मंगळागौरीला किंवा राखीपौर्णिमेला नटूनथटून जायचंय, पण पावसाची रिपरिप सुरू आहे.. पावसातही दागिने, कपडे, मेकअप सांभाळत ‘इन’ कसं दिसायचं हाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला?

‘ये रे ये रे पावसा’ ही विनवणी वरुणदेवाने गंभीर्याने घेत दमदार हजेरी लावली. त्यात कॉलेजेसच्या प्रवेशांची लगबग, इंटर्नशिपची धाकधूक, ऑफिसमधील कामाचा ढीग हा सगळा पसारा आहेच. या सगळ्याची सवय होतेय तितक्यातच भिंतीवरच्या कॅलेंडरमधील श्रावण महिना खुणवायला लागतो. मग पुन्हा एकदा सणवारांचं सत्र सुरू होतं. पावसाळ्यात रोजची जीन्स, कुर्ता, लेगिंग सांभाळणं एक वेळ समजू शकतो, पण या दिवसांमध्ये महागडय़ा साडय़ा, सलवार सूट घालून प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरतच..

मे महिना संपेपर्यंतच जूनपासून पुढचे चार महिने येणारा पाऊस आणि त्या वेळी घालायचे कपडे याची आखणी करायला सुरुवात होते. आधी जीन्स, जॅकेट्स, श्रग्स, रंग सोडणारे कपडे, मेटल ज्वेलरी, लेदर अ‍ॅक्सेसरीज अशा वस्तू वॉर्डरोबमधून वजा झाल्याने कपडय़ांची यादी अध्र्यावर येऊन पोहोचते. साहजिकच मान्सून शॉपिंगची यादी तयार झालेली असते. हळूहळू नवे कॉलेज, नवा अभ्यासक्रम, नवं ऑफिस, तेथील जबाबदाऱ्या या सगळ्याचा सराव होण्यास सुरुवात होते. हे सगळं एका सुरात चाललेलं असतं आणि एके दिवशी आई सहजच म्हणजे, ‘पंधरा दिवसांवर श्रावण आलाय.’ त्यानंतर मात्र आगाऊ  संकटाच्या चाहुलीने पोटात धस्स व्हायला होतं. अगदी आजच्या फेसबुकच्या भाषेत म्हणायचं झालं, तर पावसाळ्यात येणाऱ्या सणांमुळे होणारी पंचाईत वाचून तुम्ही घाबरून जाल आणि ही अतिशोयोक्ती अजिबात नाही. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाणी, चिखलातून रस्ता काढत जीन्स, फिकट रंगाची लेगिंग सांभाळत ऑफिस, कॉलेज गाठणं हे जर तुमच्यासाठी आव्हान असेल तर, याच पावसात, चिखलात महागडी साडी, ड्रेस सांभाळत हीच कसरत करणं तुम्हाला अजूनही अनुभवायचं आहे. पावसाळ्यासारखा रोमँटिक ऋतू नाही. पावसात भिजणं, गरम वाफाळलेला चहा पिणं, भुट्टा आणि छत्री सावरत समुद्रावर मित्रांसोबत कल्ला करणं यासारखं मोठं सुख नाही, हे सगळं मान्य. पण रोजच्या वापरातले कपडेच सांभाळणं, त्यांच्यावर लागलेला चिखल काढण्यासाठी लागणारी डबल धुलाई यातच अर्धा पावसाळा निघून जातो. अर्थात त्यामुळे पावसाळा नकोसा वाटायला लागतो, असं अजिबात नाही. उलट दर वर्षी तो अजूनच हवाहवासा वाटू लागतो.

साधारणपणे होळी संपल्यावर एप्रिल-मे महिन्यांत सणांचं सत्र संपलेलं असतं. मध्ये एखादं लग्न, पार्टी नावापुरतं येतं. त्यामुळे दिवाळीपर्यंत बाहेर आलेल्या ट्रेडिशनल कपडे पुन्हा कपाटात कोपरा पकडून सुस्तावतात. पण पावसाची चाहूल लागल्यावर सणांचासुद्धा नवा अभ्यासक्रम सुरू होतो. रक्षाबंधन, दहीहंडी, नागपंचमी, नारळीपौर्णिमा या सणांची रांग लागायला सुरुवात होते. त्यात घरात, कॉलेज, ऑफिसमध्ये, जवळच्या मैत्रिणीकडे, नातेवाईकांकडे अशा पाच-सहा सत्यनारायणाच्या पूजा, श्रावणी सोमवारच्या पूजा हे सगळ बोनस म्हणून असतंच. हे सगळं थोडंथोडकं वाटावं म्हणनू त्यात गणेशोत्सव आहेच. यासाठी छान नवे कपडे घालून, सजून, तयार होऊन घराबाहेर पडणं ओघाने येतचं. यातल्या एखाद दिवशी जरी रोजचीच जीन्स, टी-शर्ट घालून कॉलेजला जायचं म्हटलं की, लगेच किचनमधून आईचा आवाज येतो, ‘सणासुदीचे दिवस आहेत, जरा चांगले कपडे घाला.’ तेव्हा ट्रॅडिशनल कपडे घालून रोजचा ट्रेन, बसचा प्रवास येतो. हे कपडे असतात शक्यतो शिफॉन, जॉर्जेट, लेस अशा नाजूक कापडांचे, त्यावर तितकीच नाजूक एम्ब्रॉयडरी. त्यामुळे नेहमीच्या कपडय़ांप्रमाणे त्यांना रगडून धुताही येत नाही. त्यात नेमक्या एखाद्या रॉ सिल्क किंवा ब्रोकेडच्या ब्लाऊजचा पाण्यात भिजून रंग सुटला, की तो साडीही खराब करणार हे नक्की. अशा वेळी ज्वेलरी, मेकअपचीपण पार दैना उडते. इमिटेशन ज्वेलरीला पाणी लागून गंजणे, रंग उडण्याचे प्रकार पावसाळ्यात नेहमीचेच असतात आणि कितीही सुंदर मेकअप केलेला असो, दिवसाअखेरीस तो दिसेनासा होतोच. आपल्याच घरात पूजा असली, तर या कटकटीतून थोडीशी फुरसत मिळेल अशी अपेक्षा करून सोफ्यावर सुस्तावणार तितक्यात बाबा पूजेसाठी फुलं विसरल्याचं आईला लक्षात येतं आणि पुन्हा हे नवेकोरे कपडे घालून फूल मार्केटचा चिखल तुडविण्याची पाळी येते. त्यामुळे थोडक्यात ही कसरत काही चुकत नाही. मग अशा वेळी पावसाळ्यात ट्रेडिशनल पण सुटसुटीत कपडे कसे घालायचे, दिवसभर आपला लुक फ्रेश कसा ठेवावा याची उजळणी करणंपण गरजेचं होतं.

स्ट्रेट फिट ड्रेसिंग

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल सुरू होते. अर्थात या प्रत्येक सणाला सुट्टी मिळतेच असं नाही. त्यामुळे ड्रेसिंग करताना कॉलेज, ऑफिस गाठेपर्यंत कराव्या लागणाऱ्या प्रवासाला लक्षात घेणं गरजेचं आहे. स्ट्रेट फिटिंगचे सुटसुटीत कपडे अशा वेळी सोयीचे ठरतात. अनारकली ड्रेस जुने होऊन आता एक पर्व लोटलं. त्यामुळे या पावसाळ्यात त्यांना कपाटातून बाहेर काढण्याचं निमित्त नाहीच आहे. त्याऐवजी सिंपल अंगरखा स्टाइल कुर्ता किंवा जॅकेट वापरू शकता. हे जॅकेट जीन्स, स्कर्ट, चुडीदारसोबत सहज वापरू शकता. सध्या गोल्ड आणि सिल्व्हर रंगाचे मेटालिक जॅकेट ट्रेण्डमध्ये आहेत. तसेच स्ट्रेट फिटचा वन पीस ड्रेससुद्धा तुम्हाला या दिवसांमध्ये वापरता येईल. बेसिक रंग, नाजूक प्रिंटचे ड्रेस किंवा जॅकेट तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजलासुद्धा सहज वापरू शकता. अर्थात ते डे-वेअर आहेत हे लक्षात घेऊन त्यात भडक एम्ब्रॉयडरी, बोल्ड रंग, लाऊड प्रिंट्स वापरणं टाळा. शक्यतो ड्रेस कॉटन, खादी, मलमल, लिनन या नैसर्गिक कापडांचा असू द्यात. खरखरीत, भडक जॉर्जेट, शिफॉनच्या झगेदार ड्रेसेसचा ट्रेण्ड मागे पडला आहे. नेहमीच्या सलवार सूटऐवजी अँकल लेंथ चुडीदार किंवा कॉटन पँट, मिड लेंथ स्कर्ट वापरून पाहा. पावसाळ्यात प्रवास करताना हे सोयीचे असतातच, पण लुकला वेगळेपणसुद्धा देतात.

फ्रेशपण सटल रंगसंगती

मगाशी म्हटल्याप्रमाणे डे-वेअर करता आहात, त्यामुळे शक्यतो भडक रंग टाळा. पांढरा रंग सध्या ट्रेण्डमध्ये आहे. त्याचबरोबर ग्रेच्या शेड्स, क्रीम, बिस्किट रंग, पिस्ता, फिकट गुलाबी, फिकट पिवळा, आकाशी अशा फिकट रंगांच्या छटा तुम्ही वापरू शकता. इंडिगो शेड या सीझनमध्ये ट्रेण्डमध्ये आहे, तोही यंदा सणांमध्ये वापरून पाहा. डार्क टोन निवडायचे असल्यास मरून, चॉकलेट ब्राऊन, जांभळा, ग्रे या शेड्स निवडा. हे रंग एरवी आपण सणासुदीला निवडत नाही. आपल्याकडे शक्यतो लाल, पिवळा, नारंगी अशा ब्राइट रंगांना सणांच्या दिवसांत मानाचे स्थान असते. पण यंदा या रंगांसोबत प्रयोग करून बघा. सकाळच्या ड्रेसिंगसाठी हे रंग फ्रेश लुक देतातच पण लुक अतिभडक करत नाहीत. गरज वाटल्यास स्कार्फ, लेगिंग, ओढणी, बेल्ट ब्राइट रंगाचे घेऊन लुकला उठाव देऊ  शकता. ब्राइट रंगांमध्ये नारंगी रंग सीझनमध्ये हिट आहे. यंदा एम्ब्रॉयडरीऐवजी प्रिंट्स वापरून पाहा. फ्लोरल प्रिंटनी यंदा बाजारात आणि रॅम्पवर बाजी मारली आहे. तसेच भौमितिक प्रिंट्ससुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत. मध्यंतरी कॉन्ट्रास मॅचिंगचा ट्रेण्ड आला होता, पण सध्या मॅचिंग क्लोथिंग थीम पुन्हा फोकसमध्ये आली आहे.

मिक्स मॅचचा फॉम्र्युला

बऱ्याचदा छोटे सण, पार्टी, समारंभासाठी आपण नवीन ड्रेस विकत घेण्याऐवजी जुन्यातून नवं करायचा प्रयत्न करतो. गुडघ्याच्या लांबीच्या स्कर्टसोबत एखादा फॅन्सी क्रॉप टॉप छान पेअर करता येऊ  शकतो. लेअरिंग तर अशा वेळी उत्तम पर्याय ठरते. एखाद्या सिंपल ड्रेसवर एम्ब्रॉयडर जॅकेट, श्रग घेऊन छान फेस्टीव्ह लुक तयार करता येईल. सिंपल स्कार्फला गोंडे लावून थोडं सजवा आणि तो एखाद्या पांढऱ्या कुर्त्यांचासुद्धा लुक बदलतो. केप्स सध्या ट्रेण्डमध्ये आहे. हा स्टिच्ड स्कार्फचाच एक प्रकार असतो. पण तुमचा लुक युनिक करायला मदत करतो. एखाद्या डेनिम जॅकेटला एम्ब्रॉयडर पॅचवर्क करा. इंडोवेस्टन लुकसाठी ते मस्त दिसेल. ओढणी कशी घेता यावरही तुमच्या ड्रेसचा लुक ठरतो. स्कार्फप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीत तिला ड्रेप करा. फक्त हे करताना कपडय़ांचा रंग सुटत नाही ना, याकडे लक्ष द्या.

फंकी पण क्लासी ज्वेलरी

पावसाळ्यात बऱ्याचदा इमिटेशन ज्वेलरी खराब होते. त्याऐवजी चांदीची किंवा सिल्व्हर पॉलिशची अँटिक ज्वेलरी वापरा. एखादं मोठं कानातलं डुल, नेकपीससुद्धा लुक पूर्ण करायला पुरेसं असतं. लुकला ट्विस्ट द्यायचा असेल, तर बॉडी ज्वेलरी उत्तम पर्याय आहे. ही ज्वेलरी दिसायला नाजूक, लहान असते पण त्याच्या वेगळेपणाने उठून दिसते. हातफुल, कानातल्यांच्या मागे जाणारी वेल ही बॉडी ज्वेलरीची उदाहरणं आहेत. मल्टी चेन्स नेकपीस यंदा ट्रेण्डमध्ये आहे. नाजूक चेन्स एकत्र करून केलेला हा नेकपीस वेगवेगळ्या ड्रेसेसवर शोभून दिसतो.

ब्राइट लिप्स इन फोकस

पावसाळ्यात बारीक आय-मेकअप करायचा प्रयत्न कराल, तर पावसात भिजून अर्धा मेकअप खराब होऊन जाईल. त्याऐवजी न्यूड मेकअप वापरा. फक्त ब्राइट लिप कलर वापरून लिप्स फोकसमध्ये असू द्यात. लिपकलरला कधीही टचअप करता येतं, त्यामुळे मेकअप कॅरी करणं सोप्पं जातं. अर्थात मेकअप वॉटरप्रूफ असेल, ही दक्षता घ्या. नेलआर्ट या दिवसांमध्ये उत्तम पर्याय ठरू शकतो. पावसात ते खराब होण्याची भीती नसते आणि सुंदर डिझाइन लुकला उठावसुद्धा आणतं.

थोडक्यात; सिंपल पण इन फोकस लुक सध्या ट्रेण्डमध्ये आहे. पावसाळ्यासाठी तो योग्यही ठरतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नेहमीच्या सलवार सूट, साडीऐवजी हा लुक ट्राय करून तुमची ‘सण’वारी हिट करा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com