प्राची पाठक – response.lokprabha@expressindia.com

कोणत्याही प्रकारच्या कितीही पदव्या मिळवल्या तरी त्यापेक्षा जास्त महत्त्व असतं ते हातात असलेल्या कौशल्याला. त्यामुळेच अलीकडच्या काळात कौशल्य विकसित करणाऱ्या विविध अभ्यासक्रमांवरचा भर वाढताना दिसतो आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

आपण जे शिकलो, त्यातले किती प्रत्यक्ष नोकरीला लागल्यावर वापरत असतो, हा प्रश्न अनेकदा लोकांच्या चच्रेचा विषय असतो. गणितातले वेगवेगळे किचकट सिद्धांत आपण व्यवहारात वापरले तरी कुठे, अशी एका अर्थी त्या विषयाला आणि एकूणच शिक्षणाला तुच्छ लेखून गप्पा मारायची गोष्ट होऊन जाते. चारचौघांत या गप्पांना आणखीन ऊत येतो आणि पसे मोजता आले म्हणजे पुरे आहे की गणिताचे शिक्षण इथवर त्या विषयाला खाली खेचून आणले जाते. खरंतर, कोणताही विषय त्याची भीती बसावी, इतका वाईट नसतो. गणिताचे तर अनेक व्यावहारिक दाखले आणि उपयोग सांगता येतात. परंतु, आपल्यालासुद्धा कधी कधी शिक्षण पद्धतीचा, त्यातील वाढत्या खर्चाचा, शिकवणाऱ्या व्यवस्थेचा आणि त्यातल्या जीवघेण्या स्पध्रेचा राग अशा विषयांवर काढावासा वाटतो. त्यातून आपण ‘‘ल बुकं शिकला, पण उपयोग काय?’’ स्वरूपाच्या शिक्षणाला कस्पटासमान मोजणाऱ्या गप्पांचा हिस्सा होऊन जातो. अमुक गोष्ट न शिकलेली बरी, अशा फुशारक्यासुद्धा मारायला लागतो. विद्या कशी विनयेनच शोभली पाहिजे, कारण जरा कोणाला थोडी विद्या आली, तर त्याचा गर्व वाढलाच समजा, अशा सरसकट गृहीतकांना बळी पडतो. हुशार माणसाची कशी जिरवली, यात अनेकांना एक सुप्त आनंद मिळत असतो. काय विद्वान पंडित हा माणूस, पण नाव बुडते, तेंव्हा त्याला पोहायला कुठे येत असतं, अशा गोष्टी आपल्याला फार भारी वगरे वाटायला लागतात. खरंतर, नावाडी अशिक्षित असायची काहीच गरज नसते. पंडित बुकं शिकलेला असला, तरी त्याला पोहायला येत नाही, अशी गोष्ट रंगवायचीदेखील काहीच गरज नसते. खूप बुकं शिकलेला पंडित नौकानयनातलीच खूप बुकं शिकलेला असू शकतो की. पुन्हा यात एक लिंगभावाची भूमिकासुद्धा बिंबवली जाते. नावाडी ‘तो’च असायची काय गरज? नाव वल्हवणारी व्यक्ती एखादी स्त्री किंवा तृतीयपंथीसुद्धा असू शकते. खूप बुकं शिकलेल्या व्यक्तीचे पुरुष असणेसुद्धा असेच प्रश्नांकित करता येते.

मुद्दा इतकाच की शिक्षण व्यवस्थेशी संबंधित अनेक गोष्टी आपण त्याच त्या गृहीतकांवर मोजत असतो. तेच ते विषय आणि त्या विषयांच्या शिक्षणातून मिळणारे तेच ते व्यवसाय यात आपण अडकून गेलेलो असतो. म्हणूनच फार मोठी क्रेझ डॉक्टर, इंजिनीअरच बनलं पाहिजे, यामागे असते. नुसतं डॉक्टर इंजिनीअर होऊनदेखील चालत नाही. ठरावीक कॉलेजेस आणि मोजक्या शिक्षण संस्थांमध्येच प्रवेश मिळायची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. शिक्षणातला आनंद कुठेतरी मागे पडतो आणि केवळ परीक्षा पद्धतीच्या खेळात घोकंपट्टी करून यश मिळवून देईल, ते आणि तितकेच शिकण्याकडे लोक वळतात. ‘‘कुठेही अ‍ॅडमिशन मिळाली नाही की कर डीएड, बीएड,’’ अशी पूर्वी म्हणच बनून गेली होती. म्हणजे, शिक्षक निर्मिती प्रक्रियेचा पायाच इतका कमकुवत. अशा पद्धतीतून आलेले शिक्षक त्यांचे विषय किती रंजक करून शिकवणार? की केवळ ‘‘पाटी टाकण्यासाठी’’ शिकवणार, असे सगळे उलटसुलट वादग्रस्त मुद्दे कायम सामोरे येत असतात. वरच्या सर्व मुद्दय़ांकडे जसं पाहू तसा युक्तिवाद करत बसता येईल. त्यातल्या काही खाचाखोचा वकिली दाव्याने मोठय़ाही करता येतील. पण मोठय़ा कॅनव्हासवर बघितलं, तर वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षणाची गोडी लागणे, शिक्षण प्रक्रिया अतिशय आनंददायी असणे, तिचे व्यावहारिक उपयोग समजून घेता येणे आणि जे शिकलो त्यातून काही रोजगार निर्माण व्हायची शक्यता आणि त्यातूनच आपली रोजीरोटी सुटली पाहिजे असा आíथक आधार अशी सगळी ही प्रक्रिया आहे. त्यात भारतात तरुण वर्ग मोठय़ा संख्येने आहे. नोकऱ्या ठरावीक ठिकाणी एकवटलेल्या आहेत. श्रमाला विशेष प्रतिष्ठा नाही.  त्यामुळे, कष्टाची कामं करायला सुशिक्षित अशी फौजच तयार होत नाही. त्यात प्रचंड संधी असूनही प्रशिक्षित लोक मिळत नाहीत. त्या त्या कामांमध्ये कार्यरत असलेले लोक बहुधा बघून बघून काहीतरी शिकलेले असतात. त्यामुळे, त्यांच्या कामात काही घोडचुका होत राहतात. कामात सफाई येत नाही. त्या कामाशी संबंधितच निरनिराळे पलू सामावून घेणारी दृष्टी ते त्यात आणू शकत नाहीत. म्हणूनच कामचलाऊ गोष्टी घडत राहतात. कामाला चांगली माणसे न मिळणे एकीकडे दिसते आणि दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी!

विविध कौशल्य विकास योजना नेमकी हीच परिस्थिती हेरून त्यावर विविध पर्याय देऊन उपाययोजना करताना दिसतात. त्यात विविध विषयांमधील लहानमोठे प्रशिक्षण वर्ग, डिप्लोमा कोस्रेस, सर्टििफकेट कोस्रेस उपलब्ध आहेत. काही संस्था तर एक-दोन वर्षांच्या कालावधीत विविध व्यवसायाभिमुख कौशल्य एकत्रच शिकवतात. साधं उदाहरणच घ्यायचं तर, आजकाल शहरांमध्ये अनेक युनिसेक्स सलून दिसून येतात. अगदी १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत अशी काही सोय विशेष उपलब्ध नव्हती. असली, तरी ती काही ठरावीक ठिकाणीच होती. त्यातले प्रशिक्षण लोक सहजच घेत नसत. केस कापणे ही लिंगभावापलीकडची एक कला आहे आणि स्त्रिया, पुरुष, तृतीयपंथी यापकी कोणीही ती शिकू शकतात, याला लोकमान्यता दिसत नव्हती. स्त्रियांची ती ब्युटीपार्लर्स आणि पुरुषांचे ते केशकर्तनालय असंही समीकरण युनिसेक्स सलूनने मिटवून टाकलं. त्याच्या विविध खाजगी प्रशिक्षण संस्था सर्वत्र दिसू लागल्या. काही अत्यंत महागडय़ा संस्था यात उतरल्या. आपल्या मुलाला केस कापायच्या कलेत रस आहे, याभोवती जे ‘‘अमुक काम हलकं आणि तमुक भारी’’ असली पोकळ गृहीतकं लोकांच्या मनात असत, ते हळूहळू निघून जाताना दिसत आहेत. हेअर स्टायलिस्ट होणे हाय प्रोफाइलमध्ये गणले जाऊ शकते, याची झलक लोकांना दिसू लागली. पारंपरिक कपडे शिलाईदेखील बदलत जाताना दिसतेय. त्यात ड्रेस डिझायनरपासून ते स्टायलिस्टपर्यंत विविध हायटेक करिअर समाविष्ट होताना दिसतात. फिटनेस ट्रेनर हे एक वेगळे क्षेत्र खुले झालेय. अमुकच कोर्स शिकला की चिकटला सरकारी नोकरीला किंवा झाला डॉक्टर, इंजिनीअर यापेक्षा वेगळं काही घडताना आजूबाजूला दिसायला लागलं. प्लंबर, गवंडी, सुतार, माळी, हाऊस कीपिंग, सेक्युरिटी सíव्हसेस, इव्हेन्ट मॅनेजर्स, इलेक्ट्रिशिअन्स, नवनवीन उपकरणं दुरुस्त करणारे, हेल्थ केअरमधले विविध रोजगार, हॉस्पिटलमध्ये विविध यंत्र हाताळणी, त्यातच रोजगार, होम डिलिव्हरीमध्ये विविध संधी, असे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले. हे स्थित्यंतर होत असतानाच विद्यापीठीय स्तरावर एकाच वेळी दोन विषयांमध्ये संयुक्त पदवी घेता येण्याच्या सुविधा निर्माण होऊ लागल्या. नेहमीच्या डॉक्टर, इंजिनीअर या करिअर पर्यायांपेक्षा हे विविध क्षेत्रांमधलं आणि मजेदार असं काही घडत होतं. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता त्यातून रोजगारनिर्मिती आणि रोजगार मिळायच्या संधी वाढवण्याकडे अशा सर्व कौशल्य विकास योजनांचा कल दिसू लागला. अगदी एक आठवडय़ापासून ते दोन ते तीन वर्षांपर्यंत वेगवेगळे कोस्रेस विनामूल्य, सवलतीच्या दरांमध्ये अथवा महागडय़ा खासगी संस्थांमध्ये उपलब्ध होऊ लागले.

भारतात होम हेल्थ केअर क्षेत्रातसुद्धा रोजगाराच्या अनेकविध संधी आहेत. त्यात वृद्धसेवा प्रशिक्षणापासून ते घरच्याघरी आयसीयूची सोय इतपत व्यापक आणि भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. घरोघरी वाढणारी वृद्धांची संख्या आणि दुसरीकडे बेरोजगार युवक यांची सांगड घालून काही उत्तम प्रशिक्षणवर्ग वृद्धसेवा शिकवण्यासाठी चालवले जातात. बदलत्या काळाची ही अशीही गरज असेल, ती उत्तम रोजगार तर असेलच, पण त्यापलीकडे काहीतरी जीवनानुभव देऊन जाईल, असा विचार आणि तशा सुविधा याआधी विशेष नव्हत्या. अगदी डायपर बदलता येणे हेसुद्धा एक महत्त्वाचं कौशल्यच आहे आणि त्याचेही काही विशिष्ट टप्पे असतात, अशा मूलभूत गोष्टी यात शिकता येतात. हाऊस कीिपगमध्ये पलंगावर टाकायची चादर वेगळी आणि नìसगमध्ये बेड मेकिंग वेगळे, हेही यात कळते. बघून बघून शिकण्यात जे कारागीर विविध कौशल्यांमध्ये तयार होतात, त्यांना असे सगळे त्या त्या विषयातले बारकावे माहीत असतीलच असे नसते. तेच जर छोटय़ाशा प्रशिक्षणवर्गात शिकले, तर आपले कौशल्य नक्कीच समृद्ध होत जाते. अद्ययावत होत जाते. जे शाळा- कॉलेज ड्रॉप आऊट असतात किंवा ज्यांना तथाकथित डॉक्टर, इंजिनीअर क्षेत्रात प्रवेश मिळालेला नसतो, त्यांनीच यात यावे, असंही काही नसतं. कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षण योजनांतर्गत इतक्या विविध प्रकारचे प्रशिक्षण लहान-मोठय़ा कालावधीत अगदी विनामूल्य उपलब्ध असते की एखादे नवीन कौशल्य शिकण्यासाठीसुद्धा अशा वर्गाचा फायदा होऊ शकतो. नवनवीन लोक त्या त्या प्रशिक्षणाला जोडले गेल्याने ते त्यात नवनवीन पलू आणून त्या त्या सुविधा आणखीन लोकाभिमुख करू शकतात. त्यात नवीन गोष्टी घडायला एक शक्यता निर्माण होते. सरकारी योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्यांच्या अंमलबजावणीत काही त्रुटी कालांतराने लक्षात येतात. त्या सुधारायला वाव नक्कीच असतो. परंतु, मुळातच या योजना त्या त्या काळाची गरज म्हणून पुढे आलेल्या असतात आणि त्यातून कौशल्य विकास करून घेऊन रोजगार संधींची शक्यता वाढते, हे मात्र नक्की!