News Flash

शरीराचा आधारस्तंभ : पाठीचा कणा!

आपल्या संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे ‘पाठीचा कणा.’

शरीराचा आधारस्तंभ : पाठीचा कणा!
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देणारा महत्त्वाचा अवयव म्हणजे त्याच्या पाठीचा कणा.

डॉ. पी. एस. रामाणी – response.lokprabha@expressindia.com
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देणारा महत्त्वाचा अवयव म्हणजे त्याच्या पाठीचा कणा. त्याला एवढं महत्त्व का असतं, आणि त्याची कशी काळजी घ्यायला हवी याचा ऊहापोह-

माणसाला स्वतंत्रपणे उभं राहायचं असेल तर त्याला दोन पायांची गरज असते. पण त्याहूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे पाठीचा कणा. माणसाच्या पाठीचा कणा कोलमडला तर त्याचे पाय भक्कम असले तरी त्याला उभं राहता येत नाही. आपल्या संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे ‘पाठीचा कणा.’ त्याला पुराणातील समुद्रमंथनाच्या कथेतील मेरू पर्वताची उपमा देत ‘मेरूदंड’ असं म्हटलं जातं. समुद्रमंथनाचा संपूर्ण डोलारा या मेरू पर्वताच्या आधारावरच उभा होता.

संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची काळजी सुरुवातीपासूनच घेणं आवश्यक आहे. पण हल्ली या पाठीच्या कण्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. त्याचं महत्त्व आता पटवून द्यायची वेळ आली आहे. अलीकडे पाठीच्या दुखण्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जीवनशैली. आपली जीवनशैली इतकी विचित्र झाली आहे की तीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठदुखीला आमंत्रण देते.

पाठीच्या कण्याच्या रचनेत एकूण ३३ मणक्यांचा समावेश होतो. यात मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागात बारा, कंबरेमध्ये पाच आणि माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेले असतात. त्याच्या खाली तीन ते पाच मणके जुळलेल्या स्थितीत असतात, ज्याला ‘कॉसिकस’ असे म्हणतात. हा कण्याचा शेवटचा भाग असतो. दोन मणक्यांच्या सांध्यामध्ये रबरासारखी एक चकती असते; तिला डिस्क किंवा कुर्चा असं म्हणतात. या चकतीमध्ये हादरे व धक्के शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळेच धावताना, उडय़ा मारताना बसणारे धक्के सहज सहन केले जातात. कण्यामध्ये असलेल्या मज्जारज्जूला चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम पाठीचा कणा करतो.

पाठीचं दुखणं हा विषय समोर आला की डोक्यात सगळ्यात आधी आजची तरुणाईच उभी राहते. याचं कारण म्हणजे त्यांची जीवनशैली, राहणीमान. माझ्याकडे आलेल्या एका २८ वर्षीय मुलाचं उदाहरण सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. तो मुलगा आयटीमध्ये नोकरी करतो. त्याचा मित्रपरिवार मोठा आहे. नोकरीत स्थर्य असल्यामुळे हातात चार पसे येतात. त्यामुळे आठवडय़ातून दोन-तीन पाटर्य़ा तर नक्कीच होतात. शिवाय हातात सतत मोबाइल असतोच. एकदा रात्रभर त्याने मित्रांसोबत पार्टी केली. रात्रभर सुरू असलेल्या या पार्टीमुळे त्याची झोप नीट झाली नाही. दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिसला जायचं होतं. त्याला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता. त्यामुळे सकाळी काहीही न खाता पिता तो ऑफिसला घाईघाईतच गेला. ऑफिसचा सव्‍‌र्हर डाऊन होता. त्यावर काम करत असतानाच त्याला तिथेच चक्कर आली आणि तो कोसळला. त्यानंतर त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन आली. त्याला पाठदुखीने ग्रासलं होतं. दुसरं असंच एक उदाहरण. आयआयटी पवईमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणीला स्ट्रेचरवर झोपून माझ्याकडे यावं लागल, इतकी तिची परिस्थिती गंभीर होती. तिचं वजन जास्त होतं. तिला बसता येत नव्हतं, उठताही येत नव्हतं. तिला स्लीप डिस्कचा त्रास होता. या दोन्ही प्रातिनिधिक उदाहरणांवरून हे निश्चित सांगता येईल की तरुणांच्या विचित्र जीवनशैलीचा त्यांच्या शरीरावर निश्चितच परिणाम होतो. त्यामुळेच त्यांच्यात पाठदुखीचं प्रमाण वाढत चाललं आहे. करिअरच्या मागे धावताना रोजच्या राहणीमानाकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. योग्य आणि वेळेवर आहार घेणे याचा त्यांना विसर पडतो. व्यायामापासून ही पिढी बरीच लांब आहे आणि मोबाइलच्या खूप जवळ आहे. ध्येय गाठण्यासाठी मेहनत करणं हे चांगलंच आहे, पण ते करताना स्वत:साठी विशिष्ट मर्यादा पाळल्या पाहिजेत. तरुण पिढीच्या या काही चुकीच्या सवयींमुळे त्यांनी पाठदुखीचे आजार ओढून घेतले आहेत, हे अगदी स्पष्ट आहे.

धूम्रपान आणि मद्यपान हे आजच्या तरुणाईमध्ये अगदी सामान्य मानलं जातं. त्याचं सेवन करणं हे त्यांना प्रतिष्ठेचं वाटतं. पण या दोन गोष्टी पाठीच्या दुखण्याची कारणं होऊ शकतात हे ते विसरतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये पाठीचं दुखणं बळावण्याची शक्यता सर्वात जास्त असते. खरं तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत दहा वष्रे अगोदरच मणक्यांचे आजार उद्भवतात. पाठीच्या कण्यात मज्जारज्जू, मज्जातंतू आणि स्नायू गुंतलेले असतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या लहानसहान रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होऊन त्या आकुंचित होतात. यामुळे स्नायूंना रक्तपुरवठा होत नाही. ते अशक्त होतात. ते अशक्त झाले की त्यांना कण्याचं वजन पेलवत नाही. त्यामुळे कणा झिजू लागतो शिवाय निकोटीन हे मणक्याला आधार देणाऱ्या डिस्कला होणारा रक्तपुरवठा खंडित करते. यामुळे गादीची झीज होऊन पाठदुखी, मानदुखी अशा आजारांना सुरुवात होते. सिगारेट, विडीतील हानीकारक घटकांमुळे कण्यातील कॅल्शिअम वाहून नेले जाते. या कारणामुळे मणके ठिसूळ होतात आणि झिजतात. काही वेळेस तर कमकुवत झाल्याने तुटूही शकतात. अशा विविध कारणांमुळे कण्याला फार नुकसान पोहोचतं. परिणामी मज्जारज्जूला नुकसान होऊन पायात मुंग्या किंवा झिणझिण्या येणं अशी लक्षणं दिसायला लागतात.

धूम्रपानाचे गंभीर परिणाम होऊ शकतात तसेच गंभीर परिणाम मद्यपानाचेही होऊ शकतात. पाठीच्या कण्याचे स्नायू बळकट राहण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. पण मद्यपान करणारी व्यक्ती आळशी होत जाते. साहजिकच तिला साधी हालचाल करणंदेखील कष्टदायक वाटू लागतं. यामुळे पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत जातो. यामुळे कण्यावर ताण येऊन त्याच्या नसíगक आकारात बदल होऊ लागतो. कण्याचा आकारबंध सल झाल्याने काही वेळेस चालताना तोल जातो. शिवाय मद्यपानामुळे कणा आणि मज्जारज्जू दोघांनाही थेट नुकसान पोहोचतं. मज्जातंतूचा रक्तपुरवठा सुरळीत नसल्याने मज्जातंतूच्या पेशींचा नाश व्हायला लागतो आणि मग पाठदुखीचा त्रास जाणवायला सुरुवात होते. धूम्रपान आणि मद्यपान या दोन्ही गोष्टी करण्याचं प्रमाण तरुणाईमध्ये जास्त असल्याने त्यांनी त्यांचे गंभीर परिणामही समजून घ्यायला हवेत. शरीर चांगलं ठेवणं, चांगला आहार घेणं आणि भरपूर पाणी पिणं हे उत्तम जीवनशैलीचं महत्त्वाचं सूत्र आहे. नेमका याचाच विसर पडत चालला आहे. आपल्या देशाची प्रजा तरुण आहे. आपल्याकडे तरुणांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, त्यांच्यातली ऊर्जा शाबूत ठेवली, तिचा योग्य ठिकाणी वापर केला, योग्य आहार घेतला तरच आपल्या देशाच्या विकासासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. कारण हीच तरुण पिढी विविध माध्यमातून देशासाठी कार्यरत असणार आहे.

तरुणांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट अलीकडे प्रकर्षांने लक्षात आली आहे. हल्ली तरुणांना प्रवासामध्ये तासन्तास उभं राहावं लागतं. कॉम्प्युटरसमोर बसून काम करावं लागतं. अशावेळी हात, मान, खांदा दुखायला सुरुवात होते. पण अनेक जण अशा दुखण्याकडेही दुर्लक्ष करतात. कामामुळे ताण आला आहे असं समजून  ‘होईल बरं’ असं स्वत:लाच सांगितलं जातं. पण कोणतंही दुखणं अंगावर काढूच नये. प्रत्येक वेळी त्या-त्या दुखण्यावर उपाय करायलाच पाहिजे. एखादं दुखणं सुरुवातीला साधारणपणे कधीच फार गंभीरपणे घेतलं जात नाही. निष्काळजीपणा, आळशीपणा मधे येतो आणि त्यावर उपचार करण्याऐवजी त्याबाबत अधिक गरसमज करून घेतले जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण ही दुखणी पाठदुखीकडे नक्कीच वळू शकतात. पूर्वी अस्तित्वात नसलेले आजार आता दिसू लागले आहेत. कॉम्प्युटर सिंड्रोम हा आजार हल्ली तरुणांमध्ये दिसतो. सतत कॉम्प्युटरसमोर बसून काम असल्यामुळे त्यांचा हात, खांदा दुखू लागतो. त्याचा परिणाम मानेच्या कण्यावर होतो. तिथून ते दुखणं पाठीच्या कण्यावर जाऊन पोहोचतं. यामुळे संधिवात होण्याची शक्यता असते. एकदा संधिवात झाला की तो कायमचा चिकटतो. म्हणूनच स्नायूंमध्ये लवचीकता आणण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. तसंच हल्ली ऑफिसला जाताना बॅगमध्ये बरंच सामान असतं. साधारणपणे डबा, पुस्तक, लॅपटॉप, कधीतरी कपडे, कधीतरी जास्तीचं काही सामान यांमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. या ताणामुळे कणा झिजायला लागतो. झिजलेला कणा बरा होऊ शकत नाही. कामाशी संबंधित आजार अलीकडे मोठय़ा प्रमाणावर दिसू लागले आहेत. पुन्हा इथे संबंध जीवनशैलीशीच येतो. तुमचं जसं काम तशी जीवनशैली आणि जशी जीवनशैली तसे तुमचे आजार ही साखळी दिसून येते.

पाठदुखीच्या रुग्णांबाबत अजून एक बाब प्रामुख्याने लक्षात आली आहे. असे रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांच्या दुखण्याबाबत अगदी सुरुवातीपासून विचारतो. त्यावेळी असं लक्षात येतं की खरं तर त्यांचं दुखणं सुरुवातीलाच बरं होऊ शकलं असतं; पण रुग्णांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्याच अंगाशी आलेला असतो. पाठीत चमक भरणं, लचकणं हे साधारणपणे होत असतं. पण कधीकधी पाठ वेगळ्या कारणामुळेही दुखू शकते. अशा वेळीही काही जण चमक, लचकणं अशी कारणं स्वत:लाच देऊन घरगुती उपचार करतात. पण प्रत्येक वेळी ते उपयुक्त ठरतातच असं अजिबात नाही. ‘होईल बरं’ असं सतत स्वत:लाच समजावत अनेक दिवस त्या दुखण्यावर काढतात. पण खरं तर तीन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ पाठीचं दुखणं तसंच असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. काहींचं दुखणं स्लीप डिस्कसारख्या गंभीर आजारापर्यंत पोहोचलेलं असतं. १०० रुग्णांना स्लीप डिस्कचा त्रास असेल तर त्यातल्या १८ ते २० जणांनाच शस्त्रक्रियेचा सल्ला देतो. बाकींच्याना औषधानेच बरं करतो. स्लीप डिस्कवर शस्त्रक्रिया करण्याबाबत सुचवलं तर खूप कमी जण त्यासाठी तयार होतात. मुळात आपल्याकडे शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत अनेक गरसमज आहेत. शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवल्यानंतर ‘औषध घेऊन बरे होऊ. आराम करू’ असं सांगणारेही अनेक रुग्ण आहेत. पण दरवेळी औषधानेच पाठदुखीचा त्रास कमी होतो असं नाही. काही वेळा शस्त्रक्रिया करणं अपरिहार्य असतं. शस्त्रक्रिया केली नाही तर कणा झिजतो आणि कायमस्वरूपी पाठदुखी मागे लागते. हे टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाली की रुग्णाला बेडरेस्ट घ्यावी लागते, बरेच दिवस दवाखान्यात राहावं लागतं; या सगळ्या गरसमजुती आहेत. हल्लीची शस्त्रक्रिया खूपच साधी, कमी वेळात होणारी आणि सुरक्षितही असते. या शस्त्रक्रियेला एमआयएसएस म्हणजेच मिनीमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरी असं म्हणतात. त्यात पाठीच्या खालच्या बाजूला एक छोटासा छेद देऊन दुर्बणिीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत रक्तस्राव आणि गुंतागुंत होण्याची फारशी शक्यता नसते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी रुग्णाची तपासणी करून त्याला घरी पाठवले जाते आणि आठ ते दहा दिवसात तो आपल्या नेहमीच्या कामावर रुजू होऊ शकतो. शस्त्रक्रिया झाल्यावर हे करू नका, ते करू नका अशी मोठी यादी मी कधीच देत नाही. शस्त्रक्रिया झाली की सगळी कामं करता येतात. पण तरी शस्त्रक्रिया करण्याबाबत गंभीर दृष्टिकोन नसतो. हृदयाची शस्त्रक्रिया सांगितली तर ते लगेच तयार होतात. कारण ती शस्त्रक्रिया केली नाही तर रुग्ण दगावू शकतो. पाठीची शस्त्रक्रिया केली नाही तर तसं काही होणार नाही; असा समज असतो. पाठदुखीमुळे त्रास होईल पण मी मरणार नाही, अशी रुग्णांना खात्री असते. त्यामुळे पाठीच्या शस्त्रक्रियेबद्दलची त्यांची मतं, दृष्टिकोन, संकल्पना वेगळ्याच आहेत. पण त्यांचा गंभीर विचार करायला हवा. स्लिप डिस्क सुरुवातीलाच मोठी असेल आणि त्याचा मज्जारज्जूवर दाब आला असेल तर वेळेत उपचार घ्यायलाच हवे. मज्जारज्जू किंवा मज्जातंतूवर दाब आला तर पाय लुळा पडायची शक्यता असते. मूत्रविसर्जन बंद होण्याचीही शक्यता असते. या सगळ्याचा आयुष्यभर त्रास होतो. माझ्याकडे आलेल्या एका १२ वर्षांच्या मुलाला स्लीप डिस्कचा त्रास होता. त्याच्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली होती.  त्यामुळे स्लीप डिस्कचा त्रास लहान वयात होत नाही, हा गरसमज यानिमित्ताने पुसायला हवा.

स्लिप डिस्कसारखं पाठीच्या कण्याचं आणखी एक गंभीर दुखणं म्हणजे कॅन्सर. जसा इतर कोणत्याही अवयवात आता कॅन्सर होऊ शकतो; तसाच तो पाठीच्या कण्यातही होऊ शकतो. त्याचा ताबडतोब इलाज व्हायला हवा. माझ्याकडे आलेल्या एका रुग्णाचं उदाहरण देतो. त्याच्या दुखण्याबद्दल विचारपूस करताना लक्षात आलं की तो पडला, हात-पाय असं कोणत्या अवयवाला लागलं की लगेच फ्रॅक्चर व्हायचं. त्याचा हा फ्रॅक्चरचा सिलसिला सुरू असतानाच त्याच्या पाठीच्या कण्यात दुखू लागलं. हे दुखणं त्याला माझ्यापर्यंत घेऊन आलं. मी त्याला जबरदस्तीने अ‍ॅडमिट करून घेतलं. त्याच्यावर मी दीड दिवस उपचार करत होतो. तेव्हा कळलं की त्याच्या हाडांमध्ये कॅन्सर पसरला होता. दीड महिन्यात तो दगावला. त्याने सुरुवातीलाच त्याच्या दुखण्याकडे गंभीरपणे बघितलं असतं तर त्याला कॅन्सर झालाय हे लक्षात आलं असतं. म्हणूनच कोणत्याही आजाराचं योग्य निदान योग्य वेळी व्हायलाच हवं. तसंच रुग्णांनाही त्याची जाणीव व्हायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी उपचार घ्यायला हवेत. शरीरात पसरलेला कॅन्सर कण्यात जाऊ शकतो तसंच कण्यात कॅन्सर होऊन तो शरीरात पसरू शकतो; अशा दोन्ही प्रकारे कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरमुळे रुग्णाला कोणतीही दुखापत होत नाही. त्यामुळे कॅन्सरचं निदान योग्य वेळी केलं जातंच असं नाही. पण फ्रॅक्चर झाल्यावर दुखत असतं. कॅन्सर कण्यात वाढत गेला तर माणूस पॅरालाइज होण्याचीही शक्यता असते. रुग्ण पॅरालाइज झाला की वैद्यकीय उपचारांसाठी येतात. त्यावेळी कॅन्सरचं निदान होतं. कंबरदुखी, पाठदुखी या बारीकसारीक गोष्टी रुग्णांना पॅरालाइज होण्यापर्यंत कारणीभूत ठरतात. म्हणूनच रुग्णांनी योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी सगळ्यात आधी त्यांनी स्वनिरीक्षण करावं. म्हणजे स्वत: कोणतीही औषध घेऊ नये. पण तुमचं दुखणं नेहमीपेक्षा काही वेगळं असेल किंवा ते दुखणं दीर्घकाळ तसंच राहिलं असेल तर तातडीने डॉक्टरांना भेटावं.

महिलांच्या पाठदुखीचीही कारणं वेगळी आहेत. घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या हल्लीच्या स्त्रियांमध्ये पाठदुखीचा त्रास प्रामुख्याने आढळून यायला लागला आहे. पण मुळातच सहनशील असल्याने अशा स्त्रियांना आजार अगदी टोकाला पोहोचला की डॉक्टरांची आठवण येते. कमी वयात गरोदर राहिलेल्या महिलांना पाठदुखीचा त्रास प्रामुख्याने होतो. कारण कण्याच्या बांधणीसाठी आवश्यक कॅल्शिअमसोबत हार्मोनमधील असंतुलनामुळे पाठीचा कणा कमकुवत होतो. त्यात गरोदरपणातील सर्व भार पाठीचे स्नायू आणि हाडांवर पडतो. यामुळे हाडे ठिसूळ होतात. यासाठी रोज १५ ते २० मिनिटे व्यायाम, कॅल्शिअम आणि डी जीवनसत्त्वाच्या वाढीसाठी सकस आहार, अगदीच गरज पडल्यास सप्लिमेंट्सचे सेवन अशा साध्या उपायांनीदेखील स्त्रियांमधील पाठदुखी, कंबरदुखी नाहीशी होऊ शकते. गर्भाशयात ग्रंथींची वाढ झालेल्या महिलांमध्येदेखील फायब्रॉइडच्या वजनाने किंवा गर्भपिशवीला सूज आल्याने कंबरदुखी, पाठदुखीसारख्या तक्रारी सुरू होतात. अशावेळी रोगाच्या मुळावर उपचार केल्यास पाठदुखी नाहीशी होते. वयोमानानुसार स्त्रियांना होणारी कंबरदुखी काही वेळेस गर्भाशयाला आलेली सूज आणि जडत्वामुळे असू शकते. अशावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ बहुतांश वेळ गर्भपिशवी काढून टाकण्याचा सल्ला देतात. या उपायानेदेखील कंबरदुखी बंद होते.

लहान मुलांनो सावधान..!

तुमची जीवनशैली तुम्हाला योग्य प्रकारे सुरू ठेवायची असेल तर व्यायाम अतिआवश्यक आहे. लहान वयात व्यायामाची लागलेली सवय वृद्धत्वात अतिशय फायदेशीर ठरते. आताच्या लहान मुलांना फास्ट फूडचं वेड आहे. पिझा, बर्गर, चिप्स असं काहीबाही खाण्याचं प्रमाण जास्त आहे. लहान वयात या पदार्थाचं अतिसेवन घातक आहे. त्यामुळे शरीराची योग्य प्रकारे वाढ होत नाही आणि विशिष्ट रचनेत शरीराची बांधणी होते. स्थूलपणा, वजन वाढणे, बसण्या-उठण्याची चुकीची पद्धत असे परिणाम दिसू लागतात. त्यातच व्यायामाची सवय नसल्यामुळे त्यांची जीवनशैली चुकीच्या पद्धतीने आकार घेऊ लागते. याचा परिणाम त्यांच्या पाठीच्या कण्यावर होतो.

हॉलमध्ये सोफा, टीव्हीचं कपाट, कपडय़ांचं कपाट आणि डायिनग टेबल; मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरातलं साधारण फíनचर असं असतं. पण घरातलं सगळं फíनचर मोठय़ा माणसांच्या सोयीने बनवलेलं असतं. मोठे सोफे, मोठं डायिनग टेबल. पण लहान मुलांनी टीव्ही बघण्यासाठी, जेवणासाठी कुठे बसायचं? लहान मुलं अशा सोफ्यावर वेडीवाकडी बसतात. त्यांना तशीच बसायची सवय लागते. तेव्हापासूनच त्यांच्यात पाठदुखीचं बीज रुजू लागतं. आपल्याकडे लहान मुलांसाठी सोफा असं फार अभावाने बघायला मिळतं. जो मुद्दा सोफ्याचा तोच डायिनग टेबल आणि अभ्यासाच्या टेबलचा. लहान मुलांसाठी अभ्यासाचं टेबल हे फार क्वचित बघायला मिळतं. अलीकडे फोिल्डगचे जमिनीवर ठेवू शकतात असे छोटे टेबल आले आहेत. जेणेकरून मुलं मांडी घालून त्या टेबलवर वह्य़ा-पुस्तकं ठेवून अभ्यास करू शकतात. पण हे टेबल वापरताना किती मुलं पाठीला आधार म्हणून उशी ठेवून किंवा पाठ िभतीला टेकून बसतात? अनेकदा त्यांच्या पालकांना या सगळ्याची कल्पनाही नसते. मुलांच्या दुखण्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण यात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपला पाल्य कसा बसतो, उठतो, झोपतो या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असायला हवं.

लहान मुलांची जड दप्तरं, सोफ्यावर बसायची चुकीची पद्धत, जमिनीवर वह्य़ा-पुस्तकं ठेवून एकदम वाकून अभ्यास करणं, टेबलचा वापर करून अभ्यास करत असेल तरी पाठीला आधार न घेण्याची सवय ही सगळी लहान मुलांच्या पाठदुखीची कारणं आहेत. ज्याप्रमाणे तरुण वर्ग या पाठदुखीच्या विळख्यात ओढला जातोय, तसंच लहान मुलंही या पाठदुखीच्या जवळ जाऊ लागली आहेत. अलीकडे माझ्याकडे १२ वर्षे वय असलेल्या मुलांपासून रुग्ण येतात. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या पाठदुखीचं आणखी एक कारण लक्षात आलं आहे. ते म्हणजे मोबाइलचा अतिवापर. लहान मुलं मोबाइल वापरात अत्यंत तरबेज असतात. पण सततच्या मोबाइल वापरामुळे त्यांच्या हात, मानेवर परिणाम होऊन त्याचा संबंध थेट पाठीपर्यंत जाऊ शकतो. लेखाच्या सुरुवातीला आपण जीवनशैलीबद्दल बोललो. पण त्या जीवनशैलीची सुरुवात लहान वयातच लागते हेही दिसून येतंय. हे बदलणं गरजेचं आहे.

झोपण्याची पद्धत आणि पाठदुखी 

मधल्या काळात डनलॉपच्या म्हणजे फोमच्या गाद्या असायच्या. या गाद्या अतिशय मऊ असतात. झोपेत आपलं शरीर कळत नकळत इकडून तिकडे वळलं जातं. शरीराला पीळ बसतो. त्यामुळे दुखापत होऊ शकते. जमिनीवर झोपल्यामुळे असा पीळ बसत नाही. अलीकडे कॉयरच्या गाद्या वापरायचं प्रमाण वाढलंय. या गाद्यांमुळे शरीराला पीळ बसत नाही. शहर आणि गाव यांमुळे जीवनशैलीत बराच फरक असतो. शहरातली बहुतांश माणसं बेडवर झोपतात. अशांना अचानक जमिनीवर झोपायला सांगितलं तर त्याचा त्यांना कदाचित त्रास होईल. पण गावाकडच्या किंवा नेहमी जमिनीवर झोपणाऱ्या माणसाला ते सहज शक्य होईल. एसीमध्ये आणि गादीवर झोपायची सवय आहे त्याला तुम्ही पटकन जमिनीवर झोपायची सवय लावू शकत नाही. तसं कोणी करूही नये. कारण त्याचाही उलट त्रास होऊ शकतो. म्हणूनच यातला मधला मार्ग म्हणजे कॉयरची गादी. या गादीमध्ये एक थर काथ्याचा असतो. यामुळे गादीचा मऊपणा थोडा कमी होतो आणि त्यामुळे झोपताना त्याचा त्रास होत नाही.  गादीवर झोपायचंच नसेल तर त्यावर एक इंचाची रजई घालून झोपावं. केवळ चटई घालून किंवा जमिनीवर काहीच न घालता बिलकुल झोपू नये. कशावर झोपावं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच झोपेतून उठण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. झोपून उठण्याची चुकीची पद्धत अंगवळणी पडली की त्याचा त्रास पुढे होऊ शकतो. पलंगावर झोपला असाल तर सगळ्यात आधी एका कुशीवर व्हायचं, दोन्ही पाय खाली सोडायचे आणि नंतर सावकाश उठावं. जमिनीवर झोपला असाल तर एका कुशीवर होऊन मग सावकाश उठायचं. कुठेही झोपला असाल आणि सरळ उठायला गेलात तर लचक भरते. कण्यावर ताण येतो. सकाळी उठल्यावर अनेकांना कामाची घाई असते. त्यामुळे झोपेतून पटकन उठून अनेक जण भरभर कामाला लागतात. पण सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचं शरीर स्थिर होऊ दिलं नाहीत तर त्याचा त्रास होऊ शकतो. विशेषत: स्त्रिया सकाळी उठल्यावर शरीर स्थिर होऊ न देता जलद वेगाने काम करायला सुरुवात करतात. याचा परिणाम पाठीच्या कण्यावर होऊ शकतो. अनेक जण रात्री उशिरा घरी येतात. त्यामुळे त्यांना सकाळी उठायला उशीर होतो. पण कितीही उशिरा झोपलात तरी सकाळी लवकरच उठायला हवं. उठलात की दहा सेकंद त्याच जागेवर बसा. तोंड धुऊन या. दहा मिनिटं मेडिटेशन करा. प्राणायाम करा. १५ ते २० मिनिटं व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीरात लवचिकता येते. स्नायू बळकट करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते.

हे सगळं केलं तर दिवसभर होणाऱ्या धावपळीसाठी मदत होते. तसंच रात्री झोपताना मोबाइलवर चॅट करणं, सिनेमे बघणं, व्हिडीओ बघणं यामुळेही पाठदुखीला आमंत्रण येऊ शकते. कारण ते बघताना तुमच्या शरीराची स्थिती बरोबर नसते. एका कुशीवर होऊन मोबाइल बघणं, एक हात वर ठेवून बघणं, पालथं झोपून बघणं अशा विविध प्रकारे झोपून मोबाइल हाताळला जातो. असं केल्याने पाठदुखीची सुरुवात होते.

पाठदुखीविषयी समज-गैरसमज

भारतीयांच्या भावूक स्वभावामुळे येथे पाठदुखीसंबंधी गरसमजच जास्त आहेत. वयानुसार हाडांची झीज झाल्याने पाठीला बाक येतो. ते नसíगक आहे असं मानत असल्यामुळे त्यावर उपचार केले जात नाहीत. पण हाडांची झीज होते हे खरं असलं तरी त्यावर योग्य उपाययोजना केल्याने पाठीची कमान होणं टाळता येतं. काही व्यक्तींना पाठीत सुया टोचल्यासारख्या वेदना होतात. ज्यामुळे आपल्यावर कोणीतरी भुताटकी किंवा करणी केल्याचं समजून त्या दृष्टीने भगत, मांत्रिक किंवा कोणत्या तरी देवतेचा अंगात संचार आणणाऱ्या साधुबाबांकडून अमावास्येच्या रात्री पूजा करण्यासारखे तत्सम उपाय करवून घेतले जातात. खरं तर मणके झिजल्यामुळे सुया टोचल्यासारखे वाटते. ज्यावर योग्य उपाययोजना केल्यास पाठदुखी पूर्णपणे बरी होते. याशिवाय पायाळू व्यक्तींकडून पाठीत लाथ मारून घेणे, मान मोडून घेणे असे अघोरी उपाय करून घेतलेले रुग्णदेखील पाठदुखी बळावल्याची तक्रार घेऊन माझ्याकडे आलेले आहेत. त्यापकी काही जणांना केवळ कॅल्शिअमच्या पूरक गोळ्यांनीदेखील आराम मिळालेला आहे. व्यायामामुळे पाठदुखी होते असं मानणारादेखील एक गट आहे. त्यात तथ्य नसले तरी व्यायामाच्या अतिरेकामुळे आणि स्वत:च्या वजनाचा विचार न करता अतिप्रमाणात वजने उचलल्याने पाठदुखी नक्कीच बळावते. मात्र नियमित, संतुलित आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलेल्या व्यायामामुळे लाभ होतो.
(लेखक वरिष्ठ न्यूरो आणि स्पायनल सर्जन आहेत)
शब्दांकन : चैताली जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 1:06 am

Web Title: spinal cord body support
Next Stories
1 वाकेन, पण मोडणार नाही!
2 व्यायामातील सातत्याने पाठदुखी गायब!
3 मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद
Just Now!
X