04 June 2020

News Flash

अभिजात : शाकुंतलं सेव्यताम्

आषाढ महिना आणि कवि कुलगुरू कालिदासाचं अद्वैत असं नातं आहे.

आषाढ महिना आणि कवि कुलगुरू कालिदासाचं अद्वैत असं नातं आहे. ‘शाकुंतल’ या कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा गोडवा आजही कमी झालेला नाही.

फार पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करण्याचे विद्वानांनी ठरवले, तेव्हा करंगळीवर पहिले नाव अर्थातच कालिदासाचे आले. त्यानंतर त्याच्या योग्यतेचा नाव घेण्याजोगा दुसरा कवीच त्यांना सापडेना. तेव्हा करंगळीशेजारचे बोट तसेच बिननावाचे राहिले आणि त्याचे ‘अनामिका’ हे नाव सार्थ झाले.

‘पूरा कवींना गणनाप्रसंगे

कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात्

अनामिका सार्थवती बभूव॥’

कालिदासाची वाङ्मयीन महत्ता वर्णन करणारे असे अनेक उल्लेख संस्कृत साहित्यात आढळतात. त्यावरून प्राचीन साहित्यकारांना त्याच्याविषयी किती आदर वाटत होता याची कल्पना येते. कोणी त्याच्या काव्याला ‘मधुरसाद्रमंजिरी’, तर कोणी ‘ललितोद्गार शृंगार’ असे म्हटले आहे. कालिदासाला ‘कविकुलगुरू’ अशी पदवी देऊन त्याचे साहित्य हा ‘कविताकामिनीचा शृंगार’ असल्याचे स्पष्ट करताना ‘गीतगोविंद’कार जयदेव यांनी म्हटले होते-

‘भासो हास: कविकुलगुरु:

कालिदासो विलास:।

केषां नैषा कथय

कविताकामिनी कौतुकाय॥’

(भासाचे हास म्हणजे मनोव्यापार हे वैशिष्टय़ आहे. कालिदासाचा नवरसांचा अमृतविलास हा केवळ कविताकामिनीच्या सौंदर्याच्या कौतुकासाठीच सजला आहे.) कालिदास हा महाकवी असल्याचे सांगताना, ‘अस्मिन्नतिविचित्रकविपरम्परावाहिनी संसारे कालिदासप्रभृतयो द्वित्रा: पत्र्चषा वा महाकवय इति गण्यते।’ (या जगात विविध प्रकारचे कवी असले, तरी कालिदासासारखे दोन- पाचच महाकवी आढळतात.) असा निर्वाळा संस्कृत टीकाकार आनंदवर्धन यांनी दिला होता.

आपल्या लेखनसामर्थ्यांने वाचकमानसाला प्रभावित करणाऱ्या कालिदासाची जवळपास सर्वच साहित्यनिर्मिती ही तसे पाहिले, तर त्याच्या पूर्वकालीन प्रतिभावंतांच्या वाङ्मयावर तसेच पौराणिक आणि पूर्वपरंपरेने प्रचलित असलेल्या कथांवर आधारित आहे. कालिदासाचे मन्दक्रांता वृत्तातील ‘मेघदूत’ हे काव्य ‘ब्रह्मवैवर्तपुराण’ आणि रामायणातील ‘सुंदरकांडा’वर आधारित आहे. सूर्यवंशी राजांची कूळपरंपरा सांगणारे १९ सर्गाचे ‘रघुवंश’ आणि ‘कुमारसंभव’ हे शंकर-पार्वतीच्या विवाहाची कहाणी सांगणारे १७ सर्गाचे काव्य यांना प्राचीन पुराणकथांचा संदर्भ लाभला आहे. शृंगवंशीय राजा अग्निमित्र आणि मालविका यांची प्रेमकहाणी निवेदन करणाऱ्या ‘मालविकाग्निमित्र’ नाटकाला पारंपरिक कथेची, तर ‘विक्रमोर्वशीय’ (विक्रम आणि उर्वशीची प्रेमकहाणी) या नाटकाला ‘मत्स्यपुराण’ आणि ‘विष्णुपुराणा’ची पाश्र्वभूमी लाभलेली आहे. कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ या सात अंकी नाटकालाही महाभारताचा आधार आहे. अर्थात त्यामुळे कालिदासाला कमीपणा येतो असे मात्र मुळीच नाही. सरतेशेवटी, ‘सवरेऽपि परेभ्य एव व्युत्पद्यते’ (प्रत्येक ग्रंथाकार हा आपल्या पूर्वजांचे भांडवल घेऊनच व्यापार करीत असतो.) या राजशेखराच्या उक्तीनुसार साहित्यनिर्मिती होत असते. कालिदासाचे वेगळेपण असे, की मूळ कथानकाची चौकट कायम ठेवून त्याने आपल्या प्रतिभेने त्यात वेगवेगळे रंग भरले आणि त्या कथानकाचा चेहरामोहराच पार बदलून टाकला.

कालिदासाची सर्वच साहित्यनिर्मिती अभिजात असली, तरी त्याची नाटके अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कालिदासाने नाटकाला नेत्रयज्ञ मानले आहे आणि नाटकाचे महत्त्व वर्णन करताना,

‘त्रगुण्योद्भवमात्र लोकचरितं नानारसं दृष्यते।

नाटय़ं भिन्नरुवेर्जनस्य बहुधापि एक समराधनम्॥’

(त्रिगुण दोषांनी उत्पन्न झालेल्या लोकांना विविध रसांमध्ये रुची असली, तरी या विविध रुची असलेल्यांचे नाटक हेच एकमात्र समाधान आहे.) असे म्हटले आहे. कालिदासाचे सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे ‘शाकुंतल’. त्याबद्दलही म्हटले गेले आहे –

‘काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या: शकुंतला:’

(साहित्यात नाटक हा प्रकार रम्य; त्यातही ‘शाकुंतल’ हे नाटक सुंदर.)

‘शाकुंतल’ या नाटकाची कथा तशी सर्वपरिचितच आहे. महर्षी व्यासांनी महाभारताच्या ‘आदिपर्वा’तील आठ अध्यायांत वर्णन केलेल्या ‘शंकुतलोपाख्यान’ या कथानकात पुरू वंशाचा इतिहास वर्णन करताना राजा भरत याच्या जन्माची म्हणजे शकुंतलेची कथा सांगितली आहे. या कथेतील हस्तिनापूरहून शिकारीला निघालेला दुष्यंत राजा कण्व मुनींच्या आश्रमात येतो आणि शकुंतलेच्या प्रेमात पडतो व तिला गांधर्वविवाह करण्यासाठी आग्रह करतो. अतिशय मुक्त आणि स्पष्टोक्ती असलेली शकुंतला या लग्नसंबंधातून होणाऱ्या मुलाला हस्तिनापूरचा राजा करण्याच्या अटीवर दुष्यंताशी विवाहबद्ध होते. गांधर्वविवाहानंतर शकुंतला कण्व मुनींच्या आश्रमात मुलाला जन्म देते 30-lp-kalidasआणि त्याला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी दुष्यंताच्या दरबारात जाते. दुष्यंताने मुलाचे पितृत्व नाकारल्यावर संतप्त झालेली शकुंतला राजा दुष्यंताची निर्भर्त्सना करते. सरतेशेवटी देववाणी होते आणि प्रजेला गांधर्वविवाहाची माहिती देऊन दुष्यंत शकुंतलेचा व मुलाचा स्वीकार करतो. महाभारतातील शकुंतलेची कहाणी तशी फारशी आकर्षक वा लक्षवेधी नाही.

महाभारताची मौखिक परंपरा प्राचीन असली, तरी त्याचे प्रथम लिखित स्वरूप ख्रिस्तपूर्व ४०० ते इ. स. ४०० च्या दरम्यान असावे. त्यानंतर महाभारतातील या कथानकावर कालिदासाने ‘शाकुंतल’ हे नाटक इ. स. ३८० च्या आसपास लिहिले, असे समजले जाते. महाभारताचा श्रोतृवर्ग हा सामान्य बहुजन समाज होता, तर कालिदासाचे ‘शाकुंतल’ हे नाटक राजदरबारातील अभिजनवर्गासमोर सादर करण्यासाठी लिहिले गेले होते. नाटक लिहिताना कालिदासाने महाभारतातील कथानकात अनेक बदल केले.

महाभारतातील आणि कालिदासाच्या नाटकातील शकुंतला ही एकच व्यक्तिरेखा असली, तरी तिची व्यक्तिमत्त्वे मात्र भिन्न आहेत. महाभारतातील शकुंतला, महाभारतातील इतर व्यक्तिरेखांप्रमाणेच आत्मसन्मान असलेली, व्यवहारी वृत्तीची स्वतंत्र स्त्री आहे; तर कालिदासाची शकुंतला ही लाजाळू आहे, भोळीभाबडी, सात्त्विक आणि निरागस निसर्गकन्या आहे. महाभारतातील शकुंतला सरळ दुष्यंताशी संवाद साधते आणि आपल्या जन्माची कथा कोणताही न्यूनगंड न बाळगता त्याला सांगते व लग्नसंबंधातून होणाऱ्या मुलाला हस्तिनापूरचा राजा करण्याच्या अटीवर त्याच्याशी गांधर्वविवाह करण्यास तयार होते. त्याउलट कालिदासाच्या नाटकातील शकुंतला दुष्यंताशी समोरासमोर बोलतसुद्धा नाही. तिचा दुष्यंताशी संवाद प्रियवंदा व अनसूया या सख्यांमार्फत होतो. शकुंतला ही विश्वामित्र आणि मेनका यांची मुलगी असल्याची वस्तुस्थिती प्रियवंदाच दुष्यंताला सांगते. कण्व मुनींच्या आश्रमात कमळ, आंबा, बकुळ, सप्तवर्णी अशा वृक्ष- वेली असल्याचा उल्लेख नाटकात आलेला आहे. हा उल्लेख जंगलातील आश्रमापेक्षा राजवाडय़ातील बागेशी अधिक जवळीक साधणारा आहे. दुष्यंताबाबतही असेच घडले आहे. महाभारतातील दुष्यंत हा काहीसा भित्रा, स्वार्थी आणि कामुक प्रवृत्तीचा आहे. कालिदासाच्या नाटकात दुर्वास ऋ षींचा शाप, अंगठी हरवल्याने दुष्यंताला शकुंतलेचे विस्मरण होणे या व अशाच आणखी काही उपकथानकांमुळे दुष्यंताचे उदात्तीकरण तसेच समर्थन होते आणि नाटकाचा नायक म्हणून तो झळाळून उठतो. महाभारतातील शकुंतलेची कथा ही पुरू वंशातील भरत राजाच्या जन्माची आणि एक तेजस्वी स्त्रीच्या स्वाभिमानाची तसेच अधिकाराची व त्यासंदर्भातील राजा आणि पती यांच्या कर्तव्यबाबतची कथा आहे. कालिदासाने आपल्या नाटकात मानवी भावभावनांचे, निसर्गाचे आणि अद्भुत वातावरणाचे अप्रतिम चित्रण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मानवी आवाक्यापलीकडील अगम्य व सर्वशक्तिमान नियतीची अपरिहार्यता येथे ठळकपणे अधोरेखित झाली आहे. या नाटकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याची वाङ्मयीन महत्ता त्यातील शब्दसौंदर्यात नसून, त्यातून व्यक्त झालेल्या भावनांच्या आविष्कारात आहे. एकूणच या गुणविशेषांमुळे कालिदासाचे ‘शाकुंतल’ एका वेगळ्याच उंचीवर पोहचते आणि कालजयी अभिजातता त्याला प्राप्त होते.

अशा या अभिजात नाटय़कृतीचा इंग्रजीत सर्वप्रथम अनुवाद करण्याचे श्रेय विलियम जोन्स यांना जाते. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी म्हणून भारतात आलेले जोन्स काही काळ बंगालमध्ये न्यायाधीशही होते. ‘शाकुंतल’ या नाटकाच्या गुणवत्तेविषयी त्यांच्या ऐकण्यात आले. आपले संस्कृत भाषेचे गुरू रामलोचन यांच्या मदतीने त्यांनी हे नाटक अभ्यासले. ‘शाकुंतल’मुळे विलियम जोन्स चांगलेच प्रभावित झाले. संस्कृत भाषेला जवळ असलेल्या लॅटिन भाषेत त्यांनी त्याचा अनुवाद केला आणि नंतर ते इंग्रजीत आणले. या नाटकातील सूक्ष्म मानवी संबंधांच्या प्रभावी आविष्कारामुळे त्यांनी कालिदासाला ‘भारताचा शेक्सपिअर’ असे म्हटले होते. हा अनुवाद १७८९ मध्ये प्रसिद्ध झाला आणि जगभरातील विद्वानांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. हा अनुवाद वाचून त्या वेळी इंग्लंडमध्ये असलेले जर्मन तत्त्वज्ञ हुंबोल्ट चांगलेच प्रभावित झाले. ‘शाकुंतल’ वाचून ते म्हणाले, ‘‘प्रेमिकांच्या मनावर निसर्गातील वातावरणाचा कसा प्रभाव होतो हे वर्णन करण्यात कालिदासाची हातोटी विलक्षण आहे. निसर्गवर्णन आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म चित्रण यामुळे या नाटकाला जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळेल.’’

याच सुमारास जॉर्ज फोस्टर हे मूळचे स्कॉटिश; पण नंतर जर्मनीत स्थायिक झालेले विद्वानही इंग्लंडमध्येच होते. वनस्पतीशास्त्रज्ञ असलेल्या फोस्टर यांना भूगर्भशास्त्र, भूगोल, खनिजशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र या विषयांचे सखोल ज्ञान आणि इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषा चांगल्या प्रकारे अवगत होत्या. प्रवास हा त्यांचा आवडता छंद होता आणि इतरांच्या जगप्रवासाची त्यांनी भाषांतरे केली होती. १७९० मध्ये जॉर्ज फोस्टर यांचा परिचय हुंबोल्ट यांच्या मध्यस्थीने विलियम जोन्स यांच्याशी लंडन शहरात झाला. त्या वेळी विलियम जोन्स यांनी आपण केलेले ‘शाकुंतल’चे इंग्रजी भाषांतर फोस्टर यांना भेट दिले. फोस्टर यांना भारताविषयी अतिशय आकर्षण वाटत होते. ते भारतात कधीच आले नव्हते, तरी भारत म्हणजे अगाध बुद्धिमत्ता आणि पावित्र्य यांचे प्रतीक आहे, असे त्यांचे मत होते. ‘शाकुंतल’च्या इंग्रजी अनुवादामुळे फोस्टर अतिशय भारावले गेले आणि त्यांनी विनाविलंब त्याचा जर्मन भाषेत अनुवाद केला. हा अनुवाद शिलरच्या ‘यालिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आणि १७ मे १७९१ रोजी योहान पेटर फिशर ऑफ माइन्स यांनी ग्रंथरूपाने प्रकाशित केला. फोस्टरने या ग्रंथाची अर्पणपत्रिका प्राध्यापक हेर्डर यांच्या नावे केली होती. हेर्डर यांना भारताविषयी अतिशय जिव्हाळा वाटत होता. जगातील सर्व भाषांचे उगमस्थान पूर्वेकडे असून मानववंशाचा आरंभही तेथेच झाला असावा, असे त्यांचे मत होते. हेर्डर यांचे भारतप्रेम लक्षात घेऊन फोस्टरने अर्पणपत्रिकेत म्हटले होते- ‘माझी ही मानसकन्या तुमच्या अतिप्रिय अशा पौर्वात्य जगतात काही सुगंधी घटका घालवायला तुम्हाला मदत करतील या विचाराने मला आनंद होत आहे.’ जॉर्ज फोस्टरने ‘शाकुंतल’ या नाटकाच्या जर्मन अनुवादाची एक प्रत प्रख्यात जर्मन कवी गटे यांना भेट दिली होती. नाटक वाचून अतिशय प्रभावित झालेल्या गटे यांनी फोस्टर यांना जे पत्र पाठविले, ते उपलब्ध नसले, तरी त्याच्या इंग्रजी अनुवादाचा संस्कृत भावानुवाद उपलब्ध आहे. तो असा –

‘वासन्तं कुसुमं फलं च युगपद्

ग्रीष्मस्य सर्वच यत्

यद्योन्यन्मनसो रसायनमत:

सन्तर्पण, मोहनम्।

एकीभूतम्भूतपूर्वमथवा

स्वलरेकभूलोकयोरैश्वर्य

यदि वांछसि प्रिय सखे

शाकुंतलं सेव्यताम्॥’

(अर्थ: वसंत ऋ तूत झाडाला फुटलेली नवी पालवी, मोहर, फुले आणि मनाला आनंदित करणारे जे जे काही सुंदर, उत्कट, लोभसवाणे व उदात्त आहे ते सर्व एवढेच नव्हे, तर ही पृथ्वी आणि स्वर्ग या गोष्टी तुम्हाला केवळ एका शब्दातच गुंफायच्या असतील, तर मी फक्त ‘शकुंतला’ एवढेच म्हणेन.)

‘शाकुंतल’ नाटकातील कालिदासाच्या प्रतिभेने गटे भारावला गेला आणि या नाटकाच्या नाटय़तंत्राने तो प्रभावित झाला. नाटकाच्या सुरुवातीला येणारा प्रस्तावनेचा सूत्रधार आणि नटी यांच्या संवादामुळे विषयप्रवेश होतो आणि नाटकाच्या दृष्टीने प्रेक्षकांची मानसिक तयारी होते, हे त्याला जाणवले. त्याचा प्रभाव गटेच्या ‘फाउस्ट’ या नाटकावर दिसून येतो. १७९० मध्ये ‘फाउस्ट’चा जो भाग प्रकाशित झाला, त्यात हा सूत्रधार प्रवेश नाही. मात्र १८०६ मध्ये जे संपूर्ण फाउस्ट प्रसिद्ध झाले, त्यात मात्र या प्रस्तावना तंत्राचा समर्पक वापर केलेला दिसतो. गटेच्या फाउस्टचा सूत्रधारही नाटकाला ‘परमेश्वराची निर्मिती’ समजतो आणि ही निर्मिती सहजपणे सादर करता यावी यासाठी पंचमहाभूतांना आवाहन करतो. हे नाटय़दर्शन मनोरंजक पद्धतीने कसे घडवावे, याविषयी कालिदासाच्या नाटकातील सूत्रधाराप्रमाणेच फाउस्टचा दिग्दर्शकही काळजीत पडला आहे. या प्रस्तावना तंत्राचा विकसित आणि प्रभावी वापर ‘एलिअनेशन इफेक्ट’चा प्रवर्तक नाटककार बटरेल्ट ब्रेख्त (१८९८-१९५६) याने नंतरच्या काळात आपल्या ‘थ्री पेनी ऑपेरा’सारख्या काही नाटकांतून केला. मराठीतील श्रेष्ठ नाटककार अण्णासाहेब किलरेस्कर यांच्या ‘शाकुंतल’मधील नांदी म्हणजे कालिदासाच्या प्रस्तावना तंत्राचा लोभसवाणा आविष्कार आहे.

कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचा प्रभाव गटेच्या ‘फाउस्ट’पुरताच मर्यादित राहिला नाही. याच सुमारास गटेने ‘डेर गोट उण्ट डी बायाडेरं’ (ईश्वर आणि वारांगना) ही दीर्घकविता लिहिली. नि:स्वार्थी प्रेम आणि प्रियकराविषयी आत्यंतिक निष्ठा ही शकुंतलेची स्वभाववैशिष्टय़े या कवितेच्या नायिकेतही आढळतात. तसेच सौंदर्यासक्तीने तरुण स्त्रीला त्रास देणारा भुंगा हे कालिदासाच्या शाकुंतल नाटकातील प्रतीकही गटेने ‘अल सामी’ (सामीला उद्देशून) या कवितेत वापरले आहे. भुंग्याचा व्रण माती टाकल्यावर भरून आला, पण सामीच्या प्रेमभंगाची जखम त्यावर माती टाकल्यावर तरी भरून येईल का, असा प्रश्न गटेने या कवितेच्या अखेरीस विचारला आहे.

‘शाकुंतल’ नाटकाचा इंग्रजी आणि जर्मन भाषेतील अनुवाद जगात मान्यता मिळवीत होता, तेव्हा जगात स्वच्छंदतावादाचा (रोमँटिसिझम) उदय होत होता. ही इम्युनल कान्ट (१७२४-१८०४) या तत्त्वज्ञानाच्या विचारांविषयीची नकारात्मक प्रतिक्रिया होती. बुद्धी आणि तर्क यांच्या माध्यमातून सर्व गोष्टी घ्याव्यात हा कान्टचा विचार मूळ धरत होता; पण तर्क आणि बुद्धीच्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत व त्यांचे आकलन केवळ बुद्धीने होऊ शकत नाही, असा विचारही समाजमानसात काही मंडळी रुजवत होती. ‘शाकुंतल’च्या इंग्रजी आणि जर्मन भाषेतील अनुवादामुळे या स्वच्छंदतावादी विचारांच्या मंडळींना समर्थन लाभले. तर्क आणि बुद्धी याप्रमाणेच भावनेला व अद्भुतालाही साहित्यात स्थान आहे; एवढेच नव्हे, तर अद्भुत हेच मुळी साहित्यातील वास्तव आहे, अशी प्रतिक्रिया जोरकसपणे प्रतिपादन होऊ लागली. त्यामुळे स्वच्छंदतावादी साहित्यावर नंतरच्या काळात फार मोठा प्रभाव ‘शाकुंतल’ नाटकाचा पडला असल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्याचप्रमाणे भारतीय साहित्य आणि संस्कृती यामुळे थॉमस मान, स्टेफगन झ्वाईग, हेर्मान, फ्रीडरीश श्लेगेल, नोव्हालिस यांसारखे प्रतिभावंत प्रभावित झाले. नोव्हालिस या स्वच्छंदतावादी साहित्यिकाने तर कोणत्याही सुंदर गोष्टीला ‘इन्दोस्तान’ अशी भौगोलिक संज्ञाच देऊन टाकली हेती. त्याच्या प्रेयसीला कौतुकाने सासरी शकुंतला असे म्हणत असत. एफ. ए. हेडेन याने भारताची मुक्तकंठाने स्तुती केली होती. लोक तर त्याला थट्टेने ‘इंडोमॅनिया’ झाला आहे, असे म्हणत. फ्रीडरीश श्लेगेल या जर्मन पंडिताला तर संस्कृतमधील छंदातून कविता करण्याची सवय जडली होती. याच काळात जॉर्ज फोस्टरच्या जर्मन भाषेतील अनुवादावरून युरोपातील अनेक भाषांत अनुवाद झाले. अमेरिकेत १८०५ मध्ये ‘दि मन्थली अ‍ॅन्थालॉजी’ या बोस्टनच्या प्रख्यात नियतकालिकात विलियम जोन्सच्या इंग्रजी भाषांतराचे प्रकाशन झाले.

जगातील विविध भाषांप्रमाणेच भारतातील जवळपास सर्वच भाषांतून ‘शाकुंतल’चे अनुवाद झालेले आहेत. मराठीतही असे बरेच अनुवाद आहेत. पैकी प्रख्यात इतिहास संशोधक आणि कलासमीक्षक द. ग. गोडसे यांनी केलेला अनुवाद लक्षणीय होता. मूळ संस्कृत नाटक रंगभूमीवर सादर करताना, गोडसे यांनी भरत मुनींच्या नाटय़संकल्पनेनुसार रंगमंच साकारला होता. जर्मनीत या ‘शाकुंतल’चे प्रयोग झाले, तेव्हा मूळ नाटकाप्रमाणेच त्यांच्या नेपथ्यालाही फार मोठी दाद मिळाली होती.

युरोपात या नाटकावर ऑपेरा (संगीतिका) करण्याचे अनेकवार प्रयत्न झाले. जे. डब्ल्यू. थोगशिक अणि लिओपोर्ड शेफर यांनी ऑपेरा लिहिला, पण त्याचा प्रयोग होऊ शकला नाही. रंगभूमीवर त्याचा पहिला प्रयोग १९८४ मध्ये फेलिक्स वाइनगार्टनर या ऑस्ट्रियन कलाकाराने सादर केला, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा फार मोठा प्रतिसाद लाभला. बेथोवेन या संगीतकारावरही ‘शाकुंतल’चा सखोल प्रभाव पडला. या नाटकामुळे मी जीवनाविषयी चिंतन करायला लागलो, असे त्यांनी म्हटले होते.

या वाङ्मयीन प्रभावाखेरीज आणखी एक परिणाम या नाटकाने घडवून आणला. भारताविषयी आस्था बाळगणाऱ्या प्रा. हेर्डर यांनी म्हटले होते, की ‘भारतीय साहित्याचा आणि संस्कृतीचा जसजसा प्रचार होईल, तसतशी युरोपियन जगताला भारताच्या उच्च सांस्कृतिक मूल्यांची जाणीव होईल आणि वसाहतवादाला आळा बसेल.’

कालिदासाच्या ‘शाकुंतल’ या नाटकाच्या इंग्रजी व जर्मन अनुवादामुळे हे काही प्रमाणात घडून आले, असे म्हणता येईल. त्यामुळेच भारतीय लोक अज्ञानी किंवा रानटी नसून, भारतीय संस्कृती ही ग्रीकांइतकीच किंबहुना त्याहीपेक्षा प्राचीन आहे, हे वास्तवज्ञान जगाला झाले आणि भारतविषयक अध्ययनप्रक्रिया गतिमान झाली.

– महाकवी कालिदासाच्या ‘शाकुंतल’ या अभिजात नाटय़कृतीचे हे मोठेच यश!

या लेखातली चित्रे सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या ‘कालिदासानुरूपम्’ या मालिकेतील आहेत.
भालचंद्र गुजर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2016 1:23 am

Web Title: shakuntala kalidasa
Next Stories
1 मान्सून डायरी : असूनि खास मालक घरचा…
2 नाट्यरंग : विचारांमध्ये गुंतवणारा आविष्कार
3 दखल : भुताचा दगड
Just Now!
X