19 February 2019

News Flash

मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद

पाठ दुखायला लागली की जणू काही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा कणाच मोडतो.

गेल्या दशकामध्ये ‘मणक्यांचे विकार’ व त्यांच्याशी संबंधित पाठदुखी, कंबरदुखी खूप प्रमाणात वाढली आहे.

वैद्य विक्रांत जाधव – response.lokprabha@expressindia.com
पाठ दुखायला लागली की जणू काही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा कणाच मोडतो. या अतिशय गंभीर अशा विकाराकडे आयुर्वेद नेमकं कसं बघतं आणि त्यावर सांगितलेले उपाय यांची चर्चा-

हिची चाल तुरुतुरु,
उडती केस भुरुभुरु,
डाव्या डोळ्यावर बट ढळली,
जशी मावळत्या उन्हात,
केवडय़ाच्या बनात
नागीण सळसळली.

अशा सळसळणाऱ्या चाली, चर्चगेटपासून विरापर्यंत, तर व्ही.टी.पासून ठाणे, कल्याण पार करून नाशिकपर्यंतही रोज प्रवास करीत असतात. परंतु हल्ली या सळसळणाऱ्या चालींना र्निबध येतायेत. गती मंदावली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मणक्यांच्या विकारांची वाढलेली संख्या! आम्हा वैद्यांना हे सहजपणे जाणवत आहे. गेल्या दशकामध्ये ‘मणक्यांचे विकार’ व त्यांच्याशी संबंधित पाठदुखी, कंबरदुखी खूप प्रमाणात वाढली आहे.

एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे याचा प्रसार का बरं होत आहे! आधुनिक शास्त्राचा उपयोग कुठे सुरू होतो आणि आयुर्वेद चिकित्सा कुठे सुरू होते याचे ज्ञान घेतल्यास यावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. दोन्ही शास्त्रे ही त्यांच्या जागी असून त्याचा मेळ घातल्यास फायदा उत्तम होतो हे नक्की.

स्पॉन्डिलायटिस :

हा शब्द वाचताच चटकन तुमच्या डोळ्यासमोर या आजाराने ग्रासलेल्या असंख्य व्यक्तींची नावं पुढे झाली असतील. प्रथम बरेच दिवस हात दुखणे, मान दुखणे, सकाळी पाठ दुखणे, कंबर दुखणे, खांद्याला कळ लागणे, इ. लक्षणे दिसतात. सुरुवातीला काही तात्पुरत्या औषधांनी ही लक्षणे गेल्यासारखी वाटतात (आपल्याकडे अशी लक्षणं असता डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा स्वत:च्या ‘बुद्धिमत्तेने’ औषध योजना करण्याची सवय आहे). नंतर डॉक्टर, नंतर पुन्हा त्या वेदना झाल्यास ती डॉक्टरांची औषधे रिपीट करणे ही प्रथा आहे. मग बऱ्याच कालावधीनंतर या दुखण्याच्या मुळाशी न गेल्यामुळे दुखण्याने जोर पकडलेला असतो व त्या वेळेस अस्थिरोगतज्ज्ञ किंवा तत्सम स्पेशालिस्ट डॉक्टर तपासण्या करून निदान करतो, मणक्यांमध्ये गॅप पडला आहे, स्पॉन्डिलायटिस झाला आहे, बरं होणे कठीण आहे, हे ऐकताच माणसाचे मन कोलमडते.

थोडक्यात स्पॉन्डिलायटिस :

मेंदूकडून संपूर्ण मांसपेशींना आदेश देण्याकरिता मणक्यामधून वात नाडय़ा, त्या त्या मांसपेशींना जात असतात. या मणक्यांमध्ये एक मऊ गादी असते. या गादीमुळे दोन मणके एकमेकांना घासले जात नाहीत व या वातनाडय़ा आपल्या संदेशवाहनाचे कार्य अव्याहतपणे करीत असतात. काही कारणाने ही गादी झिजली गेली की मणक्यांचे घर्षण सुरू होते व वातनाडीवर दाब पडून विविध लक्षणे निर्माण होतात. मानेपासून कंबरेपर्यंत कुठेहीही विकृती घडू शकते. परंतु मान व कंबर हे भाग सातत्याने तणावात असतात. हालचालीत असतात, फिरत असतात. म्हणून हे दोन भाग प्रथम घासले जातात. याच्या तीव्रतेवरून मणक्यांचे अनेक विकार निर्माण होतात. मग त्याला स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डली- लिस्यासिस इ. नावे आहेत. पाठीच्या मणक्यांमध्ये सहजासहजी अधिक आघात झाल्याशिवाय बदल होताना दिसत नाहीत. त्यामुळे या मणक्यांच्या गादीचे पोषण झाल्याशिवाय ही व्याधी बरी होणार नाही असे चित्र दिसते. मग केवळ वजन लावण्याने तात्पुरता ‘दाब’ कमी करून लक्षणे, वेदना कमी करणे व पुढे या व्याधीचा नायनाट करण्यासाठी शोध सुरू होतो.

आयुर्वेद हे उत्तम उत्तर :

ही व्याधी आयुर्वेदचिकित्सेने सहज थांबू शकते. मुळातच पुराणकाळापासून संधी – हाड यासाठी आयुर्वेदीय चिकित्सा प्रसिद्ध आहे. मणक्यांचे विकार विविध नावांनी नटलेले असले तरी आयुर्वेदीय निदानामध्ये ते ढोबळ मानाने संधिवात या सदरातच बसतात. आयुर्वेदिक निदान पद्धतीमध्ये सूक्ष्म विचार केला जातो. वाताच्या विकृतीने अस्थिधातू व मज्जाधातू यांना विकृती होते असे निदान होते. व्यक्तीप्रमाणे हे निदान बदलत जाते व त्यामुळे औषधे, चिकित्सा, पंचकर्मचिकित्सा बदलते.

कारणांचा ऊहापोह :

आयुर्वेदशास्त्रनुसार मणक्यांना वाताची विकृत वृद्धी हे मुख्य कारण  त्रास देते. वाढलेला वात, जिथे वैगुण्य (अशक्तपणा) असेल त्या ठिकाणी जाऊन विकृती तयार करतो व त्या भागाची झीज सुरू होते. वातवृद्धीचे एक मुख्य कारण म्हणजे मलावष्टम्भ. रोज वेळेवर मलप्रवृत्तीला न जाणे हे सामान्य होत चालले आहे व त्याची दाखल न घेणे हा त्यातील वाईट भाग होय. सकाळी उठल्यावर प्रथम शौचाला स्वच्छ होणे ही वातनियमाची पहिली अट असते. दिवसभरात कधीही शौचाला होणे किंवा एक ते तीन दिवस न होणे, त्यासाठी कोणते तरी रेचक स्वमनाने घेणे ही गोष्ट सर्रास दिसते. परंतु रेचक घेतल्याने त्यावेळचेच भागते. मणक्याच्या विकारांचा निष्कर्ष काढल्यास असे दिसून येते की बँकेतील कर्मचारी, दिवसभर कॉम्प्युटरवर काम करणारे, शिक्षक, कंपन्यांमध्ये विशिष्ट हालचालीत काम करणारे, वजन उचलणारे, शेतात पुढे वाकून काम करणारे, पाटी उचलणारे या व्यक्तींमध्ये मणक्यांच्या विकाराचे प्रमाण अधिक आहे. उच्चपदस्थ व्यक्तींमध्ये मान खाली घालून गाडीत विशिष्ट स्थितीत बसून राहण्याने हा आजार बळावतांना दिसतो.

डोक्यावर पंखा..सतत पूर्ववात, म्हणजेच गार हवा डोक्यावर बसल्याने वातवृद्धी होऊन, स्नायू जखडून मणक्यांना त्रास संभवतो.

दुचाकी वाहने :

रस्त्यावरील गतिरोधक, रस्त्यातील खड्डे, दुचाकी वाहनांवर जास्त फिरणे या कारणांनी मणक्यांवर अधिक ताण पडून गादीला इजा पोहोचते. शरीरस्थ विकृत वात इतस्तत फिरून व्याधी बळावते.

व्यायामाचा अभाव :

काहीही कारण सांगून व्यायाम टाळण्याची अनेकांची वृत्ती असते. वरील सर्व कारणांनी वातवृद्धी होत असली तरी विशिष्ट पद्धतीने मणक्यांच्या स्नायूंना शिथिल करून त्यांच्यावरील ताण कमी करणारे साधे व्यायाम, योगासने केली तर मणके नादुरुस्त होण्यापासून वाचवता येतात. एवढेच नव्हे तर वजन वाढत असेल तर किमान नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. वाढणारी चरबी मणक्यांना अधिक दुर्बल करते. व्यायामाच्या सवयी लहानपणापासून लावल्याने पुढे त्रास होत नाही. ठरावीक साधनांचा, व्यायाम प्रकारांचा प्रयोग रोज केवळ १५ ते २० मिनिटे केल्यानेदेखील फायदा होतो.

झोपण्याच्या पद्धती :

ट्रेनमध्ये मान तिरकी करून झोपणे, जेवणानंतर लगेच कोणत्याही स्थितीत झोपणे, मोठय़ा उशा घेऊन वाचत बसणे, तसेच झोपणे, मान मोडत बसणे, सतत हलवत रहाणे या कारणांनीच या व्याधी बळावतात. झोपतांना आपल्या शरीराच्या अवयवांचे भान ठेवून झोपणे गरजेचे आहे.

आयुर्वेदीय चिकित्सा :

मणक्यांच्या विकारांमध्ये बसून उठताना, झोपून उठताना चक्कर येणे, फेकल्यासारखे होणे ही लक्षणे हल्ली जास्त दिसू लागली आहेत. वात नाडीवरील दाबामुळेच ही लक्षणे निर्माण होतात. परंतु लक्षणे कमी होऊन नष्ट होईपर्यंत असंख्य विचार मनात घोळतात. चिंतेत भर टाकतात. म्हणूनच मणक्यांवर योग्य ते उपचार वेळेवर घेणे महत्त्वाचे आहे. कारणांचा विचार करता कारणांचा नाश करणे हे मुख्य सूत्र आहेच. कारण बंद झाल्याशिवाय चिकित्सा सुटसुटीत होणार नाही. म्हणूनच पहिल्यांदा पूर्ण आराम आवश्यक आहे.

उपचार : वेदनाशामक औषधे घेणे, तात्पुरते वजन लावून दाब कमी करणे, यासारखे तात्काळ बरे वाटणारे उपचार ही परिस्थितीजन्य गरज असते. परंतु आयुर्वेदीयदृष्टय़ा आहार, विहार, व्यायाम व वातनाशक औषधे यांचा संगम केल्यास संपूर्ण आराम उपशय मिळताना अनेकांना दिसतो. आयुर्वेद शास्त्राने हा वातामुळे होणारा प्रकार आहे हे पूर्वी सांगितले आहे. रुग्णाची योग्य चिकित्सा करून उपचाराची दिशा ठरवली जाते, मुख्यत शोधन चिकित्सा व शमन चिकित्सा.

औषधी चिकित्सा : शरीरात झालेली वाताची दृष्टी लक्षात घेता त्या रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे वातनाशक औषधांची उपाययोजना करता येते. यामध्ये अमृतागुग्गुळ, कैशोरगुग्गुळ यासारख्या औषधांपासून सुवर्णकल्प असलेले बृहत्वाचिंतामणी रस, सुवर्ण मालिनी, कुमार कल्याण इ. तसेच महावात विध्वंस रस, एकागवीर रस, वापरता येतात. ही औषधे वेदना तर कमी करतातच, परंतु वातनाडय़ांमध्ये पोषण करून शक्तीही देतात. वाताचे नियमन करताना शरीरस्थ वात सम झाल्यास मणक्यांचे, सांध्यांचे पोषणही उत्तम होऊन आराम मिळतो. ही पोषण कल्पना आयुर्वेदाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

मलावष्टंभ : शौचाला साफ होऊन वात सरणे हे वातदृष्टीचे कारण नष्ट करण्याकरता एरंड तेलासारखे औषध नाही. कोरडेपणा आणून वात वाढवणारे रेचक वापरू नये. जे स्थूल असतील, स्निग्धता अधिक असेल तर वापरावे. रोज रात्री झोपताना एक ते दोन चमचे एरंडेल, गरम पाणी / गरम दुधातून / चहातून घेतल्यास फायदा होतो. एरंड तेल सांध्यांना स्निग्धता देऊन स्तंभता, जखडणे दूर करते. स्थूल, रुक्षपणा असलेल्या व्यक्तींनी गंधर्वहरीतकी हे रेचक घ्यावे.

शोधन चिकित्सा :

पंचकर्म चिकित्सा : आयुर्वेदातील झटपट चिकित्सा किंवा उपचार ज्याला म्हणता येईल, ती म्हणजे पंचकर्म. पोटातून औषध देऊन शरीरस्थ त्रिदोष साम्य करणे हा एक प्रकार व अधिक वाढलेले दोष शरीराबाहेर काढणे, त्या दोषांच्या मूळ निर्मितीच्या स्थानातच सरळ उपचार करणे म्हणजे पंचकर्म. पंचकर्माचा उपयोग मणक्याच्या विकारांमध्ये एखाद्या चमत्कारासारखा होताना दिसतो. या पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, बस्ती, पिशिन्चल, कटी बस्ती, तलधारा हे प्रकार या विकारांवर वापरता येतात.

स्नेहन : मणके हे सांधे असून वाताचा अधिकार त्यांच्यावर जास्त असतो. सांध्यामधील स्तंभता, जखडणे, स्नायूंचे आकुंचन हे वाताचे रुक्ष गुण वाढल्याचे फलित असते. स्नेहन ही मूळ विकृती काढते. मलावष्टंभाने वाढलेला वात असंख्य व्याधी तयार करतो. परंतु मणक्यांच्या व्याधीचे मुख्य कारण ठरतो. लहान मुलांमध्येसुद्धा शाळा सकाळची असल्याने दुपारी किंवा संध्याकाळी मल प्रवृत्तीला जाण्याची सवय लागते व या व्याधीचे पोषण त्या वयापासूनच होते असे म्हटल्यास गर नाही. मलावष्टंभावर विजय मिळवणे हे गरजेचे आहे. त्यावर विजय म्हणजे व्याधींवर विजय.

आहारीय कारणे : २१ व्या शतकाने साध्या जेवणाऐवजी फास्ट फूड नामक कल्पनेला जन्म तर दिलाच पण तिला डोक्यावरही घेतले. शहरांमध्ये तर ‘फास्ट फूड’ हा दिनक्रमातील एक भाग झाला खरा, परंतु वात वृद्धी, वात विकारांना वाढवणारा ठरला आहे. लहान वयातच पोटाच्या तक्रारी सुरू करून शरीरस्थ विकृत वात वाढविण्यासाठी मदत करणारा ठरला आहे. मद्याचे विविध पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शीतपेयं, शिळे अन्न (पुन्हा गरम करून, ताजं असल्यासारखं देणं) या गोष्टीमध्ये भर पडली. किंबहुना माणूस एक वेळ हेच खाऊ लागला. पोळी- भाजीला रामराम मिळाला किंवा असल्यास यापकी एका पदार्थाची जोड त्याला मिळाली. परिणामी वात वाढला. वाताचे विकार वाढले. घरातही बाहेरील उपलब्ध होऊ लागले. ते चविष्ट पदार्थ करण्याची मागणी वाढली. आवड वाढली. आईही तेच करायला लागली. चण्याच्या डाळीचा अति उपयोग, अति तिखट, आंबट, पाव, फरसाण, मांसाहाराचे वाढलेले प्रमाण या परिवर्तनाने भर घातली. याबरोबर वातनाशक पदार्थही कमी झाले, शरीर उपयुक्ततेपेक्षा जिभेचे चोचले श्रेष्ठ ठरले. केवळ वातच नाही तर त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, दमा, मणक्यांचे विकार बळावले. पथ्य कल्पनेला या व्याधीमुळे पुन्हा महत्त्व येत आहे हे दिसतंय.

विहारीय कारणं : अति प्रमाणात प्रवास ही आयुष्याची गरज झाली. कामानिमित्त रोज एक ते दोन तास प्रवास करणारी मंडळी आहेत. वाताची वृद्धी तर होतेच, परंतु प्रवासात मिळेल तसे बसणे वा उभे राहणे हे घडल्यामुळे विशिष्ट स्नायूंवर अतिताण, विकृत ताण येऊन, मणक्यावर परिणाम होऊ लागला व व्याधी वाढली.

ऑफिसमधील बैठक :

भारतामध्ये एकसुद्धा ऑफिस असे नाही की जिथे शरीररचनेचा अभ्यास करून टेबल- खुर्चीची उंची, कामाच्या स्वरूपावरून आखली आहे. अर्थात विविध प्रकृतीच्या व्यक्ती त्या एकाच टेबलावर येणाऱ्या असतात, म्हणून अडचणी असतील.

मणक्याच्या विकारात विविध प्रकारच्या तेलांचा उपयोग करता येतो. व्याधी अवस्था, स्थिती, वय यांचा विचार करून विविध तेलांनी अभ्यंग करतात. यात मधुमेह, स्थूल व्यक्ती, स्त्रिया, बालक यांच्याकरिता आयुर्वेदशास्त्राने मूळ व्याधीचा विचार करून तेलाची मांडणी करून ठेवली आहे. जसे मधुमेहींसाठी धन्वन्तरम कुषुम्पू, तल (स्थूल स्वरूपात), बला तल, बला- अश्वगंधादी तल, वात- विमार्दनं, सहचरादी तेल, अमृतादी तेल, इ. असंख्य तेल वापरतात. या तेलातील औषधी गुणधर्म मणक्यामध्ये जाऊन शैथिल्य आणतात. काही रुग्णांमध्ये पोटातून ही विविध तेलं, तूपं दिली जातात. पुराण काळापासून तेल ही वाताची चिकित्सा परंपरेत आहे. परंतु आज स्थितीत त्यांच्या वापराचा अभाव दिसतो. व्याधी वाढण्याचे ते ही कारण दिसते.

स्वेदन वा औषधाची स्टीम :

वेदनेवर तात्काळ नियंत्रण करणारा उपचार म्हणजेच स्वेदन. विविध आयुर्वेदीय वनस्पती, त्यांचे उपयुक्त अंग पाण्यात उकळून त्याचा काढा करून त्या काढय़ाची वाफ मणक्यांना देऊन वातावर नियंत्रण मिळवता यते. गरम काढय़ाची वाफ तेल लावून वैगुण्य असणाऱ्या भागावर दिल्यास उत्तम उपशय मिळतो. रुग्णाला पटकन तात्पुरते बरे वाटते. सामान्यत: दशमूळ बला, निर्गुडी इ. वनस्पतींचे मिश्रण वापरतात. परंतु घरी निर्गुडीच्या पानाच्या काढय़ाने दिलेले स्वेदनही फायदा करते. ‘निर्गुडती शरीरं इति निर्गुडी’ विविध सांध्यांच्या दुखण्यापासून संरक्षण करण्याकरीता निर्गुडीने जन्म घेतला आहे. याच्या पानामाधून निघणारे वातनाषक गुण व हायद्रोकोर्तीलोन हे सूज कमी करून वेदना कमी करते, असे परीक्षणावरून दिसून आले आहे. याचा काढाही पोटातून देतात. स्वेदन हा उपचार पंचकर्मतज्ज्ञांकडून केल्यास बरे. वजन लावणे, वेदनाशामक गोळ्या खाऊन पोट खराब करून घेणे यापेक्षा स्नेहन – स्वेदन यांनी पटकन उपशय मिळतो.

बस्ती : वाताच्या नियमनाची श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ती होय. विविध औषधी तेलं, तूप, काढे शौचाच्या मार्गाने पक्वाशयात या प्रक्रियेने पाठवली जातात (पक्वाशयातच वात निर्माण होतो. म्हणून वाताच्या निर्मितीच्या वेळेसच त्याचे पोषण होते). स्नेहन, स्वेदन करून, नंतर रुग्णाचा विचार करून चिकित्सा बस्ती करून ३, ५, ७, १४, २१ दिवस बस्ती दिली जाते. यासाठी शुद्ध, र्निजतुक तेल, तूप, काढे वापरले जातात. काढय़ाच्या बस्तीने पोटातील अडथळे दूर होऊन पक्वाशय शुद्ध होते. परंतु इतर बस्ती शरीरात राहून मणक्यांचे, सांध्यांचे, वातनाडय़ांचे तात्काळ पोषण करून परिणाम दाखवतात. हा अनुभव अनेक पंचकर्मतज्ज्ञांना आहे हे निष्कर्षांने सिद्धही केले आहे. बस्ती चिकित्सा म्हणजे मेडिकेटेड एनिमा. परंतु असा शब्द असला तरी आयुर्वेदीयदृष्टय़ा त्याची व्याप्ती मोठी आहे. केवळ मणक्यांच्याच विकारासाठी नव्हे तर वाताच्या असंख्य विकारांमध्ये म्हणजे संधिवात, पक्षाघात, स्नायूंचे, मांसपेशींचे आजार, पोटाचे आजार यावरही उपयुक्त आहे. खेळाडूंमध्ये विविध स्नायूंचे, मांसपेशींचे आजार उद्भवतात. त्यांनी पंचकर्मामधील बस्तीचा उपयोग निश्चितच करावा.

कटीबस्ती : औषधी तेल रुग्णाच्या अवस्थेप्रमाणे ठरवून ३०- ४५ मिनिटे कंबरेवर स्थिर करून ठेवणे म्हणजेच कटीबस्ती होय. कटीबस्ती कंबरेच्या विकारांवर उपयुक्त ठरते.

पिशिन्चल : भरपूर औषधी तेलाची धार शरीरावर धरणे म्हणजे पिशिन्चल होय. वाताच्या नियमनासाठी, स्नायूंच्या पोषणासाठी, मांसपेशींना बलवान करण्यासाठी वापरली जाणारी ही चिकित्सा आहे.

िपडस्वेद : विशिष्ट प्रकारचा भात औषधी वातनाशक काढय़ात शिजवून नंतर दुधातील काढय़ात शिजवला जातो. नंतर दुधातील काढय़ात बुडवून त्याने अवयवांना शेक दिला जातो. भातातील औषधाचा व त्याच्या पिंडाने दिलेला दाब मांसपेशी शिथिल करून बलवान करण्यास मदत करतात. ही दोन्ही पंचकर्मातील कम्रे केरळची वैशिष्टय़े मानली जातात. याचा उपयोग आज महाराष्ट्रात काही विशेष पंचकर्मतज्ज्ञ करतात व यशस्वी उपचार करतात.

आहारीय बदल : लेखात उल्लेखलेल्या कारणांचा बदल अत्यावश्यक आहे. वात वाढवणाऱ्या सर्व गोष्टी टाळाव्यात. काही विशेष आहारीय बदल हेतुत करणे हितकारक आहे. ते पुढीलप्रमाणे –

लसूण व सुंठ/ आले : जेवणात तळलेला लसूण वेगळा दोन-तीन पाकळ्या खावा. जेवणाआधी व नंतर न घेता जेवणाच्या मध्ये खाल्ल्यास लसणाचे वातनाशक गुण आहारात मिश्र होऊन आहारही वातनाशक करतात. कच्चा लसूण न खाता तो तळून घ्यावा म्हणजे कोणत्याच प्रकृतीच्या शरीराला बाधणार नाही. सुंठीला ‘विश्वभेषज’ असे म्हणतात. विश्वातील श्रेष्ठ औषध असे ज्यास संबोधले आहे, ते उत्कृष्ट वातनाशक असून शक्ती देणारे व वातनाडय़ांना उत्तेजित करणारे आहे. ही द्रव्ये रक्तातील कोलेस्टेरॉल, triglyceride, phospholipid कमी करतात. असे आजच्या निष्कर्षांवरून दिसून आले आहे. पोटाच्या विविध विकारांना दूर करण्यास यांचा मोठा वाटा आहे.

तूप : तूप हा शब्द वाचून काहींचे डोळे मोठे झाले असतील; परंतु जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर अर्धा ते एक चमचा तूप किमान कृश व्यक्तींनी खावे, म्हणजे वाताचा नाश तर होतोच पण सांध्यांनाही बळ मिळून पित्त कमी होते व शरीरास शक्ती प्राप्त होते. अर्थात तूप शुद्ध हवे. गाईचे असल्यास उत्तम. (सामान्य व्यक्तीने गाईच्या तुपाचे दोन-चार चमचे केलेले सेवन उपयुक्त ठरते.) ते चरबी वाढवत नाही असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

गरम पाणी : जेवणानंतर एक कप गरम पाणी घेतल्याने मणक्याचे विकार निश्चितच नियंत्रणात राहतात. (कारण थंड पाण्याने वात होऊन वाढतात.) भोजनोत्तर गरम पाणी घेतल्याने जेवणानंतरचा जडपणा कमी होतो. वाताचा नाश करून आहार पचण्यास मदत होते. गरम पाणी घेतल्यानंतर कालांतराने साधे पाणी घेण्यास हरकत नाही. ज्यांना मणक्याचे विकार आहेत त्यांनी थंड पाणी, फ्रिजमधील पाणी, पदार्थ पूर्णत टाळलेले बरे. थंड पाण्याने तहान भागत नसेल, सतत प्यावेसे वाटत असेल, तरी वातही सतत वाढत राहून आजारही सतत वाढतो हे लक्षात असू द्या. इतर पदार्थाचे बदल त्या व्यक्तींच्या खाण्याच्या सवयींवरून ठरवावे.

व्यायाम : मणक्यावरील ताण कमी करणारे, स्नायूंचे स्तंभन कमी करणारे व्यायाम करावेत. अतिअवघड, बराच काळ लागणारे व्यायाम टाळावेत. व्यायाम करताना अधिक वेळ करण्यापेक्षा सातत्य राहील असे व्यायाम करावेत. शाळेत शिकलेले पीटीचे व्यायाम, मानेच्या हालचाली नियमित कराव्यात. सतत बठे काम करणाऱ्यांनी हे व्यायाम दर दोन-तीन तासांनी ऑफिसमध्ये दोन-तीन मिनिटे केल्यास फारच फायदा होतो. ही आजची गरज आहे. कमरेच्या विकारांकरिता झोपून पाय जवळ घेणे, लांब करणे, झोपूनच सायकल चालवण्याच्या हालचाली करणे, पुढे वाकणे हे करावे. ज्या स्त्रियांना मानेचे विकार आहेत, त्यांनी जड पर्स, पिशव्या खांद्यावर घेऊन फिरणे, जास्त पोळ्या करणे, कपडे धुणे टाळावे. ट्रेनमध्ये, बसमध्ये वरचे हॅण्डल धरून लांबचा प्रवास उभ्याने करू नये. सोपे व्यायाम फायदेशीर ठरतात. कठीण, वेळकाढू योगासनांपेक्षा अनुभविक, उपयुक्त आसनांचा आम्ही केलेला अभ्यास असा आहे. योगासने पोट रिकामे असतानाच करावीत. आसनांवर लक्ष केंद्रित करावे.

पवनमुक्तासन :- जुन्या वातविकारांवर उपयुक्त असे आसन. झोपून दोन्ही हात वर करून, एक-एक करून डावा-उजवा पाय दुमडून पोटाकडे घ्यावा व सरळ करावा. पोटाकडे पाय घेताना श्वास आत घ्यावा व पाय सरळ करताना श्वास सोडावा. नंतर हात सरळ करून आसन सोडावे. आसन करताना शरीराकडे लक्ष केंद्रित करावे.

भुजंगासन : मानेचे दुखणे, कठीणता व पाठदुखीसाठी याचा उपयोग अधिक होताना आढळतो. ज्यांना हा त्रास होऊ नये असे वाटते त्यांनी स्वस्थ असताना या आसनाला सुरुवात करून नियमितता राखावी. या आसनाने पाठीचे स्नायू लवचीक बनतात. मणक्यांची झीज लवकर होत नाही व शक्ती प्राप्त होते.

कृती : पोटावर झोपावे, दोन्ही पाय जवळ घ्यावेत. पायाची बोटेही जमिनीवर टेकवावीत. नंतर बेंबीवरील शरीर हळुवार श्वास आत घेत वर उचलावे व नंतर मान वर करून पाहावे. बेंबीखालील शरीर बेंबीसह जमिनीवर टेकवावे. नंतर श्वास रोखून चार ते सहा सेकंद त्याच स्थितीत राहून अलगद श्वास सोडत शरीर मूळ स्थितीत आणावे. नंतर पाच ते आठ सेकंद आराम करून पुन्हा असेच पाच ते दहा वेळा अवस्थेनुसार करावे. हे आसन सोपे असून भरपूर लाभदायक आहे.

आराम विश्रांती : ज्या ज्या गोष्टींनी हालचालींनी, आहारातील घटकांनी व्याधी वाढते, त्रास होतो त्या गोष्टींवर र्निबध घालणे हे प्रथम कर्तव्य असावे. यालाच पथ्य असे म्हणतात. पथ्य म्हटलं की कपाळावर आठय़ा पाडून आयुर्वेदाच्या नावाने (कोणताही अभ्यास, अधिकार नसताना) बोलणे सुरू होते; परंतु आयुर्वेदाच्या या सूत्राशी आधुनिक शास्त्र संपूर्ण सहमत झाले असून मणक्यांच्या विकारांसाठी चांगले तीन ते सहा महिने पूर्ण आराम करण्याचा करण्याचा सल्ला देतात.

विश्रांती घेतल्याने स्नायूंवरील ताण कमी होऊन मांसपेशी शिथिल होतात, ज्यायोगे मणक्यावरील अतिरिक्त भार कमी होऊन, त्यांचे आकुंचन नाहीसे होऊन लक्षणे दूर होतात. विश्रांती या शब्दाचा अर्थ रजा घेऊन कामावर न जाणे असा नसून ‘शरीराला संपूर्ण विश्रांती’ असा घ्यावा. यात मानसिक तणावसुद्धा दूर करणे हा हेतू आलाच (या लेखाचा तो विषय नाही). कंबरेमधील मणक्यांच्या काही विकारामध्ये मलमूत्र विसर्जनसुद्धा बिछान्यावर झोपून करण्याची सक्ती केली जाते. (आम्ही मणक्यांमधील अंतर तसेच हाडांना क्रॅक असलेले रुग्ण अशा स्थितीत ठेवून बरे केले आहेत.) म्हणून पूर्ण बेडरेस्ट – आहार, विहार, औषधे ही व्यायामाएवढीच महत्त्वाची.

झोपण्याचे आसन : मणक्याचा विकार असणाऱ्यांनी मऊ गादीवर झोपू नये, असा सल्ला दिला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे मऊपणामुळे मणके हवे तसे निसर्गाच्या विरुद्ध दिशेला वळू नये व त्रास कमी व्हावा हे होय. आयुर्वेदीयदृष्टय़ा हे करीत असता वातप्रकोप होणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबईसारख्या ठिकाणी अशा पद्धतीने पंख्याखाली सरळ रेषेत झोपल्यावर खाली मार्बल व कोटा असल्याने गारवा वाढतो व दुखणेही वाढते. अशा परिस्थितीत पंखा टाळावा व पातळ गादी करून त्यावर झोपावे. कांबळे किंवा ब्लॅंकेटवर झोपणेही लाभदायक. मुंबई, कोकण याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी गारवा अधिक प्रमाणात असतो त्या व्यक्तींनी पूर्ववात, थंड हवा टाळावी. गारव्यामध्ये रात्रभर एकाच स्थितीत राहिल्यास स्नायू स्तंभ होऊन सकाळी उठताना तीव्र वेदना होतात.

फोम तसेच इतर आरामदायक साधनांपेक्षा शुद्ध कापसाच्या गाद्या शास्त्रीयदृष्टय़ा अधिक फायदेशीर आहेत. मानेचा त्रास असणाऱ्यांनी सरळ झोपताना उशी न घेता सुती, पातळ साडीची गुंडाळी करून मानेखाली घ्यावी. त्याचप्रमाणे डाव्या/उजव्या कुशीवर झोपताना मान तिरकी होणार नाही याची काळजी घ्यावी. मान व जमीन यामधल्या अंतरामध्ये उशी असावी. सकाळी उठताना शास्त्रीय पद्धतीने सर्व सांधे मोकळे होतील अशा हालचाली करून मगच उठावे. मणक्याचे विकार जरी क्लिष्ट, त्रासदायक असले तरी त्यांचे व्यवस्थित, विचारपूर्वक केलेले निदान व उपचार निश्चितच सुखी आयुष्य देऊ शकतात. बऱ्याच वेळा मणक्यांच्या विकाराने व्यक्ती घाबरून जाते व लवकर बरं होण्याच्या दृष्टीने कृती करू लागते; परंतु झालेल्या व्याधींचा निश्चित अभ्यास करून त्यावर सहज विजय मिळवता येतो यात शंका नाही. आयुर्वेदाने वेदना लवकर बऱ्या होणार का, असा प्रश्न विचारणाऱ्या शेकडो रुग्णांच्या वेदनेचा नाश पंचकर्म, औषधं यांनी करून दाखवला आहे व दाखवत आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी की, जर मणक्यापर्यंत बदल जास्त प्रमाणात असतील, चकती सरकलेली असेल, बरेच दिवस आयुर्वेदीय उपचार घेऊनही बरे वाटत नसेल तर अस्थिरोगतज्ज्ञाचा- शल्यकर्माचा सल्ला ऐकावा. आयुर्वेदाचीसुद्धा एक शास्त्रीय मर्यादा आहे; परंतु हेही सत्य, की जर वरील उपाय नियमाने, प्रामाणिकपणे केले, ‘पथ्य’ पाळले तरी शल्यकर्माची वेळ येणार नाही व हा त्रास आज भारतातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत दिसणार नाही!
(लेखक आयुर्वेदाचार्य आहेत.)

First Published on July 13, 2018 1:03 am

Web Title: spinal cord problems and ayurved