-सुनिता कुलकर्णी

 

फटाके भरलेलं फळ हत्तीणीला खायला घालून तिच्या पोटातल्या पिल्लासकट तिचा जीव घेण्याच्या केरळमधल्या अमानुष कृत्याचा सगळीकडून निषेध होतो आहे. हत्तीकडून होणारा उपद्रव ही काही भागातल्या नागरिकांची रोजची चिंतेची बाब असली तरी तिला हे उत्तर असूच शकत नाही. हत्ती हा नेहमी कळपाने फिरणारा, एकमेकांची काळजी घेणारा प्राणी असल्यामुळे गरोदर हत्तीण अशी एकटीच मनुष्यवस्तीत कशी आली हा प्रश्न या प्रकरणाबाबत उपस्थित केला जात आहे. आणि हे कृत्य करणाऱ्या संबंधितांबरोबरच या दुर्घटनेची जबाबदारी वनखात्याचीही आहे अशी चर्चा सुरू आहे.

या दुर्देवी हत्तीणीच्या घटनेचा धक्का एवढा आहे की त्यामुळे एका चांगल्या बातमीकडे काहीसं दुर्लक्षच झालं आहे. ही बातमी आहे नागपूरची. भरकटून आईवेगळ्या झालेल्या वाघाच्या एका पिल्लाची आणि त्याच्या आईची डीएनए टेस्ट करून त्यांना एकत्र आणण्याचा देशातला पहिलाच प्रयोग तिथे होऊ घातला आहे. हैद्राबादच्या सेल्यूलर अ‍ॅण्ड मोल्युक्युलर लॅबोरेटरीमधून आलेल्या अहवालानुसार, या भरकटलेल्या पिल्लाचे आणि एका वाघिणीचे डीएनए जुळले असून आता त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर सांगतात.

चंद्रपूरमधल्या चिचपल्ली इथल्या शेतकऱ्याला २४ एप्रिलला त्याच्या शेतात वाघाचं पिल्लू सापडलं. ती साधारण चार महिने वयाची मादी होती. वनखात्याने ते ताब्यात घेऊन चंद्रपूरमधल्या सेंटरमध्ये नेलं. त्या परिसरात टी वन आणि टी टू अशा दोन वाघिणी आणि त्यांची प्रत्येकी तीन पिल्लं वावरत असल्यामुळे हे पिल्लू नेमक्या कोणत्या वाघिणीचं असेल? असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना पडला. मग वाघिणींच्या विष्ठेचे नमुने घेऊन त्यांची आणि पिल्लाची डीएनए चाचणी करण्यात आली. आता असं कळलं आहे की टी टू या वाघिणीला चार पिल्लं झाली. त्यातलं एक भरकटून शेतात येऊन पोहोचलं होतं.

आता या मायलेकरांना एकत्र कसं आणायचं? हा वनखात्यापुढचा प्रश्न आहे. कारण त्यांची ताटातूट होऊन बरेच दिवस झाले असतील, तर वाघीण त्या पिल्लाला स्वीकारेल का? याबाबत काहीच सांगता येत नाही. बिबट्याची मादी अशा बऱ्याच काळाच्या ताटातुटीनंतर आपल्या पिल्लाला स्वीकारते, पण वाघिणीबाबत असा अभ्यास झालेला नाही.

टी टू ही वाघीण ज्या परिसरात वास्तव्याला आहे, त्या परिसरात एका पिंजऱ्यात घालून त्या पिल्लाला नेऊन ठेवलं जाईल, वाघीण कसा प्रतिसाद देते याचं निरीक्षण केलं जाईल आणि मग पिल्लाला पिंजऱ्यातून जंगलात सोडायचं की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असं वन्यजीव निरीक्षक तसंच वन्य जीवांचं अशा प्रकारे पुर्नवसन करण्यासंबंधीच्या समितीचे सदस्य बंडू धोत्रे सांगतात.

इंडियन एक्स्प्रेसच्या विवेक देशपांडे यांनी दिलेल्या या बातमीनुसार, गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे या सगळ्या मोहिमेला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. पण जितक्या लवकर परिस्थिती पूर्वपदावर येईल तितक्या लवकर या बछड्याला त्याच्या आईच्या कुशीत विसावता येईल.