मधुमेद म्हटलं की आपण सगळेच साखरेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. पण आता नव्या संशोधनानुसार साखर नव्हे तर कबरेदकं हीच त्यासाठी कारणीभूत आहेत.

मधुमेद परतवता येतो का, या प्रश्नाचे उत्तर हो, येतो परतवता असे आहे. हे कसे शक्य होते हे बघण्यापूर्वी, हे अशक्य का वाटायचे ते बघूया. त्या आधी एक गोष्ट सांगतो. एकदा समुद्र किनाऱ्यावर, अर्धी पाण्यात, अर्धी वाळूत अशी एक मुलगी पडलेली दिसली. ते दृश्य बघून, ‘काहीतरी भानगड दिसते आहे, गेली असेल बोटीवर पार्टीला, पिऊन पडली असेल पाण्यात. आणि वाहत आली शेवटी इथे’ असे म्हणत अनेकांनी काढता पाय घेतला. काही जण जवळ गेले आणि कसलीही हालचाल नाही हे बघून एकदम थबकले. ‘कोणीही पुढे जाऊ नका, आपल्या पावलांचे ठसे उमटतील आणि पोलिसांना गुन्हेगाराचे ठसे शोधायला त्रास होईल. क्राइम सीन अजिबात डिस्टर्ब करायचा नसतो.’ असे म्हणून त्यांनी १०० नंबरवर फोन लावला देखील. इतक्यात दोन-तीन मुली तिथे आल्या. त्यांनी पुढे जाऊन सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन चालू केले. एकीने अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. अ‍ॅम्ब्युलन्स आली. ऑक्सिजन चालू झाला. त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये हलवली. तिचे पुढे काय झाले असेल? ती चक्क वाचली. पूर्वी इतकी शार्प नाही, पण व्यवस्थित आहे. तिचं लग्न होऊन, मूलही झालं आहे. ती आईचं म्हणून जे काही काम ते ती व्यवस्थित करते आहे.

या गोष्टीचा शेवट जरी, ‘..आणि ते सुखाने नांदू लागले’ स्टाइल वाटला तरी त्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या मुलीला समुद्रावर बघितल्यानंतर बहुतेकांनी ती मृत आहे हे गृहीत धरले. असेच मधुमेदाच्या बाबतीत होते. मेडिकल कॉलेजमध्ये मधुमेद शिकविताना एक वाक्य वापरले जाते, ते असे, ‘इट्स डिसिज विथ प्रोग्रेसिव्ह डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स’ त्यातून काय प्रतिमा मनात निर्माण होते? इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी मृत आहेत. ज्या काही जिवंत आहेत त्या पण मरणपंथाला लागल्या आहेत. काही वर्षांत त्या पेशी मरतील व बाहेरून इन्सुलिन देत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उपचार पण कसे तर ‘आहेत जिवंत तोपर्यंत पेशींकडून काम करून घ्या’, त्या कामात कमीतकमी अडथळा येईल हे बघितले की झाले. हा असा एखाद्या रशियन दु:खान्त कथेसारखा, पराभूत दृष्टिकोन ठेवूनच मधुमेदाचे उपचार चालत असत. हृदय आणि फुप्फुसे बंद पडली असताना, मेंदूला रक्तपुरवठा चालू ठेवून, माणसाच्या जगण्याची शक्यता वाढविण्यासाठी; छातीवर दाब देत, तोंडात हवा भरीत प्रयत्न करतात. हे करताना जेव्हा हे उपचार देणाऱ्याचा भाव जर असा असेल, ‘हा माणूस मेलाच आहे, आपण आपल्या परीने प्रयत्न करून बघायचा’ तर तो माणूस फार कमी वेळा वाचतो. तेच जर, ‘या इमर्जन्सी उपचारांमुळे माणूस वाचतो’, ही जर मनोभूमिका असेल तर तो माणूस वाचण्याची शक्यता वाढते.

तेच तत्त्व मधुमेदाच्या उपचारांकरिता लागू होते. इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी मेल्या आहेत, ही मनोभूमिका असेल तर उपचारही तसेच होणार. गेल्या काही वर्षांत संशोधनातून एक गोष्ट समोर आली की, ज्या इन्सुलिनच्या पेशी मेल्या आहेत असे वाटत होते त्या खऱ्यातर बेशुद्ध असतात. हे एकदा लक्षात आल्यानंतर सगळ्यांचा मधुमेदाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. रक्तातील साखर कमी करणे हे उद्दिष्ट न राहता, या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना पुन्हा तरतरीत कसे करता येईल हा विचार चालू झाला. पाठोपाठ या पेशी अशा गलितगात्र का होतात, बेशुद्ध का पडतात, याला जबाबदार कोण हे शोधायला सुरुवात झाली.

एखाद्या रहस्यमय चित्रपटात जशी संशयाची सुई वेगवेगळ्या लोकांकडे रोखली जाते, तसेच इथे घडले. सुरुवातीचे गृहीतक अत्यंत सोपे होते. मधुमेद म्हणजे रक्तातील साखर वाढणे. त्याचे कारण म्हणजे खाण्यात साखर जास्त असणे. म्हणून साखर हीच दोषी आणि म्हणून साखर आहारातून बाद केली की झाले काम. नंतर नंबर लागला चरबीचा. चरबीची व्यवस्था लावण्यामध्ये लिव्हरचा मोठा वाटा असतो. रक्तातील अतिरिक्त चरबी लिव्हरमध्ये येते. तिची विल्हेवाट लावताना काही भाग लिव्हरमध्येच राहतो. आजकाल अनेकांना सोनोग्राफीचा रिपोर्ट वाचताना हा अनुभव आला असेल. रिपोर्टमध्ये लिहून येते ‘एनलार्जड् लिव्हर विथ ग्रेड टू फॅटी इनफिल्ट्रेशन’. हेच ते चरबी लिव्हरमध्ये राहणे. यातूनच पुढे लिव्हर सिरॉसिस किंवा लिव्हर कॅन्सर होतो. दारू न पिता केवळ अतिरिक्त चरबीमुळे हे त्रास होऊ शकतात. रोग खूप बळावला की लिव्हर ट्रान्सप्लान्ट करावे लागते. लिव्हर ट्रान्सप्लान्टच्या ऑपरेशनच्या किमतीत एक फ्लॅट येईल. बरेचदा तर लोक फ्लॅट विकून लिव्हर ट्रान्सप्लान्टचा खर्च भागवतात.

ही लिव्हरमध्ये साठत गेलेली चरबी पुढे बाहेर पडून पॅनक्रिएसमध्ये पोचते. तिथे ती इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना बेशुद्ध करते. त्यामुळे डायबेटीस होतो. पूर्वी लोकांचा समज होता, साखर जास्त खाल्ल्यामुळे मधुमेद होतो. आता खरा आरोपी सापडला असे वाटू लागले. मग फॅट खाऊ नका अशी फॅशन आली. साखर तर वाईट होतीच. मग आहारात कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट ५० ते ६० टक्के खा असे सांगितले जाऊ लागले. कँाप्लेक्स काबरेहायड्रेट म्हणजे ज्यात अनेक साखरेचे रेणू जुळून माळ तयार होते आणि ते पचण्यास वेळ लागतो. कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट खाऊनही फरक पडेना. मग फ्रॅक्टोज खा आणि मधुमेदावर उपचार करा असा प्रचार सुरू झाला. हेही उपाय काम करेनात. मग कोणालातरी शेरलॉक होम्सचा प्रसिद्ध डायलॉग आठवला असावा. ‘एकदा का अशक्य गोष्टी बाजूला काढल्या की उरलेली गोष्ट कितीही असंभव वाटत असेल तरी तीच सत्य असते.’

मधुमेदाच्या बाबतीत तसेच झाले. लिव्हर आणि पॅनक्रिएॅसमधील चरबीमुळे मधुमेद होतो ते कळले, पण ही चरबी तिथे जाऊन बसण्यामागे कोणाचा हात आहे ते कळेना. या अवयवात दडून बसलेली चरबी बाहेर कशी काढावयाची तेही कळेना. मग मधुमेदासाठी वजन कमी करण्याच्या उपायांची स्पर्धा चालू झाली. जठर (stomach) कापून छोटेसे करून, माणूस एकावेळेस जास्त खाऊ शकणार नाही अशी व्यवस्था करायची. (बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी). तोही उपाय एखादे वर्षभर उपयोगी ठरतो. नुसते कमी खाऊन किंवा वजन कमी करून भागत नाही हे कळले.

बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचा एक परिणाम सर्वाच्या समजुतींना धक्का लावून गेला. सर्जरी झाल्यानंतर, वजन कमी व्हायला लागायच्या आत; त्या माणसाला मधुमेदासाठी लागणाऱ्या गोळ्या, औषधांचे प्रमाण कमी होत जाते. याचा अर्थ लावताना कळले की, दिवसभरातील आहार हा ६०० ते ८०० कॅलरीपर्यंत सीमित ठेवला आणि त्यात काबरेहायड्रेट्सचे प्रमाण अत्यल्प ठेवले तर ही जादू होऊ शकते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, मधुमेद कुणामुळे होतो या संशयाची सुई पुन्हा काबरेहायड्रेट्सकडे येऊन स्थिरावली. यांत पूर्वीपेक्षा एक फरक होता. पूर्वी फक्त साखर म्हणजे सुक्रोजवर संशय होता तो आता व्यापक होऊन सर्व काबरेहायड्रेट्सवर स्थिरावला. हे म्हणजे पूर्वी पु.ल. देशपांडे आवडायचे, आता सगळेच देशपांडे आवडायला लागलेत असे काहीसे झाले. यात आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून येणारी लॅक्टोज, फळांतून येणारी फ्रॅक्टोज आणि धान्य आणि कडधान्य यांतून मिळणारी सुक्रोज या सर्व काबरेहायड्रेट्सचा समावेश होतो. या गोष्टी बंद किंवा अत्यल्प प्रमाणात ठेवल्यास लिव्हर आणि पॅनक्रिएसमधील चरबी बाहेर पडते आणि मधुमेद परतवता येतो.

मधुमेद परतवणे म्हणजे मधुमेद बरा होणे नव्हे. परतवणेचा अर्थ असा आहे की आहार, व्यायाम आणि तणाव यांचे योग्य नियोजन केल्यास औषधे कमी करून किंवा बंद करून मधुमेद नियंत्रणात ठेवता येतो. कधीकधी आळस केला, चावट खाणे खाल्ले तरी चालते. हे कधीकधी जर का रोजरोज मधे बदलले तर मधुमेद पुन्हा येऊन गाठतोच. मधुमेद परतविण्यासाठी जे आहारचे नियंत्रण लागते ते सर्वाना जमतेच असे नाही. आपल्या सर्वाना काबरेहायड्रेट्स खाण्याचे व्यसन जडले आहे. याला अल्कोहोलिझमच्या धर्तीवर काबरेहोलिझम म्हणतात. ‘थोडा भात खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण झाल्यासारखे वाटत नाही’, या तक्रारी या काबरेहोलिझमची लक्षणे आहेत. म्हणूनच आम्ही मधुमेदाच्या परतीच्या प्रवासाला निघतो तेव्हा पहिले दोन-तीन दिवस गेले की विथड्रॉवल सिम्प्टम्स येऊ लागतात. डोके दुखते, सारखे खावेसे वाटते, मन कशात रमत नाही, चिडचिड होते. अशा अनेक तक्रारी असतात. अजून काही दिवस गेले की मग फायदे दिसू लागतात. हा सारा खेळ सहा ते आठ आठवडय़ांचा असतो. पहिल्या आठवडय़ानंतर औषधे कमी करावी लागतात. स्वत:चे इन्सुलिन जास्त पाझरू लागले किंवा त्याची परिणामकारकता वाढली आणि सोबतीने औषधे चालू राहिली तर साखर जास्त खाली जाऊ शकते. म्हणून वेळीच औषधे कमी करावी लागतात. हे सर्व छान चालू असते. लोकांना एक प्रश्न पडतो, ‘आत्ता सगळे छान झाले आहे. पण.. पुन्हा नॉर्मलवर आलो की काय होईल?’. याचे उत्तर इतकेच की तुमच्यासाठी नॉर्मल काय आहे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. संन्यस्त जीवन जगायचे नसले तरी विलासी जीवन आणि राजसी जीवन (जेवण) यांतील फरक मात्र जरूर करावा लागतो.

आपल्या देशात दारू सोडण्यासाठी मुक्तांगण ते डॉक्टरी उपचार असे अनेक मार्ग असले तरी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे रिझल्ट किंवा विठ्ठलाच्या नावे गळ्यात माळ घातली की मग मिळणारे रिझल्ट या मधे संत आणि देव यांच्या सहाय्याने खूप जास्त चांगले रिझल्ट मिळतात. आपण बुद्धीने समजले तरी ते अंगीकारत नाही पण श्रद्धेने मात्र चिवट सवयी बदलतो. सगळेच संत काही सत् प्रवृत्तीचे नसतात. आपण मात्र बुद्धीपेक्षा अंधश्रद्धेला जास्त शरण जातो. मिथ्या विज्ञानावर आधारित श्रद्धा विकणाऱ्या, भगवे, हिरवे किंवा पांढरे कपडे घालणाऱ्या संत किंवा डॉक्टरांची आपल्याकडे कमतरता नाही.

म्हणून सांगावेसे वाटते की ‘मधुमेदाला परत फिरणे शक्य आहे’  पण समर्थाच्या ओळीत थोडा फेरफार करून म्हणता येईल-

शक्य आहे परतणे मधुमेदाचे,

जो जो करील तयाचे;

परंतु तेथे डोळस श्रद्धेचे,

अधिष्ठान पाहिजे..