|| शर्मिष्ठा भोसले

‘लकडी की काठी, काठी पे घोडा.. घोडे की दुम पे.. आगे क्या रहेताय गे अम्मी?’

रेहानचा सकाळी उठल्यापासूनचा हा पन्नासावा तरी प्रश्न असेल. अम्मी बिचारी वैतागली होती. रोज एका हॉटेलात चपात्या बनवायला जायची तिची नोकरी होती. आणि कामावर उशीर होऊन चालत नसे. इकडं रेहानच्या शाळेला मात्र आठवडाभर झाला, सुट्टय़ा लागल्या होत्या.

‘घोडे की दुम पे जो मारा हथौडा’ अम्मीनं उत्तर दिलं आणि लगोलग सुनावलं, ‘अब और कुछ भी मत पुछ. मं जवाब नई देनेवाली देख.’

रेहान होता सावळा, चुलबुला, तेजतर्रार. अम्मीनं डोळ्यात सुरमा भरून दिला की अजूनच ‘क्युट बॉय’ दिसायचा. शिर्डीला नगरपालिकेच्या शाळेत सहावीत शिकायचा. सुट्टय़ा लागल्या तसं रेहानची अवस्था अल्लाउद्दिनच्या जादुई चिरागमधून बाहेर आलेल्या जीनसारखी झाली. जीन अल्लाउद्दिनला म्हणत असतो, ‘काम सांग, नाहीतर तुला खातो.’ रेहान अम्मीला म्हणायचा, ‘आता मी काय करू सांग. नसता मी हाफीजमामाकडं जातो.’ अम्मीनं रेहानच्या अब्बूच्या कानावर हे घातलं. तसं अब्बू म्हणाले, ‘जाके आनदे दस-पंधरा दिन. सिद्धार्थ छोड के आियगा.’

अम्मी तरी किती दिवस त्याला ‘मेरा रेहू, होशियार बच्चा’ म्हणत भुलवणार? शिवाय होमवर्कचा रेहूनं कधीचाच फडशा पाडलेला. तिनं घराशेजारी राहणाऱ्या सिद्धूदादाला हाक मारली. सिद्धूदादा म्हणजे सिद्धार्थ कांबळे. कॉलेजात शिकतो. वडील लहानपणीच वारलेत. कॉलेज संपलं की सिद्धूदादा फैजलचाचाच्या काळीपिवळी जीपवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. रात्री घरी आला की उशिरापर्यंत पुस्तकं वाचत बसतो. अम्मी नेहमी मनातल्या मनात विचार करते, ‘मेरा रेहू भी सिद्धू के जैसा बडे-बडे बुका पढेंगा.. अफसर बनेगा..’

हां, तर सिद्धूदादा आला. कॉलेजला निघायच्या घाईत होता. अम्मीनं विचारलं, ‘ये रेहान अब क्या गप बठनेवाला नई. इसको ले जा के डालते क्या श्रीरामपूर को मामाकन?’ सिद्धू म्हणाला, ‘ठीक है. कल दोफेर को ले जाता गाडी में से.’ हे ऐकून रेहानची स्वारी एकदमच सातव्या आसमानपर जाऊन पोचली.

रेहान मामाच्या गावाची स्वप्नं बघत बाहेरच्या बाजेवर अब्बूसोबत झोपून गेलता. अम्मीनं रात्रीच चुरम्याचे लाडू बनवून ठेवले. सकाळी लवकर उठून तोंड धूत हावरट रेहाननं आधी तीन लाडू मटकावले. बाकीचे अम्मीनं डब्ब्यात टाकले. जय्यत तयारी करून एकदम चकाचक तयार होऊन रेहान सिद्धूदादाची वाट बघत बसला.

दादा जीप घेऊन आला तसा गडी जागेवरच उडी मारत उठला. ‘ऐ अम्मी निकला देख मैं.. बाय बाय बाय’ अम्मीनं रेहूच्या डोक्याला गमछा बांधत गाडीत बसवलं. सिद्धूदादानं गाडी चौकात नेऊन उभी केली तशा १५ मिनिटात श्रीरामपूरच्या सीटा भरल्या. रेहान दादाच्या बाजूलाच बसला होता. जीपमध्ये घरच्या कुणालाही बरोबर न घेता प्रवास करायची त्याची पहिलीच वेळ होती. दादा कित्ती सफाईनं गाडी चालवतो याचं मनातल्या मनात कौतुक करत आपण दादाकडून लवकरच गाडी शिकायची असं त्यानं ठरवून टाकलं.

रस्त्यात दादानं रेहानसाठी वडापाव आणायला म्हणून नाक्याजवळच्या एका टपरीवर गाडी थांबवली. दादा खाऊ आणायला गेला तसं एकदम काही बायका जीपजवळ आल्या. काही एकदम उंचेल्या, राकट, घोगऱ्या आवाजाच्या, काळ्यासावळ्या, काही नाजूक, गोऱ्यागोमटय़ा. जोरजोरात टाळ्या वाजवत, ‘बहना दे दो, अरे चिकने दे ना, चिचा, दो ना’ म्हणत पसे मागायला लागल्या. रेहान टुकुरटुकुर बघत होता. तेवढय़ात त्यातली एक जण रेहानजवळ येऊन त्याच्या अलाबला घेत बोलली, ‘कित्ता प्यारा बच्चा है गे मां, खुदा सलामत रखे तेरकू’ आणि लोकांकडून मिळतील तेवढे चिल्लर-नोटा घेत त्या बायका आल्या तशा वेगात समोरच्या गाडय़ांकडे निघून गेल्या. पुन्हा टाळ्या वाजवत पसे मागायला लागल्या. रेहानचा छोटुसा मेंदू विचारात पडला.. कोण आहेत या? टाळ्या का वाजवतात? पसे का मागतात? मला दुवा का दिली यांनी..?

दादानं आणलेला वडापाव खाल्ल्यावर मात्र रेहानला गुंगी आली. डोळे उघडले तर तो थेट मामूच्या घरासमोर पोचलेला. त्याच्या शाहीन मामीनंही ‘अकेला आया रे मेरा शेर’ म्हणत त्याला कडेवर घेतलं. चहापाणी झाल्यावर निघताना दादा रेहानला प्रेमळ दम भरत म्हणाला, ‘देख, जादा सताया ना, तो मौसी फोन करेगी मेरको. फिर मैं आया और ले गया देख तेरको उठाके वापस.’ रेहाननं लगेच गळ्यावर बोटं ठेवले, ‘दादा, कसम से एकदम सयाना बच्चा बनके रहता मैं.’ दादा ‘बघू की आपण’ म्हणत हसायला लागला.

रेहान, जिशान आणि जिशानची छोटी बहीण अफसानाची तिकडम लगोलग िधगाणा घालू लागली. लाडू खात-खात रेहानच्या बॅगेतलं सगळं समान जमिनीवर ओतत चिंचोके, गोटय़ा, संत्रा, गोळ्या यांच्या वाटण्या सुरू झाल्या. ते आटोपल्यावर पलटन चोराच्या पावलांनी घराबाहेर पडली आणि काही मिनिटांतच लगोरीचा डाव रंगात आला.

‘‘रेहान, जिशान, अफसाना.. बच्चो सुनो तो.. शामकू एक जशन में जाना है. जादा धूप में खेलो नक्को. लालपिले होरे देखो एकदम..’’

तासभर झाला नाही तोच शाहीन मामी, तिघांवर जरा ओरडलीच. लगोरीचा डाव मोडण्याचं नावच घेत नव्हता. जोडीला जळणासाठी आणलेल्या काटक्या घेऊन सायकलींचे टायर घुमवणं, मोहल्ल्यातल्या कुणाच्या जुन्या बंद पडलेल्या रिक्षाच्या सीटवर बसून लुटुपुटूचं रिक्षा चालवणं, खुराडय़ातल्या कोंबडीच्या पिल्लांना पकडून जबरदस्ती आंघोळ घालणं अशी काय-काय ‘क्रिएटिव्ह कामं’ सुरू होती..

पलटनीचा हिरमोड झाला. पण सोबतच ‘जशन’ म्हणल्यावर तिघांचेही डोळे चमकले. अफ्सू अम्मीच्या दुपट्टय़ाला धरून विचारू लागली, ‘जशन याने क्या रहेता ?’ रेहान खुदुखुदु हसायला लागला, ‘अरे, इतना भी पता नय? जशन याने प्रोग्रॅम!’ इकडं जिशानचापण आईमागं लकडा सुरू झाला, ‘किसकी शादी है, बोलो ना.. बोलो ना अम्मी’ अम्मी म्हणाली, ‘नय रे शादी नय. घरभरनी है. शाम को पता चलेंगा तुमको. और आने का होंगा तो अब दो-तीन घंटे चूपचाप घर में बठो.’ हा सौदा तिघांनाही मंजूर झाला.

टीव्हीवर कार्टून बघता-बघता जिशानला बाहेर रिक्षाचा हॉर्न ऐकू आला तसं ‘अब्बू आ गये, अब्बू आ गये’ म्हणत पोरगा बाहेर पळाला. त्याचे अब्बा, रेहानचे हाफीजमामा आले होते. ‘आपल्याला आज जशनला जायचंय’ ही न्यूज त्यानं खुशीतच अब्बूला सांगितली. अब्बूनीपण लगोलग फर्मान सोडलं, ‘चलो तयार हो जाव सब. अध्र्या तासात निघतोय आपण.’

नवे कपडे घालून, अत्तरबित्तर फवारून सगळे तयार झाले. घरापासून चालतच पाचेक मिनिटाच्या अंतरावर घरभरणीचा कार्यक्रम होता. रेहान मामाचा हात धरून चालत होता. सगळे एका नव्या कोऱ्या तीन मजली घरासमोर आले. मस्त रोषणाई केलेली, डेकवर रेहानचं आवडतं ‘िझगाट झालंया’ वाजत होतं. गेटबाहेर उभं राहून काही बायका सगळ्यांच्या हातात गुलाबाचं फूल देत होत्या. रेहान एकदम थबकला. या बाया.. तशाच दिसत होत्या की एकदम, काल त्या टाळ्या वाजवत आलत्या त्यांच्यासारख्या! रेहान विचारात पडलेला चेहरा घेऊनच मामा-मामी आणि जिशान-अफ्सूसोबत आत गेला.

तिकडं अंगणात टाकलेल्या खुच्र्यावर खूप लोक बसले होते. तिघांच्या पलटनीचं इकडं-तिकडं हुंदडणं सुरू झालं. तितक्यात तिघांना एका अनोळखी मौसीनं आईस्क्रीम आणून दिलं आणि अफ्सूचा गालगुच्चा घेत ती म्हणाली, ‘‘कित्ती प्यारी बच्ची है गे, खुदा बचाये बुरी नजरसे!’’ रेहान चमकला, ‘तोच टोलनाक्यावर आलाबला घेणारा घोगरा आवाज..’

विचार करता-करता आईस्क्रीम कधी संपलं आणि समोर शाहीन मामी कधी येऊन उभी टाकली त्याला कळलंच नाही. तिनं तिघांचा हात धरून त्या आलिशान घराच्या आत-आत नेलं. आता काय आणि किती आश्चर्य करावं? तिथंपण बसलेल्या सगळ्याजणी तश्शाच टोलनाक्यावर भेटलेल्या बायांसारख्या! शाहीननं त्या सगळ्या जणींना सांगितलं, ‘ये मेरा भांजा, रेहान. बहोत होशियार है, शिर्डी से आया आजीच.’

सगळ्या मावश्या रेहानच्या आलाबला घेत सलामतीची दुवा द्यायला लागल्या. शाहीन त्या सगळ्याजणींसोबत गप्पा मारायला लागली. हसीमजाक बराच वेळ चालला. मग थोडय़ा वेळात एक मावशी सगळ्यांना घर दाखवायला घेऊन गेली. सगळं एकदम चकचकीत, सिनेमातल्या घरांसारखं! नव्या भिंतींना येणारा रंगाचा वास रेहानला खूप आवडला.

आता सगळे जेवायच्या पंगतीत बसले. वाढायलापण सगळ्या त्याच बाया होत्या. रेहान गुपचुप त्यांच्याकडे बघत राहिला. घरी गेल्यावर मामा-मामीला या बायांविषयी विचारायचंच असं ठरवून त्यानं जेवणावर आडवा हात मारला. हलीम त्याला नेहमीच आवडतं.

रात्री मामानं घराबाहेरच्या शेणानं सारवलेल्या अंगणात अंथरुणं टाकली. सगळे रांगेत झोपले. रेहान संध्याकाळची गोष्ट विसरला नव्हता. मामाच्या हातावर डोकं ठेवत त्यानं विचारलं, ‘मामूजान, आज जीप में आते टाइम मुझे कुछ औरतलोगा दिखे.. और अभी जशन में भी वैसेच औरता थे. थोडे अजीबच लगरे थे. कौन है वो सब? उनकी आवाज इतनी भद्दी क्यूं रहती?’ मामूजान हसले, ‘भांजे, सवाल तूने बराबर पुछा. जवाब मेरको जितना पता उतना देता मं.’

‘‘कैसा है, निसर्गानं बाई बनवली आन पुरुषबी बनवला. पण काही लोकांना अर्धा पुरुष आन आर्धी बाई बनवलं. तृतीयपंथी म्हनतेत त्यांना. काही वाईट लोकं त्यांना हिजडे, छक्का असं काय काय म्हणतेत, त्यांना शिव्या देतेत, अपमान करतेत. शिकू देत नाहीत, नोकरी करू देत नाहीत. मग काय करावं त्यांनी? ते बिचारे भीक मागतेत नसता शादीत नाचून बिदागी मिळवतेत. या मोहल्ल्यात माझ्या अब्बा-पणजोबाच्या काळापासून हे तृतीयपंथी राहतेत. त्यांच्यातल्या काही लोकांनी जुन्या काळात जमीन घेऊन ठेवली होती. ते तर अल्लाला प्यारे झाले. मग नवीन आलेल्या त्यांच्या लोकांनी तिथं आपल्यासारखं पत्र्याचं घर बनवलं. मग खूप र्वष पसे गोळा करून हे नवीन तीन मंजिला घर बांधलं. त्यांच्या घराला ‘दयार’ म्हणतात. श्रीमंत बायका, पुरुष असतेत ना आपल्या गावात, पुण्या, मुंबईला.. त्यांनीपण यांना मदत केली. जिशान-अफ्सूची अम्मी त्यांच्या घरी रोज खाना बनवून द्यायला जाते. तिला पगार मिळतो त्याचा. हो की नाही?’ जिशान-अफ्सूनं लगोलग मान डोलावली. रेहान बोलला, ‘तो क्या वो अच्छे लोग है?’

हाफिजमामू म्हणाले, ‘हां, हां. एकदम अच्छे. हमारे जैसे. मं, मेरे अब्बू, सब उनके घरपे खेलके-खाके बडे हुये. ये मोहल्ले में सबके शादी में तक बहोत मदत किये उन लोगोंने, मेरी शादी में भी किये. कुणाच्यापण घरात काही वाद-भांडणं झाली तर मिटवायला यांच्याकडच जातेत सगळे. वो हमारे घरवाले है एकदम.’

आता जिशानला प्रश्न पडला, ‘अब्बू, उसदिन मेरा एक दोस्त बोलरा था, तू छक्के से बात करता क्या? तू भी छक्का बन जायेगा. मं उसको क्या बोलू?’

मामू म्हणाले, ‘उसको बोलने का, वो छक्का नही, इन्सान है. हम सब इन्सान है, इन्सान बनेंगे.’

छोटी अफ्सू बोबडय़ा बोलीत बोलली, ‘हां, म अपचू इंछान, भय्या जिचान इंछान और ये रेहू इंछांन!’

शाहीनमामी बाजूला बसून उद्यासाठी रेहानच्या आवडत्या बिर्याणीची तयारी करताना सगळं कौतुकानं ऐकत होती. म्हणाली, ‘हां रे मेरी बच्ची! मेरे नटखट इंसानो, अब सो जाव. उद्या मी दयारला जाणारे खाना बनवायला. उरलेले सवाल आता तिथं मौसी लोकांना विचारायचे. कोण-कोण येणार माझ्यासोबत?’ तिघा बच्च्यांच्या पलटनसोबत मामूजाननंही हात वर करत म्हणलं, ‘मं भी, मं भी’ आणि सगळे मिळून हसायला लागले..

रेहानला उद्या खूप साऱ्या नवीन मावशा मिळणार होत्या!