हाताखालच्या स्त्रीचे लैंगिक शोषण हा पुरुष म्हणून मिळालेला अधिकार असल्याची समजूत घेऊन जगणारे विकृत विषाणू समाजात मोठय़ा प्रमाणावर पसरले आहेत.

दररोज ठरावीक वेळी बसस्टॉपला थांबणारी ‘ती’. बरोबर वेळ हेरून तिच्यासाठी गाडी थांबवणारा ‘तो’.. तिच्याच ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारा. दुप्पट वयाचा. सुरुवातीला एवढय़ा उच्चपदस्थानं आपल्यासाठी गाडी थांबवून लिफ्ट दिल्याचं तिला अप्रूप वाटलं, आदर वाटला त्याच्याविषयी. ती गाडीत बसलीदेखील. पण गाडीतलं त्याचं वागणं तिला पटलं नाही. त्याची नजर खुपली तिला. पण नेमकं काय सांगणार आणि कुणाकडे तक्रार करणार याविषयी म्हणून गप्प राहिली. आता नियमित तो तिला ‘लिफ्ट’साठी विचारू लागला. तिने एक-दोनदा नाही म्हटलं. ठरलेली वेळ चुकवून टाळायचा प्रयत्नही केला. नंतर ऑफिसमध्येच त्यानं तिला विचारलं. तेव्हा टाळणं शक्य नव्हतं. त्या दिवशी गाडीत त्याने काही तरी निमित्त करून हात धरला तिचा. तिने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली, त्यावर तो फक्त हसला आणि वावगं काही नसल्याचं दाखवू लागला. दुसऱ्या दिवशीपासून नियमितपणे निर्लज्जपणे तिला ऑफिसमध्येही जवळीक दाखवू लागला. प्रचंड मानसिक ताणाखाली काम करीत असे ती. शेवटी सहन न होऊन तिने राजीनामा दिला.

xxx

दुसरी ‘ती’.. एका प्रसिद्ध संशोधकाकडे काम करणारी उच्चशिक्षित अभ्यासक. लॅबमध्ये काम करताना मुद्दाम वेगळी वागणूक द्यायचा तो संशोधक तिला. तिच्या ड्रेसबद्दल कमेंट करायचा, तिला आग्रह करकरून कॉफी प्यायला घेऊन जायचा. एक दिवस तिला थांबवून घेतलं रात्री उशिरा काही निमित्ताने आणि त्याचा डाव उघड झाला. तिनंही महिन्याभरात नोकरी सोडलीच त्यानंतर.

xxx

तिसरी ‘ती’.. नुकतीच रुजू झालेली तरुण मुलगी. दररोज कँटीनमध्ये एक वरिष्ठ तिला गाठायचेच. तिच्या कॉम्प्युटरपाशी येऊन काही काम समजावण्याच्या बहाण्याने लगट करायचे. काही तरी विषय काढून गप्पा मारत बसायचे. यांना टाळायचं कसं, तक्रार करायची ती काय आणि आपल्यावर कोण विश्वास ठेवणार.. असे अनेक प्रश्न घेऊन ती तणावात काम रेटू लागली.

xxx

अशा किती तरी ‘ती’ सापडतील. हे वाचणाऱ्या निम्म्याहून जास्त स्त्रियांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या या त्रासाचा असा एक तरी अनुभव आलाच असेल आजपर्यंत. प्रत्येक अनुभवाला लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही कदाचित, पण कुचंबणा तर नक्कीच आहे ही आणि लैंगिक शोषणाचाच हा भाग. तरीही यावर बहुतेक जणी गप्प बसणं पसंत करतात. अति झालं तर नोकरी सोडण्याचा पर्याय स्वीकारतात. एखादीच याविषयी आवाज उठवते, तक्रार करते, पण तिला तिच्या हेतूंसह अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायची तयारी ठेवावी लागते तेव्हा आणि त्यासाठी प्रचंड मानसिक धैर्य लागतं हे निश्चित. या सगळ्या गोष्टी आत्ता आठवायचं कारण म्हणजे गेल्या आठवडय़ातली एक घटना. यूटय़ूब, ब्लॉग, ट्विटर आदी नवमाध्यमांमध्ये रमणाऱ्या सर्वाना गेल्या आठवडय़ात या माध्यमांवर चर्चिलेली एक घटना लक्षात असेल. द व्हायरल फीवर किंवा टीव्हीएफ नावाच्या प्रसिद्ध वेबचॅनेलचा संस्थापक-संचालक अरुणभ कुमार या चर्चेच्या केंद्रस्थानी होता आणि चर्चेला कारण होतं त्याच्या संस्थेत काम करणाऱ्या एका मुलीनं एका ब्लॉगपोस्टद्वारे त्याच्यावर केलेले आरोप.

या मुलीने वेगळ्या नावाने लिहिलेल्या या ब्लॉगपोस्टमध्ये अरुणभ कुमारने आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वापर करीत आपल्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा सतत प्रयत्न केला, लैंगिक शोषणाच्या या प्रयत्नामुळे आपल्याला किती मानसिक त्रास झाला याची कैफियत तिने मांडली आहे. कारण शोधून लगट करणं, कधी थेट तर कधी आडून लैंगिक सुखाची मागणी करणं असे गंभीर आरोप या मुलीने केले आहेत. एकाच गावचे, एकच भाषा बोलणारे आणि मुंबईत एकटे राहणारे, भविष्य घडवायला आलेले आपण दोघे या ‘आपुलकी’तून या सगळ्याची सुरुवात झाल्याचंही तिने नमूद केलं आहे. त्याच्या अपेक्षा भलत्याच वळणाकडे जायला लागल्याचं लक्षात आल्यावर ती सावध झाली आणि तिने आपली नाराजी, नकार वेळोवेळी व्यक्त केला. पण अरुणभने त्याचे प्रयत्न सुरू ठेवले. याविषयी त्याच्या सहकाऱ्यांनाही कल्पना होती, असा या मुलीचा दावा आहे आणि ‘चलता है’, असं सांगत त्या सहकाऱ्यांनीही त्याची तळी उचलून धरली. दोन र्वष तिने हे अत्याचार सहन केले आणि नंतर व्यक्त व्हायला या माध्यमाची निवड केली.

या मुलीने हे सगळे आरोप असे ब्लॉगद्वारे का करावेत, पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, दोन र्वष हे सहन करण्याचं कारण काय, लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याची ही युक्ती असू शकत नाही का, वगैरे अनेक तर्क-वितर्क आणि निवाडे समाजमाध्यमांवर या तिच्या पोस्टनंतर उमटू लागले. पण सगळ्यात कहर केला अरुणभ कुमारच्या यावरील वक्तव्याने- ‘‘आय अ‍ॅॅम ए हेट्रोसेक्स्युअल, सिंगल मॅन अ‍ॅण्ड व्हेन आय फाइंड ए वुमन सेक्सी, आय टेल हर शी इज सेक्सी. आय कॉम्प्लिमेन्ट वुमेन. इज दॅट राँग?’’

केवळ एक पुरुष म्हणून कुठल्याही स्त्रीला ‘सेक्सी’ म्हणण्याचा हा अधिकार कुणी दिला याला? बोर्ड रूममध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या दिसण्यावरून, वेशभूषेवरून कॉम्प्लिेमेंट देणं अयोग्यच आहे. त्यातून ते तिला आवडत नाही, हे माहिती असताना त्या देणं हा त्या व्यक्तीचा अवमानच आहे आणि विनयभंगाचाच हा प्रकार आहे हे निश्चित. आपल्या चित्रपटांमधूनही या अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. एखाद्या मुलीच्या हात धुऊन मागे लागणं आणि अखेर तिला ‘पटवणं’ हे पुरुष म्हणून भूषणावह मानलं जातं. नकार पचवणं ही अनेक पुरुषांसाठी भयंकर मानहानीकारक गोष्ट असते. त्यातून नकार देणारी स्त्री त्याच्या हाताखाली काम करणारी असली तर तिला तो अधिकार नाही, अशीच त्याची मानसिकता असते.

अरुणभ कुमार हा नवमाध्यमांतील स्टार्ट-अप लाटेतला आघाडीचा मानकरी. ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतलेला तरुण. त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून सुरू केलेल्या ‘टीव्हीएफ’ या चॅनेलचं खूप कौतुक झालं. तरुणाईमध्ये अरुणभ कुमार हे खूप लोकप्रिय नाव आहे. त्यांच्या वेबचॅनेलच्या माध्यमातून स्त्री-पुरुष ठोकताळे मोडणारे काही वेगळे शोदेखील होत असतात. त्याबद्दल या चॅनेलचे स्त्रीवादी विचारधारेतून कौतुकही होत असतं. ही सगळी पाश्र्वभूमी महत्त्वाची, कारण त्यावरूनच अशा प्रकरणांमध्ये समाज निवाडा देण्याचं काम करीत असतो. खरं तर निवाडा देण्यासाठी आपल्याकडे वेगळी सक्षम यंत्रणा आहे, पण या यंत्रणांऐवजी समाजमाध्यमांतूनच अशा प्रकरणांवर निवाडा केल्याच्या थाटात प्रत्येक जण भाष्य करीत असतो. शोषण करणारी व्यक्ती जितकी प्रसिद्ध आणि प्रस्थापित तितकं त्याच्या अवगुणांवर पांघरूण घालणं सोपं.

या मुलीनं अरुणभबद्दल लिहिल्याबरोबर अशा आणखी तरुणी पुढे आल्या आणि त्यांनी आमचेही असेच अनुभव असल्याचं सांगितलं. लैंगिक अत्याचार प्रतिबंधक विभाग, न्यायव्यवस्था, पोलीस अशा सर्व यंत्रणा स्त्रियांसाठी उपलब्ध असताना या प्रसंगांबाबत व्यक्त व्हायला समाजमाध्यमं का सोयीची आणि जवळची वाटतात, याचा विचार करायला हवा. अन्याय होतोय, शोषण होतंय हे सिद्ध कसं करणार आणि काय सांगणार, हा प्रश्न प्रत्येक वेळी असतो. शिवाय अशा प्रसंगी गुपचूप बसून वेगळी वाट धरणंच अनेक स्त्रियांना योग्य वाटतं. निम्म्याहून अधिक प्रसंगी तक्रार नोंद होत नसली तरीही इंडियन बार कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक स्त्रियांनी आपल्याला कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचा त्रास होत असल्याचं नमूद केलं होतं. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार युरोपियन महासंघातील देशांमध्ये ५० टक्क्यांवर स्त्रियांना काम करताना अशा नको असलेल्या अपेक्षांचा सामना करावा लागतो. म्हणजे जगभर ही परिस्थिती आहे. ही आकडेवारी भयानक आहे आणि वास्तववादी आहे. स्त्री म्हणून असे अनुभव यायचेच, त्याकडे दुर्लक्ष करायचं, मार्ग काढायचा याची शिकवण आपल्यात कायम असल्याने समाजातल्या या विकृत विषाणूंचं फावतं.

आर. के. पचौरी, तरुण तेजपाल, फणीश मूर्ती आणि आता अरुणभ कुमार या सगळ्या प्रकरणांतील तथ्य काय, दोषी कोण, उद्देश काय, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरीही हाताखालच्या स्त्रीचे लैंगिक शोषण हा पुरुष म्हणून मिळालेला अधिकार असल्याची समजूत घेऊन जगणारे विकृत विषाणू समाजात मोठय़ा प्रमाणावर पसरले आहेत हे विसरता येत नाही. या विषाणूंचा नायनाट करायचा असेल तर अशा सगळ्या व्हायरलच्या तापांची दखल घ्यावीच लागेल आणि वेळीच उपचार करावे लागतील, हे निश्चित.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com
@aru001