News Flash

कथा : कंट्रोल…

सगळी फुलं कोमेजलेली होती पण त्यांचा सुगंध तसाच होता.

स्वराने डोक्यावरची ओढणी झपकन काढली. घडय़ाळ पाहिलं. बापरे केवढा हा उशीर? पण असं फक्त मनानेच म्हटलं. शरीर घाई करायला तयारच नव्हतं. तिने जरा हालचाल केली तेव्हा तिला कळलं की तिचं अंग जरा आखडलंय. मान गोल गोल फिरवताना तिला जाणवलं की ती खुर्चीवर बसल्या बसल्या झोपली होती. कुणाची तरी वाट बघत होती. मग हळूहळू तिला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागायला लागला. तिने चटकन मोबाइल हातात घेतला, तर कुठल्याच मेसेजचा पॉप अप नव्हता. तिला प्रचंड चीड आली स्वत:चीच. तिने लगेच तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून त्याचा नंबर डिलिट केला. एकदा घराकडे कटाक्ष टाकला. घर तसंच सजलेलं होतं. तिच्या मनासारखं आणि त्याला आवडतं तसं.

समोरच्या टेबलावरच सुंदर फुलांनी सजलेला फ्लॉवरपॉट ठेवलेला होता. सगळी फुलं कोमेजलेली होती पण त्यांचा सुगंध तसाच होता. सोफ्याची कव्हरं, पडदे सगळं तसंच होतं कालच्यासारखं; पण काल जसं ताजंतवानं दिसत होतं तसं आज दिसत नव्हतं. समोरचं शोकेस तसंच होतं लावलेलं, नेटकं पण रात्रभरात त्यावर धूळ साठली की काय असं उगीचच वाटत होतं. एअर फ्रेशनरचा सुगंधही मंदावला होता. सगळं तसंच होतं. पण एका दिवसात कोमेजलेलं. िभतीना मिठी का मारता येत नाही, याचं तिला आजच्या इतकं दु:खं कधीच झालं नव्हतं व्हॉट्सअ‍ॅपवर धडाधड मेसेजेस धडकले. तिने सवयीने त्याचेच असतील म्हणून पटकन फोन हातात घेतला. अर्थात व्यर्थ. बॉसने आजच्या कामाचं शेडय़ूल होतं.

स्वरा पत्रकार होती. सतत कशाचा न कशाचा तरी शोध घेत असायची. सगळ्याच शोधात सत्य शोधत असायची. विखुरलेल्या गोष्टी सावरायची तिला सवय. नोकरीतही ती सवय फार उपयोगी पडली. कामासाठी खूप माणसांच्या भेटी व्हायच्या. माणसांचा संग्रह तसा बराच होता. त्या संग्रहातही ती चोखंदळ. पडखर, सडेतोड; पण आज तिला तिच्या स्वभावातलं काहीच आठवेनासं झालं होतं. तीन-चापर्यंतचा ताप उतरल्यावर कसं गळल्यासारखं होतं तसं काहीसं तिला होत होतं. सगळी ऑफिसची तयारी करून ती कशीबशी त्या सजलेल्या घराला कुलूप लावून घराबाहेर पडली. सजलेल्या घरासोबत काल रात्री सजलेली स्वरासुद्धा आतच अडकून राहिली. तिला बाहेर पडायचं होतं तिची खूप घुसमट होत होती. बरं, समोर कामं तर इतकी दिसत होती की त्यातून स्वत:ला वेळ देणं शक्यच वाटत नव्हतं. त्यात काल सुट्टी टाकली होती. कामाचा ढीग असणार यात काही शंकाच नव्हती. कामाचा विचार करत करत तिने ट्रेन पकडली. बसायला छान खिडकी जवळची जागा मिळाली. वाऱ्याच्या पहिल्या स्पर्शाबरोबर तिला त्याचा आवाज आणि शब्द आठवले.

‘‘स्वरा, येतोय मी आज तुझ्या घरी. निवांत बोलू. सगळ्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावून टाकू. एका सुंदर आयुष्याला सुरुवात करू.’’

कसलं सुंदर आयुष्य? आणि प्रश्नांचं म्हणाल तर त्याने न येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली होती. सगळ्याचाच सोक्षमोक्ष लावला होता. इतक्यात एफएमवर गाणं लागलं.. ‘उसे मुक्का मल कर भी आओ.. वो जो अधुरीसी बात बाकी है.. वो जो अधुरीसी याद बाकी है.. फिर ले आया दिल..’ स्वराच्या अंगावर सरकन् काटा आला. गाणं ऐकता ऐकता तिने ‘त्याचा’ डिलिट केलेला नंबर पुन्हा सेव्ह केला. फरक इतकाच होता, आता तो नंबर त्याच्या आडनावासकट सेव्ह होता. खरं तर ‘त्याचा’ नंबर तिला पाठच होता; पण सेव्ह असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊन त्याचं स्टेट्स चेक करण्याची, ‘ते स्टेट्स आपल्याला तर लागू होत नाही ना?’ हे बघण्याची तिला खोड होती. नंबर पुन्हा सेव्ह करताना तिच्या मनात खोलवर कुठे तरी गलबललं. आजची मनाची तगमग आणि कालची मनाची तगमग यात किती फरक होता? मन स्थिर नव्हतं. तो घरी येणार या आशेवरच मन िहदोळे घेत होतं. घर लावताना आमच्या दोघांचंही असंच घर असेल. ते आम्ही ‘दोघंच’ कसं सजवू, त्यात मी काय काय कुठे कुठे ठेवेन, सगळं सगळं तिचं ठरलेलं होतं.

तिची आणि त्याची फारशी ओळख नव्हती. वर्षभराची ओळख. तेवढय़ा ओळखीत सगळं बदललेलं होतं. अर्थात त्यांनी लग्नाचा निर्णय अजून घेतलेलाच नव्हता. स्वराच्या एका असाइनमेंटसाठी त्यांची भेट झाली होती. तो चित्रकार होता. खूप सुंदर चित्र काढायचा. त्याच्या मनातले सगळे विचार त्याच्या चित्रात दिसायचे, जिवंत व्हायचे. त्याने तिलाही चित्रातूनच प्रपोज केलं होतं. त्याच्या विचारांवर आणि चित्रांवर तिचं प्रेम जडलं होतं. असाइनमेंटच्या नावाखाली भेटी वाढत गेल्या. त्यामुळे तिने एका सुंदर चित्रासारखं स्वत:चं आयुष्य त्याच्यासोबत रंगवलं होतं; पण काहीसं चित्र अर्धवट होतं तेच कदाचित आज पूर्ण होणार होतं. त्यांच्यात स्पष्ट बोलणं असं काहीच होत नव्हतं आणि तेच आज होणार होतं.. तो त्याच्या मनातलं आणि ती तिच्या मनातलं सगळं.. एकमेकांना सांगणार होते. स्वराने स्वत:ला सावरलं आणि खुर्चीत बसून त्या क्षणाची आणि त्याची वाट बघत राहिली.

सहा महिन्यांच्या काळात बरंच काही घडून गेलं होतं. त्याने त्यांच्यात काही नसतानासुद्धा तिच्याकडे पसे मागितले होते. तिने मागचापुढचा विचार न करता त्याला ते देऊनही टाकले होते, वर ‘त्याच्या जागी कुणीही असता तरी मी हेच केलं असतं’ हे उत्तरही. ती चूक त्याच्या लक्षात येऊन त्याने त्याची माफीही मागतली होती. स्वराचं मन पुन्हा विचार करायला लागलं त्या घटनेवर. स्वराने आपण नंतर भेटू.. असा मेसेज करायला तेव्हा फोनही घेतला होता, पण ‘नंतर भेटू’च्या जागी ‘कुठेस?’ असा मेसेज पाठवला गेला. का? तिला नक्की काय हवं होतं? त्याच्यावर विश्वास नव्हता असं नाही, पण होता असंही नाही. त्याच्यासोबत असाइन्मेंट करताना त्याचा स्वभाव ती पडताळून पाहत होती; बरेच काटेकुटे होते, तिला न आवडणाऱ्या गोष्टी होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याचं ‘फक्त स्वत:पुरतं जगणं.’ तिचा स्वभाव मुळीच असा नव्हता आणि आवडलेली म्हणजे त्याची चित्रं आणि त्याचे विचार.. विचारांनी तिला जिंकलं होतं.. ते चित्रापुरतेच मर्यादित होते हे तिला माहीत नव्हतं. त्याची वाट बघता बघता तिला गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा बारा वाजले होते आणि तरीही ती एकटीच होती. तिने मोबाइल चेक केला.. ‘कुठेस?’ हा मेसेज टाकूनही बरेच तास उलटून गेले होते. टेबलावर मांडलेलं जेवणही गार झालं होतं. बरं तो बेल वाजवून वाजवून थकून परत जाणंही शक्य नव्हतं कारण तिची झोप सावध होती आणि आज नेहमीपेक्षा जास्त सावध. तिने फोनचा सपाटा लावला. पण फोन बंद. तिला काही सुचेनासं झालं. शन्नांच्या गोष्टीतल्या प्रियकरासारखा ‘रात्र वेडी असते शहाणी असते ती सकाळ’ असा विचार करून तो सकाळी येईल असं तिला वाटलं. म्हणून ती पुन्हा खुर्चीवर झोपून गेली. झोपण्याआधी त्याच्या मित्रांना मेसेज करून ठेवले. सकाळी जाग आली तरी हा नव्हताच. आता घरात अडकलेली स्वरा होती. सगळा घटनाक्रम आठवून स्वराच्या पापण्या पाणावल्या. अश्रू ओखळत नव्हते, कारण ते गोठले होते त्या सजलेल्या घरात. वरकढी त्याच्या मित्राचा मेसेज, ‘अगं, तो आणि मी काल एका पार्टीला गेलो होतो एका लाउंजमध्ये. त्याने सांगितलं नव्हतं का तुला?’ स्वराचा संताप वाढला. कारण कळत नव्हतं तोपर्यंत ती बरी होती. हे कारण खोटं असावं तिला सारखं वाटत होतं; पण दुर्दैवाने तसं नव्हतं. त्याच्या या व्यसनाबद्दल तिला त्याने सांगितलेलं होतं; पण मी ऑकेजनली घेतो असं सांगितलं होतं. त्याचे ऑकेजन्स सारखे सारखे येतात हे तिला आजच कळलं होतं. त्याहूनही आपली कुणीतरी आतुरतेने वाट बघतंय त्याहीपेक्षा पार्टी महत्त्वाची वाटते याचंही आश्चर्य वाटत होतं. तिला स्वत:चीच लाज वाटत होती; पण मन स्वत:ला मूर्ख म्हणायला तयार होत नव्हतं. त्याचा नंबर पुन्हा डिलीट झाला. तो फोनमध्ये ब्लॉक झाला. मनातून विचार जात नव्हता.. आपण अशा माणसावर का प्रेम केलं असावं? त्याचा बेजाबदारपणा माहीत असूनही? सगळ्यांना कुणीतरी आहे म्हणून? की स्वतचं आयुष्य सिक्युअर व्हावं म्हणून? की फक्त दाखवायला, मलापण कुणीतरी आहे. आपण इतके बेधडक असूनही अशा माणसाच्या मोहात का पडलो? मुळात त्याच्या प्रेमात पडलो की त्याच्या चित्रांच्या? वय अल्लड? त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट स्वरा मूर्ख आहे हेच सिद्ध करत होती; पण स्वरा स्वत:ला मूर्ख म्हणूच शकत नव्हती. ट्रेन थांबली. स्वराची उतरायची वेळ झाली. उतरता उतरता तिला त्याचाही बेजाबदारपणा ठळकपणे दिसायला लागला. तेव्हा सहज तिने स्वतला मूर्ख म्हणून स्वत:च्याच डोक्यात टपली मारली.

तिला प्रत्येक गोष्टीत स्वतला निरखून बघण्याची खूप सवय होती. ती सवय आजही तिने अजमावली. ‘नशीब सगळं आत्ताच कळलं.. लग्नानंतर कळलं असतं तर?’ या भावनेने जखमेवर फुंकर घातली. स्वत:ला थोडय़ा शिव्या घालत थोडी शाबासकी देत स्वरा ऑफिसच्या गेटवर पोहोचली. आत्ता सजलेलं घर आपण पुन्हा आहे त्याच्यापेक्षा छान सजवू या विश्वासानिशी तिने केबिनचा दरवाजा उघडला. तर समोर ‘तो’. त्याचे डोळे बरंच काही सांगत होते; पण तिला ते पहिल्यांदाच वाचता येत नव्हतं. किंबहुना वाचण्याची इच्छाही नव्हती. तिने त्याच्या समोरून जाऊन टेबलावर सगळं सामान ठेवलं. बॉसला नेऊन दाखवायची फाइल उचलली आणि केबिनमधून निघून आली. ‘तो’ फक्त हाका मारत उभा होता. स्वराच्या मनात मात्र दुसऱ्या सजलेल्या घराची स्वप्नं रंगत होती. त्याच्या चित्रापेक्षाही सुंदर.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:09 am

Web Title: story control
टॅग : Control,Story
Next Stories
1 दखल : एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा
2 गंमतजंमत : इमॅजिकामधला बर्फानुभव…
3 पुणे ते काबूल व्हाया युनेस्को!
Just Now!
X