08 July 2020

News Flash

निमित्त : शुक्राचार्याचे एकमेव मंदिर

प्राचीन काळापासून हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध आहे.

44-lp-shukrachayrayaसंजीवनी मंत्र, देव आणि दैत्य आणि शुक्राचार्याचा त्यासाठीचा संघर्ष, त्याला असलेलं कच- देवयानीचं उपकथानक ही पौराणिक कथा सगळ्यांनाच माहीत असते. दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगांव तालुक्यात याच शुक्राचार्याचे एकमेव मंदिर आहे.

हिमकुंद मृणालाभं दैत्यानां

परमं गुरूम!

सर्व शास्त्र व्रचक्तारं

भार्गवं प्राणमाम्यहम!!

 

अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीत अनेक पौराणिक कथा व त्यांची स्मारके यांची रेलचेल आहे. प्राचीन काळापासून हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध आहे.

गोदा तटे निर्मळे

देव देवतांची देऊळे

संत महंतांचे मळे,

चतन्याचा सुगंध दरवळे

श्रीरामचंद्र याच परिसरातून वनवासाला गेले असे मानले जाते. दक्षिण गंगा गोदावरी याच परिसरातून वाहते. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महापुरुष, साधुसंतांनी गोदावरीच्या तटी यज्ञ- याग- तपश्चर्या- ध्यानधारणा केलेली आहे.

गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य ऊर्फ भार्गव यांचे कर्मस्थान आहे. येथे त्यांनी तप व वास्तव्य केले असे मानले जाते. त्याबाबत अशी आख्यायिका संगितली जाते की समुद्रमंथनातून अमृत मिळाल्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळे दैत्य कुळांचा नाश  निश्चित झाला. तो होऊ नये, दैत्यानांही अमरत्व प्राप्ती व्हावी यासाठी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी शंकराची तपश्चर्या करून संजीवनी मंत्र प्राप्त करून घेतला. त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करत. देवांना त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करणे कठीण झाले. त्यामुळे दैत्यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्तच झाले. बृहस्पतींनी देवांना असे सांगितले की, हा संजीवनी मंत्र लोप पावला तर मृत झालेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. मग  बृहस्पतीपुत्र कच याला शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्याप्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून ते शुक्राचार्य मंदिर होय, असे मानले जाते. ते पूर्वी गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरू सेवेकरिता आला ते स्थान गोदावरीच्या पलतीरावर होते. ते स्थान कचेश्वर मंदिर म्हणून (प्रतित्रंबकेश्वर) प्रसिद्ध आहे. ते शुक्राचार्य मंदिराच्या उत्तरपूर्व बाजूस असून तेथे शुक्राचार्य व कचेश्वर यांची एकत्रित िपडी आहे. गोदावरीच्या ऐलतीरावर गुरूचे स्थान तर पलतीरावर शिष्याचे स्थान आहे. पूर्वीच्या नदीवरील घाट व त्याच्या खुणा अजूनही मंदिराच्या समोरील असलेल्या श्रीविष्णू गणपती मंदिराजवळ दिसून येतात. शुक्राचार्य यांनी कचाला जिथे संजीवनी मंत्र दिला ते संजीवनी पाराचे स्थान येथे आहे, असे मानले जाते.

कचाला संजीवनी मंत्र मिळाल्यावर स्वर्गातील देव पुष्पवृष्टी करण्यासाठी आले त्यामुळे इतर देवांच्याही िपडीच्या स्वरूपात प्रतीकात्मक मूर्ती येथे पाहावयास मिळतात. गुरूची सेवा करण्यासाठी सर्व शिष्य कचासह रोज पलतीराहून ऐलतीरावर म्हणजे हल्लीच्या गुरू शुक्राचार्य मंदिराच्या स्थानावर नित्यनियमाने येत असत. या शिष्यांना नदीच्या विशाल पात्रातून येण्या- जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शुक्राचार्यानी आपल्या हाताचा कोपरा मारून नदीचा प्रवाह बदलला, अशी आख्यायका आहे. म्हणून या गावास कोपरगांव असे नाव पडले असेही सांगितले जाते.

असे सांगितले जाते की सर्व शिष्यांमध्ये कच अत्यंत भक्तिभावाने गुरूची सेवा करीत असल्याने तो सर्वात लाडका शिष्य होता. ही गोष्ट इतर दानवांना सहन होत नसे, त्यामुळे त्यांनी द्वेषापोटी कचास दोन वेळा मारूनही टाकले होते. शुक्राचार्यांना देवयानी नावाची कन्या होती व तिचे कचावर जिवापाड प्रेम होते. त्यामुळे तिने कचास दोन वेळा वडिलांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करून घेतले. दैत्यांना ते सहन झाले नाही. परिणामी त्यांनी तिसऱ्यांदा कचास ठार करून त्याची राख केली व ती राख गुरू शुक्राचायार्ंना मदिरेतून दिली.  कच दिसेना म्हणून देवयानीने आपल्या वडिलांकडे कचासाठी पुन्हा हट्ट धरला यावेळी अंतज्र्ञानाने गुरू शुक्राचार्य यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, कच हा आपल्याच पोटात आहे. ही गोष्ट त्यांनी एकुलती एक कन्या देवयानीस सांगून कचास आता जिवंत करणे अवघड असल्याचे सांगितले. देवयानीने कसेही करून कचास जिवंत करावे असा हट्ट धरला. त्यामुळे शुक्राचार्यानी देवयानीला सांगितले की, कच जिवंत झाला तर तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेन. त्यावर देवयानीने वडिलांकडे हट्ट धरला की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा व त्या मंत्राच्या आधारे मी आपणास जिवंत करीन. शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्या देवयानीस सांगितला. त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो ग्रहण केला. कच जिवंत होऊन शुक्राचार्याचे पोट फाडून बाहेर आला.  शुक्राचार्य मृत पावले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राद्वारे पुन्हा त्यांना जिवंत केले. ही घटना मंदिराच्या समोर संजीवनी पार येथे घडली असे मानले जाते.

संजीवनी मंत्र हा गुरू शुक्राचार्य, देवयानी व कच यांनी ऐकल्यामुळे तो षटकर्णी झाला व लोप पावला. अशा तऱ्हेने या मंत्राचा प्रभाव शिल्लक न राहिल्यामुळे दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करण्याची शक्ती गुरू शुक्राचार्यामध्ये राहिली नाही.

देवांचे कार्य साध्य झाल्याने कच मूळ देवलोकी जाण्यास निघाला, परंतु आश्रमात आल्यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्यामुळे तिने त्यास विवाह करण्याची याचना केली. परंतु आपण दोघेही एकाच वडिलांच्या उदरातून बाहेर आल्याने आपले नाते गुरू बंधू-भगिनीचे झाल्याने मी तुझ्याबरोबर विवाह करू शकत नाही असे त्याने सांगितले. या गोष्टीचा देवयानीला राग आला आणि अपेक्षाभंग दु:खामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्त करून चालला तिचा तुझ्यासह कुणालाही उपयोग होणार नाही.

देवयानीची शापवाणी ऐकून कचानेही देवयानीस शाप दिला की, तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणपुत्राशी होणार नाही. पुढे ही शापवाणी खरी ठरली व तिचा विवाह क्षात्रकुळातील ययाती राजाशी झाला, अशी ही सगळी पौराणिक कथा सांगितली जाते.

आजही गुरू शुक्राचार्याच्या स्थानावर मुहूर्त वेळ-नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता बाराही महिने विवाह सोहळे होतात. पेशव्यांनी वाडय़ाच्या अवशेषातून देवळाच्या ओवऱ्या पूर्वी बांधलेल्या असून समोर विष्णू, गणपती यांची मंदिरे आहेत. काळ्या गुळगुळीत दगडाचे विष्णू मंदिर प्रसिद्ध आहे, त्याच्या पायथ्याशी पूर्वी गोदावरी नदीचा घाट होता. त्याच्या खुणा व शिलालेख आजही पाहावयास मिळतो. दोन्ही मंदिरांच्या मध्यात संजीवनी पार उत्तरपूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर (त्रंबकेश्वर) येथे गुप्त रूपाने आले असे मानले जात असल्याने प्रतित्रंबकेश्वराचे मंदिर येथे आहे. भगवान शंकर गुप्त रूपाने येथे आले असे मानले जात असल्याने या मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. महाशिवरात्र पर्व काळात येथे मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. शुक्राचार्य मंदिराचा रामानुग्रह ट्रस्टच्या वतीने व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळातही येथे मोठे उत्सव होतात. गुरू शुक्राचार्याची पालखी गंगाभेटीस तसेच दसरा (विजयादशमी) सीमोल्लंघनाच्या वेळी देवी मंदिरात नेण्याचा प्रघात येथे आहे.

नुकत्याच झालेल्या कुंभमेळा पर्वात या मंदिरापासून गोदावरी नदी पात्रापर्यंत शोभायात्रा काढली गेली.  शिर्डी साईबाबा मंदिरापासून नगर-मनमाड महामार्गावर हे स्थान २० किलोमीटर अंतरावर आहे.
महेश जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 1:12 am

Web Title: shukracharya temple
Next Stories
1 कथा : जानकीची गोष्ट
2 कथा : संदर्भ
3 कथा : चोरावर मोर
Just Now!
X