|| सोनाली नवांगुळ

खरं तर माझं नाव काही तरी वेगळं हवं होतं, मी वेगळी असण्यापेक्षा!

ती अरूबाताई कसली भारी होती. अण्णा म्हणाले, अरूपा असं असणार खरं तर नाव, त्यांच्या दक्षिणी उच्चारात ते ‘बा’ होतंय. ते काही असो, पण माझं नयना हे नाव आऊटडेटेड वाटतंय. त्यापेक्षा सेहमत, झीनत, झेलम अगदी मसाबासुद्धा चाललं असतं मला. नाव वेगळं असतं तर लोकांनी त्याच्याकडं लक्ष दिलं असतं. नाही तर इथं वेगळीच कथा! मला बघितलं की चेहऱ्यावरचे, मानेवरचे, हातापायावरचे डाग आधी बघतात. निरखून. चष्मा असला तर तो पुसून पुसून बघतात. कुणाचं समजा लक्ष नसलंच तर त्याला खाणाखुणा करून, न आवाजाच्या हाका मारून दाखवतात. हँ!! नुस्ता ड्रामा..

ती आलिया भट कस्सलीय! तिला खूप हसायचे म्हणे सगळे, जोक मारायचे. खरंच वाटत नाही. पण भारी अ‍ॅिक्टग करून नि चांगले चांगले डान्स करून तिनं स्वतला इतकं आवडतं बनवलं की आता आलिया म्हटलं की कुणी जोक नाही मारत. माझं वेगळं कधी होणार यारऽऽऽऽ.

राग आला की माझं असं उलटसुलट चालू होतं स्वतशी. एरवी काही फार वाटत नाही मुद्दाम टवकारून पाहणाऱ्या लोकांचं. पण सारखं सारखं झालं की वैताग होतोच की. तिकडं हृषीकेशदाकडे सुट्टीत इतकं काय काय केलं नि परत घरी आल्यावर शैलूच्या आत्यानं विचारलं, ‘‘काय गं, डाग कसले हे? भाज्याबिज्या, फळंबिळं खातेस की नाही? कसली अ‍ॅलर्जी आलीय की मुळात आहेत हे डाग? पायावर पण आहेत का?’’ – बरं तितकं करून थांबली नाही ती. चष्मा काढला. बघितलं नीट. म्हणाली, ‘‘वेगळेच आहेत. जाणारे वाटत नाहीत. दाखवलंय का डॉक्टरला?’’

मनातून उत्तर द्यायचं होतं, दाखवीन नाही तर काहीपण करीन. तुला काय करायचंय? तुझे केस इतके कमी वाटतायत. टक्कल पडेल थोडय़ा दिवसांनी. दाखवलंय का डॉक्टरला? पण असली उत्तरं दिली की मागचं सगळं चांगलं वागणं वाया जातं. मायाताईनं सांगितल्याप्रमाणं मनात आकडे मोजायचे. श्वास नीट घ्यायचा, लक्ष देऊन. द्यावंच लागलं तर द्यायचं उत्तर की चालूय ट्रीटमेंट. चि डा य चं नाही! त्यानं काहीच बदलत नाही.

घरी येऊन अरूबाताईला सांगितलं. थोडं इंग्रजीत व थोडे हातवारे करून. तिला िहदी अज्जिबात येत नाही. ती म्हणाली, ‘हे नना. यू स्टॉप्ड युअरसेल्फ इन फ्रंट ऑफ हर, बट ऑल फेल! यू आर अँग्री विथ युअरसेल्फ. गो अ‍ॅन्ड वॉच मिरर.’

मी गेले तडक आरशासमोर. बघितलं स्वतला.

अय्यो.. चिडलं की डाग आणखीच डार्क दिसतात. डार्कने नीट लक्षात येणार नाही इतके डार्क म्हणजे ‘ग ड द’! नव्या शाळेत कस्सं हॉणॉर मॉझं?? कितीपण वेगळी असली शाळा नि मायाताई म्हणते तशी ‘ऑनंददॉयी’ असली तरी तेच ते प्रश्न कुठंपण गेलं तरी असतातच. अभ्यासात किंवा खेळात जरा पॉवरफुल असते तर मग हे झालं नसतं का? म्हणजे डाग लक्षात आले नसते का? खरं तर शैलूच्या आत्याचा राग येण्यापेक्षा मला नव्या शाळेचं टेन्शन आलंय! पहिल्यांदा बघितल्यावर तिथले लोक प्रश्न विचारणार वगरे ते सगळं बाजूला राहिलं. ते नंतर. पहिल्या दिवशी, सगळ्यात आधी ‘ही मी’ असा, म्हणजे या विषयाचा परफॉर्मन्स द्यायचाय तीन मिनिटांचा. त्याचं काय करायचं?

अरुबाताईचा रंग खूप सावळ्याच्या पलीकडचा नि ठार काळ्याच्या अलीकडचा आहे. छोटे केस. उंची काय फार नाय. शर्ट-पँट, टी शर्ट, जीन्स. काहीही साधं कुठल्याही रंगाचं घालते ती. हृषीकेशदाची मत्रीण नसती तर लक्षात नसती आली माझ्या. हसते मात्र अशी की जगात भारी. कायम लक्षात राहील. चमचा चमचा पाणी मावेल इतक्या खोल खळ्या नि एका रेषेत दिसणारे दात. हसली की नाद करायचाच नाही. आपण बघतंच राहतो तिच्याकडं.. बघतंच राहतो.. बघतंच राहतो. ती बोलते पण मस्त. इथं मी माझी गोष्ट मराठीत सांगतेय, म्हणून ती जे इंग्रजीत बोलते ते ही मी मराठीत सांगेन. मी तिच्याशी काहीपण बोलू शकते. कारण तीही माझ्याशी वाट्टेल ते बोलते.

मी सांगितलं तिला की, तू इतकी काळी आहेस. पण हसलीस की टांगा पलटी घोडे फरार. भारी. मला काळा रंग इतका कुणाचा आवडलाच नाही. ती म्हणाली, ‘‘ते दाग अच्छे है असं मला अ‍ॅडमध्ये नव्हतं आवडलं, पण तुझे डाग तुझ्या सावळ्या रंगात जिथं मिसळताहेत ती जागा मला फार आवडलीय. मला वाटतंय की जर ही शेड मला चित्रात काढता आली तर मजा येईल.’’

माझ्या डागांबद्दल इतकं सोपं कुणीच काही बोललं नव्हतं. एक तर खूप जादा चौकशा नाही तर मग बघितलं नाही असं दाखवण्याची अ‍ॅिक्टग करतात माणसं. त्यांना कळतंच नाही की मला सग्गळं कळतं. मागं एकदा बाबांची मत्रीण आलेली घरी तेव्हा ती खरं तर डिस्टर्ब झालेली मला बघून. तिचा मुलगा ऑटिस्टिक आहे, असं ती आईला सांगत होती. म्हणत होती, तुमचं असं, माझं असं, काही भोग भोगूनच संपवायचे! – नंतर जाताना मला चॉकलेट देऊन म्हणाली, ‘दॉग ऑच्छे है!’ बेटा, सगळं ठीक होईल. तसं म्हणताना जरी तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं तरी तिनं मला हात नव्हता लावला. शेकहॅण्ड नव्हतं केलं. पापी नव्हती घेतली. मला लहान समजायचं कारण नाही! सग्गळं कळतं मला. लहान मुलांना सगळीच माणसं आवडत नसतात. काही माणसं मात्र फार फार आवडतात व त्यांच्याकडंच लहान मुलं पुन्हा पुन्हा जातात. कारण खूप लहान बाळ असतानाही सग्गळं कळत असतं त्यांना. आपल्याला कुणी खरंच प्रेमानं बघतंय, हात लावतंय ते कळत असतं. मोठय़ा माणसांनाच कळत नाही की लहानांना किती कळतं! बहुतेक मोठय़ांना त्यांच्या लहानपणी त्यांना कळत होतं याची याददाज गेलेली असते. तसंच असेल. माझी नाही जाता कामा यार! मला किती कळतं हे मी म्हातारी झाले तरी मला आठवायला पाहिजे.

सांगायचं होतं एक नि वेगळीकडेच घसरली माझी गाडी. अरूबाताईला जशी ‘दॉग ऑच्छे’ आवडली नव्हती तशीच मला. म्हणून ती माझी रक्तमत्रीण आहे असं मला वाटायला लागलंय. आम्ही कित्ती सेम विचार करतो!

तसं मायाताई व मीही सेम विचार करतो. मायाताई माझी डॉक्टर. माझ्या डागांना उन्हात हुळहुळतं म्हणून ती मलम देते. तिलाही डाग होते. हळूहळू ती पूर्ण गोरी झाली. चमकदार. तिला पावडर लावायची गरजच पडत नाही. ती म्हणते अगं त्वचेत मेलॅनीन पिगमेंटची कमतरता होते नि त्वचा नाजूक होऊन बसते. तिचा मूळ रंग नाहीसा होतो त्यामुळं. डिसअ‍ॅॅपिअर!

मायाताईला खूप वाटायचं की तिच्यासारख्या व माझ्यासारख्या मुलींची गोष्ट हवी. पु. ल. देशपांडेंनी अंध मुला-मुलींसाठी ‘बिनकाटय़ांचा गुलाब’ नावाची गोष्ट लिहिलेली म्हणाली ती. मी म्हटलं, ‘‘माझी गोष्ट दुसरं कुणी का सांगेल? मीच सांगते. मी नाही डरत कुणाला.’’ मायाताई म्हणाली, ‘‘तू इतर कुणाला डरत नाहीस गं, पण कुणी सारख्या चौकशा केल्या की चिडचिड करतेस ना त्या वेळी वाटतं की, तू जी काही दिसतेस त्या दिसण्याला डरतेस. असशील खरी तर सांगून दाखव गोष्ट.’’

– म्हणून तर मी हे सांगतेय. कारण मी डरत नाही. शैलूच्या आत्यावरनं जे चिडले ते आत चिडले. म्हणजे मनात. ते माझ्या आत कळलं. म्हणजे आतल्या अवयवांना, मेंदूला, स्नायूंना, हाडांना, रक्तवाहिन्यांना, केशवाहिन्यांना. माझ्या त्वचेच्या आतल्या भागालापण. त्यामुळं डाग ग ड द झाले ना! बाहेर कुठं चिडले मी? आणि अरूबाताईला कळल्यावर मी कबूल करून टाकलं की. चुकल्यावर कबूल केलं की चांगलं वाटतं मला.

अरूबाताई नि हृषीकेशदादा यांची मत्री खूप लाख वर्षांची आहे असं वाटत असलं तरी ती तशी नाही. त्याला कॅमेऱ्याची लेन्स घ्यायची होती नि तिला विकायची होती. ऑनलाइन साइटवर ठरलं की हा घेणार ती. मग ते भेटले मॉलमध्ये. मग लेन्स राहिली बाजूला ते मित्रच झाले. कारण दोघांनापण फोटो काढायला आवडतात. दोघांनाही चित्रं काढता येतात. दोघांनाही पोहायला आवडतं. – आणि एकाला बोलायला आवडतं नि ऐकाला ऐकायला.. हाऽऽहाऽऽहाऽऽ

सुट्टीत हृषीकेशदाकडं गेल्यामुळं माझीही अरूबाताईशी मत्री झाली. खरं तर माझीच जास्त झाली. आज तर ती इकडंही आली, माझ्या घरी. आम्ही शाळेनं दिलेल्या तीन मिनिटांच्या ‘ही मी’ या विषयावर बोलतोय आता.

ती म्हटली, पांढरे डाग म्हण, कोड म्हण, विटिलिगो म्हण. काहीच फरक पडत नाही. तुला जर माहितीय की हे डाग एकामुळं दुसऱ्याला येत नाहीत, पसरत नाहीत तर तू का दचकतेस मिठी मारायला नि शेकहॅण्ड करायला? तू असं दचकल्यामुळं फरक पडतो. असं वाटतं तुझंच काही निश्चित नाहीये. जर तुझ्या हात लावण्यानं किंवा तुझ्या चिमणीच्या दाताचं चॉकलेट खाल्ल्यानं दुसऱ्याला डाग आले असते तर तू तसं केलं नसतंस ना. तू रिस्पॉन्सिबल मुलगी आहेस. ते कळू दे दुसऱ्यांना. तू घाबरतेस म्हणून लोकही घाबरतच राहातील बघ.

अरूबाताई म्हणजे असं बोलते की खटक्यावर बोट जाग्यावर पलटी! तिनं सांगितल्यापासून सगळेच रंग किती मजेदार असतात हे कळलंच मला. काळा, सावळा जास्तच ताजाताजा वाटायला लागलाय. गोरं वाईट नाही नि काळंच चांगलं असंही नाही. सगळेच छान. मायाताई म्हणते तसं, आपापल्या रूपाचे सगळेच रंग सुंदर!

नव्या शाळेतल्या ओळखीचा, ‘ही मी’चा कॉश्च्युम ठरला आमचा.

मी गुढघ्यापर्यंतचे पाय झाकणारे सॉक्स नाही घालणारे. सुंदर मिनी स्कर्ट नि स्लीव्हलेस टॉप. आणि माझ्या हाताच्या, पायाच्या, चेहऱ्यावरच्या प्रत्येक डागाभोवती अरूबाताई सुंदरसे रंग वापरून चित्र काढणारे. माझ्या भुवईजवळच्या डागावर मोर काढायचा ठरलाय. नि पायाच्या मोठय़ा डागाला तर घोडय़ाच्या मधल्या भागाचं रूप आलंय. धडाचं. त्याचं तोंड, पाय नि भरपूर शेपटी काढली की घोडा तय्यार. दंडावर पानंफुलं. पण हिरव्याच रंगांची पानं वगरे टिपिकल नाही काही. मानेचा डाग जरा जादा पसरलाय.. तिथं ती म्हणाली, तळं दाखवू नि बाजूला बघू काय करायचं. तळं तरी पक्कं झालंय. सरावासाठी आता खूप चित्रं होणारेत अंगावर. मी तर आता कॅनव्हासच झालेय अरूबाताईचा.

मेलॅनिन पिगमेंटला मायाताई रंगद्रव्य असं भारी नाव वापरत बोलते. त्वचेचं रंगद्रव्य गोंधळ घालतं तेव्हा लगेच कळतं, पण आपण मोठेमोठे होत जाऊ तेव्हा केस पांढरे होतात तेसुद्धा त्यामुळंच. त्याचं काही एवढं वाटत नाही तर मग त्वचेचं कशाला वाटायला पाहिजे? मी सांगेन ते.. मुळात मी अश्शी भारी होऊन गेले की सांगावं लागणारंच नाही कुणाला. ‘दॉग ऑच्छे हॅ’ हे दुसऱ्यानं म्हटलं तर पटत नसतंय. आता माझी मीच म्हणतेय.. डरणार नाही.

अरूबाताई म्हणत होती की तुझं नाव सेलिब्रेट करू.. सगळ्या डागांच्या इथं डोळे काढू.. नयना! हो ना?

मी म्हटलं नको नको. नाव नको. माझी पांढरी तळी सेलिब्रेट करू. सगळ्या डागांना एकच चित्र देणं बोअर होईल. आपण ठरवलीत तशी खूप सारी चित्रं काढू. जितके डाग तितकी नवी चित्रं. रंगद्रव्य जिंदाबाद!