22 February 2019

News Flash

एका हरिणीने..!

योगायोगाने एक हरणाचे पिल्लू त्याच्या जीवनात आले आणि त्याला जणू काही त्याच्या जगण्याचे श्रेयसच सापडले.

आनंद एकदा संध्याकाळी दूरवर फिरावयास गेला. तेव्हा त्याला एक मुलगा दिसला. त्याच्या हातात एक भेदरलेले हरणाचे पिल्लू होते. (प्रातिनिधीक छायाचित्र)

जगावेगळं
प्रदीप जोशी – response.lokprabha@expressindia.com
योगायोगाने एक हरणाचे पिल्लू त्याच्या जीवनात आले आणि त्याला जणू काही त्याच्या जगण्याचे श्रेयसच सापडले. हरणाच्या एका पिलाने वेड लावलेल्या एका माणसाची जगावेगळी गोष्ट.

सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. आनंद राजेशिर्के नुकताच आंध्र प्रदेशात तलामदुगू येथे बँकेत शाखाधिकारी म्हणून रुजू झाला. तलामदुगूच्या तीन बाजूला छोटे-मोठे डोंगर, पहाड होते. सुरुवातीला छोटी-मोठी तुरळक झाडे आणि दूर आत वाढलेले दाट जंगल. त्याच्या आत नक्षलींचा वावर. त्यामुळे तो भाग स्थानिक जनता व त्यांची पाळीव जनावरे यांना वज्र्य होता. त्यामुळे हरणे, कोल्हे व तत्सम प्राणी या भागांत हमखास दिसत.

स्थानिक गावकरी मुले, बायका शेळ्यांना चरायला, लाकूडफाटा गोळा करायला हक्काने जंगलात जात असत. हरणाची मादी जंगलात एखाद्या निर्धोक जागेत आपले पिल्लू ठेवून, खाद्यासाठी जवळपास जात असे. शेळ्यांचे आणि हरणांचे ओरडणे, यात बरेच साम्य आहे. शेळीचा आवाज ऐकून ढोलीत लपून बसलेले हे जगात येऊन दोन-चार दिवसांचे निष्पाप पिल्लू त्याची आई आली समजून बाहेर येत असे. ते या गुरख्यांच्या मुलांना आयतेच थोडय़ा धावपळीने पकडता येई. अन्यथा निसर्गाने दिलेल्या देणगीनुसार चार दिवस वयाचे हे पिल्लू माणूस पकडू शकत नाही.

आनंद एकदा संध्याकाळी दूरवर फिरावयास गेला. तेव्हा त्याला एक मुलगा दिसला. त्याच्या हातात एक भेदरलेले हरणाचे पिल्लू होते. एक तर कोणत्याही प्राण्याचे गोंडस, गोजिरवाणे पिल्लू कोणालाही आवडणारच. एक-दोन वर्षांची निष्पाप मुले किती छान दिसतात. ताबडतोब कडेवर घेण्याची इच्छा होते. तसेच या पिल्लाचे होते.

आनंदने त्या मुलाला विचारले की, तू या पिल्लाचे काय करणार? तो म्हणाला, ‘‘सर, कुछ दिन चुपके से घर मे रखेगा, फोरेस्ट के लोगों को मालूम होने के पहले काटके खायेगा.’’ क्षणभरात कोणताही विचार न करता आनंदने त्याला पिल्लाच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या कोंबडीचे पसे देऊ केले. कारण त्या पिल्लाने आनंदकडे इतके रोखून पाहिले की, ती नजर आनंदच्या हृदयाला भिडली. अगदी प्रथमदर्शनी प्रेम. तो मुलगा पिल्लाला घेऊन आनंदच्या क्वार्टरमध्ये गेला. आनंद एकटाच राहत असल्यामुळे क्वार्टर रिकामेच होते. पिल्लाला एका खोलीत सोडून दिले. पिल्लाचे वय तीन ते चार दिवस, ते अजून चारा खाऊ लागले नव्हते, गावात दुधाची बाटली उपलब्ध नव्हती. इमारतीचा मालक लछ्मा रेड्डी आनंदचा मार्गदर्शक झाला. त्याच्या घरातील मुले खूप खूश झाली. त्यांना आयतेच जिवंत खेळणे उपलब्ध झाले. घरातील बायकांना खूप उत्साह आला. पिल्लाला बोळ्याने दूध, पाणी पाजण्याची व्यवस्था त्यांनी उत्साहाने अंगावर घेतली. ‘‘मॅनेजर साहब के घर मे जिनका पिल्ला, (हरणाचे पिल्लू)’’ गावभर चच्रेची बातमी. एका चर्मकाराने हौसेने घुंगरू लावून पट्टा बनवून पिल्लाच्या गळ्यात घातला. आनंदचे क्वार्टर, बँक आणि रेड्डीचे बंदिस्त घर हे पिल्लाचे कार्यक्षेत्र. शेळ्या, बकऱ्या, गाई, म्हशीमधून ते बिनधास्त फिरू लागले. ते प्राणीही हा नवीन आलेला, पूर्वी न पाहिलेला सवंगडी कोण म्हणून निरखून बघायचे. फॉरेस्ट गार्डपण आला. मॅनेजर आणि रेड्डीच्या घरात पाळलेले हे पिल्लू बघून न बघितल्यासारखे करून निघून गेला. त्यानेच मागे एकदा आनंदला मागे लागून फॉरेस्टच्या घोडय़ावर चांगली मांड कशी असावी याचे शिक्षण दिले होते.

इतक्या लहान वयाचे हरणाचे पिल्लू पाळण्याचा प्रयोग त्या भागात प्रथमच आनंदच्या हौसेपायी झाला असावा, नाही तर वन्यप्राणी सापडला की त्याच दिवशी त्याचा ‘खातमा’ व्हायचा.

गावात एक पाळीव प्राण्यांचा शिकाऊ डॉक्टर होता. तो पाळीव प्राण्यांवर त्याचे प्रयोग करायचा. काही प्राणी त्यांच्या नशिबाने वाचायचे. हरणाचे पिल्लू डॉक्टरचा बहुधा पहिलाच वन्यप्राणी पेशंट होता. त्यामुळे ते पिल्लू बिचारे चार दिवसांत मेले. रेड्डीच्या शेतात त्याला गुपचूप समाधी मिळाली, गळ्यातल्या घुंगरांसह.

काही दिवसांनी अजून एक पिल्लू मुलांना सापडले. एखादी भाजी घेऊन यावी, तशी ही गुराखी मुले ते गोंडस हरणाचे पिल्लू घेऊन आनंदकडे आली. पोत्यातून फक्त डोके बाहेर आलेले, मोठय़ा डोळ्यांचे, भेदरलेले निरागस पिल्लू सगळीकडे टकमक बघत होते. मागच्या अनुभवामुळे रेड्डी कुटुंबाने त्याला भुकेच्या वेळेस शेळीकडे सोपवले. दोन शेळ्या लछ्मा रेड्डीने खास या पिल्लासाठी घरातच बांधून ठेवल्या. त्यांनीही या नवख्या पाहुण्यास स्वीकारले.

राजस्थानातील जोधपूर परिवारात राहणाऱ्या बिस्नोई समाजात हरणाला आणि इतर वन्यप्राण्यांना देवाचा अंश मानतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांची हत्या करीत नाही. चोरटी शिकार, अपघात किंवा आई वन्य श्वापदांचे भक्ष्य ठरल्यामुळे अनाथ झालेले पिल्लू त्या गावात बाळंतीण झालेल्या बाईकडे सोपविले जाते. आपल्या बाळाबरोबर ती हरणाच्या पिल्लालाही दूध पाजते.

हे दुसरे पिल्लू मात्र आनंद तलामदुगुहून बदलून जाईपर्यंत त्याच्याच नाही तर सगळ्या गावकऱ्यांच्या सहवासात वाढले. घुंगरू घातलेले हे पिल्लू इतके माणसाळलेले होते की, सकाळी शेळीच्या दुधाचा पोटोबा झाला, की नंतर घराच्या आजूबाजूला रेड्डीच्या बंदिस्त आवारात गाई, म्हशी, कुत्र्यांची पिल्ले, शेळ्या, मेंढय़ांत ते वावरत असे. रेड्डीच्या नातवांचे ते एक जिवंत खेळणे होते. रेड्डीच्या स्वयंपाकघरात, आनंदच्या क्वार्टरवर आणि बँकेत पिल्लाचा मुक्त संचार असे. त्यामुळे आनंदने त्याचे नाव ‘मुक्ता’ ठेवले. आधी हिरवा चारा, नंतर मटकी, गाजर आणि नंतर शिजवलेले अन्नही ते खाऊ लागले. थोडे मोठे झाल्यावर, थोडा आत्मविश्वास आल्यावर त्याने त्याची फिरण्याची कक्षा विस्तारित केली. वन्यप्राण्यांमध्ये जन्मत: संभावित धोका ओळखण्याची मूलभूत क्षमता असल्यामुळे, असे काही वाटले की, ते पटदिशी त्याच्या संरक्षित क्षेत्रात म्हणजे बँकेकडे, रेड्डीच्या घरात पळून येत असे.

या छोटय़ा गावात आनंदचे ओळखीचे कोणीच नव्हते.  रेडिओ वगळता करमणुकीची साधने नव्हती. संध्याकाळनंतर गावात दारूचे राज्य असे. मंदिरातील लाऊडस्पीकरवरील आरत्या व दारूच्या अमलात चालू असणारी भांडणे, सुखसंवाद यांचे मिश्रण कानावर पडायचे. या अशा वातावरणात ‘मुक्ता’ने आनंदला फार महत्त्वपूर्ण साथसांगत केली. आनंदला एकाकीपणा विशेषत संध्याकाळनंतरचा उदासीपणा अजिबात जाणवू दिला नाही.

लहान प्राणी आणि छोटी बाळे खटय़ाळही असतात. मुक्ताही तशीच होती. ती मुक्त असे आणि इतर जनावरे बांधलेली. ती या बांधलेल्या जनावरांबरोबर अनेक प्रकारे खोडसाळपणा, व्रात्यपणा करत असे. ते बघणं हे आनंदाचं होतं. मुक्ताला आनंदने केलेले लाड, रागावणे, एखादी गोष्ट सांगणे, उदा. ‘जा, त्या कोपऱ्यात बसून राहा,’ ‘इकडे ये,’ ‘नाकाने दार ढकलून घे,’ नीट समजत असे. या गोष्टींना ती माणसासारखाच प्रतिसाद देत असे.

एकदा आनंदचा चहा मुक्ताने धक्का दिल्यामुळे त्याच्या अंगावर सांडला. भाजल्याची कातडीवर जखम झाली. आनंदने तिला प्रतिक्रिया म्हणून दोन-तीन हलक्या लहान मुलाला गमतीने मारतात तशा चापटय़ा मारल्या. त्या वेळी ती खाली मान खालून, मोठा गुन्हा केल्यासारखी जवळजवळ अर्धा तास उभी होती. मधून हळूच आनंदकडे बघत होती. त्याने बघितल्यावर खाली मान घालत होती. हळूच नंतर पुन्हा नजर चुकवून आनंदकडे बघत होती. तो अपराधी, निष्पाप चेहरा, डोळ्यातील भाव आनंद स्पष्टपणे वाचू शकला.

रात्री जेवणापूर्वी पहिला घास तिलाच द्यावा लागे. एकदा गप्पांच्या नादात ती शेजारी असून आनंद तिला घास भरवायला विसरला. नंतर त्याने घास पुढे केला तर ती तोंड फिरवून दूर गेली. सगळ्या घरभर तिच्या मागे फिरल्यावर, तिची माफी मागितल्यावर, मोठय़ा मिनतवारीने स्वारीने शेवटी घास घेतला व रुसून परत दूर पळून गेली.

ऋषी-मुनींच्या आश्रमात, मानवाने प्रथम सर्व दृष्टीने माणसाळलेला जंगलातील प्राणी हरिणच असावा. मानवाला, त्याच्या जगण्यात प्रत्यक्ष उपयोग नसतानाही त्याची हरणाइतकी भावनिक जवळीक दुसऱ्या कोणत्याही प्राण्यााशी झाली नसावी.

आनंदच्या हरिण पाळण्यामुळे गावात एक वेगळ्या प्रकारचा अनपेक्षित सामाजिक बदल आला. आजूबाजूला डोंगरात शेळ्या चरायला घेऊन जाणाऱ्या मुलांना विणीच्या हंगामात हमखास पिले सापडायची. एक चांगले फुकटचे सामिष जेवण एवढाच त्यांचा या प्राण्याकडे बघायचा दृष्टिोकन होता. त्या प्राण्याविषयी कोणतीही सहानुभूती बाळगण्यासाठी, प्राण्याला जिवंत राहण्याची संधीच उपलब्ध नसायची.

ही संधी आनंदमुळे मिळाली. हरिण हा एक निरागस, निष्पाप, आखीव रेखीव, सतेज कांती, अगदी पुराणापासून वेगवेगळ्या वाङ्मयात उल्लेख असलेला हा प्राणी, तोसुद्धा लहान, गोजिरवाण्या पिलाच्या स्वरूपात गावाला जवळून प्रत्यक्ष बघायला आणि हाताळायला कित्येक महिने उपलब्ध झाला. असा गरीब प्राणी मारून खाणे नक्कीच चांगले नाही, हे नकळत त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पिल्लं पकडणे बंद झाले. गावातील, तालुक्यातील वनविभागाचे लोकही आपोआप खूश झाले. यापूर्वी अनेकदा कायद्याचा बडगा दाखवून जे शक्य झाले नाही, ते आनंदच्या हरिण पाळण्यामुळे शक्य झाले.

काही दिवसांनी आनंदची मुंबईला बदली झाली. पहिल्या क्षणांत प्रश्न आला ‘मुक्ता’चे काय? आनंद तिला बरोबर घेऊन जाऊ शकत नव्हता. नंतरचा मॅनेजर झंझट घेणे शक्य नव्हते. गावातील अगदी प्रतिष्ठित लछ्मा रेड्डी वगैरेंनीसुद्धा व्यावहारिक चातुर्य दाखवून, आम्हाला फॉरेस्ट ऑफिसरची झंझट नको म्हणून असमर्थता दाखविली. ते खरेही होते. आनंदकडे दुर्लक्ष केलेल्या वनाधिकाऱ्यांनी नंतर कायदेशीर कारवाई केली नसती, याची काय शाश्वती? एकीकडे आपल्या राज्यात परत जाण्याचा आनंद तर दुसरीकडे मुक्ताला कायमचे जंगलात सोडण्याची वेळ आली ही हुरहूर. इतके दिवस उत्तम माणसाळलेली, सर्व गावची लाडकी मुक्ता, खाण्यापिण्याची कोणतीही काळजी, ददात नसलेली निरागस मुक्ता, जंगल कायद्याचा कोणताही अनुभव नसलेली मुक्ता, तिचे काय होणार? किती महिने, दिवस जिवंत राहणार? तिचा शेवट कसा होणार? उपासमारीने, शिकाऱ्याचे सर्वात सोपे भक्ष्य, का असेच काही, असे अनेक विचार येत. त्यामुळे आनंदची रात्रीची झोप गेली. आनंद रात्री उठून लाइट लावून सोफ्यात बिनधास्त, नििश्चत पहुडलेल्या मुक्ताकडे पाहत बसायचा, मग तर अजूनच वाईट वाटायचे.

गावातील प्रतिष्ठित लोक व इतरांनी सर्व प्रकारे विचार करून शेवटी मुक्ताला जवळच्या डोंगरात सोडायचे ठरविले. येणारा मॅनेजर उशिरा येवो, अशी आनंद आणि गावकरी मंडळी प्रार्थना करू लागले. एक प्रकारे मुक्ताने सर्व गावाला, लहान, थोरांना चांगलाच लळा लावला होता. तिचे आता सर्वाकडून जास्तच लाड होऊ लागले. जणू काही ती आता गावची लेक झाली होती आणि आता परत नांदायला चालली होती. काही उत्साही लोकांनी तर आनंदबरोबर तिचाही निरोप सभारंभ करू या असे सुचविले.

आनंद जाण्याच्या दोन दिवस आधी मुक्ताला जंगलात सोडण्याचे ठरले. आनंद तिला त्या भागात एकदा घेऊनही गेला होता. तिची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. परत येताना गाव जवळ आल्यावर ती सुसाट वेगाने घराकडे एकटीच पळाली, हे पाहून आनंद आणखीनच हादरून गेला.

शेवटी नवीन मॅनेजर आले. दोन दिवस शाखेचे कामकाज दाखविण्यात गेले. अखेर तो कटू दिवस आला. त्या निरागस पाडसाला याची काहीच कल्पना नव्हती. आनंद मात्र रात्रीअपरात्री उठून उगीचच तिला थापटत असे. मुक्ता मोठे डोळे हळूच किलकिले करून, मान दुसरीकडे करून परत झोपी जाई. आनंद मात्र मंद प्रकाशात तिची हालचाल बघत कॉटवर पडून राही. मोठा लाइट लावलेला तिला आवडत नसे. मग ती हळूच आनंदच्या कॉटखाली अंधारात झोपायला जाई. वाढत्या वयामुळे, चांगल्या नियमित खाण्यामुळे तिच्या अंगावर लकाकी आली होती. काळेपांढरे ठिपके एकदम छान दिसायचे. आंघोळ तर कळत नकळत रोजच व्हायची.

रविवारी सकाळी थोडय़ा लांबच्या डोंगरात तिला सोडण्याचे ठरले. दोन दिवस अगोदर गळ्यातील घुंगरू काढून टाकले. तिलाही ते सध्या आवडत नसावे. मोठमोठय़ा उडय़ा मारताना, पळापळी करताना कोणताही आवाज न आल्यामुळे ती खूश होती. मागील आठवडय़ापासून आनंद तिला जाणीवपूर्वक फक्त जंगलात उपलब्ध असलेला हिरवा वाळलेला चारा देत होता. पाणीसुद्धा फार स्वच्छ देत नव्हता; तिने या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या होत्या. गावात काही मुलांनी तिच्यासोबत फोटो सेशन केले. शाळेतल्या काही मुलांनी तिची रेखाचित्रे काढली. शाळेच्या चौकातील सार्वजनिक फळ्यावर, ‘मुक्ता रविवारी जंगलात जाणार’ असल्याचे खडूने मोठय़ा अक्षरांत लिहिले होते.

काही निवडक लोकांनी लछ्मा रेड्डीचे दोन छोटे, चपळ बलांनी चालणारे छकडे घेऊन गावापासून दूरच्या ‘खाप्पर’ देवीच्या पहाडात तिला सोडण्याचे ठरविले. त्या भागात बरीच हरणे, वन्यप्राणी वास्तव्यास होते. तो भाग ताडोबा अरण्याला जवळचा होता.

का कोणास ठाऊक, त्या सकाळी ती आनंदपासून दूरदूरच जात होती, भेदरल्यासारखी वागत होती. तिचे नेहमीचे वागणे, जाणवण्याइतपत बदलले होते. आनंद तिला मांडीवर घेऊन छकडय़ात बसला. तिचा छकडय़ातील हा पहिला आणि शेवटचा प्रवास. हिरवा चारा आणि पाणी भरपूर घेतले होते. रस्त्यात एका ओढय़ाकाठी मुद्दाम थांबून तेथेच वाढलेले गवत आणि पाणी दिले. आनंद जंगलात अगदी धाप लागेपर्यंत खोलवर पहाडात चालत गेला. गळ्यात एक नावाला बांधलेली बारीक दोरी होती. आणलेले डबे एका मंद वाहणाऱ्या ओढय़ाकाठी बसून खाल्ले. या वेळेस मुक्ताला मुद्दाम मोकळे सोडले. ती तेथून जंगलात गेली तरी तिच्या दृष्टीने ते सुरक्षितच होते, पण ती जागची हलली तर नाहीच, उलट आनंदच्या जास्तच जवळ वावरू लागली.

एका जागी मुक्ताला सोडायचे ठरले. पुढे थोडी दाट झाडे व त्याखाली भरपूर गवतही होते. आनंदची धडधड वाढली. शेवटी तो क्षण आलाच. आनंदने तिच्या गळ्यात नावाला बांधलेली दोरी काढली. ‘मुक्ता, जा, तुला मानवी बंधनातून आम्ही मुक्त केले आहे. तुझे जीवन तू जगू शकतेस. जा, तुझे कुटुंब वाढव, सुखी राहा’ असा आशीर्वाद दिला; पण कोण जाणे जवळ जवळ पाच मिनिटे ती घुटमळत राहिली. थोडी दूर जाऊन, पलीकडच्या अफाट मुक्त विश्वाकडे जाऊन परत आली. सर्व जण तिला तुझ्या जगात जा, असे आवर्जून परत परत सांगत राहिले. शेवटी तिला काय वाटले माहीत नाही, पण मोठमोठय़ा उडय़ा मारीत ती दाट झाडीकडे गेली. नंतर एकदा मागे वळली, स्तब्ध उभी राहिली आणि मग निघून गेली.! आजही ती निष्पाप, काही तरी सांगू इच्छिणारी, त्या वेळी जास्तच तजेलदार डोळे असणारी मुक्ता जशीच्या तशी आनंदच्या डोळ्यात, मनात, हृदयात आहे.

तलमादुगु सोडण्यापूर्वी आनंद पुन्हा दोघांना घेऊन त्या जागी गेला. चार तास थांबला, पण मुक्ता आनंदला किंवा गावकऱ्यांना कधीच दिसली नाही. कन्यादानाचा हा हृदयस्पर्शी अनुभव आनंदच्या मनावर कायमचा कोरला गेला, गोंदला गेला.

हरणगाथा

आनंदच्या दृष्टीने अज्ञात प्रवासाला गेलेल्या मुक्ताच्या हुळहुळणाऱ्या जखमेवर ३५ वर्षांनीसुद्धा खपली धरली गेली नाही. या हरणांच्या प्रेमात काय वेडातच आनंद पडला. सुरवातीचा हा हरिणछंद काही वर्षांत अति आवडी (PassiPassion) मध्ये झुकला. भारतातील नव्हे तर जगातील सर्व हरणांशी संबंधित सर्व माहिती गोळा करण्याचा आनंदने सपाटा लावला. त्यातच त्याला ब्रिटिश सरकारची हरिण अभ्यासाची शिष्यवृत्तीही मिळाली.

आनंद सांगतो की हरणांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. सारंग (DearDeer) प्रजातीच्या हरणास भरीव, फाटे असलेली िशगे असतात. ती दर वर्षी गळून पडतात. तसंच सुळे असलेले दात असतात. या हरणांचे प्रकार म्हणजे सांबर, चितळ, पिसोळी. दुसरा प्रकार कुरुंग (Ante lop). या प्रजातीच्या हरणास तलवारी सारखे पिळे असलेली पोकळ िशगे असतात. ही शिंगे त्यांना आयुष्यात एकदाच येतात. त्यांच्या डोळ्याखाली, खुरांच्या बेचक्यात द्रविपड असतात. काळवीट, चिंकारा, नीलगाय, चौर्समिा ही हरणं या प्रकारात मोडतात.

हरणांच्या एकूण १८० प्रजातीपकी भारतात फक्त १० जाती आहेत. तसेच नष्ट झालेल्या दुर्मीळ जाती, हरिणासंदर्भात जगातील विविध वाङ्मय, धार्मिक व इतर उल्लेख, शेक्सपिअरसारख्या लेखकांनी केलेला वारंवार उल्लेख, देशोदेशीची टपाल तिकिटे, नाणी, चलनी नोटा, सन्यातील तुकडय़ांची (Heraldry) चिन्हे, परदेशात झालेले, होत असलेले संशोधन इत्यादी माहितीचे संकलन आनंदने केले आहे. सर्वसामान्य भारतीयांना भारतात आढळणारी हरणं वगळता या अफाट विश्वाबद्दल फारसे माहीत नाही, पण त्यांना हरणांबद्दल औत्स्युक्य आहे.

हा माहितीचा खजिना सांप्रत व भावी पिढीसाठी उपलब्ध करून देण्याची छोटीशी सुरुवात म्हणून भारतातील वेगवेगळ्या शहरांत फोटो, चित्र, प्रदर्शनाद्वारे मांडण्याचा प्रयत्न आनंदने केला आहे. तो या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी सविस्तर व्याख्याने देत असतो. जास्तीत जास्त लोकांना हरणाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळावी म्हणून प्रयत्न करतो.

आनंदने परदेशातील हरिणासंबंधी अनेक म्युझियम आणि डीअर फार्म पाहिले आहेत. तेथील वास्तव्यात आणि नंतरही जगभरात या विषयावरील चालू असणाऱ्या घडामोडींशी आनंदचा कायम संपर्क आला. अशाच प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एखादे म्युझियम, डीअर फार्म भारतात विकसित करावे असे आनंदचे स्वप्न आहे.

First Published on August 24, 2018 1:02 am

Web Title: story of a deer