एकसष्टीनिमित्त जमलेली पाहुणेमंडळी आपापल्या घरी निघून गेली. माधवराव निवांतपणे आरामखुर्चीत विसावले. मालिनीबाई म्हणाल्या, ‘‘छानच झाला सोहळा नाही का? खूप मजा आली. सर्व नातेवाईकांचे आपल्याविषयीचे प्रेम पाहून मन कसे आंनदाने भरून आले.’’ माधवरावांनी मालिनीबाईंच्या हातावर हलकेच थोपटले. ‘‘तू सर्वाचे प्रेमाने करतेस त्याचेच हे फळ,’’ माधवराव म्हणाले.

माधवरावांच्या डोळ्यांसमोरील मालिनीसह स्वत:चा जीवनपट उभा राहिला. प्रथम आठवला आपला या उद्यमनगरीत कायम वास्तव्यासाठी झालेला प्रवेश. माधवच्या आयुष्यातील अपवादात्मक , थोडय़ा हटके घटना यांची ती सुरुवात होती. ध्यानीमनी नसताना अचानक रात्री साडेबारा वाजता माधवच्या कोकणातील घराची बेल वाजली. वडिलांनी दार उघडले तर दारात उद्यमनगरीतील जिव्हाळ्याचे व आदरणीय नातेवाईक उभे. त्या काळी घरोघरी फोन नसल्यामुळे, ते तातडीने माधवला ठाण्यातील एका कंपनीत इंटरव्ह्य़ूसाठी हजर राहण्याविषयी सांगण्यासाठी आले होते. त्यांच्या ऑफिसमधील एका सद्गृहस्थांकडून, सदर कंपनीत सरकारी नियमाप्रमाणे काही जागा भरायच्या असल्याचे समजले होते. निरोप देण्याचा दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना स्वत:ला जातीने जाणे भाग पडले होते. माधव उठला, त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. पाहुणे घरी थांबले. माधवने दोन कपडे बॅगेत भरले, सर्व सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन, थोडे पैसे वडिलांकडून घेतले. सर्वाचा निरोप घेऊन रात्री दीड वाजता माधवने घर सोडले. वडील व एक शेजारी यांच्याबरोबर माधव गावाबाहेर दोन-तीन किमीवर असलेल्या हायवे नाक्यावर येऊन मिळाली ती गाडी पकडून स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी निघाला. सकाळी ठाण्याला उतरून जवळच्या बॅगेसह थेट त्या भल्या नातेवाईकांच्या ऑफिसमध्ये गेला. तेथून सदर सद्गृहस्थांची चिठ्ठी घेऊन संबंधित कंपनीत पोचला. जागा भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. रीतसर दोन- तीन अधिकाऱ्यांनी वेगवेगळे इंटरव्ह्य़ू घेतले. मात्र काही गैरसमजुतीमुळे ही संधी निसटलीच. म्हणतात ना, ‘दैव देते नि कर्म नेते’ तसे झाले. आता आला उद्यमनगरीत राहण्याचा प्रश्न. याच नातेवाईकांनी तो मोठय़ा मनाने सोडविला.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

काही दिवसांनी माधवला एका कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून प्रवेश मिळाला. तीन वर्षांत माधवने प्रामाणिकपणा व निष्ठेने काम शिकून त्यात प्रावीण्य मिळवलेच. मुख्य म्हणजे वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. सरकारी प्रावीण्य परीक्षा चांगल्या तऱ्हेने पास झाला. याचाच परिणाम म्हणून कंपनीने दुसऱ्याच दिवसापासून टेंपररी म्हणून नोकरी दिली. सहा महिन्यांनी युनियनकडून ३० माणसांना कायम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. व्यवस्थापनाने माधवला सांगितले, युनियनने तुझा त्यांच्या यादीत समावेश केल्यास आम्ही तुला कायम करू. तुझ्या वरिष्ठांकडून तुझी शिफारस करण्यात आलेली आहे, परंतु युनियन नेते त्यांच्या यादीतील एक नाव कमी करून माधवचे नाव द्यायला तयार नव्हते. शेवटी माधवने आपला मार्ग स्वत:च निवडण्याचे ठरविले. पहिल्याच प्रयत्नात माधवची एका मोठय़ा सरकारी कंपनीत निवड झाली, मात्र तिकडे हजर होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी पहिल्या कंपनीत माधवला त्याचे काम व एकूण गुणवत्ता बघून व्यवस्थापनातर्फे ‘स्पेशल केस’ म्हणून कायम करणार असल्याचे सांगण्यात आले. फक्त युनियनबरोबरची बोलणी पुरी होईपर्यंत थांब, असे सांगण्यात आले. पुढे चार महिन्यांनी युनियनचे ३० जण व व्यवस्थापनातर्फे माधव असे ३१ जण कायम झाले. इथे मात्र माधवला ‘स्पेशल केस’चा तोटा सहन करावा लागला. युनियनचे ३० जण त्यांनी मागणी केल्या दिवसापासून (१ वर्ष पूर्वलक्षी), तर माधव चालू महिन्याच्या १ तारखेपासून कायम झाला. माधवची एक वर्षांची फरकाची थकबाकी बुडाली.

पुढे माधवने भाडय़ाची का होईना, स्वतंत्र जागा घेतली. कोकणातील तेव्हाच्या प्रथेप्रमाणे पाठच्या भावंडांना आपल्याकडे आणून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी वडिलांना हातभार लावला. भावंडं आपापल्या मार्गाला लागल्यानंतर यथावकाश माधवच्या आयुष्यात मालिनीचा प्रवेश झाला.

नंतर आली दिवाळी व कौतुकाचा दिवाळसण. माधवने दोन-तीन दिवस आधीच मालिनीला माहेरी पोहोचविले व स्वत: दिवाळीचा पहिला दिवस आपल्या गावी साजरा करून दुसऱ्या दिवशी आई-वडिलांसह दिवाळसणासाठी सासुरवाडीला जायचे ठरविले, मात्र ऐन दिवाळीच्याच दिवशी एक अपघात होऊन माधवचा डावा हात फ्रॅक्चर झाला. गावातल्या डॉक्टरांनी सांगितले, मेजर फ्रॅक्चर आहे, दोन्ही हाडे मोडली आहेत. ऑपरेशन करावे लागेल. आपल्या गावात ती सोय नाही. आई-वडिलांना दिवाळसणासाठी आणायला गेलेल्या माधवलाच अ‍ॅम्ब्युलन्सने आणायची वेळ आली. कसला दिवाळसण नि काय? मालिनी ताबडतोब उद्यमनगरीला निघून आली. ऑपरेशन झाले. डाव्या हातात स्क्रू व स्टील रॉड बसवून १० दिवसांनी माधव घरी आला. हे माधवच्या एकाच हाताचे तिसरे फ्रॅक्चर होते. पूर्वी गावी शाळेत असताना दोन वेळा हात मोडला होता. खर्च भरपूर झालाच, शिवाय दोन महिन्यांवर बिनपगारी रजा झाली. माधव एका सहकारी बँकेचा सभासद होता. त्यांच्या भागधारक कल्याण निधीतून थोडीशी मदत करण्याची तरतूद होती. फक्त एक अट होती. ऑपरेशन सरकारी- निमसरकारी हॉस्पिटलमध्येच झालेले असावे. माधवचे ऑपरेशन खासगीमध्ये झाले होते. माधवने बँकेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. ज्या गावात सरकारी- निमसरकारी हॉस्पिटलची सोय नसेल त्याबाबतीत आपले मत कळवावे. उद्यमनगरीत मनपाच्या हॉस्पिटलचा तेव्हा फक्त पायाभरणी समारंभ झालेला होता. अध्यक्षांचे उत्तर लगेच आले. ‘स्पेशल केस’ म्हणून योजनेंतर्गत असलेली कमाल मदत तुम्हाला मंजूर करीत आहोत. सर्व कागदपत्रं थेट त्यांच्याकडे पाठवावीत. माधव पुन्हा एकदा ‘अपवाद’ ठरला होता.

पुढे माधव-मालिनीला एक सुंदर कन्यारत्न झाले. मुलगी अगदी गुणी निघाली. शाळेत अभ्यासात तसेच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये हमखास भाग घेत असे. बिल्डिंगमध्येही सर्वाची आवडीची होती. नातेवाईकांत पण सर्वाची लाडकी. तिचे शिक्षण, लग्न सर्व काही अगदी सुखाने, विनाअडथळा पार पडले. जावईसुद्धा अगदी मुलासारखा मिळाला. सासर छान मिळाले.

दरम्यानच्या काळात एका प्रख्यात पण अतिहाव असलेल्या बिल्डरची वक्रदृष्टी माधवच्या कंपनीकडे वळली. त्याने कंपनी ताब्यात घेऊन नाममात्र भरपाई देऊन कंपनी बंद करून टाकली. सनमायका बनविणारी भारतातली पहिली कंपनी, ऐन भरात असताना बिल्डर-मालकाने संपविली. वयाच्या चाळिशीत दुसरी नोकरी मिळणे अवघडच. माधवला आपल्या या आयुष्यातील या योगाचे दु:ख व नवल वाटले. जेव्हा नोकरी बदलण्याची संधी होती तेव्हा ते शक्य झाले नाही. आता नवी नोकरी मिळणे अवघड. जी नोकरी प्रामाणिकपणा व सचोटीने ‘स्पेशल केस’ म्हणून सन्मानाने मिळाली, ती बिल्डरचा हव्यास, स्वार्थी युनियन नेते व सरकारची उदासीनता यांच्या अभद्र युतीने गमवावी लागली.

दरम्यान अजून एक ‘स्पेशल धक्का’ पचवावा लागला. माधवच्या छातीत कधी कधी दुखत असे. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉर्डिओलॉजिस्टना दाखविले. त्यांनी चार दिवस आयसीसीयूमध्ये डांबून ठेवल्यावर टू डी इको साठी पाठविले. त्यांनी निदान केले कऌरर नावाचा हा फार क्वचित आढळणारा हृदयाचा आजार आहे. त्याला निश्चित असे औषधोपचार अजून नाहीत. बिघाड जन्मापासून, पण त्रास ३५-४० वर्षांनंतर सुरू होतो. त्रास वाढू नये म्हणून आयुष्यभर गोळ्या घेत राहणे हाच उपाय आहे. त्यांच्या डॉक्टरी कारकीर्दीत असा पेशंट फक्त दुसऱ्यांदा आला होता. पहिला त्यांनी अमेरिकेतील वास्तव्यात पाहिला होता. इतर डॉक्टरांना अभ्यास व्हावा म्हणून ८-१० कॉर्डिओलॉजिस्ट्सच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा माधवची तपासणी केली. एक प्रकारे ‘मेडिकल मॉडेल’ म्हणून माधवने अनुभव घेतला.

काही दिवसांनी (नोकरी चालू असताना) माधव चौथ्यांदा डाव्याच हाताच्या फ्रॅक्चरला सामोरा गेला. झाले ते असे- माधव आपल्या नातेवाईकाचा आथरेपेडिक सर्जनकडे नंबर लावण्यासाठी स्कूटरने निघाला होता. ओल्या रस्त्यावर स्कूटर स्लिप होऊन माधवला स्वत:च पेशंट म्हणून जावे लागले. चौथ्यांदा हाताला प्लॅस्टर होऊन हात गळ्यात अडकला. याहून कमाल झाली ती सुमारे १०-१२ वर्षांनी. पूर्वी झालेल्या हाताच्या ऑपरेशननंतर २२ वर्षांनी डावा हात दुखू लागला. काहीच कारण घडले नव्हते. पेनकिलर्स घेऊन पाहिली. शेवटी डॉक्टरांकडे जावेच लागले. डॉक्टरांनी एक्स-रे काढला. त्यांनाही आश्चर्य वाटले. पूर्वी जे हाड ऑपरेशन करून स्क्रू ने जोडले होते तेच परत ओपन झाले होते. पुन्हा ऑपरेशन करावे लागणार होते. डॉक्टरांनी ऑपरेशन केले. स्क्रू खोलल्यावर हाडाचे दोन तुकडे चक्क अलग झाले. आता डॉक्टरांनी त्या वेळच्या सुधारित पद्धतीनुसार हातामध्ये स्टील प्लेट व सहा स्क्रूंच्या साहाय्याने तुटलेले हाड जोडले. शरीरात नवीन स्टीलचा ऐवज घेऊन माधव घरी आला. डाव्या हाताची पाचवी दुरुस्ती पार पडली. त्यातल्या त्यात माधवला एकच समाधान होते. चक्क पाच वेळा फ्रॅक्चर होऊनही हात सलामत व जवळपास पूर्वीइतकाच कार्यक्षम राहिला.

मालिनीच्या प्रेमळ व मनमोकळय़ा स्वभावामुळे सर्वच नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी खेळीमेळीचे संबंध होते. उद्यमनगरीत आलेले सर्वच नातेवाईक आवर्जून माधव-मालिनीकडे येत असत व तृप्त मनाने जात असत. कोणत्याही अडीअडचणीला, मुलांच्या चित्रकला, हॅण्डिक्राफ्टकरिता मालिनीताई मदत करतील याची शेजाऱ्यांना खात्री वाटत असे. नोकरी गेल्यानंतर चिकाटीने सुरू ठेवलेला छोटा स्वतंत्र व्यवसाय व त्याला मालिनीबाईंची समर्थ साथ व नेहमी हसतमुख असणे याचे नातेवाईकांना खूप कौतुक वाटे. दोघांविषयी सर्वाची आपुलकीची भावना होती. माधवरावांसारखा किरकोळ विक्री व्यवसाय त्यांच्या घराण्यात कोणी केला नव्हता.

माधवरावांच्या घराण्यात कोणी फार काळ भाडय़ाच्या घरात राहिले नव्हते. इथेदेखील माधवराव अपवादच ठरले. त्यांना आयुष्यात मालकीचे घर घेताच आले नाही. माधवच्या वडिलांनी शिक्षणासाठी लहानपणीच त्यांचे दुर्गम खेडेगाव सोडले होते. नोकरी शहरात केली होती. बरीच वर्षे भाडय़ाच्या घरात राहिल्यानंतर तेच भाडय़ाचे घर खरेदी केले होते. मात्र माधवची पहिली १६-१७ वर्षे त्याच भाडय़ाच्या घरात गेली होती. माधवराव कृतार्थ होते. निदान उत्तरायुष्यात इच्छा झाली तर वडिलांनी स्वत:चे घर घेऊन ठेवले होते तेथे राहता येणार होते.

अपवादांची मालिका अजून संपली नव्हती. एक दिवस मालिनीला छातीत गाठीसारखे जाडसर काही हाताला जाणवले. थोडे दुखतही होते. डॉक्टरांना दाखवले. त्यांनी काही दिवस प्राथमिक उपचार केले व नंतर इतर काही तपासण्या करायला सांगितल्या. विशेषज्ञांनी तपासणी केली व निदान केले ते शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्टय़ा हादरवून टाकणाऱ्या आजाराचे. तशातही माधवराव गमतीने म्हणाले, बघ, आपली पत्रिका किती छान जुळली आहे, अगदी एक दूजे के लिए. माझा हृदयाचा दुर्मीळ आजार व आता तुझाही. असा कोणाच्या वाटय़ाला येऊ नये असा आजार. मात्र आता डगमगून चालणार नाही. नातवंडाची चाहूल लागली आहे. त्याच्या आगमनापर्यंत बरे व्हायलाच पाहिजे. डॉक्टरांनी शक्यतो लवकर करावे लागणारे ऑपरेशन, पुढे घ्याव्या लागणाऱ्या उपचारांची व होणाऱ्या संभाव्य शारीरिक त्रासांची स्पष्ट कल्पना दिली. मालिनीबाईंनी एकच प्रश्न डॉक्टरांना विचारला. मी यातून नक्की व पूर्ण बरी होईन ना? डॉक्टर म्हणाले, निर्धास्त राहा. आजार प्राथमिक अवस्थेत लक्षात आला आहे. काहींच्या बाबतीत तो उशिरा लक्षात येतो व त्यामुळे आजार पसरतो व गुंतागुंत वाढते. आता आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. मधला थोडा काळ त्रास सहन केलात म्हणजे तुम्ही ठणठणीत बऱ्या व्हाल. खुशाल नातवंडाला मांडीवर खेळवाल. बस, ठीक आहे तर. उपचार कधी व कसे सुरू करायचे ते सांगा. मी तयार आहे. मालिनीबाईंच्या उद्गारांनी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. बस ये हुई ना बात? ते म्हणाले. शारीरिक व मानसिक धैर्य तर स्वत:च आणायचे होते. ती तयारी झाली. आर्थिक बाबीचे काय? अर्धे आयुष्य नोकरीत गेल्यामुळे व स्वत:च्या आजरामुळे व्यवसायावरही मर्यादा होत्या. म्हणून परिस्थिती दुबळी नसली तरी हा धक्का सोसण्याएवढी मजबूतही नव्हती. भल्याभल्यांना हा आजार दमवून टाकतो. तिथे या जोडप्याची काय कथा? त्यात दोघांनीही वयाची पन्नास-पंचावन्न वर्षे ओलांडलेली. मात्र याच वेळी काही आप्तेष्ट मदतीला उभे ठाकले. पैशांची काळजी करू नका. आम्ही तत्पर आहोत. तुम्ही उपचारांवर लक्ष केंद्रित करा. सर्व तपासण्या झाल्यावर वेळ न दवडता ऑपरेशन करायचे ठरले व पार पडलेही. सर्वानी मनापासून हातभार लावला. हॉस्पिटलच्या आठवडाभराच्या वास्तव्यात सर्वानी, नातेवाईक, शेजारी यांनी जेवणखाण्याची यथास्थित काळजी घेतली. अगदी ट्रेनने बाहेरून येणारे नातेवाईकदेखील सांगत, आज आम्ही येताना जेवण घेऊनच येत आहोत. कुणाला आज आणायला सांगू नका. हॉस्पिटलचे बिल अदा करताना प्रत्येक जण पूर्ण तयारीने आले होते. कोलमडण्याच्या स्थितीत असणाऱ्या माधव-मालिनीला जवळच्या हातांनी मजबूत आधार दिला. जसा आधार तरुण, मजबूत हातांनी दिला तसाच थरथरणाऱ्या कृश हातांनी दिला तेवढाच नाजूक हातांनीही दिला. हॉस्पिटलमध्ये भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली होती. माधव-मालिनीला जाणवले, अरे, आपण तर खूपच श्रीमंत आहोत. किती प्रेमाच्या माणसांची संपत्ती आपल्यापाशी आहे.

पाच-सहा महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर मालिनीबाई ठणठणीत बऱ्या झाल्या.

माधवरावांचा वाढदिवसही हटकेच होता. शाळा प्रवेशाच्या वेळी असलेल्या शिक्षिकांनी, कशी माहिती नाही पण एक आठवडा आधीची जन्मतारीख नोंदविली. त्यामुळे ती झाली सरकारी जन्मतारीख तर जन्मपत्रिकेत (खरी) वेगळी तारीख होती. पूर्वीच्या काळी वाढदिवस साजरा करणे वगैरे काही नसल्यामुळे याविषयी काही वाटत नसे.

माधवरावांच्या घराण्याला सर्वसाधारणपणे दीर्घायुष्याचे वरदान(?) लाभले होते. वडील, काका, आजोबा, आते वगैरे सर्वानी किमान ८० वर्षे ओलांडली होती. दीर्घायुष्याचे ओझे वाहताना झालेली दमछाक माधवरावांनी पाहिली होती. माधवरावांची इच्छा होती, आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टींना अपवाद ठरलोय. तसेच याबाबतीतही देवाने, दैवाने अथवा नियतीने आपणास अपवाद ठरवावे. आयुष्य उपभोगता येईल एवढेच असावे. भोगण्यासाठी ते लांबवू नये. तेदेखील संपावे ते कसे? तर क्रिकेटमधील क्लीन बोल्ड. चेंडू झप्कन आला, काय झाले ते कळण्यापूर्वीच मधली दांडी गुल! झेल घेतला जातोय की सुटतोय, रनआउट होऊ नये व व्हावे म्हणून दोन्ही पक्ष परस्पर विरुद्ध प्रयत्न करताहेत, प्रसंगी तिसरा अंपायर ‘आहे की गेला’ याची उत्सुकता वाढवतोय अशा प्रकारे विकेट जाऊ नये. अंपायरला बोटदेखील वर करावे लागू नये अशी डावाची इतिश्री व्हावी. माधवरावांच्या मनात विश्वास होता.

‘‘चला, चार घास खाऊन घेऊ, खूप चिंतन झाले.’’ मालिनीच्या उद्गारांनी माधवराव तंद्रीतून जागे झाले.

क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगात आला होता. या वेळी सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत झिम्बाव्वेने चक्क अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यांची गाठ होती त्रिभुवन स्वामीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाशी. भारताने प्रथम फलंदाजी करून ३३० धावा केल्या होत्या. प्रतिपक्षानेही जोरदार टक्कर दिली होती. त्यांच्या ४९ षटकांत ९ बाद ३२० धावा झाल्या होत्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार – जलदगती गोलंदाज त्रिभुवन स्वामी सज्ज झाला होता. झिम्बाव्वेचा कर्णधार मोसांडा ९५ धावांवर नाबाद होता. अकरावा खेळाडू त्याला हिमतीने साथ देत होता. पहिल्याच चेंडूवर मोसांडाने चौकार लगावला. नाबाद ९९. दुसऱ्या चेंडूवर चपळाईने दोन धावा घेताना भारतीय क्षेत्ररक्षकाचा थ्रो अचूक यष्टींवर आदळला होता. त्याच वेळी मोसांडा क्रीजमध्ये पोचला होता. रनआउटचे जोरदार अपील. तिसऱ्या अंपायरने रिप्ले पाहून ‘नाबाद’चा निर्णय दिला. शतक पूर्ण नाबाद १०१. तिसऱ्या चेंडूवर विकेटकीपर व इतरांचे यष्टीमागे झेल घेतल्याचे अपील रिप्लेमध्ये चेंडू बॅटला न लागल्याचे स्पष्ट झाले. तीन चेंडू बाकी. झिम्बाव्वे ९ बाद ३२६ धावा. माधवराव आरामखुर्चीत उत्सुकतेने टीव्हीसमोर. ‘‘अरे असे नको, सरळ क्लीन बोल्ड कर. शंकेला जागाच नका,े’’ माधवराव म्हणाले. त्यांचा ‘त्रिभुवन स्वामी’वर विश्वास होता. चौथा चेंडू सीमापार भिरकावण्यासाठी मोसांडाने जोरदार बॅटचा पट्टा फिरविला. मात्र चेंडू बॅटला न लागता सरळ मधली यष्टी उद्ध्वस्त करून गेला होता. ‘क्लीन बोल्ड’ ‘जिंकलो’ माधवराव जोरात ओरडले. सगळीकडे विजयाचा जल्लोश उडाला. भारताने कडवी झुंज देऊन परत एकदा वल्र्डकप जिंकला होता. मालिनीबाईंना क्रिकेट फारसे आवडत नसे. पण त्याही माधवरावांच्या शेजारी खुर्चीवर बसून मॅचचा व माधवरावांच्या खुशीचा- उत्साहाचा आनंद घेत होत्या.

‘‘चला माधवराव वेळ झाली निघायचं ना?’’ कानाशी गुणगुण ऐकू आली. माधवरावांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू उमटले. शरीर पिसासारखे हलके झाल्याचे जाणवले. शांत चेहऱ्यावर समाधानाचे हसू कायम होते.
श्रीकांत वैद्य – response.lokprabha@expressindia.com