सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
दोन वर्षांपूर्वी अमेयदादामुळे राहुलला ट्रेकिंगची चांगलीच आवड लागली होती. सुट्टी लागली रे लागली तो अमेयदादाच्या खनपटीला बसायचा आणि किमान दोन तरी ट्रेक करायचाच. राहुल आता आठवीत होता. तसा मोठा झाला होता. आता त्याला आणखी बरेच उद्योग खुणावत होते. गेल्या वर्षभरात सोसायटीतल्या बऱ्याच मुलामुलींनी सायकली घेतल्या होत्या. सोसायटीच्याच आवारात ते सायकलवरून हुंडदत असायचे. तशी राहुलने लहान असताना सायकल चालवली होती. पण नंतर सायकलशी फारसा संबंध आला नव्हता. सोसायटीतल्या मुलांचे पाहून त्यालादेखील सायकल घ्यावीशी वाटत होती. पण त्याला खरे आकर्षण होते ते सोसायटीतल्याच सुमित दादाच्या सायकलचे. सुमित दादा पट्टीचा सायकलपटू. अनेक सायकल स्पर्धामध्ये भाग घ्यायचा. त्याची सायकल एकदमच वेगळी. ना त्याला कॅरिअर होते, ना स्टॅण्ड, ना नेहमीसारखे हॅण्डल. रेसिंगच्या सायकलला असतात तसे आत वळवलेले हॅण्डल असलेली आणि अगदी बारीक टायर असलेली त्याची सायकल वजनाला पण एकदम हलकी होती. सुमितदादा ती सायकल थेट चौथ्या मजल्यावर सहज उचलून न्यायचा. सुमितदादा ट्रेकलापण जायचा. पण सायकल त्याला भारी प्रिय होती. ट्रेकिंगला जात असल्यामुळे राहुल एकदम बिनधास्त झाला होता. एकदा त्याने सुमितदादाला गाठलेच.

‘सुमितदादा मलापण सायकल घ्यायचीय, ती पण गिअरचीच, अगदी तुझ्यासारखीच’ राहुलने एका झटक्यात सांगून टाकले. राहुलचा प्रश्न ऐकून सुमितला खूपच आनंद झाला. कोणी आपणहून सायकल घेणार म्हटले की सुमितलाच जास्तच उत्साह असायचा. राहुल अगदी आवडीने ट्रेकला जातो हे त्याला माहीत होतेच, त्यामुळे सोसायटीतल्या इतर मुलांनी सायकल घेतली इतकंच कारण राहुलच्या सायकल घेण्यामागे नसणार हे त्याच्या लक्षात आलं. आता राहुलसाठी योग्य ती चांगली सायकल निवडायचे काम सुमितला करावं लागणार होतं हे निश्चित.

Kalmana, murder,
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा

सुमितने राहुलला विचारले की तुला गिअरचीच सायकल का घ्यायचीय?

‘जोरात पळते म्हणून’ राहुलचे उत्तर तयारच होते.

‘पण जोरात पळवायची असेल तर तुला शहराबाहेर जावे लागेल, तू तयार आहेस का?’

सुमितचा पुढचा प्रश्न तयारच होता.

‘मी तुझ्याबरोबर येईन ना’, राहुलने लगेच तयारी दाखवली.

राहुल नक्कीच येईल याची सुमितला खात्री होती, त्यामुळे आता सायकल घेण्याची मोहीम सुरू करायलाच हवी होती. सुट्टी सुरू असल्यामुळे मग दुसऱ्याच दिवशी राहुल आणि सुमितचा मोर्चा जवळच्याच सायकलच्या मोठय़ा शोरूमकडे वळला. ट्रेकसाठी सॅक घ्यायला म्हणून राहुल त्या दुकानात पूर्वीपण एकदा आला होताच. तिकडे किमान शे-दोनशे प्रकारच्या सायकली होत्या. राहुलने पूर्वीपणे त्या पाहिल्या होत्या. पण आज त्यालाच सायकल घ्यायची असल्यामुळे इतक्या सायकली पाहून त्याला कळतच नव्हते नेमकी कोणती सायकल घ्यायची. मग सुमितदादाने त्याला एकेक गोष्ट समजावून सांगायला सुरुवात केली.

त्याच्या सोसायटीतील सर्व सायकलींना पुढच्या बाजूस सस्पेंशन होते, आणि जाडजूड टायरदेखील. राहुलला वाटायचे अशीच सायकल घ्यायला हवी. पण सुमितदादाने त्याला सायकलचे प्रकार सांगायला सुरुवात केली.

‘हे बघ राहुल, असे जाड टायर आणि सस्पेन्शन माऊंटन बाईकला असतात. डोंगरातून, पायवाटेने, ओबडधोबड रस्त्यावरून जायचे असेल तर हे उत्तम. पण आपण रस्त्यावरच सायकल चालवणार आहोत तेव्हा अशा गोष्टींची गरज नाही. सस्पेन्शनमुळे दरवेळी हॅण्डल वरखाली होत राहते, त्यामुळे अधिक ताकद लावावी लागते.’

राहुलने माऊंटन बाईक पाहणं बंद केले. त्याची नजर सुमितदादाच्या सायकलसारख्या रेसिंग सायकलवर गेली. राहुलच्या मनात काय चाललंय ते सुमितदादाच्या लक्षात आले. सुमित मग त्याला रेसिंग सायकलजवळ घेऊन गेला. ‘राहुल, ही रोड बाइक आहे. याचे टायर रुंदीला कमी आहेत, पण ते मजबूत असतात. याचे हॅण्डलदेखील आत वळलेले आहे. सायकल स्पध्रेत सायकलस्वारासाठी ते फायदेशीर ठरतात. तुला सायकल स्पध्रेत जायचे असेल तर ही सायकल घ्यावी लागेल. पण तुला तर केवळ भटकायचे आहे. त्या ठिकाणी सर्वत्र रस्ते चांगलेच असतील असे नाही, तेव्हा सायकल बोजडपण नसावी. म्हणून तुला हायब्रीड सायकल घ्यावी लागेल. ज्यामध्ये माऊंटन बाईक आणि रोड बाईक अशा दोन्हींची महत्त्वाची वैशिष्ठय़े एकत्र असतात.’

मग राहुल आणि सुमित दोघांनी मिळून काही हायब्रीड सायकली पाहिल्या. गिअरचे राहुलला खूपच आकर्षण होते. सुमितदादा म्हणाला तुला सायकल चालवताना गिअरबद्दल अधिक माहिती देईन. शेवटी एकदोन मॉडेल ठरवून दोघांचा मोर्चा राहुलच्या घरी वळला. राहुलचे बाबा तसे राहुलच्या सगळ्या उद्योगांना प्रोत्साहनच द्यायचे. त्यांना माहीत होते, राहुल काही नको त्या गोष्टींवर पसे उधळणार नाही. तरी राहुल आणि सुमितने ठरवलेली सायकल जरा महागच होती. तेव्हा मग सुमितदादाने राहुलच्या बाबांना समजावून सांगितले की घेतली तर चांगलीच सायकल घ्या, नाहीतर थोडे दिवस थांबा आणि मग घ्या. आत्ता दोन पसे अधिक खर्च होतील, पण ही सायकल टिकणारी आहे. राहुल बरीच वर्ष ती वापरू शकेल.

शेवटी राहुलच्या बाबांनी परवानगी दिली आणि राहुलला सायकल मिळाली. आत्ता पुढचा प्रश्न होताच, चालवायची कुठे? सकाळी रहदारी वाढण्याआधी थोडाफार सराव केला. पण राहुलला सुमितदादाबरोबर शहराबाहेर जायचे होते. मग एकदा त्यांचे ठरले, कर्जतजवळच्या गावांमध्ये सायकल घेऊन जायचे.

ट्रेकसाठी भल्या पहाटे उठून लोकल ट्रेन पकडायची सवय राहुलला होतीच, त्यामुळे अशाच एका भल्या पहाटे सुमित आणि राहुलची जोडगोळी सायकल घेऊन स्टेशनवर दाखल झाली. पुरेसे पाणी, सायकल चालवताना ताकद पुरवणारे पूरक पदार्थ असे सारे सोबत घेऊन पहाटेच्या साडेपाचच्या कर्जत लोकलच्या माल डब्यात सायकली चढल्या. कर्जतपर्यंतचा प्रवास राहुलला ओळखीचाच होता. बदलापूर सोडल्यावर राहुलच सुमितदादाला डोंगराची नावं सांगू लागला. कर्जतला उतरल्यावर दोघांनी आधी पोटपूजा केली आणि सायकलवर टांग मारली.

गिअरची सायकल हवी म्हणणाऱ्या राहुलला आता खरी गियरची मज्जा कळणार होती. सुमितदादाने त्याला पहिला नियम सांगितला, पायडल मारत असतानाच गियर बदलायचा, एरवी नाही. कारण तू गियर बदललास की चेन ज्या चक्रावर फिरत असते त्यावरून गियरनुसार दुसऱ्या चक्रवार जाते. चेन फिरत नसताना गियर बदलला की चेन दुसऱ्या चक्रावर जाताना गडबड होते. आता सुमित त्याला गियर समजावून देऊ लागला. सायकलला पुढे आणि मागे दोन्हीकडे गियर असतात. पण मागील चाक किती वेळात एक चक्र पूर्ण करणार त्यावर सायकल किती वेगात धावणार हे ठरते. पुढे तीनच गियर असतात, मागे बरेच असतात. पायडलच्या फिरण्याचा वेग आणि मागील चाकाला चक्रावर जोडलेली चेन फिरण्याचा वेग यानुसार वेग कसा वाढतो किंवा कमी होतो. पुढे तीन गियर व मागे सहा गियर असतात हे पण त्याने सांगितलं.

राहुल सायकलवर बसला, रस्ता सारा सपाटच होता आणि सायकल पहिल्याच गियरवर असल्यामुळे त्याचे पायडल एकदम गरगर फिरू लागले. सायकल पळेना. मग सुमितदादाने सांगितलेले गणित त्याच्या लक्षात आले आणि मग त्याने पटकन गियर बदलला, हळूहळू सायकलला वेग आला. मागील गियर बदलला, तसं त्याला पायडल फिरवताना जडपणा जाणवू लागला, पण सायकलचा वेगदेखील वाढला होता. आता सायकलने चांगलाच वेग पकडला होता. खरे तर सुमितदादा यापेक्षा वेगाने सायकल चालवत असे, पण आज राहुल बरोबर होता, त्याला सायकिलग शिकायचे होते, त्यामुळे तो अगदी त्याच्या बाजूने सायकल चालवत होता.

आता राहुल चांगलाच सरावला होता, त्याला गियर बदलताना कधी कधी गोंधळ व्हायचा, मग कधी पायडल गरगर फिरायचे, तर कधी एकदम जोर लावावा लागायचा. तेवढय़ापुरती गडबड व्हायची पण लगेच ते दुरुस्त करून तो पुढे जायचा. सायकल चालवण्यातली मज्जा येऊ लागली होती. आणि मग त्याचे लक्ष आजूबाजूला जाऊ लागले.

नुकतीच सकाळ झाली होती, मस्त गार वारा हवेत पसरला होता. गावांना जाग आली होती. काही पोरं रस्त्यावरच खेळत होती, त्यांना चुकवून जाताना ती सर्व मुलं सायकलस्वारांना टाटा बाय बाय करत होती. थोडेसे दूरवर डोंगरांची रांग दिसत होती. त्यातील एक डोंगर राहुलला ओळखीचा वाटू लागला. त्याने सुमितदादाला विचारले, तो पेठचा किल्ला आहे का रे? राहुलने डोंगर ओळखला याचे सुमितला कौतुक होतेच, पण तो सायकल चालवताना हे सारं एन्जॉय करतोय याचा आनंद अधिक होता. कारण आत्ता राहुलचं लक्ष हे केवळ सायकलचे गियर, त्याचे अन्य फिचर यावर नव्हते तर त्याला सभोवतालचा निसर्ग, माणसं याचंदेखील भान होतं. खरे तर सुमितला याचीच जाणीव राहुलला करून द्यायची होती. पण ते न सांगताच होऊन गेलं होतं.

सुमितने सांगितले होते की आपली काही कोणाशी स्पर्धा नाही, उगाच जोरजोरात सायकल चालवून दमायचे नाही, एका लयीत पायडल मारत जायचे. म्हणजे मग दम लागत नाही.

पाचदहा किलोमीटर गेल्यावर दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतांमध्ये मस्त पिकं डोलत होती. आणि त्याच वेळी राहुलच्या सायकलच्या पुढील चाकाचा खडखड आवाज येऊ लागला. सुमितने पटकन राहुलला सायकल बाजूला घेऊन थांबायला सांगितले. राहुलचे चाक पंक्चर झाले होते. असं झालं तर काय करायचं याबद्दल राहुलला काहीच माहीत नव्हते की सुमितदादा काही बोलला होता. पण सुमितदादा तयारीत होता. पंक्चर काढायचं साहित्य त्याच्या सॅकमध्येच होते. राहुलची सायकल आडवी पाडून त्याने पुढील चाक मोकळं केलं. इतक्या सहज चाक निघू शकते हे पाहून राहुलला जामच आश्चर्य वाटले. सुमितदादाने रिममधून टायर सुटं करण्यासाठीचं साधन वापरून लगोलग टायर मोकळं केलं. त्यातून टय़ूूब काढली. त्यात हातपंपाने हवा भरून, टय़ूूब कानाजवळून फिरवत त्याने पंक्चर कोठे आहे ते ओळखले. ती जागा पॉलिश पेपरने थोडीशी घासून स्वच्छ केली आणि जवळचे पॅच लावून पंक्चर बंद केले. पुन्हा त्याच गोष्टी उलटय़ा क्रमाने करून चाक बसवले.

राहुलसाठी हे सारेच नवीन होते. त्याच्या लक्षात आले की हे सोपं तर आहेच, पण शिकायलाच हवं असं आहे.

पुन्हा एकदा राहुलच्या सायकलने वेग पकडला. पण मध्येच एकदम चढ आला. सुमितदादाने सांगितले होते की चढावर पायडल जड झाले की मग दम लागणार. राहुलने गियर कमी केले. पायडल लगेचच पूर्णपणे फिरू लागले, पण मागील गियर हा मोठय़ा चक्रावर असल्यामुळे मागील चाक पूर्ण फिरायला वेळ लागत होता. त्यामुळे सायकल हळूहळू पण राहुलला न दमवता चढ चढत होती. सुरुवातीला राहुलला या चढाची भीतीच वाटली होती. पण ती सुमितदादाच्या टेक्निकमुळे पार पळून गेली.

कर्जतपासून सायकल चालवायला सुरुवात केली त्याला आता दीडदोन तास होत आले होते. राहुल पहिल्यांदाच अशी चालवत होता. त्यामुळे कदाचित थोडासा दमलादेखील होता. पण त्याला मजादेखील वाटत होती. आता ते बऱ्यापकी आतील भागात आले होते. डोंगररांगा जवळ होत्या. जेवायचा ब्रेक घ्यायचा होता आणि मग आले तेवढंच अंतर परत मागं जायचं होतं. वाटेत एक छोटासी वाडी दिसली. वाडीजवळच विहीरदेखील होती. सुमितदादाने ती जागा हेरली आणि ते दोघे तेथील खोपटासमोर थांबले. त्यांनी जेवण सोबत आणले होते. फक्त जेवायला सावली आणि पाणी हवे होते.

खोपटात एक बाई आणि तिची मुलं होती. त्यांचे वडील शेतात काम करत होते. ही दोन शहरातली पोरं सायकलवरून आली आहेत म्हटल्यावर तेदेखील खोपटाजवळ आले. मग सुमितदादा त्यांच्याशी अगदी नेहमीचे मित्र असल्याप्रमाणे गप्पा मारू लागला. कोठून आलात, कुठे चाललात, कशापायी मेहनत करायची असे सारे प्रश्न सुमितसाठी नेहमीचे होते. तोपण न कंटाळता त्यांच्याशी बोलत होता. खोपटातली मुलं राहुल-सुमितच्या सायकलशी लगट करू लागले. नेहमीच पायी चालणाऱ्यासाठी या सायकली म्हणजे गाडीसारख्याच होत्या. त्यांना त्याचे जामच कुतूहल होते. राहुलला थोडी भीतीच वाटत होती. ट्रेकमध्ये डोंगरात कातकरी वगरे लोक भेटायचे, पण असं डांबरी रस्त्यावरच्याच घरात तो कधीच थांबला नव्हता. पण त्याला येथे आश्चर्याचे धक्केच बसत होते. त्या शेतकरी दादांनी घागरभर थंडगार पाणी आणून दिले. जेवायचं काय करणार असेदेखील विचारले. त्यांच्याकडची चटणी, ठेचा देऊ केला. आणि सगळ्यात मस्त म्हणजे जेवण झाल्यावर घट्ट ताक प्यायला दिले. शहरातले छास आणि हे ताक यात खूपच फरक होता.

थोडय़ा वेळाने मग सुमितदादाने त्या खोपटातल्या मुलांना एकत्र केले. त्यांना सायकल समजावून दिली. आणि त्यांच्यातला मोठय़ा मुलाला चक्क सायकलवर बसवले आणि त्याला फेरी मारून यायला सांगितले. तो मुलगा खूपच खूश झाला. त्याला सायकल चालवता यायची, पण घरच्या परिस्थितीमुळे साधी सायकल घेणेपण शक्य नव्हते. त्यामुळे गियरच्या सायकलवरचा त्याचा आनंद काही औरच होता. असा तास अर्धा तास गेल्यावर मग सुमित आणि राहुल परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत सुरुवातीला राहुल शांतच होता.

मग सुमितदादानेच सुरुवात केली. ‘राहुल, अरे आपण आपल्या आनंदासाठी सायकल चालवतो. त्यामुळे प्रदूषण होत नाही हे सारं बरोबर असले तरी या मुलांना कोणतेच वाहन मिळत नाही. शाळेला पण ती पायीच जातात. मग आपण आपल्या सायकली त्यांच्यासमोर किती मिरवायच्या. त्यांना जरा दोन घटका आनंद मिळू दिला तर चांगलंच आहे. आणि हे बघ, त्या शेतकरीदादांनी आपल्याला किती अगत्याने वागवले. त्यांना काही अपेक्षा नसतात. अगदी रात्रीची वेळ असती तर त्यांनी आपल्याला जेवायला दिले असते आणि  झोपायलापण जागा करून दिली असती.

राहुल मनात विचार करू लागला. डोंगरात त्याने अशी खोपटं पाहिली होती. पण सायकलवरून भटकण्याने त्याला अगदी गावा-शहराजवळचीही माणसं नव्याने पाहायला मिळाली होती. सायकिलगचा आनंद तर होताच, पण त्याला माणसांचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले होते. एकदम आनंदी असे.

आता तर त्याचे सायकल चालवणे हे अगदी सहज झाले होते, ना त्याला गियरकडे लक्ष द्यावे लागत होते ना ब्रेककडे. त्याचे सारे लक्ष आता आजूबाजूच्या लोकांवर, शेतांवर, गावांवर होते. एरवी गाडीतून भुर्रकन जाताना हे सारं दिसायचं पण जाणवत नव्हते. त्यासाठी सायकलच हवी. मग किती लांबवर गेलो, किती जोरात सायकल चालवली यापेक्षा कायकाय पाहिले हे महत्त्वाचे ठरते.

चार-पाचच्या दरम्यान ते दोघे कर्जतला पोहचले. लोकल ट्रेनमध्ये सायकल चढवतानाच राहुलच्या डोक्यात पुढच्या सायकल भटकंतीला कुठे जायचे याचे प्लान सुरू झाले होते आणि सुमितदादाला ते न सांगताच कळले होते.