03 March 2021

News Flash

कथा : एका आडाण्यावरून

आणि.. गगरी मोरी भरन नही देत- बंदिश ऐन भरात आलेली.

खचाखच भरलेलं सभागृह. मंचावरती मधोमध सिद्ध गायक, मागे दोन्ही बाजूंना तानपुरे हातात घेतलेले त्यांचे दोन शागीर्द, पुढे डाव्या-उजव्या बाजूंना साथसंगत करणारे संवादिनीवादक आणि उत्साद तबलिया, मधोमध संगीतात मुरलेला एक बुजुर्ग गवई आणि समोर मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरलीलांमध्ये तल्लीन श्रोतृसमुदाय- असा मस्त जमून आलेला माहोल! कान तृप्त आणि मन तुडुंब अशी अवस्था! रागामागून राग आकाराला येत होते- वाहव्वा! बहुत अच्छे! क्या बात है! कमाल की कमाल है! – अशी उत्स्फूर्त दाद मिळत होती- याशिवाय दुसरा शब्द नाही- गायनरंगी रंगून गेलेली एक मैफील!

आणि.. गगरी मोरी भरन नही देत- बंदिश ऐन भरात आलेली. शेवटी भरन नही देत, भरन नही देत, भरन नही देत- असा तीन तीन वेळा, तीन तीन वेगळ्या प्रकारे त्रागा करीत, त्या सिद्ध गायकाने ती डचमळणारी गगरी सम नावाच्या किनाऱ्यावर टेकवली. टाळ्यांचा कडकडाट झाला, सभागृहातले दिवेही जरा बागबुग झाले आणि लगोलग बऱ्याच गोष्टी घडल्या.

संवादिनीवर उत्तम साथ करणाऱ्या वादकाचं, भाता ओढणाऱ्या हातावर तंद्रीत टेकायला आलेलं डोकं, ग्रीवेसकट परत तटकन जागच्या जागी स्थिरस्थावर झालं. तबलियाची अवस्थाही तशीच – बोल वाजवताना आणि घुमाऱ्याचा लाजवाब ठेका धरताना, स्प्रिंग लावल्यासारखे होणारे मानेचे विभ्रम थांबले, तोंडात जायच्या घाईला आलेली केसांची झुलपं सावरली, डोईवर जाऊन बसली, आणिक एक म्हणजे बोल खणखण उठावे, तबला तब्येतीनं बोलावा आणि बोटं जादूई करामतीनं सरकावीत म्हणून तबल्यावर शिंपडलेली टाल्कम, तबलजीच्या गालावर फरांटे उठवून गेली. मागचे दोन शागीर्द – पुछो मत! बात और होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे विभोर भाव पुसटता पुसटत नव्हते. मध्यभागी बसायची अनुमती मिळायच्या आधीचे हे स्थान! दोघांनी तानपुरे अलगद आडवे केले- एकीकडे नजरेच्या भाषेतून, गुरूच्या थक्क करणाऱ्या गायकीचे नवल हातवाऱ्यांनी व्यक्त करीत दोघंही तसेच मंत्रमुग्ध खिळलेले. इकडे गानसिद्ध गायकाने डाव्या मांडीखालचा घडीदार शहापुरी पंचा काढला, दीडता करून खांद्यावर टाकला- क्षणभर वाटलं, ती अर्धीमुर्धी भरलेली गगरी डोक्यावर ओतून हा तपस्वी बुडुक अंघोळ करून येणार बहुतेक- पण तसलं काही घडलं नाही. फक्त घामाघुम झालेला चेहरा त्यांनी खसखसून पुसला, पंचा परत जागच्या जागी. मंचापशी दाद द्यायला आलेले चार-दोन हात त्यांनी सस्मित हातांत घेतले – आणि मंडळ उठलं- मध्यंतर झालं होतं, मंचाच्या मागे चहापान आणि चघळपान असा विधी होता – मंच सुनासुना- वाद्ये निमूट!

श्रोते मंडळीही बरीच हलचल झाली. मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकावर गटागटांत रंगलेल्या गप्पा. विशेष होतं ते तिसऱ्या रांगेत लक्ष वेधून घेणारा एक परम रसिक दर्दी होता. स्वत:तून कम्प्लीट हरवलेला- गायनरंगात डुंबून गेलेला. उजवा हात वाहाव्वाचे कशिदे काढण्यात गुंतलेला – डाव्या हाताची एक वेगळीच कमाल. ती गगरी किनाऱ्याला लागताक्षणीच डाव्या चाफेकळीचं, डाव्या नाकपुडीशी जुळलेलं अद्वैत सुटलं. त्या श्रोत्याचा हा चाळा सर्वाचं लक्ष वेधून घेत होता. तादात्म्याची कमाल म्हणजे लयी आडलयींतही तालांच्या मात्रांचा चोख हिशेब मोजण्यात एक लय झालेली ती चाफेकळी- ती मुक्त झाली, डाव्या नाकपुडीवरची तिची टकटक थांबली. ती परत मधल्या बोटांच्या शेजारी जाऊन उभी राहिली. सभागृहांतील अन्य रसिक श्रोते त्याच्याकडे पाहत होते, किंचित हसतही होते. पण त्याचा तो उरलाच नव्हता. आपण नादात काही तरी विक्षिप्तपणा करतोय हे त्याच्या गावीही नव्हते. एकूणच सभागृहात एकमेकांत परिचय असलेले-नसलेले मुग्धावस्थेत गेलेले श्रोते, खूप जवळची ओळख असल्यागत खुलून बोलत होते. या आधी ऐकलेल्या आणि रंगलेल्या मैफिलींच्या आठवणींची देवाणघेवाण करीत होते. सगळ्यांनाच समाधानाची सम सापडली होती. मीही त्या गायनरंगी हरपून गेलेला एक. माझ्या नजरेसमोरून मात्र ती जलाशयाच्या लाटांवर डुचमळ डुचमळ करणारी करणारी कळशी हलता हलत नव्हती. आणि मला आतल्या आत बंदिशीच्या दुसऱ्या ओळीत खेचत होती. धीट लंगरवा आ मतवारो! क्षणात माझ्या मनात चमकलं, हे गोकुळवासी काहीही वेगळं घडलं की त्या मतवारोच्या नावावर ढकलून मोकळे- सवयच तशी जडलेली. रोटी करपली, रसोई बिघडली, ताक लवंडलं, लोणी पळवलं- सगळं मतवारो! तो विचार तिथंच खुंटला- कारण माझ्या सोबत आलेला माझा मित्र ओठांपाशी कप टेकवल्याचा आविर्भाव करीत मला म्हणाला – ‘‘चिंतू आपणपण ‘भरन’ला जाऊ या रे!’’- सूचना मान्यच होती. आम्ही दोघं कँटीनच्या दिशेनं वळलो. तिथं हीऽऽऽ गर्दी- आरोह-अवरोहाच्या पलीकडले शब्दच शब्द! थक्क करणाऱ्या गायनावर जो तो बोलत होता. तेवढय़ात सदू मला म्हणाला, ‘‘अरे ही रागांची भलती-सलती नावं कुणी ठेवली असतील रे! काय तर म्हणे आडाणा, पण तो शहाण्यासारख गायचा, काय ना यार!’’

मी म्हणालो, ‘‘अरे आडाण्यावर कुठे थांबतोस! या गाणाऱ्यांच्या घराण्यांत या आडाण्याच्या जोडीला खरंच एक शहाणापण असतो – शिवाय आडाणा शहाणा असं संगनमत करूनपण गातात- त्याला जोड राग म्हणतात. च्यायला – बारा स्वरांत बागडणारी ही माणसं. त्यांतलं शास्त्र समजत नसलं तरी गायनरंगी आपण दंगून जातो. म्हणून तर जमतो ना असे!’’

सदू म्हणाला – ‘‘आणि एक तुझ्या लक्षात आलय का! अरे या चीजांचे रचयिते त्या कृष्णाला आणि त्याच्या बासरीला जाम सोडत नाहीत- उठता बसता बन्सी बजैया बासूरीयाँ! आणि कमाल म्हणजे – कृष्णाच्या लीला वर्णन करणारी एक बंदिश आहे म्हणे- तीही कंस रागात – काय ना!’’

मी सदूला लगेच हटकारल- म्हटलं- ‘‘काहीही फेकू नकोस – आणि मला मामा करू नकोस- कंस नावाचा राग बापजन्मीही ऐकला नाही- काय उगाच! पण एक आहे. या कंसाला पुढय़ात घेऊन बसणारे – माल, चंद्र, मधू, आहेत माहितीचे. आणखीनही असतील- आपलं ज्ञान ते काय!’’

सदू म्हणाला- ‘‘बरं कबूल! पण असा राग कुणी निर्माणच करणार नाही याची शाश्वती काय!’’

मी म्हणालो, ‘‘ पण आजमितीला जे नाही ते नाही. आपण का घुसडायचं!

पण तुला ठाम सांगतो – भीम नावाचा मात्र एक राग आहे – विचार कोणालाही! चॅलेंज!’’ मी कशाला चॅलेंज घेऊ! अरे या रागांच्या पसाऱ्यात एक पिलूपण सोडलंय कुणी तरी!’’

मी म्हणालो – ‘‘पिलू सोड रे – अरे झिंजोटी आहे एक – मला तर हे नाव उच्चारलं ना की केस विसकटलेली एक बाईच डोळ्यासमोर उभी राहते-’’

‘‘हो रे मला जाम पटलं- अभिजात संगीताच्या मूळ ग्रंथात या सर्वावर भाष्य असेलही. आपण तिथवर काय पोहोचणार रे! आपली योग्यता त्या डुचमळणााऱ्या गगरीची! नुसते डुबुक डुबुक हिंदोळायचे! आपण काय आत सूर मारणार! नसत्या विषयात डोकवायचं नाही हे बेस्ट!’’

साफ भरकटलेले आम्ही भानावर आलो – खरंच हवेय कशाला चिकित्सा! आनंद घेत दाद देण्याची अवकळ आहे ती बास आहे.

‘‘चोकस बोललास- उद्या कुणी आपल्याला म्हटलं- एक तान घेऊन दाखव हजार रुपये तुझे! जमणार का! अरे ही विद्या म्हणजे साधना आहे म्हणतात- गुरूने म्हणायचे – शिष्याने गिरवयाचे- अशी वर्षांमागे वर्ष!  गुरूने अनुज्ञा देईपर्यंत मध्यभागी स्थान नाही. सूर गोड, भान हरपणारे, पण अध्ययन खडतर! जो टिकेल तो बहाद्दर!’’ सदूने गानतपस्येचे मर्मच विशद केले.

मी म्हणालो- ‘‘अरे कुणाकुणाला तर ओ की ठो कळत नाही- आपण कानसेन तरी आहोत – मान डुलत्ये आपली, दाद देतोय आपण! आणि तानसेन एकदाच जन्माला येतो रे- त्याच्या गायनाने वर्षां व्हायची- दिवे पेटायचे.’’

‘‘आपण त्या इतिहासातला औरंगजेब नाही- तो म्हणे स्वरांचा द्वेष्टा एक नंबरचा! तानसेन जर अकबराच्या ऐवजी याच्या दरबारात असता, तर वाट लागली असती त्याची. बादशहाने त्याला तडीपारच केले असते.’’- सदूने पुस्ती जोडली.

मी म्हणालो- ‘‘सदू आपण बडबड करण्यात माहीर! एका आडाण्यावरून आपण कुठे वाहवत चाललोय रे!’’

– आम्ही भलतेच भानावर आलो. कँटीनमधली गर्दी पांगत होती. जो तो सभागृहाकडे चालला होता- मध्यंतर तसं बरंच लांबत गेलं होतं. तेवढय़ात आठवण झाल्यासारखं जिना चढता चढता सदू म्हणाला – ‘‘एक मजा रे – माझी मामी रे- तिचे वडील गवई होते. हिला त्यातलं ढिम्म नाही. कधी घरी आली ना, तर विषय निघो न निघो, ती सडेतोड म्हणायची- मी त्या आ आ ऊ ऊ च्या बाबतीत ओम नाम ठोम आहे. घरी सारखं ते गाणं ऐकून माझ्या मनात वेगळेच विचार यायचे! अरे, लोकांचे रंजन करणारे हे गवई- पण तोंडात वाचा चांगली नाही- मरे शिवाय बात नाही – धनी मरे, साप मरे, मनी मरे, धप मरे, इकडून तिकडून मरे! मग तरे कोण! आणि उरे कोण! आणि अशा मरेच्या सोबत जोडलेल्या सुरावटीला हे लोक अलंकार म्हणतात- सौभाग्यवतीच्या गळ्यात जसं गंठण तसं गायन शिकायला आलेल्या प्रत्येकाच्या गळ्यात हे अलंकारांचं पठण प्रथम बसवावं लागतं- त्याशिवाय पुढचा श्रीगणेशा नाही!’’

मी म्हणालो – ‘‘गायनाच्या शास्त्र विभागात तुझी मामी मरतडच रे! तिने निदान नोम थोमपर्यंत पोहोचायला हवं होतं- पण सुरापोटी बदसूर अशी अवस्था, गाणं घरात शिजतंय, वाढून पुढय़ात येतंय पण हिला गिळवत नाही- चवच नाही मुळी- सिस्टर ऑफ औरंगजेब! तुझी मामी एकूण गीनेज बुकचं मॅटर आहे.’’

इतक्यात एक अनोळखी इसम जवळ आला. ‘‘तुम्ही गाण्यांतले दर्दी दिसता- रमलायत गप्पांत- खूप गाणं ऐकलेले दिसताय- चेहराच सांगतोय- मी तसा नाही – पण मी कुणाला विचारायच्या भागगडीत पडत नाही- माझ्यासाठी डोळ्यांत पाणी आणतो तो असावरी- उल्हसित करतो तो बसंत!’’- रागांचं इतकं ब्रीफिंग करणारा अनोळखी अवलिया पुढय़ात येऊन माहितीत भर टाकून गेला.

आजचा दिवस अजबच म्हणायचा! कुठच्या तरी फाटय़ावर गेलेलं बोलणं थांबवावं लागलं- मध्यंतराची वेळ संपली होती- किर्र्र बेल वाजवू सूचना मिळाली होती.

आम्ही सर्व गानलुब्ध मंडळी परत सभागृहात स्थानापन्न झालो. तिसऱ्या रांगेतला तो दर्दी श्रोता पहिल्याच निरलसतेने मंचाकडे डोळे लावून बसला होता –

तानपुरे जुळत होते, जवार झंकारत होती, प सा सा सा लयीत सुरू झाले – परत एक माहोल तयार झाला – कुठच्या तरी कोपऱ्यातून- आता बसंत पेश करा – फर्माईश झाली–

आणि

गायकाने स्थिर, घनगंभीर, दीर्घ षड्ज लावला.

वातावरण परत एकदा ब्रह्मानंदी एकरूप होत होतं.
सुमन फडके – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:11 am

Web Title: story 23
Next Stories
1 कथा : संशय
2 व्यवस्था विजिगीषू हवी
3 आवाहन
Just Now!
X