08 August 2020

News Flash

स्टार्टिग स्टार्ट-अप

स्टार्ट-अप करणं म्हणजे नेमकं काय करायचं?

गेल्या वर्षभरात स्टार्ट-अपचा बोलबाला चांगलाच वाढलाय. पण स्टार्ट-अप म्हणजे काय, इथपासून ते उत्पादन सुरू होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर नेंमकं काय करावं लागतं याबद्दल अनभिज्ञताच आहे.

स्टार्ट-अप करणं म्हणजे नेमकं काय करायचं? चांगल्या बिझनेसची आयडिया डोक्यात आल्यानंतर प्रत्यक्ष कंपनी उभारून चालविण्यापर्यंत नेमक्या कोणकोणत्या पायऱ्या असतात? त्यात सरकारी संस्था, बँका यांची कितपत व कशी मदत होते, कोणती कागदपत्रे त्यासाठी महत्त्वाची असतात ते मिळविण्यासाठी नेमकं कुठे आणि कसं पोचायचं? हे स्टार्ट-अपच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या कोणालाही पडणारे स्वाभाविक प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरे सध्या उद्योग जगात स्थिरस्थावर असणाऱ्या उद्योजकांकडून मिळवून ती आपणापर्यंत पोहोचविण्याचा हा लेखप्रपंच..

पहिली पायरी

या प्रश्नांची उत्तरे शोधताना भेटलेल्या प्रत्येक उद्योजकाने एकमुखाने या प्रश्नाचं एकच उत्तर दिलं ते म्हणजे ‘उद्योग करण्याची इच्छा..’ हा निर्णय इतका आणि इतका पक्का असायला हवा की कोणत्याही क्षणाला या निर्णयापासून मागे फिरण्याचा विचार मनात चुकूनपण यायला नको.

उद्योगाची निवड

एकदा का उद्योग करायचा हे मनाशी निश्चित झाले की मग पुढचा प्रश्न समोर असतो तो कोणता उद्योग? उद्योग हा खरंतर फारच ढोबळ शब्द आहे, यामध्ये अगदी हॉटेल, रेस्टॉरंट, आयटी, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कलाकुसरीच्या वस्तू विकण्यापर्यंत अनेक प्रकारचे उद्योग करता येऊ शकतात. त्यामध्येपण फक्त वस्तू उत्पादन करणारे (मॅन्युफॅक्चरर), फक्त सेवा देणारे (सíव्हस सेक्टर), सल्लागार (कन्सल्टन्ट) असे वेगवेगळे गट पडतात, अधिक सविस्तर सांगायचे झाले तर आपण घरगुती मिक्सरचे उदाहरण विचारात घेऊ. मिक्सर या उत्पादनावर आपण उद्योग उभारायचा असे ठरवले की सर्वप्रथम बाजाराचा आढावा घ्यावा. बाजारात या उत्पादनाची किती गरज आहे? किती लोक ते खरेदी करतात? कोणकोणत्या कंपन्या हे मिक्सर बनवितात? त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे? त्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल, त्यातून आपल्याला कितपत फायदा होऊ शकेल? जर आपण कमीतकमी किमतीत उत्तमोत्तम सेवा देऊ शकलो तर आणि तेवढी गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर उत्पादक हा गट आपल्यासाठी योग्य आहे. यानंतर सेवा देणाऱ्या कंपन्या. किती कंपन्या या उत्पादनासाठी सेवा देण्याचे काम करतात?  (या उत्पादनासाठी सेवा म्हणजे प्रत्यक्ष मिक्सर गरजू व्यक्तीपर्यंत पोचविणे, खराब झालेला मिक्सर दुरुस्त करणे त्यांची देखभाल करणे, त्यांच्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट उपलब्ध करून योग्य दरात ते बदलवून देणे, इ.) त्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे? यातून आपल्याला काय कितपत फायदा होऊ शकतो? जर आपणास जास्त गुंतवणूक करणे शक्य नसेल, परंतु आपल्याकडे हेच उत्पादन कमीतकमी खर्चात उत्तमोत्तम करण्यासाठीचे तंत्रज्ञान अवगत असेल तर आपण कन्सल्टिंग करू शकतो. याबाबतीत सर्वोत्तम बाब म्हणजे आपण कधीही एका गटातून दुसऱ्या गटात जाऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला बाजाराची गरज आपली गुंतवणूक क्षमता यांचा विचार करूनच उद्योगाचा विचार करावा. त्यामुळे आपण उद्योग करणार हे ठरविल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो क्षेत्र निवडणे. बाजाराच्या गरजेनुसार आणि आपल्या गुंतवणूक मर्यादेनुसार उत्पादक, सेवा गट आणि सल्लागार यांपैकी योग्य गट निवडणे. हेच गणित छोटय़ा उद्योगांसाठीही तितकेच लागू होते. शिवाय बँकादेखील कर्ज देताना या बाजारपेठ आणि उत्पादन सर्वेक्षणाचा आढावा घेतात व त्यानुसारच आपले कर्ज मंजूर होत असते. त्यामुळे बाजारपेठ आणि उत्पादन सर्वेक्षण हा घरगुती उद्योजकांपासून ते मोठमोठय़ा उद्योजकांपर्यंत साऱ्यांसाठी तेवढाच महत्त्वाचा असतो.

सुयोग्य जागेची निवड

कोणत्या क्षेत्रातला आणि गटातला उद्योग करायचा हे ठरल्यावर महत्त्वाची बाब असते ती म्हणजे उद्योगासाठीची जागा. फक्त स्वस्तात मिळते म्हणून कोणतीही जागा घेणे योग्य नाही, असा सल्ला देताना एका उद्योजकाने उत्तम उदाहरण दिले. एका माणसाने स्वस्त मिळते म्हणून गावामध्ये उद्योगासाठी जागा घेतली. बाजारपेठ मुंबईत असताना दूर गावात जागा घेणे तसा मोठा धाडसी निर्णय होता, आíथक गणितांनुसार तो योग्य वाटत होता, परंतु त्यांनी एक गोष्ट दुर्लक्षित केली ती म्हणजे गावामध्ये उपलब्ध होणारे अकुशल कामगार, ज्याचा खूप मोठा परिणाम त्यांच्या उद्योगावर झाला. त्यामुळे जागा घेताना आíथक बाबींसोबतच उपलब्ध कुशल-अकुशल कामगार, वीज, पाणी आणि उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता या बाबींचाही जरूर विचार करावा. आपल्याकडे एमआयडीसी (महाराष्ट्र प्राधिकरण मंडळ) च्या जागा सर्व दृष्टीने उत्तम असतात परंतु सध्या अशा जागांची किंमत बरीच वाढलेली आहे, (साधारण २-४ हजार प्रति चौरस फूट आणि कंपनीसाठी आवश्यक जागा ही स्क्वेअर मीटरमध्ये असते) अशा वेळी जागा भाडय़ाने  घेणे हा उत्तम पर्याय ठरतो. उद्योग कर्जासाठी बँकांकडे अर्ज करताना कंपनीकडे स्वत:ची जागा आणि त्या जागेवर शेड उभारलेली असावी अशा अटी असतात. त्यामुळे जागा घेणे हा उद्योग उभारणीतला महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्र शासनातर्फे नवीन सुरू करण्यात आलेल्या योजनांद्वारे जागा खरेदीसाठी काही कर्ज देण्यात येते त्याबद्दलच्या अटी शर्ती यांची सुयोग्य माहिती आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या खालील वेबसाइटवर सविस्तररीत्या मिळू शकेल.

http://www.doingbusinessinmaharashtra.org/DIC_schemes.aspx http://www.doingbusinessinmaharashtra.org/Land_Acquisition.aspx

रजिस्ट्रेशन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट

रजिस्ट्रेशन हा उद्योगातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, प्रत्येक उद्योगाच्या प्रकारानुसार त्यासाठी लागणारे रजिस्ट्रेशन्स, सर्टििफकेट वेगवेगळे असतात, परंतु काही सर्टििफकेट्स उद्योगांसाठी आवश्यकच असतात जसे की टॅक्स रजिस्ट्रेशन, ईएसआयसी, प्रोव्हिडंट फंड याबद्दलची योग्य माहिती, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, खर्च आणि कालावधी यांबद्दल सविस्तर माहिती आपल्याला त्या त्या जिल्ह्य़ातल्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रिअल सेंटरमध्ये मिळू शकेल व या (डीआयसी) सेंटरचा  पत्ता आणि संपर्क करण्यासाठीच्या व्यक्तीचा क्रमांक आपल्याला http://msme.gov.in/web/portal/Administration-DIC-Details.aspx?Id=15

या वेबसाइटवर उपलब्ध होऊ शकतो. शिवाय प्रत्येक जिल्ह्यच्या डिस्ट्रिक्ट सेंटरची स्वत:ची वेबसाइटदेखील आहे. ज्यावरून आपण ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकतो. बऱ्याचदा हे रजिस्ट्रेशन आणि कंपनी तयार करून देण्याची जबाबदारी कंपनीच्या सीएला देण्यात येते. तो पुढील पाच वर्षांचा जमा-खर्च मांडून कंपनीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देऊ शकतो. असा रिपोर्ट एखाद्या विश्वासू आणि चांगल्या सीएकडून तयार करून घेणे फायद्याचे ठरते, असा सल्ला एका प्रथितयश उद्योजकाने दिला. कारण याच प्रोजेक्ट रिपोर्टवर बँका कर्ज मंजूर करीत असतात. या रजिस्ट्रेशनखेरीज आपली कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत असते त्या संबंधित संस्थांमध्येदेखील रजिस्टर करणे गरजेचे असते. उदाहरणादाखल जर आपण ट्रान्सफॉर्मर बनविण्याची कंपनी चालवत असाल तर ते ट्रान्सफॉर्मर खरेदी करणाऱ्या संस्थांपकी एक म्हणजे एमएसईबी. आपले ट्रान्सफॉर्मर त्यांना विकता यावेत अगर त्यांचे निघणारे टेंडर्स भरता यावे म्हणून आपली कंपनी ही एमएसईबीच्या अंतर्गत नोंदविणे बंधनकारक असते. मार्केटिंग आणि सेल्सच्या दृष्टीनेही ही नोंदणी  हितकारक ठरते.  त्यामुळे आपापल्या प्रोडक्टनुसार ही नोंदणी कुठे कुठे करता येईल त्याबद्दल त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेता येऊ शकतो.

बँकांकडून कर्ज आणि कंपनी उभारणी

वर सांगितल्याप्रमाणे उत्तम प्रोजेक्ट रिपोर्ट आणि रजिस्ट्रेशननंतर आपण कंपनीच्या साधनसामुग्रीसाठी बँकांकडे कर्ज मागू शकतो. यामध्ये फेरतपासणी क्रिया आणि इतर बाबी पूर्ण होण्यासाठी साधारण ३-६ महिन्यांइतका कालावधी लागू शकतो. हे कर्ज लवकरात लवकर मंजूर करवून घ्यायचे असेल तर एका उद्योजकांनी दिलेला सल्ला नक्कीच मोलाचा ठरू शकेल. त्यांच्या सल्ल्यानुसार रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू असतानाच आपण मार्केटिंग करण्याकडे लक्ष केंद्रित करावे व शक्य तेवढय़ा चांगल्या किमतीच्या ऑर्डर मिळवाव्यात. ज्याच्यामुळे बँकेला आपण कर्ज भरण्याची क्षमता राखता हे पटवून देता येते व आपले कर्ज बँकांकडून लवकरात लवकर मंजूर केले जाते. या संदर्भात महाराष्ट्र सरकारतर्फे लघु आणि महत्तम उद्योजकांसाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. त्यासाठी मुख्यत्वे गुंतवणूक रक्कम हा मुख्य निकष ग्राह्य़ धरण्यात येतो. यासाठीचे पात्रता निकष आणि इतर सविस्तर माहिती आपल्याला http://www.doingbusinessinmaharashtra.org/DIC_schemes.aspx   या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय शेतीविषयक उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठीही विशेष सहकार्य सरकारतर्फे पुरविण्यात येते. तसेच महिला गृहउद्योगांसाठीही टॅक्स आणि इतर बाबतीत सवलतींच्या योजना सरकार पुरविते आहे. महाराष्ट्र सरकारच्या धोरणांनुसार महिला उद्योजिकांना आणि अनुसूचित जाती-जमातींच्या उद्योजकांसाठी विशेष सवलती देऊ केल्या जातात. ज्यामध्ये बँकेचा व्याजदर हा सामान्य व्याजदरापेक्षा ५ ते ८ टक्यांनी कमी असतो. शेतीविषयक आणि दुग्धोद्योग करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी नाबार्डतर्फेही विशेष सवलतीच्या व्याजदरातील कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सरकारच्या नवीन धोरणांनुसार कापड उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनाही विशेष कर सवलत व सरकारतर्फे मदत केली जाते. याबद्दलची माहिती आपल्याला वरील संकेतस्थळावर आणि जिल्ह्यांच्या डीआयसी (डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर) मध्ये उपलब्ध होऊ शकते. यानंतरचा मुख्य टप्पा म्हणजे कंपनीची उभारणी यांची पूर्वकल्पना ठेवून संबंधित क्षेत्रातल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मगच ही उभारणी करावी; जेणेकरून आपले मॅन्युफॅक्चिरग कमीत कमी किमतीत  कमीत कमी वेळात उत्तम प्रतीचे होऊ शकेल.

अपयशाचे प्रमाण आणि तरुणांचा सहभाग

या उद्योग उभारणीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त अपयश कुठे येऊ शकते, या प्रश्नावर ते सांगतात की, कोणत्याही टप्प्यावर असे फेल्युअर येऊ शकते. ह्य सगळ्या प्रक्रिया ठरावीक वेळेत पूर्ण होतील असे नाही. त्यामुळे अगदी संयमाने सगळ्या गोष्टींना आणि प्रश्नांना तोंड देत आपली महत्त्वाकांक्षा ढळू न देणे महत्त्वाचे ठरते. या साऱ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे जी सर्वात आधी सांगितली तुमची उद्योग करण्याची इच्छा ती असेल तर अपयश असे काहीच नसते.

सुदैवाने भारतात खूप पसे असणारा आणि खिशात अजिबात पसे नसणारा कोणीही उद्योग करू शकतो आणि बिकट परिस्थितीतून मोठे उद्योग उभारल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. त्यामुळे सध्या सरकारी मदत जाहीर होत असताना आणि तंत्रज्ञानाची भरभराट होत असताना तरुणांनी उद्योग क्षेत्रात यायलाच हवे आणि ते येताना दिसतही आहेत, पण सध्या फक्त क्रेझ आहे म्हणून उद्योग करू इच्छिणाऱ्यांनी हा उद्योग न केलेलाच बरा.. असा तात्त्विक सल्ला अंबरनाथचे एक प्रथितयश उद्योजक देतात.

हे फेल्युअर टाळण्यासाठी सध्या एनक्युबेटर सेंटर्स हा पर्याय समोर येताना दिसतो, यामध्ये वर सांगितलेल्या सगळ्या बाबींमध्ये कमीत कमी खर्चात ते एनक्युबेटर सेंटर आपल्याला सहकार्य करते. जेणेकरून सगळा ताण कंपनीच्या मालकावर अचानक येत नाही, ज्यामुळे तो उद्योग बहरण्यात नक्कीच मदत होते. महाराष्ट्रातही विविध क्षेत्रांतील उद्योगांसाठी ८-९ एनक्युबेटर सेंटर्स सध्या कार्यरत आहेत ज्यातील मुख्यत्वे मुंबई ,पुणे, नागपूर, इचलकरंजी येथे आहेत. अशा अधिकाधिक एनक्युबेटर सेंटर्सची आवश्यकता महाराष्ट्रातील स्र्टाट-अप क्षेत्राला आहे. थेट स्वत:चा उद्योग उभारण्याची िहमत आणि धर्य मिळविण्यासाठी तत्सम उद्योग क्षेत्रात काम करून त्यातील सर्व पलू समजून घेतल्यास स्वत:च्या उद्योग उभारणीत नक्कीच मदत होते. तेव्हा उद्यमशील तरुणांचे या क्षेत्रात नेहमीच स्वागत आहे.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:17 am

Web Title: starting start up
टॅग Startup
Next Stories
1 करिअर किचनमधलं
2 करिअरमधील बदल आणि मानसशास्त्र
3 न मळलेल्या वाटा
Just Now!
X