25 September 2020

News Flash

घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया – उपचार

आपल्या देशात घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया याचे प्रमाण भरपूर आहे. जनजागृती नसल्याने माहिती नसते.

डॉ. अभिजित देशपांडे

घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया हे आपल्या समाजात सर्वत्र आढळणारे आजार आहेत. त्यांच्यावर १०० टक्के उपचार उपलब्ध आहेत, पण बहुतेकांना आपल्याला हे आजार आहेत याचीच नीटशी कल्पना नसते. 

घोरणे आणि अतीनिद्रा ही सौख्याची लक्षणे आहेत, असा एक गैरसमज आहे. वास्तविक  घोरण्यामुळे झोपेची प्रत खालावते आणि त्याचा परिणाम दिवसभरात थकवा किंवा पेंग येणे असा होतो.

घोरण्याबरोबर येणारा ‘स्लीप अ‍ॅप्निया’ हा विकार धोकादायक ठरू शकतो. एक तर हा विकार गाढ झोपेत होत असल्याने ज्या माणसाला तो होतो आहे त्याला त्याचा पत्ताच नसतो. दुर्दैवाने स्लीप अ‍ॅप्नियाचे परिणाम मात्र भयंकर होतात. त्याच्यामुळे थकवा, वजन वाढणे, मधुमेह बळावणे, ब्लड प्रेशर वाढणे, हृदयविकार, पक्षाघात आणि झोपेत मृत्यू आदी विकार मागे लागतात. आपल्या देशात घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया याचे प्रमाण भरपूर आहे. जनजागृती नसल्याने माहिती नसते. त्यामुळे अनेक लोकांना या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. खालील उदाहरणाने हे स्पष्ट होईल.

राजेंद्र गावित (नाव बदलले आहे) हे ५२ वर्षांचे गृहस्थ. एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणारे.  कामाला वाघ, पटापट निर्णय घेणारे अशी ऑफिसमध्ये ख्याती, पण गेल्या पाच वर्षांमध्ये हा वेग थोडा मंदावला होता. ऑफिसमधली मीटिंग थोडी जरी लांबली तरी त्यांना जबरदस्त पेंग येऊ लागायची. घरातले अनेक कार्यक्रम लांबणीवर पडू लागल्याने बायकोदेखील नाराज! सुट्टीच्या दिवशीदेखील त्यांचा झोप काढण्याकडे कल असायचा.  त्यामुळे कुटुंबीयांच्या टीकेचा सूर झेलावा लागत होता. गावित यांना व्यायामाची आवड, पण गेल्या दोन वर्षांत थकव्यामुळे इच्छाच होत नव्हती. परिणामी त्यांचे वजनदेखील दहा पौंडांनी वाढले. या सगळ्या परिस्थितीचे कारण त्यांच्या मते अगदी स्पष्ट होते. कामाचा व्याप, वाढते वय यामुळे थकवा येतोय आणि या दोन्ही गोष्टी अपरिहार्य असल्याने, कुटुंबीयांनी समजून घ्यावे, असे गावित यांना प्रामाणिकपणे वाटे.

भारतीय आणि अमेरिकन लोकांच्या विचारसरणीमधील एक फरक मला नेहमीच जाणवला आहे. ‘झोपाळूपणा’ म्हणजे आळशी असल्याचे लक्षण अशी आपल्या भारतीयांची मनोधारणा आहे. त्यामुळे भारतीयांना तुमचा झोपाळूपणा वाढला आहे का, असे विचारले तर बऱ्याचदा उत्तर नकारार्थी येते. याउलट थकवा (फटिंग) वाढला आहे का, याचे उत्तर अनेक लोक ‘होय’ असे देतील.

थकवा आहे याचाच अर्थ मी कामसू आहे आणि आळशी नाही हे स्पष्टीकरण कोणालाही आवडेल. वस्तुत: झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याची कारणे आपण बा गोष्टीमध्ये (उदा. वृद्धपणा, चिंता, तणाव, कामाचा व्याप) शोधतो, पण एका महत्त्वाच्या कारणाकडे दुर्लक्ष करतो. ते म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता’!

गाढ झोपेतून आपण अनेक कारणांनी उठलो तरी त्याचे स्मरण राहत नाही. यामुळे आपल्या थकव्यामागे झोप हेच कारण आहे हे लक्षात येत नाही. राजेंद्र गावित यांच्या परिस्थितीला झोपेशी निगडित बाबीच कारणीभूत होत्या. एका महत्त्वाच्या बठकीमध्ये गावित यांना झोप अनावर झाली आणि ते सगळ्यांसमोर चक्क घोरू लागले. या प्रसंगानंतर गावित यांनी वैद्यकीय सल्ला घेतला आणि इंटरनेटवरदेखील संशोधन केले. हजारो लोकांना आपल्यासारखा त्रास आहे, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि थोडे बरेदेखील वाटले.

काय प्रकार चालू होता गावित यांच्या झोपेच्या बाबतीत, त्याचे दूरगामी परिणाम काय घडत होते याची सविस्तर चर्चा करू या.

गेल्या दहा वर्षांत गावित यांचे घोरणे वाढले होते. सुरुवातीला खूप दमल्यावर, पाठीवर झोपले तरच घोरणे व्हायचे. त्यानंतर पाठीवर झोपले की घोरणे नित्याचेच झाले. गावितवहिनी कधी कधी त्यांना हलवून कुशीवर झोपायला लावायच्या. पुढे कुशीवर झोपल्यावरदेखील मंद घोरणे सुरू झाले.

मित्रांबरोबर एखादी बीअर अथवा वाइनचा ग्लास घेतल्यानंतर घोरण्याचा आवाज वाढायचा. घोरण्याच्या भौतिकशास्त्रीय कारणांनुसार कंप पावताना, घसा कधी कधी अर्धवट बंद होऊ लागला होता. गावित यांच्या मेंदूला घशाचे बंद होणे ही धोक्याची सूचना वाटत होती. (पूर्ण बंद झाला तर?) त्यामुळे मेंदू गाढ झोपेतूनदेखील त्यांना उठवत होता. अर्थात हे उठवणे काही सेकंदाचेच असल्याने गावितांना दुसऱ्या दिवशी याची सुतराम कल्पना नसायची, पण अशी खंडित झोप आल्याने थकवा येतो. त्याचा परिणाम निर्णय घेण्याच्या वेगावर होणारच. ‘आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी भी क्या जलदी है जब जीना है बरसो!’ अशी टाळाटाळ व काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती निर्माण होते. पटकन राग येतो. झोप येत असल्याने लक्ष केंद्रित करणे कठीण जाते आणि स्मरणशक्ती कमी होते.

या प्रकारामुळे काही लोकांचा स्वतवरचा विश्वास उडायला लागतो. त्यामुळे औदासीन्यदेखील येऊ शकते. गावित यांचे दहा पौंडांनी वजन वाढले. त्यालाही खंडित झोप हेच कारण होते. झोपेत असताना मेंदू वारंवार उठल्याने, कॉर्टसिॉल नामक हार्मोन स्रवते. साधारणत झोपेमध्ये या हार्मोन्सचा स्राव अगदी नगण्य असला पाहिजे. परंतु खंडित झोपेमध्ये हे प्रमाण फारच वाढलेले असते. यामुळे पोटाभोवतीच्या चरबीचे प्रमाण वाढते. याशिवाय घ्रेलीन या हार्मोनमुळे पिष्टमय पदार्थ (भात, बटाटा, साखर) जास्त खाल्ले जातात.

दिवसभरात थकवा जाणवत असल्याने व्यायामाचे प्रमाण आपोआप कमी होते.  या सर्व गोष्टींचा परिपाक वजन वाढण्यात होतो. ही गोष्ट इथेच संपत नाही. म्हणजे घोरण्यामुळे वजन वाढते, तसेच वाढलेल्या वजनामुळे गळ्याभोवतीची चरबी वाढते. गळ्याचा व्यास (डायमीटर) जितका कमी तितका तो कंप पावण्याची (घोरण्याची) आणि बंद होण्याची शक्यता जास्त!  अशा रीतीने गेल्या पाच वर्षांत गावित यांचे घोरणे विनासायास (?) वाढतच  गेले.

खंडित झोपेचा (फ्रॅगमेंटेड स्लीप) परिणाम दुसऱ्या दिवशी मेंदूच्या कार्यप्रवणतेवर होतो. निर्णय घेण्याचा वेग ३० ते ५० मिली सेकंदांनी मंदावतो!

आपल्या मेंदूचा निर्णय घेण्याचा वेग आणि प्रतीक्षिप्त (रिफ्लेक्स) क्रिया किती पटकन होतो हे मोजण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आमच्या संस्थेमध्ये  यावर भरपूर संशोधन झाले आहे. हे तंत्रज्ञान सोपे, साधे आणि विनामूल्य देण्यात आम्हाला यश आले आहे. कुणीही हे लॅपटॉपवर डाउनलोड करू शके ल. आमचा पुढचा प्रयत्न हे सॉफ्टवेअर ‘अँड्रॉइड’ भाषेत लिहिण्याचा आहे, जेणेकरून कोणताही डॉक्टर आपल्या मोबाइल/स्मार्ट फोनवरून रुग्णाची चिकित्सा करू शकेल.

गावित यांची प्रतीक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स) जवळजवळ ५० मिली सेकंदांनी (१००० मिली सेकंद =१ सेकंद) मंदावली होती. अनेक वाचकांना वाटेल फक्त ०.०५ सेकंदांनी काय फरक पडणार? उत्तर असे आहे की, जीवन की मृत्यू इतका फरक असू शकतो. गाडी ड्राइव्ह करत असताना वाहन चालकाचा रिफ्लेक्स ३० मिली सेकंदांनी चुकला तरी अपघात होऊ शकतो, किंबहुना अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनात दारूखालोखाल झोपाळूपणा हे अपघाताचे प्रमुख कारण असते.

गावित यांना त्यांच्या ड्रायिव्हगबद्दल विचारले असताना, त्यांनी एक-दोनदा झापडं आल्याचे कबूल केले, पण त्यात त्यांना काही विशेष काळजी घेण्यासारखे वाटले नाही. संशोधनामध्ये असेही आढळले आहे की कुठल्याही कारणाने झोप कमी अथवा खंडित होते तेव्हा गॅम्बिलग (जुगार) करायची प्रवृत्ती वाढते. ही प्रवृत्ती मोजण्याची ऑब्जेक्टिव्ह पद्धती आमच्या संस्थेत आहे.

याच कारणामुळे अमेरिकेमध्ये कमर्शियल वाहनचालकांना परवाना देण्याअगोदर आणि दर दोन वर्षांनंतर घोरण्याची/झोपाळूपणाची चाचणी दिली जाते. आपल्या देशात अशी काळजी घेतली तर अनेक अपघात निश्चित टळतील. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील झालेले अपघात हे विशिष्ट वेळेला होतात हे ध्यानात घेतले पाहिजे.

‘निद्राविज्ञान’ अर्थात झोपेचे शास्त्र ही एक सकारात्मक वैद्यकीय शाखा आहे.  निद्राविकार नानाविध (आतापर्यंत ८४ माहीत असलेले) असले तरी बहुतांश विकारांवर इलाज आहेत! त्यांच्यावरील उपचारानंतर आयुष्यात विलक्षण फरक पडू शकतो, असा अनेक लोकांचा अनुभव आहे. घोरणे आणि त्याच्याशी संलग्न असलेला ‘स्लीप अ‍ॅप्निया’ यावरदेखील अनेक उपचार आहेत. त्याचा विचार या लेखात  करू या. सर्वप्रथम आपण घरगुती, सोप्या आणि स्वस्त उपायांचा आढावा घेऊ या. अर्थात असे उपाय सगळ्यांना लागू पडतील असे नाही. किंबहुना काही दिवसांनंतर लक्षणीय असा फरक वाटला नाही, तर पुढची पायरी म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणे  आवश्यक ठरते.

झोपताना पलंग, उशी आणि पहुडण्याची स्थिती यांचा घोरण्यावर परिणाम होतो. आडव्या स्थितीमध्ये पडल्यावर, विशेषत: पाठीवर झोपल्यानंतर आपली जीभ आणि पडजीभ मागे ढकलली  जाते. याने गळा अरुंद होऊन घोरणे वाढते. अशा वेळेला कुशीवर झोपल्याने घोरणे कमी होते. यात पंचाईत अशी आहे की, झोपेत पुन्हा कुशीवरून पाठीवर वळणार नाही कशावरून, हे आपल्या हातात थोडेच असते? अशा वेळेला पाठीच्या लांबीएवढा एक तक्क्या ठेवणे उपयोगी ठरते. काही लोक जास्त उशा घेऊन फक्त मान आणि डोके उचलतात तसे न करता झोपताना कंबरेपासून ते डोक्यापर्यंतचा भाग थोडासा उंचावणे हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे नाक सुटण्यास मदत होतेच. शिवाय जळजळणे आणि अन्न घशाशी येणे हा प्रकारही कमी होतो. दुसरा उपाय म्हणजे अंगरख्याला तीन टेनिस बॉल्स पाठीकडे मधोमध शिवून घेणे. यामुळे कुशीवरून पाठीवर यायला अटकाव येईल.

अर्थात या उपायांमध्ये दोन त्रुटी आहेत. सर्वप्रथम म्हणजे सतत एका कुशीवर झोपल्याने मान आणि त्या बाजूचा खांदा वजन पेलण्यामुळे दुखावू शकतो.

झोपणे ५० टक्के तरी पाठीवर असावे. दुसरी त्रुटी म्हणजे झोपताना बरेच लोक शर्ट वा तत्सम घालतीलच असे नाही. अर्थात घोरणे कुठल्याही कुशीवर आणि पाठीवर होत असेल तर संबंधिताने तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.

झोपेशी संबंधित समस्यांवर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर निद्राविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणे  जरुरीचे  असते. स्लीप अ‍ॅप्नियाचे परिणाम गंभीर असले  तरी यावर शंभर टक्के यशस्वी उपचार आहेत. कित्येक लोकांचे आयुष्य बदलण्याची किमया या उपचारांमध्ये आहे.

उपचार पद्धती (१)

पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (ढअढ) या पद्धतीत नाकामधून एका छोटय़ा यंत्राद्वारे प्रेशरने हवा दिली जाते. त्यामुळे गळा बंद  होणे टाळले जाते. गेली ४० वर्षे या पद्धतीच्या उपयोगासंदर्भात हजारो आंतरराष्ट्रीय  संशोधन निबंध लिहिले गेले आहेत. म्हणूनच उपचारांमध्ये ही पद्धत सर्वश्रेष्ठ (गोल्ड स्टॅण्डर्ड) मानली जाते आहे. आमच्या संस्थेमध्ये गेल्या दहा वर्षांत कित्येक हजारो लोकांनी या पद्धतीच्या उपचाराचा लाभ घेतला आहे. हे यंत्र ऑक्सिजन देणारे मशीन नाही  किंवा  श्वासोच्छ्वास देणारे (व्हेंटिलेटर) नाही  हे  ध्यानात  घ्या. या यंत्राचा वापर  केल्यावर घोरण्याचा आवाज पूर्ण बंद होतो आणि गाढ झोप लागते. मात्र हे दररोज रात्री वापरावे लागते. प्रत्येक व्यक्तीपरत्वे विशिष्ट प्रेशर लागते. त्यासाठी यंत्र वापरण्याआधी एक रात्र स्लीप लॅबमध्ये चाचणी आवश्यक ठरते. याला टायट्रेशन (Titration ) म्हणतात.  या पद्धतीचा फायदा असा की, उपचार म्हणून आपण श्वास घेण्याकरिता वापरतो तीच हवा असल्याने  कोणतेही  साइड इफेक्ट  होत  नाहीत.

उपचार पद्धती (२)

या पद्धतीत आपल्या खालच्या जबडय़ाला पुढे ओढण्यात येते. त्याकरिता विशिष्ट प्रकारच्या डेंटल इन्स्ट्रमेंटचा वापर केला जातो. या प्रकारात प्रथम तर डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या दंतपंक्तीचे इंप्रेशन घेतले जाते.

या पद्धतीत जीभ पुढे खेचल्याने गळ्याचा भाग रुंद होतो. दुर्दैवाने या पद्धतीचा  वापर  ज्यांना स्लीप अ‍ॅप्नियाच्या विकाराची सुरुवात झाली आहे अशांकरिताच होतो. तीव्र विकार (severe) स्लीप अ‍ॅप्नियामध्ये ही पद्धत वापरता येत नाही.

उपचार पद्धती (३)

यात शस्त्रक्रियेचा अंतर्भाव होतो. एक प्रकारच्या शस्त्रक्रियेत तुमची पडजीभ आणि आजूबाजूचा भाग कापला जातो. अशा प्रकारची शस्त्रक्रिया ज्यांना कमी  तीव्र ( mild to moderate) प्रकारचा त्रास आहे अशांनाच उपयोगी ठरते. दुसऱ्या प्रकारची शस्त्रक्रिया ही जबडय़ाचाच एक भाग तोडून केली जाते. ही बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून हा प्रकार केला जातो.

वजन कमी करणे : अनेक लोकांना वजन कमी करायचा सल्ला दिला जातो. बरेच जण उत्साहाने डाएट करणे, फिरणे, योगा करणे या उद्योगांना लागतात. काही जण यशस्वीपणे बारीक होतातदेखील! त्यांचे कौतुक होते. पण मुळात भारतीय लोकांनी ‘वजन’ कमी करायच्या भानगडीत पडू नये!

कारण आपले वजन हे दोन घटकांचे असते. चांगले वजन म्हणजे स्नायू, अस्थी वगैरे आणि वाईट वजन म्हणजे पोटाच्या आतील मेद (visceral fat).

बहुतांश भारतीय लोकांमध्ये चांगले वजन कमी आणि वाईट वजन जास्त अशीच संरचना असते. म्हणजेच तुमची प्रकृती ही पोटाच्या आतील मेदाला (visceral fat) जास्त प्राधान्य  देते. त्यामुळे तुम्ही या प्रकृतीमध्ये बदल न करता वजन कमी करायचा प्रयत्न कराल तर बारीक व्हाल, पण चांगले वजन म्हणजे स्नायूंचे आणखीनच कमी होते.

याचे दुष्परिणाम दूरगामी असतात. अनेक जणांचे वजन परत वाढण्याचे कारण हेच आहे. याकरिता केवळ डाएट आणि व्यायाम हेच उत्तर नाही. आमच्या संस्थेत वॉर (WAR- White Adipocyte Reduction ) हा एक शास्त्रशुद्ध आणि तंत्रज्ञानावर  आधारित, वैद्यकीय प्रोग्रॅम राबवला जातो. यात वाईट वजन कमी करणे आणि चांगले वजन वाढवणे (वेट लॉस नाही तर पेट लॉस) यावर भर  दिला  जातो. या प्रकाराबद्दल  जास्त  माहिती  पुढे  कधीतरी  दिली जाईल.

तात्पर्य : घोरणे  आणि  स्लीप अ‍ॅप्निया हे विकार आपल्या समाजात बऱ्याच प्रमाणात आढळतात. या विषयाबद्दल अज्ञान आहे आणि ते ज्या व्यक्तीला असतात तिला त्याचा पत्ताच नसतो.  दुर्दैवाने योग्य उपाययोजना केली नाही तर गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात पण आनंदाची बाब म्हणजे यावर १०० टक्के इलाज आहेत !!

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:05 am

Web Title: snore and sleep apnea treatment
Next Stories
1 झोप आणि हृदयविकार
2 मधुमेद आणि झोप
3 जगाची थाळी : रताळ्याचा जगप्रवास
Just Now!
X