गोविंद डेगवेकर – response.lokprabha@expressindia.com

राजकारणात चांगल्या माणसाने जाऊ नये, असं म्हणण्याचा हा काळ आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं आहे किंवा भ्रष्टाचार हाच शिष्टाचार, अशी राजकारणाची व्याख्या झाली आहे; पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने ओदिशाने या व्याख्येत बदल केला आहे.

महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण देण्याविषयीचे विधेयक संसदेत प्रलंबित आहे. ते तसे असण्याविषयीची कारणे विविध आहेत; पण २०१९च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत बऱ्याच राजकीय पक्षांनी ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केलाच, शिवाय प्रतिनिधित्व देताना त्यातील वैविध्य कसोशीने पाळले. यात बिजू जनता दलाच्या नेतृत्वाची दूरदृष्टी दिसून येते.

ओदिशातील २१ खासदारांपैकी सात महिला खासदार आहेत. यातील पाच महिला खासदार बिजू जनता दलाच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत, तर दोघी भाजपाच्या तिकिटावर.

संपूर्ण राज्यात सात महिला खासदार आकडा हा तसा कमीच आहे, पण त्यातील वैविध्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. सात महिला खासदारांमध्ये एक माजी सनदी अधिकारी, दुसरी डॉक्टर, तिसरी अभियंता, चौथी तळागाळात काम करणारी कार्यकर्ती, पाचवी राजघराण्यातील, सहावी गृहिणी, तर सातवी राज्य सरकारची निवृत्त कर्मचारी आहे.

बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी मार्चमध्ये लोकसभेसाठीच्या उमेदवारांबाबतचे धोरण जाहीर केले. तेव्हा आपला पक्ष ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. अर्थात तसे उमेदवार पटनायक यांनी रिंगणात उभे केले. परंतु सातपैकी पाचच उमेदवार निवडून आले. हेच भाजपाच्या बाबतीत म्हणावे लागेल. त्यांच्या तीन महिला उमेदवारांपैकी दोघी खासदार झाल्या.

सनदी अधिकारी अपराजिता सारंगी या लोकसभा निवडणुकीत या नावाप्रमाणेच ‘अपराजित’ राहिल्या. त्यांना पहिल्यांदाच तिकीट मिळाले आणि त्यांनी पहिल्यांदाच विजयाची चव चाखली. त्या मूळच्या ओदिशाच्याच होत्या. ग्रामीण विकास खात्याच्या त्या मुख्य सचिव होत्या. सनदी सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी २०१८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजपामध्ये गेल्यावर त्यांनी आपल्या काही कल्पना पक्षनेतृत्वासमोर मांडल्या. नेतृत्वाने त्यांच्या मतांचा आदर केला आणि पक्ष कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आखण्यात आला. प्रचारात त्यांनी आखून दिलेली रणनीती काटेकोरपणे राबविण्यात आली. त्याचे फळ त्यांना मिळाले. भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या. विशेष म्हणजे भुवनेश्वर हा बिजू जनता दलाचा बालेकिल्ला मानला जातो. सारंगी यांनी बिजू जनता दलाच्या अरूप पटनायक यांचा पराभव केला. त्यांनी राजकारणात प्रवेश केला तो सहजगत्या. त्याविषयी त्यांनी अगदी गेल्या वर्षीपर्यंत काही ठरवलेले नव्हते. त्यांचे कामातील झपाटलेपण हे अनेक राजकीय पक्षांना आकर्षण वाटत आले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून त्यांच्या दिवसाला सुरुवात होते आणि रात्री उशिरापर्यंत त्या काम करतात. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी महिला बचत गटांच्या भेटीगाठी घेतल्या, झोपडपट्टीतील समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना भेटण्यावर भर दिला. खरे तर सारंगी यांनी पक्ष कार्यालयात नाही तर, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या घरी भाजपात प्रवेश केला. यानंतर झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीत त्यांनी भाजपा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि पक्षाचे कार्य करीत असताना मी पक्षांतर्गत गट-तटांना मानीत नाही, असे निक्षून सांगितले. त्यांच्या कार्यप्रणालीची चुणूक पक्ष पदाधिकाऱ्यांना आलेली होती. प्रचारातही सारंगी यांनी लोकांसमोर जाताना, मला तुमचे मत नको, पण तुमच्या आकांक्षा आणि समस्या माझ्यासमोर मांडा, असे आवाहन केले.

प्रमिला बिसोई या शेतकरी कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण तिसरीपर्यंत झालेय. बिजू जनता दलाने प्रमिला यांना अस्का लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याच्या दिवसापासूनच चर्चेत राहिल्या होत्या. ६८ वर्षीय प्रमिला या शेतीतच रमल्या. यामुळे राजकारण हा त्यांच्यासाठी पूर्णपणे वेगळाच अनुभव होता. तरीही नवीन पटनायक यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. प्रमिला या गेली १८ वर्षे महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम करीत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विजयाबाबत शंका नव्हती. यामागील कारणही तसेच होते. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी २० वर्षांपूर्वी अस्का येथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नवीन यांचे वडील म्हणजे बिजू पटनायक यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा होता. प्रमिला बिसोई या गंजम जिल्ह्य़ातील वंचित समाजातील महिला आणि मुलांसाठी काम करतात. यात महिलांसाठी रोजगार आणि मुलांच्या संगोपनावर भर दिला जातो. याशिवाय प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी, गर्भवती महिलांमधील लसीकरण. त्यानंतर स्तनदा माता आणि बालकांच्या लसीकरणाची विविध शिबिरे बिसोई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जातात. शाळाबाह्य़ मुलांना एकत्रित करून त्यांना शिक्षणाची सुविधा पुरविण्याच्या कामात बिसोई यांचे योगदान जिल्ह्य़ात मोठे राहिलेले आहे.

बिजू जनता दलाच्या चंद्राणी मुर्मू यांनी केयोन्झार मतदारसंघातून विजय मिळविला. चंद्राणी यांना आदिवासी भागातून उमेदवारी देण्यात आली. चंद्राणी यांच्या नावावर या विजयासोबत एका विक्रमाची नोंद झाली आहे. म्हणजे लोकसभेतील सर्वात तरुण खासदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत. चंद्राणी यांचे वय २५ वर्षे आहे. भुवनेश्वर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून चंद्राणी यांनी पदवी मिळविली आहे. खरे तर मुर्मू यांनी ‘बी-टेक’ची पदवी घेतल्यानंतर काही दिवस नोकरीच्या शोधात घालवले. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी घोषित होणे, हे चंद्राणी यांच्यासाठी आश्चर्याचीच गोष्ट होती. चंद्राणी यांनी केयोन्झार मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या अनंता नायक यांचा पराभव केला. ‘सर्वात कमी वयात खासदार म्हणून निवडून येणं ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची नाही, तर येत्या पाच वर्षांत खनिजांनी समृद्ध असलेला केयोन्झारचा परिसर सोयी-सुविधांनी समृद्ध करण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. ते मला अधिक महत्त्वाचे वाटते,’ असे मुर्मू म्हणाल्या.

भाजपा नेत्या संगीतासिंह देव या ओदिशातील राजकारणात नवख्या नाहीत. पटनागड संस्थानाच्या म्हणजे राजघराण्यातील सदस्या म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि त्यांचा राजकारणात दबदबा कायम राहिला आहे. बालनगीर लोकसभा मतदारसंघातून संगीतासिंह याआधी तीनदा निवडून आल्या आहेत.

कटकमधील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पॅथोलॉजी विभागात सहयोगी प्राध्यापक असलेल्या राजश्री मलिक यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा पटनायक यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता आणि मलिक यांनी तो सार्थही ठरवला. किनारपट्टी प्रदेशात असलेल्या जगतसिंगपूर मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या िरगणात होत्या. लोकसहभाग आणि विकासाची दृष्टी या दोन्ही गोष्टींवर भर देऊन त्यांनी या निवडणुकीत यश मिळविले.

बिजू जनता दलाच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोनंपैकी एक महिला उमेदवार माजी राज्य सेवा अधिकारी आहेत. राज्याच्या वित्त सेवा खात्यातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर शर्मिष्ठा सेठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्या जयपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, तरमंजुलता मंडल या गृहिणी भद्रक मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

१. अपराजिता सारंगी, २. प्रमिला बिसोई, ३. संगीता कुमारी सिंगदेव ४. शर्मिष्ठा सेठी, ५. मंजुलता मंडल, ६. चंद्राणी मुर्मू, ७. राजश्री मलिक