08 March 2021

News Flash

संस्कृती : भारत नागपूजकांचा देश

अलीकडेच झालेल्या नागपंचमीला सगळीकडे नागाची प्रतिकात्मक पूजा केली गेली.

अलीकडेच झालेल्या नागपंचमीला सगळीकडे नागाची प्रतिकात्मक पूजा केली गेली. भारतातली ही प्राचीन प्रथा. वेगवेगळ्या ठिकाणांच्या मंदिरांमधील शिल्पांमधून ही प्रथा किती प्राचीन आहे, ते लक्षात येते. आज तिला  सणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भारतीय परंपरेनुसार श्रावण मासाच्या शुक्ल पंचमीला नागपूजन करण्याची परंपरा आहे.

शेषदीनां फणशींना पंचम्यां पूजनं भवेत्।

सर्प पूजनाची ही परंपरा वैदिक काळापर्यंत जाते. वैदिक वाङ्मयात काही सर्पदेवतांचा उल्लेख येतो. सर्प हे विषारी असल्यामुळे त्यांना आसुरी स्वभावाचे सुद्धा मानलेले आहे. व त्यांच्या तुष्टीकरणासाठी काही विधीही सांगितले आहेत. अथर्व वेदात सर्पाना दान असलेल्या दोऱ्या ‘दांतवती रज्जू’ असे म्हटले आहे.

अथर्ववेदातील एक सूक्त (१०/४) सर्पविषदूरीकरण या नावाने प्रसिद्ध आहे. या सूक्ताची देवता तक्षक आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या सापांविषयी माहिती असून त्यांच्या विषदंशापासून मुक्त होण्याचे उपाय सांगितले आहे.

त्याच्या ऐतिहासिक दृष्टीने त्याच्याही पलीकडच्या काळात म्हणजे सैंधवी संस्कृतीच्या युगात नागांचे अंकन त्या काळातील शिक्यांवर झालेले आहे असे दिसते.

प्राचीन भारतीय कथा वाङ्मयात, विशेषत: महाभारतात व पुराणांमध्ये सर्प- कथांचे प्राचुर्य आहे. महाभारतातील कुरुवंशीय सम्राट, अर्जुनाचा पौत्र व अभिमन्यू उत्तरेचा पुत्र राजा परिक्षित याचा अंत तक्षक नागाच्या दंशामुळे कसा झाला व त्याचा सूड म्हणून त्याचा पुत्र जनमेजय याने सर्पाचा विनाश करण्यासाठी सर्पसत्र नावाचा यज्ञ केला होता याचे मोठे विस्ताराने वर्णन महाभारत व इतर पुराणांमध्ये आलेले आहे. अश्याच अनेक कथा आपल्याला सापडतात.

प्राचीन काळी मथुरा व त्यांच्या आसमंतात सर्पपूजा प्रचलित होती. शुंग, कुशाण कालातील नागांच्या मनुष्यावृत्ती शिल्पाकृती जलाशयांच्या काठावर ठेवलेल्या स्थितीत मिळालेल्या आहेत.

कृष्णाचा मोठा बंधू बलराम हा शेषनागाचा अवतार आहे असे मानले जाते. मथुरा हे कुशाण कालात बलरामाच्या पूजेचे महत्त्वाचे केंद्र होते. या भागात मस्तकावर शेषाचा फणा व हातात मद्यपात्र अशा बलरामाच्या मूर्त्यां पाहायला मिळतात. बलरामाच्या या अशा अंकनामुळे सर्पपूजेच्या पंथांना बळ मिळाले.

कुशाण काळातील शिलालेखांवरून दधीकर्ण नावाच्या नागाची पूजा मथुरेत प्रचलित होती. त्याचे एक मंदिर मथुरेत होत,े असे निदर्शनास आले आहे. मथुरेजवळच्या सोंख या गावी नागाची दोन मंदिरे मिळाली.

बिहार येथील प्राचीन नगर असलेल्या राजगृहाच्या परिसरात मणियार मठ हे स्थान महाभारत काळी नागपूजेचे मोठे केंद्र होते. महाभारताच्या अरव्यक पर्वात या स्थानी अरबूद, सकरावापी, स्वस्तिका व मणीनाग हे येथील प्रमुख नागदेव होते. असे नमूद केले आहे.

समुद्रमंथनाची कथा महाभारत व इतर पुराणांत आलेली आहे. अमृताच्या प्राप्तीसाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्राचे मंथन केले. त्यांनी मेरू किंवा मंदार पर्वताची रवी केली व वासुकी नागाची दोरी करून समुद्र घुसळायला प्रारंभ केला. यावेळी वासुकीचे महाविष समुद्रात पडले व त्यातूनच समुद्रातून अत्यंत भयानक हलाहल नावाचे विष उत्पन्न झाले. ते विष इतके भयंकर होते की त्याने सगळ्या विश्वाला जाळायला सुरुवात केली त्यामुळे घाबरून गेलेले देवगण शिवाला शरण गेले. शिवाने ते विष प्राषण करून आपल्या कंठात धारण केले त्यामुळे शिवाचा गळा निळा झाला व त्याला निळकंठ असे नाव प्राप्त झाले. या विषाच्या प्रखर दाहाचा ताप कमी व्हावा म्हणून महाप्रभूने शिरावर गंगा, मस्तकावर चंद्र व सर्वागावर भस्म धारण केले. जेव्हा यानेही त्याचा ताप शांत होईना तेव्हा त्याने अत्यंत शीतल स्पर्श असलेले नाग आपल्या अंगाभोवती गुंडाळले. अशी कथा ऐकावयास मिळते. या प्रसंगाचे प्रतीक म्हणून बहुधा शिवलिंगावर फणा विस्तारलेला साप दाखविण्याची प्रथा आहे.

जैन आणि बुद्ध वाङ्मयात अनेक नागकथा येतात. बुद्धाचा नागराज मुचलिंगाशी संबंध आला होता. असे म्हणतात की भगवान बुद्ध बोधी वृक्षाखाली तपश्चर्येसाठी बसलेले असताना वादळ आणि पाऊस यांनी सात दिवसांपर्यंत धुमाकूळ घातला तेव्हा नागराज मुचलिंग भूगर्भातून वर येऊन त्याने आपला फणा विस्तारून निसर्ग कोपापासून बुद्धाचे रक्षण केले. निसर्ग कोप शांत झाल्यावर त्याने बुद्धाला मानवी रूपात येऊन प्रणाम केला. व आपले कार्य संपवून अदृश्य झाला. येथे नवजात कृष्णाची पर्जन्यापासून रक्षण करणाऱ्या नागाची व लगोलगच कालिया मर्दन प्रसंगाची आठवण होते.

भारतीय परंपरेनुसार शेषनाग हा सर्व सर्पाचा राजा असून तो आपल्या फणावर पृथ्वी धारण करतो असे म्हणतात. त्याला आदीशेष किंवा अनंतशेष असेही म्हणतात. असे म्हणतात की जेव्हा आदीशेष आपले वेटोळे उलगडतो तेव्हा काळ समोर सरकतो. आणि जेव्हा तो आपले वेटोळे गुंडाळून घेतो त्यावेळी विश्वाचा अस्त होतो. शेष हा भगवान विष्णूची शय्या आहे म्हणून विष्णूला शेषशायी भगवान असे म्हणतात. देवगड येथील दशावतार मंदिरात शेषशायी विष्णूचे अप्रतिम  शिल्प आहे. श्रीरंगम् येथील मंदिरातील शेषशायी विष्णूची मूर्ती प्रसिद्ध आहे, असे म्हणतात की दक्षिणेतील अलवार संत कोदाई अर्थात् आंडाळ ही श्रीरंगम् मंदिराच्या सर्प शय्येवर चढून विष्णूच्या मूर्तीत मुक्त झाली होती.

शेषाला विष्णूचा अंशावतार असेही मानतात, त्याने स्वत: काही अवतार घेतले. प्रभुराम चंद्राचे बंधू लक्ष्मण यांना शेषावतार मानतात. काही दंतकथांच्या मते व्याकरणकार व महाभारताचे कर्ते पतंजली यांनासुद्धा शेषाचे अवतार समजतात. असे म्हणतात की भगवान शेषाला शिवाचे तांडव नृत्य पाहाण्याची इच्छा झाली. तेव्हा त्याने पृथ्वीतलावर पतंजलीच्या रूपाने अवतार घेतला. भगवान शिवाने चिदम्बरम् येथे आपल्या तांडव नृत्याचे प्रदर्शन करून शेषनागाची इच्छा पूर्ण केली. भारतीय लोक जीवनात व लोकधर्मामध्ये नागाला महत्त्व आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून मौर्य काळात नागपूजा प्रचलित होती असे दिसते. भरहूत, सांची, अमरावती येथील स्तूपांमध्ये नागाचे मनुष्य रूपात व प्राणी रूपात विपुल शिल्पांकन झालेले आहे.

बंगाल व आसामच्या लोकजीवनामध्ये मनसा या नागमातेचे पूजन होते. मनसेच्या अनेक लोककथा असून या भागात अनेक कवींनी मनसा मंगल काव्य लिहिलेली आहेत.

गरुड पक्षी आणि नाग यांच्यामध्ये असलेल्या वैरांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सातव्या शतकात सम्राट हर्षवर्धन शिलादित्य याने रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद  नावाची तीन नाटके लिहिली त्यांत नागानंद हे नाटक बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे नाग आणि गरुडाच्या संघर्षांची एक कथा वर्णन केलेली आहे. याचा नायक जिमूतवाहन नावाचा बोधीसत्त्व आहे. नाटकाच्या शेवटच्या अंकात तो गरुडाला जिवंत जीवांची हत्या करण्यास परावृत्त करतो व त्याचा उपदेश ऐकून गरुड नागहत्येचे आपले नैमित्यिक कार्य थांबवतो असे दाखविले आहे.

असे म्हणतात की जिमूतवाहन हा हर्षांचीच प्रतिकृती होता. सम्राट हर्षांनेही आपल्या राज्यात प्राणी हत्येची बंदी केली होती. या नाटकांचे अनेक प्रयोग झाल्याची नोंद आहे.

नागपूजा आजही भारतात मोठय़ा प्रमाणात साजरी होते, त्यामध्ये अशा अनेक प्राचीन प्रथा आणि परंपरा दिसून येतात.
मनोहर वराडपांडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:14 am

Web Title: snake worship
Next Stories
1 कथा : एका आडाण्यावरून
2 कथा : संशय
3 व्यवस्था विजिगीषू हवी
Just Now!
X