lp53आज तेजस जरा गोंधळलेला होता. ज्ञान दिल्याने ते वाढते या संस्कारामध्ये मोठा झालेल्या त्याला, आज एक नवीनच बाळकडू त्याच्या सहकाऱ्यांनी पाजले होते. सध्याच्या गळेकापू स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या सहकाऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहायचे असेल तर स्वत:कडचे सर्व काही इतरांकडे शेअर करू नये. आपल्याकडचे ज्ञान इतरांना देणे म्हणजे स्वत:चे अनेक क्लोन निर्माण करून आपले महत्त्व घालवून बसणे, आपल्याला नसलेली स्पर्धा स्वत:हून ओढवून घेणे वगैरे वगैरे बोधामृत तेजसला पाजले गेले होते. लाडका शिष्य असूनदेखील द्रोणाचार्यानी अर्जुनला सर्व काही शिकविले नव्हते. आपला मुलगा अश्वत्थामा याला कांकणभर जास्त ज्ञान देण्यासाठी द्रोणाचार्य अर्जुन व इतरांना पाणी भरून आणण्याच्या बहाण्याने दूर पाठवत व त्या वेळात आपल्या मुलाला नवीन विद्या शिकवत. थोडक्यात आपले ज्ञान हे उधळण्यासाठी नसावे तर स्वत:चे जगावेगळे वैशिष्टय़ जपण्याचे साधन असावे, असा त्यांचा सर्वसाधारण मुद्दा होता.

तेजस आज त्याच्या आजोबांकडे आला होता. त्याचे आजोबा त्यांचे मेंटॉर होते. आजोबा म्हणाले, ‘बस, तुला मी समजावतो. ज्ञान देणे म्हणजे ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीचा आत्मा आहे. आयटी क्षेत्रामध्ये कोणतेही आव्हानात्मक प्रोजेक्ट पूर्ण झाले की जल्लोशाबरोबरच लेसन (learnt) नावाचे डॉक्युमेंट तयार केले जाते. हेतू हाच की यश साजरे करतानादेखील आपण कुठे चुकलो याचे ज्ञान आपल्या सहकाऱ्यांना व्हावे, ज्यायोगे चुकांची पुनरावृत्ती टळते. पुढच्या वेळी तेच काम कमी श्रमामध्ये, कमी वेळात व कमी पैशात होते.

‘निश स्किल’ (अत्यंत असाधारण कौशल्य. उदा. मिसाइल तंत्रज्ञान, क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान) असलेले लोक फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांची गरज एकाच वेळी अनेक कामांमध्ये असू शकते. अशा वेळी जर निश स्किल असलेल्या माणसाने ‘ट्रेन द ट्रेनर स्कीम’खाली आपले अनमोल ज्ञान दुसऱ्यांना हस्तांतरित केले तर त्या माणसावरील कामाचा भार तर कमी होतोच, सोबत त्याला वर्क-लाइफचा समतोल सांभाळता येतो व जीवनाचा आनंद मनमुराद उपभोगता येतो किंवा कधी कधी निश स्किलवाली माणसे पर्याप्त प्रमाणात उपलब्ध तर असतात, पण त्या सर्वाना नोकरीत घेणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसते तेव्हा एकाच तज्ज्ञाला घेऊन त्याच्या हाताखाली त्याच्यासारख्याच तंत्रज्ञांची फौज निर्माण करण्याचे मनसुबे रचावे लागतात. ज्ञानाचे आदान-प्रदान गरजेचे होऊन बसते.

त्याचप्रमाणे एखादी गोष्ट सातत्यपूर्णरीतीने एकाच गुणवत्तेची निर्माण करायची असेल तर त्या गोष्टीची निर्मितीही पूर्णपणे अशा प्रकारे झाली पाहिजे की ती गोष्ट कोणताही मनुष्य निर्माण करो, त्याचा गुणवत्तेवर तसूभरही परिणाम होणार नाही आणि यासाठीदेखील आवश्यक ठरते ते तंत्रज्ञान हस्तांतरण. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) हे याचेच एक उदाहरण आहे.

ग्राहक समाधान किंवा कस्टमर डिलाइट ही कोणत्याही कंपनीसाठी यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा ग्राहकांच्या दृष्टीस पडते की एखाद्या कंपनीमध्ये ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड, अव्याहतपणे चालू आहे तेव्हा त्यांच्या मनास खात्री पटते की स्थळ, माणसे, काळ बदलला तरी कंपनीच्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या गुणवत्तेमध्ये तसूभर फरक पडणार नाही. आणि मग ग्राहकच अशा कंपनीला डोक्यावर घेतात. म्हणूनच ज्ञान वाटणारे सहकारी कंपनीच्या दृष्टीने लर्निग ऑर्गनायझेशनचे खंदे पिलर असतात.

आजोबा तेजसला एक एक करून ज्ञान शेअर करण्याचे फायदे सांगत होते. जर आपण आपल्याकडचे ज्ञान वाटायला तयार आहोत हे सभोवतालच्या लोकांना कळले तर ते खुशीने तुमच्या टीममध्ये सामील होतात; तुमच्यासाठी काम करायला आसुसलेले राहतात. यामुळे होते काय की आपल्याला विनासायास अशी टीम मिळते, जी नवीन काही शिकायला तत्पर असते. अशा टीममध्ये सकारात्मक ऊर्जा असते.

आपण जर दुसऱ्यांना ज्ञान वाटत असू तर आपल्याला देखील दुसऱ्याकडून ज्ञान मागण्याचा हक्क आपसूकच प्राप्त होतो.

तेजसला आता जरा हलके वाटू लागले होते. आजोबा पुढे म्हणाले, ‘तू नुकताच ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट पाहिलास. संगीत क्षेत्रामध्ये अनेक घराणी आहेत. या घराण्यांचा पायाच मुळी ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे’ हा आहे.

जितेंद्र अभिषेकी (बुवा) यांनी त्यांचे संगीतातील ज्ञान इतरांवर उधळल्यामुळेच आपल्याला फैयाज, देवकी पंडित, शौनकसारखे शास्त्रीय संगीतामधील दिग्गज मिळाले. गुरू अनंत काळासाठी अजरामर होतो ते त्याच्या शिष्यांमुळेच. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ज्ञान गेले तर देशाची संस्कृती समृद्ध होते.

जर आपल्याला कोणाकडून ज्ञान प्राप्त झाले असेल तर ते ज्ञान दुसऱ्याला देणे आपली नैतिक जबाबदारी ठरते. जेव्हा आपले ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते आपल्या पायरीवर येऊन उभे राहतात तेव्हा नकळतच आपल्याला त्यांच्यापेक्षा परत एक पाऊल पुढे राहण्याची निकड भासू लागते. त्यातूनच जन्माला येते ते नवीन क्षितिजाला गवसणी घालण्याची ऊर्मी!

तेजसचे आजोबा ही गोष्ट सांगून थांबले. त्यांनी तेजसकडे एक मिस्कील कटाक्ष टाकला. तेजसला देखील योग्य तो सल्ला मिळाला होता. तेजस म्हणाला, ‘‘आजोबा मला कळले, ज्ञानदेखील असेच आहे. मुळातच आपल्याला गुरुजनांकडून मिळालेले मूल्यवान पण फुकट ज्ञान हे आपल्या मालकीचे नसतेच तर त्यावर समाजाचा हक्क असतो. ज्ञान जर स्वत:कडेच ठेवले तर काळाच्या ओघात ते नष्ट होते. ज्ञान जर दुसऱ्याला दिले तर त्या दुसऱ्या माणसाचे जीवन आमूलाग्र बदलू शकते. आपल्याकडे ज्ञान आहे पण ते जर जगाला कळलेच नाही तर जगाच्या दृष्टीने आपण अज्ञानी म्हणजे ज्ञानाच्या जगात गरीबच ठरतो. आपल्या ज्ञान देण्याच्या वृत्तीमुळे लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात व हेच शुभाशीर्वाद आपल्याला वैभव प्राप्त करून देतात. ज्ञान दिल्याने आपली ओंजळ रिकामी होते पण रिकाम्या ओंजळीमध्येच नवीन ज्ञानाचा संचय करता येतो. आपल्यासाठी जुने झालेले ज्ञान इतरांना देऊन आपण नवीन ज्ञान शिकावे. तेव्हा मी उद्यापासून ज्ञान प्राजक्ताच्या सुवासाप्रमाणे उधळणार, मग माझे सहकारी काहीही म्हणोत!’’
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com