नयना कंपनीच्या आवारातून बाहेर पडली तेव्हा सहा वाजून गेले होते. सवयीप्रमाणे गळ्यातलं आयकार्ड पर्समध्ये ठेवून ती टॅक्सीची वाट बघत होती. ती सी.ए. होती आणि एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. हा निर्णय खरं तर तिला तिच्या मनाविरुद्ध घ्यावा लागला; तोसुद्धा मोहितच्या इच्छेखातर. मोहित आणि तिचं लग्न होऊन आता कुठे वर्ष होत होतं. मोहित त्याच सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या हुद्दय़ावर काम करत होता. लग्नाआधी ती एका सीए फर्ममध्ये काम करत होती. लग्नानंतर दोघांना एकाच ठिकाणी काम करता यावं म्हणून त्याने हा मार्ग काढला होता. लग्न झाल्यावर नंतर थोडे बदल होणार हे तिने गृहीत धरलं होतंच. पण प्रत्यक्षात हे बदल स्वीकारणं तिला कठीण जात होतं. मग ते बदल घरच्या वातावरणातले असोत किंवा नोकरीच्या ठिकाणचे.

मोहित आणि तिचं लग्न रीतसर आई-वडिलांच्या पसंतीने, बघून झालेले. मोहित एकुलता एक, त्यामुळे काहीसा लाडावलेला. त्याने कधी ‘नाही’ हा शब्द ऐकलाच नाही. गोड बोलून स्वत:च काम करून घ्यायला त्याला चांगलं जमायचं. सुरुवातीच्या काळात तो म्हणेल तसं करायला तिची काही हरकत नव्हती, पण नंतर नंतर तो म्हणेल तसं करणं तिला कठीण होत गेलं, आणि कुठे तरी काही तरी चुकतंय हे तिच्या लक्षात आलं, त्यात गेले दीड-दोन महिने तिच्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे असंच वाटत होतं. तसा विचार करायला तिच्याकडे कारणसुद्धा होतं, तिचा मोबाइल, तिचं ई-मेल आकाऊंट, सोशल साइटवरचं तिचं अकाऊंट यावर कोणी तरी नजर ठेवून आहे हे नक्की. तिने या गोष्टीचा उल्लेख एक-दोन वेळा मोहितजवळ काढला, पण त्याने विशेष लक्ष दिलं नाही. नयनाला या सगळ्यामागे कोण आहे याचा शोध घ्यायचा होता, तेसुद्धा मोहितच्या नकळत.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

नयनाने पुन्हा एकदा घडय़ाळात बघितलं आणि टॅक्सी करून ती जयदीपला भेटायला निघाली. टॅक्सीच्या वेगापेक्षा तिच्या विचारांचा वेग अधिक होता. जयदीप काय सांगणार आहे याकडेच तिचं लक्ष लागलं होतं. खरं तर मोहित शहराबाहेर असताना जयदीपला हे असं त्याच्या नकळत भेटणं तिला स्वत:लाच पटत नव्हतं. पण खरं काय घडतंय हे शोधायचं असेल तर हे असं जयदीपला भेटणं भाग होतं. तिने कधीच कुठली गोष्ट लपून छपून केली नाही. तिच्या घरचं तसं वातावरणच नव्हतं. शाळा-कॉलेजमध्ये असताना घडलेली प्रत्येक गोष्ट आई-बाबांबरोबर, बहिणीबरोबर शेअर करण्याची तिला सवय होती. लग्नानंतरसुद्धा ती मोहितबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करत होती. आजही ती जयदीपला भेटायला जाणार असल्याची कल्पना तिने तिच्या आई-बाबांना दिली होती.

जयदीपला भेटायला त्याने बोलावलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली तेव्हा जयदीप तिथे आला नव्हता, ती अस्वथपणे तिथे थांबली, पर्समधून मोबाइल काढून ती जयदीपला फोन करण्याच्या विचारात होती, पण फोन न करताच तिने मोबाइल पर्समध्ये ठेवून दिला. तिला आठवलं जयदीपने त्याला फोन न करण्यास तिला बजावलं होतं. ‘का सांगितलं असेल?’ तिच्या मनातल्या प्रश्नांची शृंखला वाढत अधिक गुंतागुंतीची होत होती. ती किती तरी वेळ रेस्टॉरंटच्या मधल्या पॅसेजमध्ये उभी होती.

घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता, पण जयदीप आला नव्हता. जयदीपशी तिची ओळख होऊन काही महिनेच झाले होते, तो तिच्या मत्रिणीचा- कावेरीचा- होणारा नवरा होता. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांच्या साखरपुडय़ात त्यांची ओळख झाली होती. गेले काही महिने जे तिच्याबाबत जे घडत होतं, त्याचा शोध घेण्यासाठी जयदीप तिला मदत करत होता, तो स्वत: एक प्रोफेशनल हॅकर होता. तो काय सांगेल यावर नयना तिचे पुढचे निर्णय घेणार होती.

‘‘सॉरी, मला उशीर झाला, तुला खूप वेळ वाट बघायला लागली.’’ जयदीपला समोर बघून नयनाला हायसं वाटलं.

‘‘नाही; मला इथं येऊन फार वेळ नाही झाला, तू आधी सांग काय झालं कोण आहे या सगळ्याच्या मागे?’’ ती अधीरपणे विचारते.

‘‘हो, हो सगळं सांगतो, आधी सांग काय घेणार चहा, कॉफी, ज्यूस.’’

‘‘सॉरी, हे मी तुला विचारायला हवं होतं.’’

‘‘नयना, कोणी आधी सांगायला हवं होतं हे फार महत्त्वाचं नाही, तू कुठल्या परिस्थितीतून जातेस याची कल्पना मला आहे, तू सांग काय घेणार?’’ तिच्या चेहऱ्यावरची चिंता त्याच्या नजरेतून सुटली नव्हती.

‘‘नाही, काही नको.’’ तिच्या बोलण्यात अस्वस्थता होती.

‘‘नयना, ज्यूस सांगू तुझ्यासाठी? तुला त्याची जास्त गरज आहे,’’ जयदीपने पुन्हा तिला विचारलं. ती नजरेनेच हो म्हणाली. त्याला नयनाला असं अस्वस्थ बघवत नव्हतं. प्रोफेशनल हॅकर असल्यामुळे आणि सायबर डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे अशा केसमध्ये समोरच्या व्यक्तीची मन:स्थिती काय असते याची कल्पना त्याला होती.

थंडगार ज्यूस घेतल्यावर तिला जरा बरं वाटत ती शांतपणे म्हणाली, ‘‘आता तरी सांग.’’

‘‘नयना, खरं काय आहे हे तर मी सांगणार आहेच, पण हे असं का आहे हे शोधणंसुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मोकळेपणाने देशील?’’

‘‘हो. कारण लपवून ठेवण्यासारखं माझ्याकडे काही नाही.’’

‘‘लपवून ठेवण्यासारखं नाही, मग तू मोहितच्या नकळत ही भेट का ठरवलीस?’’ जयदीपच्या या प्रश्नाने नयना थोडी गोंधळली, पण म्हणाली, ‘‘कारण मोहितसाठी गेले दीड-दोन महिने जे घडतंय ते निवळ माझे भास आहेत, तो खूप विचित्र वागतोय, तो सतत माझ्या आजूबाजूला असतो, मला जरा एकटीला सोडत नाही, काय चाललंय ते कळत नाही.’’

‘‘तो पहिल्यापासून असा आहे.?’’

‘‘नाही. पण तो म्हणेल ते मी करावं हे त्याचं नेहमीचं.’’

‘‘यावरून तुमच्या वाद होतात?’’

‘‘हो कधी तरी. नवरा आहे म्हणून प्रत्येक गोष्ट तो म्हणेल तसं करण्याची अपेक्षाच चुकीचीच आहे, माझी काही मतं आहेत, सोशल लाइफ आहे.’’

‘‘याव्यतिरिक्त तुमच्यामध्ये वाद होण्याचं कारण?’’

‘‘विशेष नाही, पण त्याची एक सवय आहे. माझ्या नावाने आलेले डॉक्युमेंट्स, पत्रं, कार्ड तो बघतो. त्याच्या साठी त्याने बघितलं काय आणि मी बघितलं काय हे एकच. पण असं नसतं ना? माझी स्पेस मला हवी आहे.’’

‘‘हे सगळ दीड-दोन महिन्यांपासून होतंय. बरोबर?’’

‘‘हो.’’

‘‘पण विशेष काही घडलंय का ज्यामुळे हे सगळं असं होतंय?’’

‘‘नाही, मला तरी आठवत नाही.’’

‘‘बरं, मग मला सांग हा अमित कोण आहे?’’ अमितचं नाव ऐकून नयना चक्रावून गेळी.

‘‘तू कसं ओळखतोस त्याला? तो कशाला हे सगळं करेल?’’ कविता जवळजवळ ओरडूनच म्हणाली.

‘‘नयना, मी कसं ओळखतो हे फार महत्त्वाचं नाही. मी फक्त विचारलं कोण आहे?’’

‘‘तो माझा कॉलेजमधला मित्र, काही र्वष अमेरिकेत होता, पण सध्या इथेच असतो.’’

‘‘अलीकडे कधी भेटलीस त्याला?’’

‘‘काही महिन्यांपूर्वी कॉलेजच्या ग्रुपचं गेट टुगेदर होतं तेव्हा पहिल्यांदा. त्यानंतर त्याच्या बहिणीच्या लग्नात, एकाच शहरात राहतो अधूनमधून भेटणं होतं. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि फोनच्या माध्यमातून संपर्कात आहोत.’’

‘‘नयना, त्याचं प्रेम होतं तुझ्यावर?’’

‘‘नाही. तो माझा खूप चांगला मित्र आहे.’’

‘‘आणि तुझं?’’

‘‘प्रेम नव्हतं, पण तो मला आवडायचा.’’

‘‘प्रेम नव्हतं, पण आवडतो म्हणजे नक्की काय?’’ जयदीपच्या या प्रश्नावर नयना विचार करून म्हणाली, ‘‘कॉलेजच्या त्या विशिष्ट वयामध्ये प्रत्येकाला वाटणारं आकर्षण होतं ते, खरं सांगायचं तर एक माणूस म्हणून मला आजही तो आवडतो. एखादी व्यक्ती आवडते म्हणजे माझं तिच्यावर प्रेम आहे असा अर्थ नाही होत. एखाद्या व्यक्तीचं कधी दिसणं, कधी बोलणं, कधी वागणं, काम करणं आवडू शकतं.’’

‘‘नयना तू म्हणतेस त्यातसुद्धा तथ्य आहे, पण आपल्या आवडण्याचा कोण कसा अर्थ घेतं हे जास्त महत्त्वाचं.’’

‘‘तू इतक्या खोलात जाऊन का विचारतोस?’’

‘‘सांगतो. तुझं कधी कोणावर प्रेम असतं तर मोहितला सांगितलं असतंस?’’

‘‘हो, पण हे तू का विचारतोस?’’ नयनाची अस्वस्थता अधिक वाढत गेली.

‘‘मी तुला सगळं सांगतो. पण आधी तू सांग, मोहितला का सांगितलं असतंस?’’

‘‘हो. कारण प्रेम करून लग्न न करणारे किती तरी असतात, आज काल लग्नाआधी ब्रेकअप असणं मला नाही वाटत फार मोठी गोष्ट आहे, मी आणि मोहित लग्नाआधी भेटलो तेव्हा मला मोहितने विचारलं होतं, ‘तुझं कोणावर प्रेम होतं का?’ विषय निघाला तेव्हा अमितचा उल्लेख मी मोहितजवळ केला होता. मीही त्याला विचारलं होतं, ‘तुझं कोणावर प्रेम होतं का?’ मोहितचं एका मुलीवर प्रेम होतं, हे मला समजल्यावर मी पुढे जायचं की नाही हा निर्णय माझा होता. एकदा एखादं सत्य समजलं की कुठलीही शंका, संशय न घेता त्याचा स्वीकार केलात तर तुम्हाला त्रास नाही होत. त्या व्यक्तीशी तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. पण समोरच्याच्या बोलण्यावर विश्वास नसेल, शंका-संशय मनात असेल तर तुम्ही पुढे पाऊल टाकूच नये.’’

‘‘नयना, तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, लपूनछपून ठेवण्याचा तुझा स्वभाव नाही म्हणून तू निष्पापपणे सगळं सांगितलंस, खरं तर कोणाला काय सांगावं काय लपवावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. नयना, मी खरं सांगितलं तर तुला धक्का बसेल या सगळ्यामागे दुसरं-तिसरं कोणी नसून मोहितच आहे.’’

जयदीपचं बोलणं ऐकून नयनाला धक्का बसला, काय घडलं हे समजायला तिला वेळ लागला. तिने शांतपणे जयदीपला विचारलं, ‘‘त्याने माझ्यावर संशय घेतला? तो असा कसा वागू शकतो?’’

‘‘नयना, आहे हे सत्य आहे. तुझी आणि अमितची मत्री त्याने समजून घेतलीच नाही, तुझ्या स्वभावाप्रमाणे अमितबद्दल त्याच्याशी बोललीस, पण त्याने अर्थाचा अनर्थच केला. स्मार्ट फोनच्याच्या युगात स्मार्ट राहण्यासाठी २४ तास ऑनलाइन असतो, फोनला पासवर्ड दिला की आपलं काम झालं असं नसतं, आपल्या नकळत आपण इतरांसमोर फोन वापरताना पासवर्ड वापरत असतो, आपल्यावर नीट लक्ष ठेवून कोणी असेल तर हे सहज शक्य आहे. त्यात तुम्हाला तांत्रिक गोष्टी माहिती असतील तर पासवर्ड हॅक करणं फार कठीण काम नाही, गुगलच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध असते.’’

मोहितचं नाव ऐकून नयना कोलमडून गेली. मोहित असं काही करेल याचा विचारही तिच्या मनात आला नव्हता, जयदीप काय बोलतोय याकडे आता तिचं लक्ष नव्हतं. तिच्या अवतीभवती कोण काय करतं याकडेही तिचं लक्ष नव्हतं. तिच्या प्रश्नाची उत्तरं तिला मिळाली असली तरी त्यातून निर्माण झालेले प्रश्न तिच्या भोवती वेढा घालून उभे होते. ती जितका जास्त विचार करत होती तितका तीव्रपणे तिच्या भोवतालचा वेढा घट्ट होत जात होता. काचेला तडा गेल्यावर ती तुटण्याची शक्यता जास्त असते. ती विचार करत होती तिचं  काय चुकलं? मोहितबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केलं ही चूक होती का? संशयाचं भूत डोक्यात असलेल्या व्यक्तीबरोबर ती आयुष्य जगू शकते का? लग्नाआधी कोणी कोणावर प्रेम केलं/ कोणी आवडत असेल तर कोणी कोणाला सांगूच नये का?
दीप्ती वारंगे – response.lokprabha@expressindia.com