10 August 2020

News Flash

आध्यात्मिक श्रावण

भारतीय संस्कृतीमध्ये चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे.

श्रावण महिन्यातीले मंगळागौर, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमी  या सणांची आध्यात्मिक बाजू..

भारतीय संस्कृतीमध्ये चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी ते काíतकी एकादशी असा चातुर्मासाचा कालावधी असतो. या चार महिन्यांत श्रावण मासाचे महत्त्व विलक्षण आहे. या महिन्यातील सण व रीती याचे यथायोग्य पालन करण्याचा धार्मिक लोक यथाशक्ती प्रयत्न करतात. हे सण किंवा ही व्रतं कशी करायची असतात ते सांगणे हा या लेखाचा उद्देश आहे.

मंगळागौरी : श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव करण्याची पद्धत आहे. मुलीचे लग्न झाल्यावर पाच वर्षांपर्यंत तिच्याकडून मंगळागौरीची पूजा करून घेत असतात.

धार्मिक विधी व रूढी : लग्न झालेल्या मुलीने श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी देवीची पूजा करायची असते. पहिल्या वर्षी माहेरी व पुढे सासरी मंगळागौरीची पूजा करायची असते.  मंगळागौरीच्या पूजेत धोतरा, शेवंती, दुर्वा, आघाडा वगरे सोळा प्रकारची पत्री व फुले असावी लागतात. या सर्व औषधी वनस्पती आहेत. एका ताटात हळदीकुंकू, काजळ, करंडा, फणी, तांदूळ, खण, नारळ, सुपारी, विडा व दक्षिणा वगरे पदार्थ घालून ते वायन आपल्या मातेला अगर मातेकडील सुवासिनींना द्यावे. पुरोहितासही वायन द्यावे. पूजा भक्तिपूर्वक व मौनाने करावी.  दुपारी सुवासिनींसह न बोलता मिष्टान्न भोजन करावे. रात्री सोळा वातींची आरती मंगळागौरीला ओवाळावी आणि सुवासिनींच्या ओटय़ा भराव्या. रात्री भोजन करू नये. गाणी, खेळ, नृत्य, फुगडय़ा वगरे प्रकारांनी सर्व रात्र मोठय़ा आनंदात घालावावी. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीस सौभाग्यद्रव्ये अर्पण करून पूजा विसर्जन करावी.  गौरीची प्रतिमा केली असल्यास पुरोहितास दान द्यावी. अशा प्रकारे पाच वर्षे व्रत केल्याने पतीस आरोग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.

वास्तविक हे व्रत सर्व सुवासिनींनी सौभाग्य कायम राखण्यासाठी प्रतिवर्षी करायला हवे, परंतु प्रचारात फक्त पाचच वष्रे व्रत आचरणाची चाल आहे. हे व्रत एकटीपुरते न करता आठ-दहा जणींनी एकत्र जमून केले, तर एकमेकांविषयी प्रेम वाढेल, धार्मिक गोष्टी समजणे सुलभ जाईल. यावरून दहा-बारा मुली एकत्र जमून मंगळागौरीची पूजा करण्याची चाल पडली असावी.

नागपंचमी : श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा करतात म्हणून त्या तिथीला नागपंचमी असे म्हणतात. या सणाची उत्पत्ती अशी सांगितली जाते की, एकदा बाळ श्रीकृष्ण सोबत्यांसह यमुनेच्या काठी खेळत असता त्याचा चेंडू कदंबाच्या झाडावर अडकला.  तेथून तो काढण्यासाठी कृष्ण झाडावर चढला, परंतु झाडाची फांदी मोडून ती यमुनेच्या डोहात पडली. त्या डोहात कालिया नावाचा एक मोठा विषारी सर्प राहात असे. त्याच्या श्वासोच्छ्वासानेच सर्व पक्षी जळून जायचे. वायू प्रदूषित व्हायचा, ते विषारी पाणी प्यायल्यामुळे प्राणी मरून जात. इकडे फांदीसह डोहात पडलेल्या श्रीकृष्णाने आत जाऊन त्या कालिया सर्पाची पुरी खोड मोडली व काही वेळाने त्या कालियास वर काढले व निसर्ग प्रदूषित केल्याबद्दल त्याला हद्दपारीचे शासन केले. शेतीला सर्पाची अनेक प्रकारे मदत होते हे लक्षात घेऊन कृष्णाने त्यास शासन केले पण मारून टाकले नाही. त्या वेळेपासून दरवर्षी कालिया सर्पाच्या स्मरणार्थ नागपूजा करण्याची वहिवाट पडली. (वस्तुत: श्रीकृष्णाचीच पूजा करणे जास्त योग्य होय.)

नागपंचमीसंबंधी सांगितली जाणारी आणखी एक कहाणी अशी की बंगालमध्ये मणिपूर नावाचे एक गाव आहे.  तेथे एका माणसाने पंचमीच्या दिवशी नांगराने जमीन नांगरली. त्या नांगराच्या फाळाचा त्रास पोचून नागिणीची सर्व पिले मरण पावली. तेव्हा त्या नागिणीने त्या रात्री त्या गृहस्थाच्या सर्व मंडळींस दंश करून ठार मारले व ती त्या गृहस्थाच्या मुलीला दंश करण्याकरिता तिच्या गावी गेली, परंतु त्या मुलीने पंचमीच्या दिवशी पाटावर नाग काढून त्याची पूजा केली होती. हा प्रकार पाहताच ती नागीण खूश झाली. तुझ्या बापाने माझ्या पिलांस मारले, म्हणून मी तुझ्या माहेरच्या सर्व माणसांस दंश करून ठार मारले असे तिने त्या मुलीला सांगितले. हे ऐकून त्या मुलीने सर्व माणसांस जिवंत करण्याविषयी तिला विनंती केली. ती विनंती मान्य करून त्या नागिणीने त्या मुलीस अमृत दिले. ते अमृत त्या माणसांच्या तोंडात घातल्यावर ते सारे जण जिवंत झाले. त्या वेळेपासून हा सण पाळण्यात आला असावा अशी समजूत आहे.

नागपंचमी दिवशी घरातील सर्व मंडळींनी प्रात:काळी लवकर उठावे. अंगास सुगंधी तेल लावून स्नान करावे. नंतर गंध, हळद-कुंकू वगरे मिश्रणांनी पाच फणांचा नाग पाटावर काढावा. अगर केशरयुक्त चंदनाने िभतीवर नाग व नागीण काढावी किंवा मातीची मूर्ती करून पूजा करावी. पूजा करताना नवनागाची नावे घेऊन फुले वाहावीत. (नवनागांची नावे-अनंत, वासुकि, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया).  घरातील सर्व मंडळींनी फुले, दुर्वा, लाह्य़ा, वाटाणे, हरभरे वगरे पदार्थ वाहावे. पूजा केल्यावर उत्तम प्रकारचे भोजन करावे.  मुले व त्रिया यांनी उत्तम प्रकारचा पोशाख करून आपल्या मित्र-मत्रिणींसह तो दिवस मोठय़ा आनंदाने घालवावा. वरील दिवशी जमीन खणणे, पोळ्या भाजणे, जमिनीतून उपटून काढणे वगरे प्रकार करू नयेत.  जेथे वारूळ असेल, तेथे जाऊन दूध ठेवावे व नमस्कार करावा व सर्पज्ञातीबद्दल कृतज्ञ असावे. हा सण महाराष्ट्र, गुजराथ व बंगालात पाळण्यात येतो. काहीजण मातीच्या नागाची, काहीजण िभतीवर नाग काढून तर काहीजण नागाच्या देवळात जाऊन पूजा करतात. या सणाच्या दिवशी स्रिया कापणे, चिरणे, भाजणे, तळणे अशा कोणत्याही क्रिया करत नाहीत.  या दिवसाचे पक्वान्न म्हणजे उकडलेली पुरणाची िदडे होत. या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात. मुली झोपाळ्यावर बसून गाणी गातात. मुले निरनिराळे खेळ खेळतात.  मुख्यत: एखाद्या झाडाला दोर बांधून त्यावर झोके घेणे हाच खेळ प्रसिद्ध आहे.  काही मोठय़ा शहरात गारुडी लोक घरोघर नाग आणतात. त्या नागाला हळदीकुंकू वाहून त्याला दूध पाजण्यात येते. अशा प्रकारे दरवर्षी नागाची पूजा केली म्हणजे त्यापासून भीती राहात नाही अशी समजूत आहे.

नारळीपौर्णिमा व रक्षाबंधन : समुद्रकाठी राहणारे लोक प्रामुख्याने हा सण साजरा करतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगरेची ये-जा या काळात बंद असते. या दिवसापासून समुद्र शांत व्हावा व बोटी वगरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात.  कोणी नारळ अर्पण करतं तर कोणी तांब्याची किंवा रुप्याची नाणी बांधून तो अर्पण करतात. कोणी बेगडाचा नारळ समुद्रात सोडतात. या दिवशी राखीपौर्णिमेचाही सण साजरा केला जातो. बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी, भावाने बहिणीचे रक्षण करावे असा यामध्ये हेतू असतो. या दिवशी मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात करावा. बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच करावा व अंगणात नारळाच्या ठिपक्यांची रांगोळी पण काढावी.

याच दिवशी नवीन यज्ञोपवीत (जानवे) धारण करतात. या विधीला लोक ‘श्रावणी’ असे म्हणतात. हा विधी श्रवण नक्षत्रावर केला जातो. या दिवशी उपनयन झालेल्या सर्वानी एकत्र जमावे.  करंगुलीजवळच्या बोटात पवित्रक घालावे. नंतर सर्वानी शरीरशुद्धीसाठी पंचगव्य (गाईचे दूध, तूप, दही, शेण व मूत्र) तीन वेळा प्राशन करावे. नंतर उपाध्यायाने प्रथम श्रीगणपती पूजन करून होम करावा. त्या होमात शिजवलेल्या भाताच्या २१ आहुती द्याव्यात, मग सर्वानी मिळून ब्रह्मयज्ञ करावा. नंतर भस्मस्नान, गोमयस्नान, मृत्तिकास्नान व शुद्धजलस्नान करावे. हे शक्य नसेल तर दर्भाद्वारे शरीरावर जल संमार्जन करावे. नंतर सप्तऋषींची पूजा करावी.  त्यानंतर ऋषितर्पण व पितृतर्पण करावे व आणखी एक होम करावा.  त्यात २१ वेळा सातूच्या पिठाच्या गोळ्या करून त्याच्या आहुती द्याव्या व प्रत्येकाने सातूच्या पिठाच्या दोन गोळ्या करून पाण्याबरोबर दातास न लावता भक्षण कराव्या.  नंतर गायत्री जप करून नवे यज्ञोपवीत धारण करावे व जुने काढून टाकावे. यज्ञोपवीत धारण करताना ब्रह्मचार्याने एक व गृहस्थाने दोन घालावीत व उपवस्त्र म्हणून तिसरे यज्ञोपवीत घालावे.  आयुष्यवृद्धीसाठी जास्तही यज्ञोपविते धारण करतात.

गोकुळाष्टमी : भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला,  तो दिवस म्हणजेच ‘गोकुळाष्टमी’ असे मानले जाते. ज्यांच्या घरी गोकुळाष्टमी व्रत असते, त्यांनी त्या दिवशी उपवास करावा.  श्रीकृष्णाचा रात्री बारा वाजता जन्मोत्सव करावा व दुसऱ्या दिवशी पारणे करावे. श्रीकृष्णाचे देवालय नसल्यास श्रीनारायणाच्या देवालयात जन्मोत्सव करावा.  मोठमोठय़ा शहरांत अन्य देवालयातसुद्धा जन्मोत्सव करण्याची वहिवाट आहे.  रात्री कीर्तन, मंत्रश्रवण, भजन, पुराण वगरे यथासंभव कार्यक्रम करावा. या दिवशी कोकणात बालगोपाल मंडळी नाचत नाचत, वाद्य्ो वाजवीत तोंडाने ‘‘गोिवदा आलाऽरेऽऽ आला’’ किंवा नुसते ‘‘गोिवदा ऽऽगोपाळा’’ अशी गाणी म्हणत गावभर फिरून शेवटी श्रीनारायणाच्या देवालयात जाऊन दर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात. श्रावण वद्य नवमीला ‘दहीकाला’ असे म्हणायची प्रथा आहे.  या दिवशी नाचणाऱ्या बाळगोपाळांच्या अंगावर ताक, दही, कढत पाणी व थंड पाणी ओतण्याची पद्धत आहे.  सर्व गावात नाचून झाल्यावर ही मुले शेवटी श्रीनारायणाच्या देवालयात येऊन तेथील दहीहंडी फोडण्यात येते.  त्यावेळी कोठे कोठे भुईमुगाच्या शेंगा उडविण्याची प्रथा आहे. मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येतो.  बाहेरगावचे पुष्कळ लोक मुद्दाम या ठिकाणी श्रीकृष्णजन्मोत्सव पाहण्याकरिता जातात.

पोळा  : हा सण श्रावण वद्य अमावास्येला येतो. हा सण बलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आहे. साहजिकच या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांना जास्त आहे.  शेतकरी या दिवशी बलांना स्वच्छ धुऊन सजवतात.  दुपारी पुरणपोळीचे जेवण बलास खावयास घालतात. पुष्ट बलांच्या शर्यती लावल्या जातात. रात्री बलांची वाजत-गाजत मिरवणूक काढतात.  काही लोक मातीचा बल तयार करून त्याची पूजा करतात.

अशा रीतीने श्रावण मासात निसर्ग पूजा, पशू पूजा व शरीरशुद्धीने आत्मपूजा साधून मनुष्याने इह परलोकीचे सौख्य साधावे असा संदेश या सर्व व्रतांमधून मिळत असतो.
चारुदत्त आफळे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2016 1:22 am

Web Title: spiritual shravan
Next Stories
1 विदर्भातील नागपंचमी!
2 आहार असावा हलकाफुलका
3 सात्त्विक आणि राजस
Just Now!
X