकथा लिहिणाऱ्या, जवळपास दुर्लक्षित राहिलेल्या लेखकाच्या ताकदीशी जुळणारी ही कथा आहे. ‘मुआवजा’ कथेतील नायकावरही भूतकाळातील एका विशिष्ट गोष्टीचे ओझे आहे. अन् तोही लेखकच आहे. त्याचे लेखकपण फार विस्ताराने यात समोर आलेले नसले, तरी २१ वर्षांनतर मनावरचे ओझे उतरवून टाकण्यासाठी तो जत्रेतल्या गारुडय़ाच्या पालावर दाखल झालेला आहे.

नाग-साप पाळणाऱ्या लोकांचा लेखकाच्या मनावर अफाट पगडा दिसतो. या संग्रहातील प्रत्येक कथेमध्ये साप पाळणाऱ्या व्यक्ती येतात. ‘घनगर्द’मधील दुय्यम पात्र स्नेकओनर, ‘पानगळ’मधील देवधर काकू, ‘मुआवजा’मधील गारुडी अन् त्यांचे त्यावरचे प्रेम हा देखील कथेच्या भयविस्तारासाठी उपयुक्त घटक म्हणून गुप्ते वापरतात.

संग्रहातील शेवटची ‘रमलवाटा’ या कथेतील नायकाचे निवेदन हे गुप्तेच्या साहित्यिक भूतकाळाविषयी बरेच सांगणारे आहे.

हा निवेदक नायकाविषयी म्हणतो. ‘त्याने लिखाणाची सुरुवात भय-गूढ साहित्यापासून केली होती. याच साहित्याने त्याला लोकमान्यताही दिली. नंतर त्याने जेव्हा जेव्हा भय-गूढापलीकडे जाणारं लिहिलं, तेव्हाही त्याच्या चाहत्यांनी त्याचं स्वागतच केलं. अर्थात साहित्यविश्वाच्या प्रांगणात तो जसजसा स्थिरावू लागला आणि या इवल्याशा प्रांगणातले राजनीतिनियम त्याला समजू लागले, तेव्हा नेमकं कोणत्या प्रकारचं साहित्य राजमान्य आहे, हे त्याला उमगलं आणि त्याच दरम्यान केव्हा तरी त्याने त्याच्या मूळ लिखाणाची कास सोडली.’

ही कथा आहे मुख्य प्रवाहातील साहित्यविश्वात बऱ्यापैकी नाव झालेल्या लेखकाची. सारे काही नीट सुरू असताना दिवेकर नावाच्या व्यक्तीचा त्याला फोन येतो. साहित्याची जाणकार असलेली ही व्यक्ती त्याला सतत पूर्वीप्रमाणे गूढकथा लिहिण्याचा आग्रह करीत राहते. ‘रमलवाटा’ नावाच्या वाईमधील त्या व्यक्तीच्या घरी लेखक पोहोचतो आणि त्याच्यासमोर भयाचा नवाच प्रदेश उलगडू लागतो.

‘पावसात आला कोणी’ आणि ‘रमलवाटा’ या दोन्ही कथांमध्ये थोडेसे साम्य आहे, मात्र परिणामांच्या बाबतीत दोन्हींची प्रकृती भिन्न आहे. ‘पावसात आला कोणी’मध्ये गुप्तेंच्याच सतत पतंग उडविणाऱ्या माणसाच्या ‘२६व्या गोष्टी’चा संदर्भ आहे.

‘घनगदर्’मधून ऋषीकेश गुप्ते यांच्या कथेने एक उंबरठा ओलांडला असून ती अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होत चालली असल्याचा आणि अद्भुताचा मार्ग तिने सोडलेला नाही’ हा दाखला समीक्षक निखिलेश चित्रे यांनी या संग्रहाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेमध्ये दिला आहे. २०१८ सालातील प्रतिष्ठित दिवाळी अंकांतील त्यांच्या तीन दीर्घकथा ही त्याचीच साक्ष म्हणावी लागेल.

‘अंधारवारी’ आणि ‘दैत्यालय’ या संग्रहावेळी गुप्ते यांच्या भयकथा इतक्या ठळकपणे मुख्य प्रवाहात येतील असे वाटले नव्हते. पण कोकणाच्या मातीतील भयसंकल्पना ‘दंशकाल’मध्ये वापरून गुप्तेंनी आपल्या लेखनाची ताकद सिद्ध करून दाखविली. भाषिक प्रयोगांसह, आत्यंतिक सूक्ष्म वर्णनांसह गुप्तेंची कथा वाचकाला आपल्या ताब्यात घेते.

आगामी काळात कुणी ‘सिक्रेट विंडो, सिक्रेट गार्डन’वरून ‘घनगर्द’मधील ‘पावसात आला कोणी’ बेतली आहे. मॅक्झिम गॉर्कीच्या ‘ट्वेंटी सिक्स मेन अ‍ॅण्ड ए गर्ल’ या कथेवरून ‘सव्विसावी गोष्ट’ ही कथा बेतली आहे, असे दावे केले, तरी नवल वाटणार नाही. पण भयकल्पित कथांना चांगले दिवस आणून देणाऱ्या गुप्तेंचा लिहिता हात सध्याच्या गढूळ वातावरणामुळे थांबला, तर मराठी साहित्याची ती खरी हानी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 1:05 am

Web Title: scary stories in marathi
Next Stories
1 घोंगडी उरली देवापुरती!
2 हतबल हत्ती! (ओदिशा)
3 ‘हिल्सा’ला मासेमारीचे ग्रहण (पश्चिम बंगाल)
Just Now!
X