सुनिता कुलकर्णी

सध्याच्या करोनाकहरात लक्ष वेधून घेणारी न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलेली ही एकदम वेगळी बातमी. जवळपास ४० वर्षांपूर्वी एका अमेरिकी जोडप्याने दत्तक घेतलेल्या एका कोरियन मुलीच्या संदर्भात नुकताच सेऊलमधल्या न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. तो असा की या मुलीला तिचे आईवडील कोण आहेत हे जाणून घेण्याचा, त्यांचं नाव लावण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे आता अशा पद्धतीने दत्तक गेलेल्या हजारो कोरियन व्यक्तींना आपले मूळ पालक कोण हे समजून घेता येणार आहे.

आता अमेरिकी नागरिक असलेली कारा बोस दक्षिण कोरियाच्या एका शहरात बरोबर ३६ वर्षांपूर्वी एका पार्किंग लॉटमध्ये सोडून दिलेली सापडली होती. तेव्हा तिचं वय तीनचार वर्षे होतं. त्यानंतर वर्षभरातच तिला एका अमेरिकी जोडप्याने दत्तक घेतलं आणि ती अमेरिकेत पोहोचली. तिथेच वाढली. सध्या ती तिचा डच नवरा आणि दोन मुलांसह अॅमस्टरडॅम येथे राहते. दक्षिण कोरियामध्ये अशा पद्धतीने १९७० तसंच ८० च्या दशकामध्ये हजारो मुलांना देशाबाहेर दत्तक दिलं गेलं.

आपले नैसर्गिक आईवडील कोण आहेत, हे समजून घेण्यासाठी कारा बोसने दक्षिण कोरियातील न्यायालयात धाव घेतली होती. परदेशात दत्तक गेलेल्या व्यक्तीने केलेला अशा प्रकारचा दक्षिण कोरियामधला हा पहिलाच खटला होता. त्यात न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता तिला आपली खरी आई कोण हे समजून घेण्यासाठी वडिलांशी सामना करायचा आहे.

बोस गेली काही वर्षे आपले खरे आईवडील कोण ते समजून घेण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये फेऱ्या मारत होती. तिला तिच्या खऱ्या वडिलांना भेटायचं होतं. त्यांना भेटून तिला तिची खरी आई कोण हे तर समजून घ्यायचं होतंच, शिवाय त्या दोघांनी तिला असं सोडून का दिलं हेही तिला त्यांच्याकडून समजून घ्यायचं होतं. पण तिच्या तीन सावत्र बहिणी तिला तिच्या वडिलांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. तिचा आमच्या कुटुंबाशी काही संबंधच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी तिला न्यायालयात धाव घ्यावी लागली.

या निकालामुळे आता मला त्यांची मुलगी म्हणवून घेण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे, असं ती सांगते. तिचे आणि तिच्या वडिलांचे डीएनए ९९.९९८१ टक्के जुळत असल्याचं आणि त्यामुळे ते तिचे वडील असल्याचं सिद्ध होत असल्याचं न्यायालयाने मान्य केलं आहे. पण तिने आपले हे वडील कसे शोधले याचा मात्र बातमीमध्ये उल्लेख नाही.

आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर ती तिच्या वडिलांच्या कुटुंबाचा भाग बनेल आणि तिच्या बहिणी तिला वडिलांना भेटण्यापासून रोखू शकणार नाहीत. मला फक्त त्यांच्याशी बोलून माझ्या आईविषयी समजून घ्यायचं होतं. तेवढ्यासाठीच मी हा सगळा खटाटोप केला असं कारा बोस सांगते.

अजाणत्या वयात देशाबाहेर दत्तक गेलेल्या आणि जाण आल्यावर आपली मुळं शोधू पाहणाऱ्या हजारो कोरियन वंशाच्या लोकांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला आहे.