भूतकाळात मला जावेच लागेल.. वर्षांचा काळ जमीनदोस्त झाला आहे.. वर्षांच्या कालावधीसाठी त्याचा तपशील लक्षात ठेवण्यासाठी, संगणकाची मदत घ्यावी लागत आहे.. महिन्याच्या स्मरणशक्तीला ‘ताण’ दिल्यामुळे बीपी शूट होत आहे. दिवसांचा हिशेब देताना ‘दमछाक’ होत आहे. विसरलो. सॉरीचा ‘नाद’ घुमवावा लागत आहे.

कालचा आज- आजच्या आजला पाहून हसत आहे. हे करीत असताना तासांचे काटे छद्मीपणाने कालच्या आजचे आणि आजच्या आजचे ‘स्वागत’ नाकारीत आहेत. सेकंदाचे काटेपण यांत मागे नाहीत.. तासांच्या काटय़ांना ते ‘वाकुल्या’ दाखवत आहेत..

अशा परिस्थितीत ‘आस्मादिक’ म्हणजे मी २०१७ ची ‘स्वप्ने’ बघत आहे. आणि दुसऱ्यांना ‘दाखवीत’ आहे. सारेच क्षणभंगुर आहे. या फुकाच्या देखणेपणाचे स्वागत करावयाचे का बुडबुडय़ांप्रमाणे असणाऱ्या आयुष्याचे मोल कोणास समजून सांगावयाचे!

आपण निवांत असावे हेच खरे. प्रत्यक्ष मैदानावरील मॅच बघण्यापेक्षा टीव्हीवरील खोटय़ा चित्रांना लोक अधिक गर्दी करू लागले आहेत. उपदेश करणारे ‘मारेकऱ्यांप्रमाणे’ आयुष्य कंठित आहेत. कोणालाच आपल्या ‘शाश्वत’ अस्तित्वाची दखल घेण्याचे भान राहिलेले नाही. ‘अशाश्वता’मागे माणसं ‘मृगजळा’प्रमाणे ‘अथक’ धावत सुटली आहेत. मुक्कामास कोठे थांबायचे याचे साधे भानही राहिलेले नाही. मुळात मी जगू शकेन आणि काही तरी भव्यदिव्य विश्वाचे दर्शन जगाला दाखवून देऊ शकेन याचा भरवसा राहिलेला नाही.

अनामिक ओढ म्हणजे काय? तिची चव कशी आहे, याचे साधे ज्ञानही राहिलेले नाही. माणूस आतल्या आत ओक्साबोक्शी रडत आहे. आपले हे भेसूर रडणे जगाला दिसू नये म्हणून चेहऱ्यावर ओशाळे हसू आणण्याचा त्याचा केविलवाणा प्रयोग चालू आहे.

मनाची ही ‘स्थित्यंतरे’ आहेत. करारीपणा, आत्मसन्मान- परोपकाराची भावना या गोष्टी इतिहासजमा होऊ पाहात आहेत.. भकास नजरेने आम्ही दीनवाणे हे सारे पाहात आहोत.

आतून ‘पोकळ’ पण आकाराने मोठय़ा असणाऱ्या ‘वृक्षाला’ आम्ही ‘वटवृक्ष’ म्हणू पाहात आहोत. या कथित वटवृक्षाला येणाऱ्या मोहाच्या फुलांना आम्ही कुरवाळीत बसलो आहोत आणि येणाऱ्या विषारी फळांना अमृताची गोडी आहे असे खोटे सांगत सैतानाची फौजच आम्ही तयार करीत आहोत. या साऱ्या पापांना आम्ही पुण्याच्या दोरीने बांधून जगाला निष्फळ आशावादाची पुरचुंडी बहाल करीत आहोत.

निर्मितीचे आयुष्य आम्ही, ‘ही प्रपंचमाया’ असे म्हणून ‘अल्प’ करून टाकलेले आहे. ‘समाधी अवस्थेला’ आम्ही ‘मरणप्राय’ वेदनांची फुंकर घालीत बसलो आहोत. प्रसूतीच्या वेदनांना आम्ही हिणवू पाहात आहोत. मातेला आम्ही मॉम करू पाहातोय.. पित्याला डॅड म्हणून त्यांची यथेच्छ धुलाई चालूच आहे.

आव्हानं पेलण्यास कोणीच का पुढे येत नाही? आव्हान पेलण्याचा विचारही आम्हास तुरुंगात डांबू पाहातोय.. आजूबाजूची परिस्थिती मला अशी आव्हाने पेलण्यापासून अटकाव करीत आहे. झाडावरची वटवाघळं माझ्यावर दबा धरून बसलेली आहेत. अशी भीती माझ्या मनात घर करून राहिलेली आहे..

एवढे सर्व होत असताना ‘आशावादा’ची ही ठिणगी विझत का नाही आहे? ‘न’ का विझेना, पण मला ती स्वस्थही बसू देत नाही याचे कारण काय? मी एकटा पडलो आहे का? नाही, पण मी एकटा नाही माझ्याकडून निर्मितीच घडू नये म्हणून आसमंतात फिरणारी ही गिधाडे दबा धरून बसलेली आहेत. एकटेपणाच्या ‘अत्युच्च’ क्षणी मला, ‘एकाकी’ पडल्यासारखे वाटत असले तरी त्याच वेळेस एका नव्या निर्मितीचा जन्म होतो आहे आणि तिच्या या वेदना आहेत असे समजून या एकाकीपणालाच आव्हान देण्यास मी सज्ज असले पाहिजे..
दिलीप गडकरी – response.lokprabha@expressindia.com