जानेवारी महिना,  थंडी अंमल जास्तच. सालाबादप्रमाणे याही वर्षी संक्रांतीचा सण आला. आजूबाजूला सणाची लगबग जाणवत होती. दुकानांमधून वाणसामानांनी गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे सणाच्या भीतीने माझ्या पोटात गोळा आला होता. नोकरी करणारा स्त्रीवर्ग सण आला की धास्तावतो. सुट्टी न घेता सण साजरे करणे म्हणजे महाकठीण कर्म. आम्ही सगळ्या मैत्रिणी शिक्षित, तसेच विचारांनी पुढारलेल्या असल्यामुळे आम्ही सणाचा नेमका उद्देश लक्षात घेऊन सण साजरे करण्यास प्राधान्य देतो. तर ..सण कसा साजरा करावा, माझे विचार धावू लागले, ऑफिसमध्ये ऑडिट सुरू होते. सगळा आमचा लंच ग्रुप बिझी होता. आमच्या लंच ग्रुपच्या मैत्रिणी फारच हौशी, सतत आमचे कार्यक्रम सुरू असतात. कधी पिकनिक, कधी समाजसेवा, कधी भजनसंस्था तर कधी भेळपार्टी. मागील वर्षी आम्ही अनाथ आश्रमाला भेट दिली. वर्गणी करून मुलांच्या आवडत्या छोटय़ा छोटय़ा वस्तू त्यांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद झाला होता. याही वर्षी असे काहीतरी करावे म्हणून मैत्रिणींचा आग्रह सुरू होता.

अमरावतीला तपोवन नावाची संस्था आहे. शिवाजीराव पटवर्धन ह्यंनी त्या संस्थेची उभारणी केली आहे. कुष्ठरोगी बांधव तिथे राहतात. संस्थेचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत जसे की लाकडाचे फर्निचर बनविणे, लोखंडाचे फर्निचर बनविणे, सतरंजी बनविणे, शेती इत्यादी सर्व कुष्ठरोगी बांधव तिथे काम करतात. आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर संस्थेचा खर्च चालतो. आता वळू या संक्रांतीकडे. महाराष्ट्रात संक्रांतीला हळदीकुंकू करतात, ज्यामध्ये हळदीकुंकू, तिळगूळ, तसेच वाण व गव्हाची ओटी देण्यात येते, खूप दिवसांपासून संक्रांतीचा सण तपोवनमध्ये मैत्रिणीसमवेत करण्याची माझी इच्छा होती. बस, मनातील इच्छा मैत्रिणीजवळ बोलून दाखविली  आणि तिने ती लागलीच उचलून धरली. भराभर सगळ्यांना फोन गेले, ‘‘ह्य वर्षी आपल्याला हळदीकुंकू तपोवनमध्ये करायचे आहे.’’ मैत्रिणींमध्ये एक उत्साहाची लहर पसरली.

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

मी संस्थेमध्ये फोन करून महिलांची संख्या विचारून घेतली. आयुर्विमा महामंडळातील स्त्रिया तपोवनमध्ये येणार, ही बातमी ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंची महिती घेण्यात आली. दोन दोनच्या गटांमध्ये कामाची विभागणी झाली. कोणी वर्गणी जमा केली. कोणी तिळगूळ आणले, दोघींनी वणसामान आणले. दोघींनी स्वत:चे चार चाकी वाहन आणले की ज्यामुळे तपोवनामध्ये सर्वाना जाण्यास सुविधा होईल. त्यांना वाणसामान म्हणून स्कार्फ देण्याचे ठरले. मी संस्थेत फोन करून येण्याची वेळ सांगितली. ‘‘आम्ही ११ वाजता येत आहोत, सर्वचजण एका ठिकाणी तयार राहा.’’ ‘‘ठीक आहे, तुम्ही या, सगळ्या  बायका देवळात तयार असतील.’’ इति संस्थेचे सेक्रेटरी. देऊळ!

कशाकरिता? माझे मन आक्रंदले, ईश्वराने त्यांच्यावरती इतका मोठा अन्याय केला, त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून दूर केले. कोणाचे नातेवाईक भेटीला येतात, कोणाचे नुसते फोनवर चौकशी करतात, तर कोणाचे विचारीतसुद्धा नाहीत. बस, सोडून दिले संस्थेच्या भरोशावर. का ईश्वराची आराधना? पण दुसरे मन म्हणाले की तपोवन आणि आनंदवनसारखी संस्था म्हणजे हीपण ईश्वराची लिलाच आहे, नाहीतर काय झाले असते? आम्ही मैत्रिणींनी तिळगूळ भेटवस्तू दिले, सगळ्यांना आनंद झाला. एका भगिनीला विचारले की तुम्ही कोठून आलात. तिने सांगितले की ती नागपूरची असून चाळीस वर्षांपासून इथेच आहे. ‘‘उम्र भी कितनी लंबी लगती है,’’ प्रथमच जाणवले. ती भगिनी तिथेच ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचे काम करते. बहुतेकजणींनी नऊवार पातळ नेसले होते. खेडय़ापाडय़ांमधून या रोगासंबंधीची जागृतीची आवश्यकता दिसून येत होती.

आम्हाला आशीर्वाद देताना त्यांचे डोळे भरून आले. ‘‘भेटायला येत जा अधूनमधून, काही आणले नाही तरी चालेल.’’ आम्हाला गहिवरून आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्याबरोबर आमच्या मैत्रिणींच्या मुलीसुद्धा ह्य उप्रकमात सहभागी होत्या. समाजसेवेचे संस्कार लहानपणापासून त्यांच्यावर घडत होते.

आम्ही त्यांना काय दिले हे विशेष नव्हते, त्याचप्रमाणे आम्ही त्यांना खूप काही दिले असेही काही नव्हते. विशेष हे होते की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, काही क्षण त्यांच्याबरोबर होतो. तुम्हीपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता, वेगळी वाट करू शकता. इच्छा असेल तर..
संगीता जोशी विवरेकर – response.lokprabha@expressindia.com