अभ्यासकांनी अजंठा येथील चित्रशिल्पांचा बारकाईने अभ्यास केला असता त्यांना या कलाकारांनी गाठलेली कौशल्याची परिसीमा जाणवली.

अजिंठा येथील कलेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ यापूर्वी अधोरेखित करण्यात आलेले आहेच. हे असे ठिकाण आहे की जेथे स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला यांचा अभूतपूर्व संगम झालेला आढळतो. शिल्प आणि चित्रकला यांचा या ठिकाणी इतका सुंदर मेळ आहे की सारनाथच्या तुलनेने येथील शिल्पामधील काही उणेपणा दाखवल्यास असे उत्तर देता येईल की येथील मूर्ती नुसत्या पाषाणमूर्ती म्हणून बघण्याच्या नाहीत. आपण ज्याप्रमाणे दरवर्षी गणपती रंगवतो त्याप्रमाणे या रंगवलेल्या होत्या. त्यामुळे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने त्यांचे पूर्ण मूल्यांकन होऊ शकत नाही. चेहऱ्यावरचे भाव हे चित्रकलेतील काही अंगभूत पलूंमुळे अधिक प्रभावीसुद्धा होऊ शकतात. एवढे मात्र ध्यानात ठेवले पाहिजे की गुंफा क्रमांक २६ येथे चित्रापेक्षा निखळ शिल्पावर जास्त भर देण्यात आला आहे. आणि हे अजंठा येथील वैशिष्टय़ वेरुळमध्ये प्रभावीपणे वापरण्यात आले असे फग्र्युसन यांचे मत आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिशिल्पांच्या बरोबर अलंकरणात्मक शिल्पालासुद्धा अधिक महत्त्व दिल्याचे वेरुळ येथे आढळते, असे त्यांचे मत आहे.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

चित्रकलेचा आस्वाद कसा घ्यावा याविषयीचे विवरण कामसूत्रावरील टीकेमध्ये आले आहे ते असे.

रुपभेदा: प्रमाणानि भावलावण्ययोजनम्

सादृश्यमं वर्णिका भम्ग: षड्विधंम चित्रलक्षणम्

एखाद्या चित्राचा निकष म्हणून हे सहा घटक सांगितलेले आहेत. चित्राचा विषय असलेल्या प्राण्यांचा किंवा वस्तूंचा बांधा, प्रमाणबद्धता, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव, त्या वस्तूचे अंगभूत सौंदर्य दाखवण्याचे कौशल्य, ती वस्तू आणि चितारलेली वस्तू यामध्ये असलेले साम्य आणि छाया-प्रकाश यांचा खेळ मांडण्यासाठी रंगाचा वापर हे ते सहा घटक होत. डॉ. शिवराम मूर्ती, कृष्ण देव आणि म. न. देशपांडे यांनी अजंठा येथील चित्रकलेची ही सहा लक्षणे लक्षात घेऊन बारकाईने अभ्यास केला असता त्यांच्या लक्षात आले की अजंठा येथील चित्रकाराने प्राचीन चित्रकलेचे तंत्र पूर्णपणे आत्मसात केले होते व त्या कसोटीला ते उतरले होते असे दिसते. यापूर्वीसुद्धा छतावरील निरनिराळ्या प्रकाराची प्रयोजने (मोटीफ) उदा. मदिरापानात दंग असलेली मिथुने, निरनिराळ्या प्रकारचे व्याल, शंखपद्मस्वस्तिकासारखी शुभचिन्हे यांचा वापर येथील चित्रकारांनी फार सुंदर रीतीने केलेला आहे. त्याचबरोबर पद्मपाणि आणि वज्रपाणि; प्रवचनात दंग असलेले भगवान बुद्ध; छद्दन्त जातकामधील सुप्रसिद्ध मरणोन्मुख राणी (डाइंग प्रिन्सेस); गुंफा क्रमांक १६च्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील इंद्र आणि आकाशातून स्वैर विहार करणारे गंधर्व आणि अप्सरा; वलयापीड हत्ती व भगवान बुद्ध या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सभोवतालच्या त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचे भाव; विश्वंतर जातकामध्ये विश्वंतर आणि त्याची पत्नी आपल्या मुलासमवेत नगर सोडून जात असतानाचे नागरिकांच्या चेहऱ्यावरचे शोकाकुल भाव आणि एकूणच वातावरण; सिंहलअवदानातील राक्षसीने मारून टाकल्यानंतर जमा झालेली गिधाडे व तिथे दाटलेली भीषणता; त्याचप्रमाणे महिष जातकामध्ये कधी माकडांशी प्रेमाने खेळणारा तर कधी रागाने उसळलेला रेडा आणि घाबरलेले माकड; तसेच शिबी जातकामध्ये राजाने आपले मांस कापण्यासाठी खडम्ग हातात घेतले असता त्याची विनवणी करणारी राणी हे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणजे येथील कलाकारांनी कौशल्याची कुठली परिसीमा गाठली होती हे सहज लक्षात येते. आणि त्यामुळेच भरताच्या नाटय़शास्त्रात सांगितलेल्या शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भुत या सर्व रसांचे समर्पकपणे चित्रण झाल्याचा प्रत्यय भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येतो. या सर्व रसांच्या पलीकडे असलेला व त्या सर्वाचा राजा म्हणून ज्याचे वर्णन करण्यात येते त्या शांत रसाचा प्रत्यय निरनिराळ्या जातकामधून येतो. उदा. कपि जातक, हंस जातक, विदुर पंडित जातक, मत्रीबल जातक यामध्ये असलेले उपदेशपर प्रवचन रेखाटणारे प्रसंग. ज्यांचे बौद्ध परिभाषेमध्ये समाज असे वर्णन केले जाते. या बुद्धप्रवचन प्रसंगातसुद्धा याच शांत रसाचा प्रत्यय येतो. शांत रसाचा कळस ज्याला म्हणता येईल अशा मारधर्षण प्रसंगाच्या क्रमांक २६ या गुंफेतील शिल्पात त्याचप्रमाणे इतरत्र चितारलेल्या या प्रसंगात परिपूर्णपणे रेखाटलेला दिसतो.

एका दृष्टीने पाहिले तर जातक कथा या बुद्धाच्या समकाळातील सामाजिक जीवनाच्या प्रतिबिंबासारख्या असल्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात घडलेले प्रसंग त्यामध्ये वर्णिले आहेत. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यात असलेल्या रागद्वेषाचे प्रसंग, त्यातून उत्पन्न होणारे संघर्ष, अथवा मानवी जीवनाला स्वाभाविक असलेल्या स्नेह, आकर्षण, प्रेम, शृंगार किंवा करुणा या स्थायी भावांचा किंवा रसांचा त्यात प्रत्यय आला असल्यास त्यामध्ये अनैसर्गिक काही आहे असे वाटत नाही. परंतु या सर्व आठ रसांच्या कल्लोळात सहसा न सापडणारा आणि आध्यात्मिकदृष्टय़ा मानवी जीवनातील व्यर्थता लक्षात आल्यानंतर परतत्त्वाची ओढ दाखवणारा, संवेग, शम आणि वैराग्य हे ज्याचा पाया आहे अशा शांत रसाचे चित्रण अजंठा येथील चित्रकलेत प्रकर्षांने आढळून येते; आणि ते अपेक्षितही आहे. येथील चित्रित केलेले प्रसंग हे फक्त एखाद्या सहृदयाच्या रसास्वादनासाठीच नसून यांच्या परिपोषातून शांत रसाचा मार्ग दाखवणाऱ्या प्रसंगाच्या चित्रणात आहे. ही चित्रे एखाद्या आर्ट गॅलरीत मांडण्यात आलेली चित्रे नसून या चित्रांच्या दर्शनाने भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचे अनुसरण उपासक आणि भिक्षूंच्यामध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे होऊ शकेल या हेतूने केलेले आहे. भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचा तीन महत्त्वाच्या तत्त्वांमध्ये सारांश सांगावयाचा झाल्यास तो प्रज्ञा, शील आणि समाधी असा सांगता येईल. हा सारांश वेगळ्या रीतीनेसुद्धा इतर धर्मविचारातून प्रकट झालेला असतो. सम्यक् दर्शन, सम्यक् चारित्र्य आणि सम्यक् ज्ञान या रीतीने जैन पंथात सांगितला आहे. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गावर पूर्ण श्रद्धा, अहिंसा, सत्य, अस्तेय, बह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचशीलाबरोबरच सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम आणि सम्यक् स्मृती यांच्या साह्य़ाने शीलयुक्त आचरण; व सर्वोच्च ज्ञानस्वरूप असलेली प्रज्ञा, ती मिळवण्यासाठी समाधी म्हणजे मनाची एकाग्रता असे ढोबळपणे या उपदेशाचे वर्णन करता येईल. ज्या साधक व्यक्तीने मला सम्यकसंबुद्धाच्या म्हणजे परिपूर्ण ज्ञान झालेल्या बुद्धाच्या मार्गाने जायचे असा निश्चय केलेला असतो, तिला स्वत:च्या ठिकाणी दहा सद्गुण अंगी बाणवावे लागतात. हे गुण आपल्याकडे असावेत म्हणजे पुरे झाले अशी त्यात कल्पना नाही. या गुणांची पराकाष्ठा म्हणजे पारमी किंवा पारमीता मिळवावी अशी त्यात अपेक्षा आहे. सुमेध तापस म्हणून या त्याच्या पूर्वजन्मात शाक्य मुनीने बुद्ध दीपंकराचे दर्शन झाल्यानंतर, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन मलाही अशाच प्रकारची स्थिती अनुभवयाची आहे अशी मनाशी खूणगाठ बांधली त्यावेळेपासून साधक म्हणून तो बोधिसत्व झाला. बोधिवृक्षाखाली बसल्यानंतर माराच्या (मदनाच्या) हल्ल्याची पर्वा न करता तो बोधिज्ञान मिळवतो. सुमेध तापसापासून शाक्य बुद्धापर्यंतचा हा आध्यात्मिक मार्ग पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कल्पे (युगे) घालवावी लागली. मधल्या काळात अनेक बुद्ध होऊन गेले. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा शाक्य मुनीने जन्मजन्मांतरी भोगलेली संकटे, कष्ट, मानपमान, दु:ख यांनी खडतर झाला होता. पण या सर्व जन्मांच्या शृंखलांना जोडणारा दुवा म्हणजे दहा सद्गुणांचा प्रकर्ष आहे. त्याने भोगलेली सर्व दु:खे ही हे गुण बाणवण्यासाठी दिलेली किंमत आहे. या असंख्य जन्मापैकी फक्त ५४४ जन्मांच्या कथा या चुल्ल वग्गामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्यांचाच उल्लेख नेहमी जातक कथा म्हणून केला जातो. जातक म्हणजे जन्म, म्हणजे त्या त्या विशिष्ट जन्माच्या या कथा आहेत. या कथा भगवान बुद्धाने त्यांच्या शिष्यांनी किंवा इतरांनी प्रश्न विचारले असता सांगितलेल्या आहेत. यातील एका दृष्टीने मौजेची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कथांमधील महत्त्वाची पात्रे ही सिद्धार्थ गौतम म्हणजेच शाक्य बुद्ध याच्या जीवनात आलेल्या व्यक्तीच होत. उदाहरणार्थ सिद्धार्थ गौतम आणि त्याची पत्नी यशोधरा, त्याचे प्रसिद्ध शिष्य सारीपुत्र आणि मौद्गलायन, सावत्र भाऊ आनंद, चुलत भाऊ देवदत्त हीच पात्रे त्यात दिसतात. या कथांचा विशेष असा की हे एखाद्या सदगुणाचे परिपालन करीत असताना सिद्धार्थ गौतमाने त्या जन्मात दाखवलेला धीरोदात्तपणा व त्याच्या विरुद्ध प्रकर्षांने दिसून येणारा देवदत्ताचा दुर्गुण किंवा दुष्टपणा यातील विरोध स्पष्टपणे दिसावा असे चित्रण असते. हंस जातकाचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास हंसांचा राजा जर सिद्धार्थ गौतम असेल तर त्याचा प्रधान हा त्याचा आवडता भाऊ असतो. आणि त्या दोघांना पकडून राजासमोर सादर करणारा कोळी हा देवदत्त असतो. एका बाजूला भगवान बुद्ध हा त्याच्या उत्तरोत्तर जन्मात आध्यात्मिकदृष्टय़ा परिपक्व होऊन बुद्धपदाला पोहोचतो. त्याला साथ देणारे आनंद, सारीपुत्र हे त्याच्याबरोबर राहिल्याने किंवा त्याच्या मार्गाचे अनुसरण केल्यामुळे अर्हत् पद प्राप्ती करून घेतात; तर त्याला विरोध करणारा त्याचा मत्सर करणारा, त्याच्या लौकिक आणि आध्यात्मिक मार्गात अडथळे आणणारा देवदत्त हा सरतेशेवटी सर्वात भयंकर अशा सातव्या नरकात जाणार याची या जातक कथा पुन: पुन: श्रोत्यांना आणि दर्शकांना आठवण करून देत असतात.

त्रिपिटकामधील चर्यापिटकात, दहापैकी सात पारमींचा उल्लेख असून त्या स्पष्ट करणाऱ्या २० ते ३० कथा थोडक्यात सांगितल्या आहेत. तर जातक कथांच्या मध्ये बऱ्याच वेळा दहापैकी कुठल्या पारमीचे किंवा पारमीतेचे पालन त्या त्या जन्मात केले याचे विवरण जातकट्ठकथा या त्यावरील टीकेमध्ये आढळते. जातकट्ठकथेच्या उपोद्घातामध्येच हे स्पष्ट करण्यात आले आहे की एका जन्मामध्ये एखाद्याच सद्गुणाचे, पारमीतेचे पालन बोधिसत्वाने केले असे नाही. त्याच्या त्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावरून एक किंवा त्याहून जास्त पारमीतांचे पालन करण्याचा किंवा त्या सद्गुणांचे परिपोष करण्याचा त्याने प्रयत्न केला असेल. क्रमांक एक आणि दोन गुंफामधील जातक कथांच्या चित्रांचा अभ्यास केल्यानंतर वॉल्टर स्पिंक आणि त्यांची शिष्या डॉ. लीला वूड यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या मते क्रमांक एकचे लेणे हे महाराज हरिषेणानेच कोरविले असावे, तर क्रमांक दोनचे लेणे हे हरिषेणाच्या पत्नीने म्हणजे महाराणीने कोरलेले असावे. असा निष्कर्ष काढण्यामागे त्यांनी दिलेले कारण असे आहे की, क्रमांक एकच्या गुंफेत ज्या जातक कथा कोरल्या आहेत, त्या बहुतांश सिद्धार्थ गौतम हा जेव्हा एखाद्या राजघराण्यात युवराज म्हणून जन्माला येतो किंवा राजा म्हणून राज्य करतो अशा विषयावर आधारलेल्या आहेत. त्यांच्या या निरीक्षणाला परिपोषक दुसरेही असे कारण सांगता येईल की सभामंडपातून अंतराळात ज्या दोन खांबांवरून बौद्ध उपासक गर्भगृहात जातो त्या दोन खांबांच्या सर्वात वरच्या भागात, दुसऱ्या कोणत्याही गुंफेत न आढळणारे चित्रण, म्हणजे त्या खांबांभोवती सर्वत्र राजमुकुटच कोरलेले आहेत. त्या उलट गुंफा क्रमांक दोनमध्ये ज्या जातक कथा चितारण्यात आलेल्या आहेत त्यातील स्त्री पात्रांची उदात्तता अधिक दाखवण्यात येईल असे प्रसंग निवडण्यात आले. दुसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे एरवीसुद्धा प्रत्येक विहाराच्या बाहेर हारिती या यक्षीचे चित्रण असावे असा संकेत आहे. यापाठीमागचे कारण असे की नवजात किंवा मृत अर्भकांचे मांस चाखण्याची लालसा असलेली हारिती भगवान बुद्धांच्या उपदेशामुळे आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावामुळे हे मांस खाण्याची प्रवृत्ती आपण टाकून देत आहोत असा निश्चय जाहीर करते. आणि म्हणून भगवान बुद्ध तिला, उपाशीपोटी राहावे लागू नये म्हणून, असा वर देतात की विहारात राहणारे भिक्षू आपली भिक्षा गोळा केल्यानंतर, अथवा कोणी दाता विहारामध्ये त्यांच्यासाठी आहार आणत असेल तर तो खाण्यापूर्वी आपल्या भिक्षेचा काही भाग हारितीला अर्पण करतात. वरील संकेताप्रमाण क्रमांक दोनच्या गुंफेमध्ये बाहेरच्या व्हरांडय़ात हारितीचे आणि तिचा पती पांचिक याचे चित्रण आढळते. पण विहार क्रमांक दोनचे वैशिष्टय़ असे की गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या देवळीत यक्षरूप असलेल्या शंखपद्मनिधींच्या मूर्ती आहेत. तर डाव्या अंगाच्या देवळीत हारिती आणि पांचिक यांच्या मूर्ती बरोबरच हरिती आणि भगवान बुद्ध या दोघांच्यामध्ये घडून आलेल्या प्रसंगांचे प्रभावी चित्रण आहे.

धम्मपदावरील टीकेमध्ये दहा पारमी कोणत्या याची गणना केली आहे. त्या दहा अशा; १. दान २. शील ३. नेक्खम्म ४. पञ्ञा ५. विरिय ६. खंती ७. सच्च ८. अधिट्ठाण ९. मेत्ता आणि १० उपेखा पारमी. यातील दान, शील, नेक्खम्म, खंती, सच्च या त्यातल्या त्यात अधिक लोकप्रिय असून, दानपारमीला एक वेगळेच महत्त्व आहे. दानपारमीच्या चटकन समोर येणाऱ्या कथा म्हणजे शशजातक, व्याघ्रीजातक, हस्तिजातक आणि विश्वंतरजातक. शश जातकामधील कथा अशी की बोधिसत्व शश आणि इतर प्राणी एका मुनीला आपल्याकडे भोजनासाठी निमंत्रण देतात. प्रत्येकजण आपापल्या रीतीने तयारी करतो, पण मुनीला देण्यासाठी आपल्याकडे फारसे काही नाही याची सशाला जाणीव होते. म्हणून मुनी आल्यावर पेटवलेल्या अग्नीमध्ये स्वत:चीच आहुती देऊन ते मांस मुनीला मिळेल अशी व्यवस्था तो करतो. तर व्याघ्री जातकामध्ये प्रसूतीनंतर एका वाघिणीला प्रचंड भूक लागते आणि  शेवटी भूक अनावर होऊन पिलांपैकी एखाद्याला ती खाणार अशी शंका आल्याने बोधिसत्व स्वत:चे शरीर तिला खायला देतो. तर हस्ति जातकामध्ये एका वैराण प्रदेशातून प्रवास करणारे सार्थातले (तांडय़ातले) लोक भुकेने आणि तहानेने व्याकूळ होतात. ते हत्तीला विचारतात की आम्ही अत्यंत व्याकूळ झालेलो आहोत, तर आम्हाला अन्नपाणी कुठे मिळेल का? ते जवळपास कुठेही मिळणार नाही व त्यामुळे तांडय़ातील या प्रवाशांना मृत्युमुखी पडावे लागेल याची खात्री झाल्यानंतर हत्ती म्हणून जन्माला आलेला बोधिसत्व त्यांना असे म्हणतो की समोर दिसणारी जी टेकडी आहे तिला वळसा घालून गेल्यास तुम्हाला एक मेलेले सावज दिसेल. त्यातून मिळालेल्या मांसरसाने तुमच्या तहानभुकेचे शमन होईल. ते प्रवासी सांगितलेल्या ठिकाणी पोहचण्याच्या अगोदरच बोधिसत्त्व हत्ती जवळच्या वाटेने त्या टेकडीवर जातो आणि त्या कडय़ावरून स्वत:ला खाली झोकून देतो व मरण पत्करतो. स्वत:चे प्राण झोकून देऊन आपला देह दुसऱ्याच्या स्वास्थ्यासाठी अर्पण करणे ही दानपारमीमधली पराकोटीची अवस्था समजली जाते. त्यामुळेच शशजातकाचे मोठे प्रभावी चित्रण अजंठा येथील क्रमांक दहाच्या हीनयान चित्रणामध्ये आढळून येते. तर हस्तिजातकाचे चित्रण क्रमांक १७ येथील लेणीमध्ये मोठय़ा प्रभावीपणे केले आहे. वाकाटककालीन चित्रणे ही आर्यशूराच्या जातक-मालेवर आधारित असल्यामुळे प्रवाशांच्या विषयी वाटणाऱ्या करुणेपोटी स्वत:चा जीव देऊन आपला देह त्यांच्या स्वाधीन करणाऱ्या हत्तीचे मनोगत बोधिसत्वाच्या मनाची ओळख करून देतात. हे मनोगत धर्मराज युधिष्ठर ज्याप्रमाणे महाभारतात व्यक्त करतो तशाच आशयाचे आहे. युधिष्ठिर म्हणतो :

नत्वहमं कामये राज्यंम नस्र्वगम नापुनर्भवम्

कामये दु:खतप्तानां प्राणिना माíतनाशनम्

दानपारमीतेचे सर्वोक्तृष्ट उदाहरण गुंफा क्रमांक १७ मध्ये मंडपाच्या एका संपूर्ण भिंतीवर चित्रित केलेले विश्वंतर जातक होय. विश्वंतराची कथा अशी आहे, विश्वंतर हा युवराज. महाभारतातील उदाहरण द्यावयाचे झाल्यास तो कर्णाप्रमाणेच दानशूर. समोर आलेल्या याचकाला कधी विन्मुख होऊन परत जाण्याची कधीच पाळी आलेली नव्हती. पण त्याचा हा गुण राज्यातील जनतेला मात्र शापासारखा झाला. राजवाडय़ात असा एक हत्ती होता की ज्याच्या पुण्याईने प्रजेला कधीही अवर्षणाच्या संकटाला सामोरे जावे लागले नाही. शेजारच्या राज्यातील काही ब्राह्मण तेथे पडलेल्या दुष्काळामुळे त्याच्याकडे येतात व मोठय़ा करुणेने विश्वंतर तो हत्ती त्यांना देऊन टाकतो. आता शेजारचे संकट आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रजाजन व दरबारी विश्वंतराला वनवासाची शिक्षा देण्यासाठी राजाला भाग पाडतात. एका घोडे जोडलेल्या रथानिशी विश्वंतर नगराबाहेर एका टेकडीवर राहण्यासाठी निघतो. वाटेत एक याचक त्याला घोडे मागतो म्हणून तो घोडे देऊन टाकतो; त्यानंतर रथसुद्धा. पुढे वाटचाल करता जूजक नावाचा लोभी ब्राह्मण त्याच्याकडे घरच्या कामात नोकर म्हणून उपयोगी व्हावेत यासाठी दोघा मुलांची मागणी करतो. आपली पत्नी वनात फळं तोडण्यास गेली आहे याचा फायदा घेऊन विश्वंतर ती मुलेही त्याला देऊन टाकतो. त्याच्या दानशूरपणाचा लौकिक स्वर्गात इंद्राच्या दरबारात पोहचल्यानंतर, त्याच्या परिक्षेसाठी इंद्र येतो. विश्वंतरसुद्धा आपल्या पत्नीचेसुद्धा दान करायला तयार होतो. विस्मयचकित झालेला इंद्र आपल्या रूपात प्रकटून त्याची वाहवा करतो आणि तुझा वनवास संपेल असा वर देतो. इकडे विश्वंतर वनवासात असताना, त्याची मुलेदेखील दान म्हणून दिली गेली आहेत हे कळल्यावर त्यांचा आजा जूजकाला सोन्याच्या मोहरा देऊन त्यांचा ताबा मिळवतो. नंतर विश्वंतर वनवासातून परत येऊन पत्नीसह युवराजपदावर आरूढ होतो. गुंफा क्रमांक १७ मध्ये विश्वंतराच्या कथेला एवढे मोठे महत्त्व का दिले याच्याविषयी विद्वानांनी चर्चा केली आहे ती अशी. विश्वंतराच्या पाठोपाठ बोधिसत्वाचा जन्म सिद्धार्थ गौतम म्हणूनच होतो. आणि त्यामुळे दानपारमीला शाक्य बुद्धाच्या आयुष्यामध्ये केवढे मोठे स्थान आहे हे लेखकांना आणि कलाकारांना सुचवायचे आहे असे विद्वानांना वाटते. १७ व्या लेणीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनासुद्धा असेच वाटते की अप्रत्यक्षपणे ऋषीक देशाचा राजा उपेंद्रगुप्त याचीसुद्धा पुढल्या जन्मात आपल्याला बुद्धपद नाही तरी कमीत कमी अर्हततपद मिळावे अशी मनोमन इच्छा असली पाहिजे.

दानपारमीला जसे वर वर्णिलेल्या तीन-चार जातककथांमधून आध्यात्मिकदृष्टय़ा महत्त्व आहे, त्याचप्रमाणे लौकिक दृष्टीने विहारसंस्था व्यवस्थित रीतीने चालावी म्हणून देखील दानपारमीचा उपयोग आहे. वैदिक व हिंदू धर्मामध्ये कुठलेही धार्मिक कार्य केल्यानंतर पुरोहिताला दक्षिणा रूपाने दान दिल्याशिवाय ते कर्म फलप्रद होत नाही अशी धारणा आहे. तसेच ब्राह्मण वर्गाला, त्याच्या ज्ञानामुळे व धार्मिक कार्यात साहाय्य करण्याचा अधिकार असल्यामुळे, तसेच यजमानाने दिलेल्या दानामुळेच त्याची उपजीविका होत असल्यामुळे त्याला दान स्वीकारण्याचा म्हणजेच प्रतिग्रहाचा अधिकार दिला आहे. लौकिक पातळीवर ब्राह्मणांच्यासारखेच ज्ञानदान आणि धार्मिक कार्यात साहाय्य अशी भूमिका असल्यामुळे, दानपारमीच्या रूपाने श्रमणसंस्थेला व विहाराला हा दान स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे असे दिसते. दानपारमीला या प्रकारचे महत्त्व दिल्यामुळे महाभारतातल्या शिबी राजाची कथासुद्धा शिबीजातकाच्या रूपाने आली आहे.

या संदर्भात सिंहलावदानाच्या कथेचासुद्धा उल्लेख करणे आवश्यक आहे. या अवदानाचे विश्वंतराइतकेच मोठे चित्रण क्रमांक १६ या गुंफेत करण्यात आले आहे. या कथेला बौद्ध परंपरेमध्ये वेगवेगळ्या रीतीने महत्त्व आहे. जातक हे जर शाक्य बुद्धाच्या जन्मजन्मीच्या कथांचे वर्णन असेल तर अवदान हे तितकेच आश्चर्यकारक पण बुद्धाऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी महात्म्याचे चरित्र असते. थेरवादी (स्थविरवादी) बौद्ध परंपरेप्रमाणे सिंहल हा भगवान बुद्धाचा समकालीन. त्याचे नाव विजय. हा एक सार्थवाह होता. समुद्रावर व्यापार करण्याच्या हेतूने तो रत्नद्वीप या बेटावर म्हणजे आजच्या श्रीलंकेला पोहोचतो. या बेटाची अशी ख्याती होती की जहाजं बुडाल्यानंतर वाचलेल्या प्रवाशांना तेथे राज्य करणाऱ्या यक्षीणी आश्रय देत, त्यांचा आदरसत्कार करीत. त्यांना आपल्या पत्नीचीसुद्धा उणीव भासू देत नसत. परंतु अशीच वाताहत झालेली नवीन माणसे किनाऱ्याला लागली की पूर्वीच्या प्रवाशांना बंदी करून यक्षीणी त्यांचे मांस खात असत. सिंहल असाच बंदीवासात जातो.

तो चोरून असा तपास लावतो की या बेटावर जशा मनुष्यभक्षी यक्षीणी आहेत तसाच एक वलहस्स नावाचा आकाशात भरारी घेणाऱ्या अश्वाचे रूप असलेला, यक्षदेखील आहे. आणि उडत असताना पाठोपाठ येणाऱ्या यक्षिणींच्या मोहाला बळी न पडलेल्या संकटग्रस्त बंदींना तो आपल्या पाठीवरून समुद्रापलीकडे नेतो. पण अशा अटीवर की, आपले सावज सुटू नये म्हणून सुंदर स्त्रियांचे रूप घेऊन पाठोपाठ येणाऱ्या यक्षिणींच्या मोहाला बंदी बळी पडले नाहीत तर. सिंहल या यक्षाच्या मदतीने घरी आल्यानंतर तो राजदरबारात रुजू होतो. यक्षीणींची राणी मात्र असा निश्चय करते की काही झाले तरी सिंहलाला परत आणायचेच. म्हणून ती राजदरबारात उपस्थित होते आणि राजाला सांगते की सिंहल माझा पती आहे. माझ्याबरोबर जे बाळ आहे ते त्याचेच मूल आहे. तो माझा स्वीकार करत नाही. सिंहल राजाला समजवाण्याचा प्रयत्न करतो की ही मनुष्यभक्षी राक्षसीण आहे. हिला तुम्ही थारा देऊ नका. राजा तिच्या सौंदर्याच्या मोहात पडून तिला अंत:पुरात पाठवतो. राजवाडय़ावर दुसऱ्या दिवशी झेप घालणाऱ्या गिधाडांमुळे लोकांच्या लक्षात येते की यक्षीणीने राजाचे सर्व कुटुंबच फस्त केले आहे. प्रजानन सिंहलाला राजा म्हणून निवडतात. सिंहल मोठय़ा सन्यानिशी आणि गलबतातून प्रवास करून रत्नद्वीप जिंकतो; आणि तिथले प्रजानन पहिला राजा म्हणून त्याला अभिषेक करतात. येथून पुढे रत्नद्वीपाचे नाव सिंहल असे होते आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रसार होतो. हिच कथा थोडय़ा फरकाने दिव्यावदानात येते. पण त्यात मात्र सिंहल हा दुसरा कोणी नसून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमच आहे किंवा शाक्य बुद्ध आहे असे प्रतिपादन येते. ही कथा श्रीलंकेमध्ये इतकी लोकप्रिय झाली की द्वीपवंश या श्रीलंकेच्या इतिहास सांगणाऱ्या काव्यात त्याचे वर्णन तर आढळतेच, पण युएन शँगच्या प्रवासवर्णनातदेखील आहे. धर्माच्या तुलनात्मक अध्ययनामध्ये या कथेला असे महत्त्व आहे की, नायाधम्मक:ओ (ज्ञाता धर्म कथा:) या श्व्ोतांबर जैनांच्या नवव्या अंग ग्रंथामध्ये मांकंदिक पुत्र आख्यानामध्ये हीच कथा येते. शिबिजातक आणि मांकंदिकपुत्र आख्यानामधून सहज लक्षात येते की महाभारत-रामायणात व पुराणात,जैन व बौद्ध आगम वाङ्मयात आढळणाऱ्या या कथांचे मूळ कुठल्याही एका धर्म परंपरेत नसून इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात भारताच्या निरनिराळ्या प्रांतात प्रचलित असलेल्या लोककथांच्यामध्ये आहे. बौद्ध, जैन व पौराणिक परंपरांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी थोडेफार फरक करून त्या काव्यरूपाने आणल्या व त्यांना अजरामर केले आहे.

अजिंठा येथील एक, दोन, १६, १७ या गुंफांच्या भिंतींवर आर्यशूराच्या जातकमालेत समाविष्ट असलेल्या ३२ जातक कथा, तसेच हरिभट्टाच्या जातकमालेतील तसेच विषय असलेल्या जातक कथा फार सुंदर रीतीने चित्रित करण्यात आलेल्या आहेत. अगोदरच्या संशोधकांच्या पिढीत, त्रिपिटकामधील पाली भाषेत लिहिलेल्या जातक कथांच्या आधाराने गुंफात चितारलेल्या प्रसंगांची उकल करण्याची प्रथा होती. आणि त्यामुळेच या महायानाशी संबंधित कथा नसून हिनयानी कथा असे समजले जात होते. अजिंठा येथील दोन क्रमांकाच्या गुंफेतील रंगवलेल्या अभिलेखांच्या साहाय्याने हे लक्षात आले होते की संस्कृत भाषेत लिहिलेल्या जातकमालेतील या कथा असल्यामुळे ही चित्रणे खऱ्या अर्थाने स्थविरवादी नव्हती. म्युनिक विद्यापीठामधील प्राध्यापक श्लिंगलोफ यांच्या सखोल अध्ययनामुळे असेही लक्षात आले की गांधार आणि उड्डियान भागात मूळ धरणाऱ्या संस्कृत भाषा माध्यम असलेल्या सर्वास्तिवादी निकायाशी जवळचा संबंध असलेल्या, नवीन बौद्ध विचारांशी ही चित्रणे जास्त सुसंगत आहेत. आणि त्यामुळे गुंफा क्रमांक नऊ आणि दहामध्ये चित्रित केलेल्या पाली भाषेतील जातकांपेक्षा ही चित्रणे वेगळा संदेश देतात. छद्दन्त  जातक हे हीनयानी गुंफा क्रमांक दहा व त्याचप्रमाणे वाकाटककालीन गुंफा क्रमांक १६ मध्येही चित्रित केलेले आहे. परंतु यातील मुख्य पात्रे म्हणजे छद्दन्त हत्ती, बनारसची राणी म्हणून जन्माला आलेली त्याची प्रिय पत्नी हीच होत. ती सवती मत्सरापोटी छद्दन्ताला मारण्याचा घाट घालते. परंतु या कथेतील मुख्य विषयाची मांडणी आणि त्यातून जाणारा संदेश वेगळा आहे. पाली कथेत छद्द पारध्याला क्षमा करतो एवढेच नाही तर त्याला आपले दात कापू देतो; तर जातक मालेत तो ते स्वत: कापतो असे म्हटले आहे. पाली कथेत तो मरण पावतो, तर जातक मालेच्या कथेत तो स्वत: मरत नाही. आणि बनारसच्या मरणोन्मुख राणीला तो मरत नाही हे शुभवर्तमान देऊन प्राण तिचे वाचवतो. या वाकाटककालीन चित्रणांचे महत्त्व असे की ते बौद्ध धर्माचे हिनयानाकडून महायानाकडे होणारे स्थित्यंतर स्पष्टपणे दाखवतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, सिल्क रुटवरील मध्य अशियातील बौद्ध विहारांच्या जातक चित्रणांवर आपला स्पष्ट ठसा ती उमवटतात. आणि अशा रीतीने गुप्त-वाकाटककाळातील चित्रशैलीचा परिणाम आजच्या लडाख, कझागिस्तान आणि चीनमधील सहाव्या-सातव्या चित्रकलेवर झालेला दिसून येतो. आणि या अर्थाने वाकाटक कला ही वैश्विक पातळीवर पोहोचते.