या चारही स्क्रीन्सवर व्हिडिओ सुरू असतो. प्रत्येक स्क्रीनवरचा व्हिडिओ, त्यातील अँगल वेगळा असतो, घटना एकच असली तरी एखादी घटना आपण चारही बाजूंनी पाहावी त्या प्रमाणे..

संचलन करणाऱ्या सनिकांच्या बुटांचे आवाज यावेत तसेच जोरदार आदळणाऱ्या बुटांचे आवाज येतात.. आवाज हळूहळू वाढत जातो. त्या आवाजावरूनच लक्षात येते की, मोठ्या संख्येने असलेल्या सनिकांचे संचलन असावे.. ज्या खोलीतून हा आवाज येत असतो त्या खोलीबाहेर लावलेला काळा पडदा बाजूला सारत आपण एका काळोख्या खोलीत प्रवेश करतो.. चार बाजूंना चार स्क्रीन्स लावलेले.. मधोमध उभे राहून पाहावे असे मांडणीशिल्पच जणू. या चारही स्क्रीन्सवर व्हिडिओ सुरू असतो. प्रत्येक स्क्रीनवरचा व्हिडिओ, त्यातील अँगल वेगळा असतो, घटना एकच असली तरी. एखादी घटना आपण चारही बाजूंनी पाहावी त्या प्रमाणे.. नजरेच्या एका टप्प्यामध्ये सुरू झालेला व्हिडिओ नंतर दोन स्क्रीन्सवर दिसू लागतो, दोन वेगवेगळ्या अँगल्समध्ये. नंतर मागून आणि आणखी एका बाजूने आवाज येतात आणि चारही स्क्रीन्सवर एकाच वेळेस व्हिडिओमधील महिला पथक लष्करी पद्धतीने पुढे सरकते..

केमोल्ड प्रेस्कॉट रोड दालनात आपण हे सारे पाहात उभे असतो. ..व्हिडिओच्या सुरुवातीस एकच महिला दिसते लष्करी थाटात..     ती हाती तलवार असल्याच्या आवेशात संचलनासाठी तयार होते. ही साधीसुधी महिला नक्कीच नाही. कारण तिने संपूर्ण शरीरावर लष्करी संरक्षक कवच चढवलेले आहे. तिच्या हाती तलवार नाही..  पण लष्करी सज्जतेचा आवेश, अभिनिवेश तिच्या अभिनयात निश्चितच आहे. सुरुवातीला दिसणाऱ्या त्या एकाच महिलेच्या साथीला नंतर दुसरी येते, मग तिसरी, चौथी, पाचवी .. नंतर एक जुलूसच तयार होतो त्यांचा. लष्करी शिस्तीत, करारी मुद्रा राखत त्यांचे संचलन सुरू होते.. पायांचा, शस्त्रांचा आवाज हळूहळू वाढत जातो. एकाच वेळेस चारही स्क्रीन्सवरची दृश्ये पाहाणे शक्य नाही हे लक्षात येताच आपण मागे- पुढे होऊन एकाच वेळेस अधिकाधिक स्क्रीन्स कसे न्याहाळता येतील त्याचा अंदाज घेतो. मग कोणत्या तरी दोन स्क्रीन्सच्या कोपऱ्यात जाऊन एकाच वेळेस चारही स्क्रीन्स न्याहाळू लागतो. जेव्हा दोन स्क्रीन्सच्या बरोबर मधोमध आपण उभे असतो; त्यावेळेस आपल्या मागच्या बाजूच्या स्क्रीनवरून हे लष्करी महिला पथक आपल्याच अंगावरयेते आहे आणि आणि समोरच्या स्क्रीनवरून निघून जातेय पुढे असे सारे भासमान होते..

यापूर्वी आपण शकुंतला कुलकर्णी किंवा ‘शकू’चे प्रदर्शन पाहिलेले असेल तर हे असे आश्चर्यकारक काम आपल्याला अपेक्षितच असेल. कारण आजवरचा तिचा प्रवास आपल्याला पुरता ठावूक असतो. जे पहिल्यांदाच पाहतात ते अधिक अचंबित होतात. गेली कित्येक वष्रे ती एका विचाराने – प्रेरणेने काम करते आहे. तिच्या विचारांमध्ये, विचारांच्या गतीमध्ये आणि त्यातून येणाऱ्या कलाकृतींमध्येही एक सातत्य आहे. दरखेपेस एक पुढे जाणारा विचार कलाकृतींमधून व्यक्त होत असतो. एक एक टप्पा पार करत ती पुढे जाते आहे.

२०१२ सालीही ही अशीच लष्करी संरक्षक कवचधारी महिला अर्थात स्वत शकूच पाहायला मिळाली होती. तिच्या प्रदर्शनाचे शीर्षक होते ‘ऑफ बॉडिज, आर्मर अ‍ॅण्ड केजेस’. आजवर तिने तयार केलेली आणि वापरलेली सर्व शिरस्त्राणादी सर्व संरक्षक कवचं ही वेताची बनवलेली आहेत. वेतामध्ये एक लवचिकता आहे आणि ताठरपणा, ठामपणादेखील! ही सारी गुणवैशिष्टय़े एकातच असलेले माध्यम तिने खुबीने निवडले आहे. त्यात तिची कल्पकता दिसून येते. या मांडणीशिल्पातील व्हिडिओमध्ये असलेला तिचा अभिनयदेखील खिळवून ठेवणारा आहे. त्यातील करारी नजर भेदक आहे. हातात तलवार नसली तरी आवेशामुळे ती भासमान होते. आणि अशा समस्त महिलांचा जुलूस लष्करी शिस्तीत चालू लागतो त्यावेळेस होणारी वातावरणनिर्मिती खूप काही व्यक्त करणारी आहे. प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणून आणि समाजाचा एक भाग म्हणून समान हक्क आणि स्वातंत्र्य आहे. या पाश्र्वभूमीवर खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधातील हा आवाज आहे. आपण व्हिडिओ पाहताना जाणवतो तो लष्करी शिस्तीतील बुटांचा एकत्रित संचलनामध्ये होणारा ठाक.. ठाक असा लष्करी तालमीतील आवाज.. इथे बोलत कुणीच नाही. पण आवाज जाणवेल एवढा मोठा आहे. तेच तर कलावंत असलेल्या शकुंतलाला सांगायचे आहे..  या महिलांची ती सामूहिक कृती म्हणजे धर्य, निर्भीडता आणि जीगर यांचे शक्तीप्रदर्शन आहे. हेच भविष्य आहे समाज म्हणून .. स्वातंत्र्य आणि समतेच्या दिशेने जाणारे.. पायातील बुटांचा तो आवाज तीच निíभडतेची दिशा व्यक्त करतो आणि दाखवतोही.

याशिवाय आणखी दोन बाबी या प्रदर्शनात पाहायला मिळतात त्यात शकुंतला कुलकर्णी यांनी गेली कित्येक वष्रे ज्या कॅनव्हॉसवर मनातील या साऱ्या गोष्टी, कल्पना उतरवल्या, रंगवल्या, रेखाटल्या, पुसल्या आणि परत रेखाटल्या ते चार कॅनव्हॉस या प्रदर्शनात मांडलेले आहे. खरे तर या कॅनव्हॉस डायरीज अर्थात कलावंताच्या दैनंदिन दृश्य नोंदीच आहेत, असे म्हणायला हवे. शिवाय काही छोटेखानी स्केचेसही आहेत. त्या संरक्षक कवचांची किंवा इतरही काही गोष्टींची. सोबत एखाद्या जवाहिऱ्याच्या दुकानात मौल्यवान दागिने मांडावेत तशा वेताच्या छोटेखानी वस्तू त्यात बांगड्या, अंगठ्यांपासून ते मोठ्या शिरस्त्राणापर्यंत सर्वाचाच समावेश आहे.. त्याही पद्धतशीरपणे सुबकरित्या मांडलेल्या दिसतात. हे सारे अमूल्य आहे हे लक्षात यावे, अशीच त्यांची मांडणी- रचना करण्यात आली होती.. आता पुढचा टप्पा कोणता असेल असा प्रश्न मनात येतो.. आणि एक वेगळा मनावर िबबलेला परिणाम घेऊन आपण कलादालनातून बाहेर पडतो.
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab