-जय पाटील 

सध्या देशभरातल्या जवळपास सर्वच शाळा ऑनलाइन भरत आहेत. पण जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाही, अशा भागांचं काय? ज्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण गावखेड्यांतल्या शाळांनी या समस्येवर उपाय शोधले आहेत. त्यांनी शोधलेले हे पर्याय सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील भटपाल गावात असलेल्या शाळेने असाच एक अभिनव मार्ग शोधला आहे. तिथे स्पीकरवरून इंग्रजीचे धडे दिले जात आहेत आणि कुपोषणाविषयीही जनजागृती केली जात आहे.

गावात ३०० कुटुंब राहतात. सहा ठिकाणी ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून १४ जूनपासून विद्यार्थ्यांना धडे देण्यात येत आहेत. यासाठीचे ध्वनिमुद्रण जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जगदलपूरला जाऊन करावे लागते. तिथून या फाइल्स पेन ड्राइव्हवर कॉपी करून आणल्या जातात आणि दिवसातून दोनदा ध्वनिवर्धकावरून ऐकवल्या जातात. गोष्टींच्या आणि संवादांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. गावातील ज्या घरांमध्ये सुशिक्षित व्यक्ती आहेत, अशी घरे या कामासाठी निवडण्यात आली आहेत. ८-१० विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला एक घर निश्चित करून देण्यात आले आहे. ध्वनिवर्धकाचा आवाज आला की विद्यार्थी त्यांना ठरवून दिलेल्या घरात जमतात. शिक्षकांनी ध्वनिमुद्रीत केलेला धडा त्यांना ऐकवला जातो आणि नंतर घरातल्या मोठ्यांच्या देखरेखीखाली विद्यार्थी अभ्यास करतात. ध्वनिवर्धक अशा पद्धतीने लावण्यात आले आहेत, की त्यांचा आवाज गावाच्या सर्व भागांत पोहोचतो, त्यामुळे ज्यांच्या घरी अभ्यासासाठी चांगलं वातावरण आहे, असे विद्यार्थी घरी बसूनही शिकू शकतात.

यात सर्वांत मोठे आव्हान आहे, ते अध्यापन साहित्य तयार करण्याचे. तिथल्या स्थानिक आदिवासींची बोलीभाषा हलबी आहे. इंग्रजीचे शिक्षक त्यांना जी कथा शिकवायची आहे, ती हिंदीत लिहून देतात. मग दुसरा एक गट ती कथा हिंदीतून हलबीत अनुवादित करतो. नंतर स्थानिक कलाकारांकडून कथा ध्वनिमुद्रित करून घेतली जाते. अशा प्रकारे एका सत्र तयार करण्यासाठी एक दिवस लागतो. शिक्षक आणि संबंधितांच्या अथक परिश्रमांतूनच हा प्रकल्प सिद्धीस जात आहे. या प्रयत्नांचा दुहेरी फायदा दिसू लागला आहे. विद्यार्थ्यांना तर इंग्रजीचे धडे मिळत आहेतच, पण हे धडे प्रौढांच्याही कानी पडत असल्यामुळे त्यांच्याही ज्ञानात भर पडत आहे.