तुमचं, माझं सगळ्यांचंच पावसाशी अतूट नातं असतं. पण पाऊस म्हटलं की आपल्या मनात उमटतो तो श्रावण. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ ही कविता शिकताना पावसाळ्यातल्या निसर्गाचं बदलतं रूप-रंग मनावर ठसतं आणि मग कळत्या वयात श्रावणात बरसलेला निळा घन आपल्याला त्यात कधी चिंब भिजवून टाकतो हे कळतही नाही. बदलत्या वयानुसार पावसाळ्याच्या पर्यायाने श्रावणाच्या वेगवेगळ्या पाऊलखुणा मनात उमटतात आणि मग पुढे त्या जन्मभर जपल्या जातात! माझं अन् श्रावणाचंही असंच वेगळं नातं आहे. अगदी लहानपणापासूनच मनात जपलेलं. आमच्या शाळेच्या भोवताली मोठ्ठं पटांगण होतं. शाळेत असताना मला वर्गात काय शिकवलं जातंय यापेक्षा वर्गाबाहेर काय घडतंय हे जाणून घेण्यातच अधिक रस असे. त्यासाठी श्रावणासारखा दुसरा उत्तम ऋतू नाही. हा अनुभव मी लहानपणीच घेतला होता. चोहीकडे दाटलेली हिरवळ, त्यावर उमललेली इवलाली रंगीबेरंगी फुलं, भिरभिरणारी फुलपाखरं या निसर्गाच्या सौंदर्यानं त्याही वयात मी इतका भारावून जात असे ना की वर्गात काय घडतंय हे जाणून घ्यायची ना मला गरज वाटत असे ना त्याची तमा असे!

उन्हाळ्याच्या काहिलीनं त्रस्त झालेली धरित्री जशी पहिल्या पावसाच्या थेंबाची आतुरतेनं वाट बघत असते तितकीच वाट आपणही बघत असतो. आम्ही विदर्भवासी तर जास्तच! पंचेचाळीस-अठ्ठेचाळीस वर गेलेला पारा! इतकं कडक ऊन अनुभवल्यावर पावसाच्या शिडकाव्याची वाट कोण नाही बघणार! पाऊस सुरू झाला की हळूहळू तापलेलं वातावरण शांतावू लागतं, निसर्ग न्हाऊन स्वच्छ होतो आणि न्हायलेल्या निसर्गावर श्रावणात रंगगंधाचा साज चढू लागतो! ही निसर्गाची तरतरी आपल्या मनावर नाही उमटली तरच नवलं! मग काय श्रावणातल्या सणासुदीच्या निमित्तानं ठेवणीतले कपडे जसे बाहेर निघतात ना तसे स्वयंपाकघरातून खास श्रावणासाठीच्या ठेवणीतल्या पदार्थाची ही दरवळ सुटू लागतो! घरापासून ही जी काही खमंग दरवळीची सुरुवात होते ना ती पार रस्त्यापर्यंत जाऊन पोहोचते! पाऊस पडल्यानंतर पहिला बदललेला खाण्याचा प्रकार म्हणजे मक्याची कणसं मळणं. आमच्याकडचे भुट्टे. भर पावसात भाजलेले भुट्टे खाण्याची मजा काय असते, ती नव्याने सांगायला नको! त्याहीपेक्षा मजा येते ती श्रावणातल्या ऊन-पावसाच्या खेळात गरमागरम भुट्टा खाण्याची! भुट्टय़ाचा एक वेगळा प्रकार आमच्या विदर्भात रस्तोरस्ती दिसतो, तो म्हणजे भुट्टय़ाचा कीस किंवा भुट्टय़ाचा चिवडा. कोळशाच्या शेगडीवर लोखंडाच्या कढईत तेल गरम करून मोहरी, बारीक चिरलेला लसूण, हळद, हिरवी मिरची व ताजा किसलेला भुट्टा भराभर परतून त्यात चवीप्रमाणे मीठ व िलबू पिळून पानाच्या द्रोणात खायला देतात. हाच प्रकार थोडा जास्त भाजला की झाला भुट्टय़ाचा चिवडा!

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

श्रावणातली अजून एक खासियत म्हणजे भाजलेल्या ऊसाचा रस. उन्हाळ्यातील ऊस रसाच्या गाडय़ा जूनमध्ये कमी-कमी होत जातात. अगदी एखाद्-दुसरी गाडी दिसते. त्यातील काही मोजक्या ठिकाणी हा प्रकार मिळतो. कोळशाच्या शेगडीवर ऊस भाजतात आणि रस काढतात. यामध्ये भरपूर आलं आणि िलबाच्या रसाचा वापर असतो. वरून थोडी सुंठ पावडरसुद्धा घालतात. धुरकट तिखट स्वादाच्या या रसाची खुमारी काही औरच!

आमच्या नागपुरात एक पंजाबी पनीरवाला आहे. शहराच्या काहीसं बाहेरच त्याचं ढाबासदृश रेस्टॉरंट आहे, या ढाब्याच्या मागे गाई-म्हशींचा प्रचंड मोठा गोठा आहे. तर याची खासियत म्हणजे हा वर्षभर आपल्यासमोर ताजे पनीर तयार करून विकतो. इतकंच नाही तर त्याच्याकडे फ्लेवर्ड पनीरदेखील मिळतं. यामध्ये लसूण, काळीमिरी, पुदीना, मसाला इत्यादी स्वादाचं पनीर मिळतं. पावसाळा सुरू झाल्यानंतर तो तिथे पनीर टीक्का, तवा पनीर, पनीर भुर्जी, पनीर पकोडे इत्यादी प्रकार गरम गरम करून देतो. पडत्या पावसात छत्री सांभाळण्याची कसरत करत अर्धवट भिजत उभे राहून हे प्रकार खाण्याची जी मजा आहे ती घ्यायला नागपूरला यावे लागेल.

श्रावणातील अजून एक मजा म्हणजे वाफवलेल्या भुईमुगाच्या शेंगा. पाण्यामध्ये भरपूर मीठ घालून या शेंगा वाफवतात. मग एकत्र बसून यांचा फडशा पाडायचा. कोजागरीच्या दिवशी उकडलेल्या शेंगा आणि गरमागरम मसाला दूध असा वेगळाच बेत असे आमच्याकडे!

शक्यते भोक्तुंअनेनेतिषाक :

याचाच अर्थ ज्याच्या मदतीने आपलं रोजचं जेवण चविष्ट व सुकर होतं त्याला शाक (फळभाजी, पालेभाजी) असं म्हणतात व शास्त्र असं म्हणतं की शाकाहार, मांसाहारापेक्षा अधिक चांगला.

पावसाळ्यात बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या येऊ लागतात. पालेभाजी म्हटलं की आपण नाकं मुरडतो. काहीजणांच्या मते पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत, पचत नाहीत. पण माझ्या मते निसर्ग ज्या ऋतूत जी भाजी, फळं आपल्याला देतो ती पचत नाहीत असं होणंच शक्य नाही. पावसाळ्यात पालेभाजी खाल्ली की पोट बिघडण्याचं कारण पालेभाजी नसून ती भाजी नीट स्वच्छ केलेली नसणं हे आहे! पालेभाज्यांना लागलेली माती जर स्वच्छ धुतली नाही तर माती पोटात जाऊन पोट बिघडणं स्वाभाविकच आहे. स्वच्छ धुवून, लोखंडाच्या कढईत शिजवून/परतून जर पालेभाजी खाल्ली गेली तर अपाय होणं सोडाच उलट शरीरातील लोहाचं प्रमाण नक्कीच वाढेल. अनेक जीवनसत्त्वं मुख्यत: लोह व क्षार पालेभाज्यांमधूनच मिळतात. जेवणात दररोज एक पालेभाजीचा प्रकार असावा. पालक, आंबट चुका, लसणीची पात, कांद्याची पात, माचोळ, शेवळा, पुदीना, मेथी, शेपू, अळू, चाकवत, चवळी, कोिथबीर इत्यादी पालेभाज्यांसह श्रावणातल्या काही खास पालेभाज्यांची आठवण झाल्याशिवाय कशी राहील! गडचिरोली, सिरोंचा, भामरागड, भांदक, मेळघाट वगरे छोटय़ा गावांमध्ये डोंबळी, राजगिरा, शेवरा, वनदोडका, जंगली चूच, नाळगुट, शिरीस (सूर्यफूल) चिवळी यांसारख्या पालेभाज्यांची श्रावणात लयलूट असते.

श्रावणाची वाट मी अजून एका कारणासाठी बघायचो. लहानपणी श्रावण सुरू झाला की आईबरोबर भाजी बाजारात जाऊन ताज्या भाज्या घ्यायला मला खूप आवडायचं. आमच्या घराजवळ सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी भाजी बाजार लागायचा. सोमवारी तर काय श्रावणी सोमवारची शाळेला अध्र्या दिवसाची सुट्टी असे. शाळा सुटली की भाजी बाजारात जायचं आणि छान ताजी भाजी आणायची. त्या दिवशी आमचा उपवास असे. भाजी आणून आईचा स्वयंपाक होईस्तोवर कडकडून भूक लागलेली असायची. मग काय रात्री ताजी गरमागरम भाजी आणि पोळीचं जेवण, पुरणावरच्या जेवणापेक्षा सुग्रास लागत असे. आजही मला भाजी बाजारात जाऊन ताजी भाजी आणायला आणि त्याची भाजी करून किंवा करवून घेऊन ती ताजी ताजी खायला आणि खायला घालायलाही मनापासून आवडतं.

श्रावणातील अजून एक आकर्षण म्हणजे सोमवारचे उपवास. मी आता फारसे उपवास करतच नाही. त्यामुळे माझ्या उपवसाच्या ज्या आठवणी आहेत त्या लहानपणाच्याच. लहानपणापासून मला उपवासाची खिचडी खूप आवडते. शिंगाडय़ाच्या पिठाची थालीपीठंही आवडतात. आईचा जेव्हा उपवास असे तेव्हा खिचडीत माझा वाटा असेच. खिचडीसाठी दाण्याचं कूट लागतं ते करायला त्यावेळी आमच्याकडे मिक्सर नव्हता. हाताने फिरवायचा क्रशर होता. मग आई सांगायची खिचडी खायची असेल तर मला दाण्याचं कूट करून दे. ते करायचीही तयारी असे. श्रावणी सोमवार म्हणजे दिवसभर मस्त चमचमीत उपवासाच्या पदार्थावर ताव मारायचा आणि उपवास सोडण्यासाठी म्हणून आई रात्री ताजा गरमागरम स्वयंपाक करायची, त्यावर आडवा हात मारायचा.

मला एकूणच खाण्याचं खूपच वेड आहे. मग इतवारीत अगदी रांग लावून खावं लागलं तरी माझी तयारी असते. असे हे इतवारी प्रकरण तुम्हांला सांगितल्याशिवाय कसं कळणार! नागपुरातला इतवारी हा भाग म्हणजे खाऊगल्लीच! इथे एरवी चाट आयटम वगरे मिळतात. पण मोठय़ा उपवासाच्या दिवशी आणि श्रावणात तिथे खास उपवासाचे बटाटेवडे, खव्याची जिलेबी, रबडी वगरे प्रकार मिळतात. हे खाण्यासाठी चक्क रांग लावावी लागते. आजही रांगेत उभं राहून खाण्याची मजा घेण्यासाठी श्रावणात एकदा तरी माझी इतवारीला भेट असतेच!

खिलवणं हे माझ्या जगण्याचं अविभाज्य अंग आहे. म्हणूनच तर माझ्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक ऋतूच्या आठवणींची सांगड ही खाण्याशी आणि खिलवण्याशीच घातली गेली आहे. मग या आठवणी मनात घर करून राहतात आणि श्रावण धारांसारख्या मनात रिमझिमत राहातात!
विष्णू मनोहर – response.lokprabha@expressindia.com