जय पाटील

टोपीवाला आणि माकडांची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली असेल. आपला कार्यभाग साधून घेण्यासाठी टोपीवाला आपल्या डोक्यावरची टोपी काढून फेकतो आणि माकडं त्याचं हुबेहुब अनुकरण करतात. समाजमाध्यमांवरचे ट्रेण्ड्स साधारण अशाच प्रकारचे वाटू लागले आहेत. एकजण काहीतरी पोस्ट करतो आणि लगोलग सर्वजण त्याचं अनुकरण करू लागतात. यातून सर्वसामान्य युझर्सच्या हाती घटकाभर मनोरंजनापलिकडे काय लागतं हा संशोधनाचा विषय असला, तरी विविध समाजमाध्यमांची मात्र त्यातून पोतडी भरली जाते. या ट्रेंण्डचा आता एवढा अतिरेक झाला आहे की रोज नव्याने उगवणाऱ्या ट्रेंड्सची खिल्ली उडवणारे मीम्सही याच चावडीवर तयार होऊ लागले आहेत.

ट्विटरवर सध्या ‘कुर्ता ट्विटर’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. पण काही दिवसांपूर्वीच तिथे ‘सारी ट्विटर’ आणि ‘झुमका ट्विटर’ही ट्रेण्ड होऊन गेले. आधीच्या दोन्ही ट्रेण्ड्सना भरघोस प्रतिसाद लाभला हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच. टाळेबंदी आणि त्यानंतरच्या रटाळ दिनक्रमात साडी, झुमक्यांच्या निमित्ताने अनेकींनी रंग भरले. नव्या कुर्ता ट्रेण्डचं वैशिष्ट्य हे की कुर्ता महिलांप्रमाणेच पुरुषही वापरतात. त्यामुळे त्यांनाही कधी नव्हे ते आपापली छायाचित्र झळकवण्याची संधी मिळाली आणि कुर्ता ट्विटर हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. पण या रोजच्या नव्या ट्रेण्डसना आणि ते न थकता फॉलो करणाऱ्या ट्विटराइट्सना वैतागलेल्या वर्गाने या प्रकाराचा समाचार घेणारी मजेदार मीम्स व्हायरल करून धमाल उडवून दिली.

कोणी ट्विटरच्या लोगोतल्या पक्ष्याच्या पंखांना झुमके लटकवलेलं चित्रं पोस्ट केलं आणि झुमका ट्रेण्डला मिळालेला भरगोस प्रतिसाद पाहून ट्विटरने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं. कोणी पायजमा ट्रेण्ड कधी येणार आहे, अशी विचारणा केली, तर कोणी ‘गली बॉय’ चित्रपटातलं अपना टाइम आयेगा गाणं म्हणत, लुंगी ट्रेण्डही येईल, अशी आशा व्यक्त केली. कोणी करोना राहू द्या बाजूला आधी ट्रेण्ड फॉलो करा, अशी उपहासात्मक टिप्पणी केली, तर कोणी ‘जॉली एलएलबी’ मधला अर्शद वारसीचा ‘कौन हैं ये लोग, कहाँ से आते है?’ हा संवाद वापरून सर्व ट्रेण्ड इनामे इतबारे फॉलो करणाऱ्या वर्गाविषयी आश्चर्य व्यक्त केलं. काहींनी तर थेट कुत्र्याबरोबरचे फोटो ट्विट करून कुर्ता ट्विटरसाठी फोटो न मिळाल्यामुळे कुत्ता ट्विटर ट्रेण्ड सुरू करत असल्याचं म्हटलं. ‘हेराफेरी’ चित्रपटाचे फोटो वापरून ‘चष्मा ट्विटर’, ‘लुंगी ट्विटर’ कधी ट्रेण्ड होणार असा प्रश्न काहींनी केला. या नव्या ट्रेण्डमुळे मुलगे खूप खूष आहेत. त्यांनी ‘व्हाय शुड गर्ल्स हॅव ऑल द फन’ म्हणत ‘हिसाब बराबर’ करण्याचा चंग बांधला आहे.

थोडक्यात मुली असोत वा मुलं प्रवाहाबरोबर वाहत राहण्याचा मोह कोणालाही आवरता आलेला नाही. आपण हे सारं का करायचं, हे करायलाच हवं का हा प्रश्नही कोणाला पडत नाही. मधल्यामध्ये समाजमाध्यमांची मात्र भरभराट होत राहते.