News Flash

कहाणी एका ‘बच्चू’ची

एक वाघीण मरण पावते आणि तिचा बछडा मागे उरतो.

बच्चू २ जून २०१६ रात्रौ १ वाजता. मोबाइलच्या प्रकाशात एक छोटंसं, गोजिरवाणं वाघाचं पिलू बघताच मनात काळजी, थोडीशी भीती, उत्सुकता अशा अनेक भावनांचा कल्लोळ उठला.

नवलविशेष
रवींद्र वानखडे – response.lokprabha@expressindia.com 
विदर्भात दूर जंगलात एक वाघीण मरण पावते. तिचा बछडा मागे उरतो. तो कसा जगतो, कसा वाढतो, जंगलराजमध्ये कसा तगतो याचा तिथे कॅमेरा ट्रॅप लावून, व्यवस्थित अभ्यास करून मिळालेला हा आगळावेगळा दस्तावेज-

वर्ष २०१६. विदर्भातला कडाक्याचा उन्हाळा ऐन भरात आलेला. ‘तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी’ कवी अनिलांच्या या पंक्ती अगदी शब्दश: खऱ्या ठरत सृष्टी भाजून निघत होती. या वर्षीचा उन्हाळा विशेषत: मे महिन्याचा दुसरा पंधरवडा अधिकच कडक होता. पण कडक उन्हाळा म्हणून वनाधिकाऱ्यांना घरी निवांत बसण्याचं सुख मिळणार नव्हतं.

१९ मे.

वन्यप्राण्यांची बुद्ध पौर्णिमेची पाणवठा गणना सुरू होती. या प्रगणनेसाठी पाणवठय़ाजवळच्या मचाणावर रात्र घालवून परतत असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट नियतक्षेत्रात पचांबा खोऱ्यात एक नर वाघ पाणवठय़ावर मरून पडला असल्याची खबर मिळाली. वाघ/ बिबटय़ाच्या मृत्यूप्रसंगी घ्यावयाच्या खबरदारीबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने एक कार्यप्रणाली निश्चित केली आहे, त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही पार पाडली.

उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राण्यांसाठी जंगलात फारच मोजके पाणवठे उपलब्ध असतात आणि अशा पाणवठय़ांवर वन्यप्राण्यांसोबतच पाळीव प्राणीही येऊ पाहतात. त्यातच बेरकी शिकारी, पोटाकरता शिकार मिळवू पाहणारे वनवासी पाणवठय़ाच्या पाण्यात युरिया मिसळून शिकारीची संधी साधत असतात. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना सतत सावध राहून पाणवठय़ावर नियमित गस्त घालणे क्रमप्राप्त असते.

२६ मे.

चिखलदरा वन परिक्षेत्रातील वैराट राऊंडचे वनपाल आशिष कोकाटे चिखलदऱ्याहून रात्रीच्या वेळी वैराटला परतत होते. कंपार्टमेंट ३४ च्या वरच्या रस्त्यावरून जाताना त्यांना सडका वास आला. एखादा वन्यप्राणी मेला असल्याची या अनुभवी वनाधिकाऱ्याला शंका आली. रात्रीची वेळ असल्याने तपास करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी हद्दीचे वनरक्षक इंगळे यांना दुसऱ्या दिवशी खामदार दरीमध्ये उतरून तपास करण्याच्या सूचना दिल्या. खरं तर इंगळे ‘वजनदार व्यक्तिमत्त्व’ असल्याने त्यांच्याकरता तो तीव्र उतार उतरून खाली जाणं व परत वर येणं म्हणजे डोंगराएवढं काम होतं. पण वरिष्ठांच्या आज्ञा तंतोतंत पालन करणे या बाळकडूला जागून ते एका वनमजुराला घेऊन खामदार दरीत उतरू लागले. कोकाटे यांचा अंदाज बरोबर होता. दरीच्या तीव्र उतारावर एका दगडी कपारीमध्ये एक झरा होता आणि या झऱ्याजवळ एक प्राणी मृत पावला होता. हा प्राणी इतर कोणी नसून वाघीण होती. जंगलच्या राजाचा (इथे राणीचा) मृत्यू म्हणजे अतिशय संवेदनशील बाब! लगेच वॉकीटॉकीवरून चिखलदऱ्याला वनक्षेत्र कार्यालयात, परतवाडय़ाला माझ्या ऑफिसमध्ये, अमरावतीला व्याघ्र प्रकल्प संचालकांच्या कार्यालयाला खबर देण्यात आली.

आठवडय़ाभरात वाघाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना, स्थळही जवळपासचं, आमची चिंता वाढली होती. वाघाचं जंगलातील आयुष्यमान १२ ते १५ (क्वचितच) वर्षांचं असतं, त्यामुळे वर्षांत किमान आठ ते दहा टक्के वाघ मृत्यू पावणं नसíगक मानलं गेलं पाहिजे. पण सर्वसामान्य जनता, पत्रकारांना वाघाचा मृत्यू होतोच कसा, असं अतीव काळजी, प्रेमापोटी वाटत असतं. लगेच शिकारीचा संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे वाघाचा मृत्यू होणं ही वनखात्यात अस्वस्थ करणारी घटना ठरते. परत एकदा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीनुसार सर्व सोपस्कार करण्याचं काम आलंच. मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालक  डॉ. दिनेश कुमार त्यागी, त्यांच्या सोबत अमरावती जिल्ह्यचे मानद वन्यजीवरक्षक जयंत वडतकर, मी स्वत:, शेजारच्या सिपना वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा, भारतीय वन सेवेतील परिवीक्षाधीन अधिकारी अमलेंदू पाठक, सहाय्यक वनसंरक्षक विशाल माळी, यशवंत बहाळे, वन परिक्षेत्र अधिकारी थिगळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रहाटे आणि डॉ. खान, एक निसर्गप्रेमी यादव तरटे आणि इतर १५-२० वनाधिकारी/ कर्मचाऱ्यांचा ताफा खामदार दरीत उतरू लागला.

वाघीण मृत झाली होती ती जागा अतिशय दुर्गम होती. जवळपास ५०० मीटर खोल दरीत उतरायचं होतं. दरीच असल्याने उतरायला पायवाट वगरे काही प्रकार नव्हता. आम्ही उतरू तोच रस्ता ठरणार होता. इतक्या तीव्र उतारावर दोरखंड बांधल्याशिवाय उतरणं फक्त वन्यप्राण्यांनाच शक्य होतं. एकेक पाऊल सावधपणे टाकत आम्हाला खाली उतरायलाच अर्धा तास लागला. दरी तर अजून खोलच होती, आदल्या आठवडय़ात मृत्यू पावलेल्या नराची जागा याच डोंगराच्या दक्षिणेकडच्या पचांबा खोऱ्यात उतरणाऱ्या उतारावर पाचएकशे मीटर खाली होती. खामदार दरीच्या अध्र्या अंतरावर तीव्र उतारावर ही कपार होती, अशा कपारी सािळद्राच्या अनेक पिढय़ांनी तयार केलेल्या बिळाच्या पडझडीने तयार होतात. वाघ, बिबटे, अस्वलं, तरस असे निशाचर प्राणी दिवसभर विश्रांतीकरता तसेच बच्च्यांना जन्म देण्यासाठी अशा कपारींचा वापर करतात, कारण अशा कपारींमध्ये मानवी हस्तक्षेप होण्याची शक्यता कमी असते.

कपारीसमोरच्या दगडाळ भागात वाघिणीचा अर्धवट कुजलेला देह पडला होता. वाघिणीचा देह कुजत चालला असला तरी तिचे सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे प्रथमदर्शनी तर शिकार नसल्याची खात्री पटली. कोणत्याही दोन वाघाच्या अंगावरील पट्टे एकसारखे नसतात, त्यांच्या पॅटर्नवरून त्यांचे नेमकंपण ठरतं आणि त्याचं टी-सीरिजमध्ये नामकरण होतं. मला सकाळीच व्हॉट्सअ‍ॅपवर वाघिणीचा फोटो मिळाल्याने माझ्या लॅपटॉपवरील वाघांच्या रेफरन्स अल्बमवरून वाघिणीची ओळख पटवण्यात अडचण आली नाही, ती टी-१५ होती. सन २०१५ मध्ये याच वाघिणीचा तीन युवा बछडय़ासह नजीकच्या गांजाखांडी येथे कॅमेरा ट्रॅपमध्ये फोटो मिळाला होता.

वाघिणीचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाला असावा, स्थळ साधम्र्यामुळे दुसरी शंका होती की दोन्ही वाघ विषप्रयोगाने तर मेले नसावेत ना? कारण काही दिवसांपूर्वी वरच्या पस्तलाई गावात वाघाने एक गाय मारली होती. वन्यप्राण्यांकडून मारल्या जाणाऱ्या पाळीव प्राण्यांची, पीक नुकसानीची, मनुष्यहानीची नुकसानभरपाई वन विभागाकडून दिली जाते तरीही एक सूड भावना म्हणून मारलेल्या प्राण्यांवर विष फासण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. हा त्यातलाच प्रकार होता की काय ते लगेच कळायला मार्ग नव्हता. जंगली प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवयवांचे नमुने तपासणीसाठी न्यायिक वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले जातात, त्यानुसार वाघिणीचा विसेरा व इतर अवयवांचे नमुने घेतले गेले, मानद वन्यजीव रक्षक, एनटीसीएचे प्रतिनिधी अशा त्रयस्थ पंचांच्या समक्ष पंचनामा करून वाघिणीचा दाहसंस्कार करण्यात आला. काळोख होऊ लागल्याने व दूर जायचं असल्याने प्रकल्प संचालक व इतर मंडळी परतू लागली, पण माझा पाय काही निघेना. वाघिणीची चिता पूर्ण विझेपर्यंत थांबायचं ठरवलं, माझ्यासोबत सुनील, अमलेंदू व इतर कर्मचारीही थांबले.

वाघिणीची चिता पूर्ण विझली आहे, देहाचा कोणताही भाग शिल्लक राहिलेला नाही याची खात्री करून आम्ही निघालो. एव्हाना पूर्ण काळोख पडला होता. अशा अवघड जागी काळोखात थांबणं म्हणजे जरा वेडेपणाच होता. आता वर जायची कसोटी होती, दरीत खाली उतरायला वेळ कमी लागतो, पण चढ चढणं म्हणजे जास्त त्रासदायक, वेळखाऊ असतं. दोरखंडाला धरून आम्ही वर जायला सुरुवात केली, अगदी पुढे सुनील होता. त्याच्या मोबाइलच्या प्रकाशात वाटचाल चालू होती. आम्ही गुहेपासून शंभर एक मीटर वर आलो असू, अचानक सुनील हळू आवाजात आम्हाला ऐकू जाईल असं पुटपुटला ‘सर, कब!’. एक क्षण तो काय म्हणतोय ते क्लिक झालं नाही आणि लख्खकन डोक्यात प्रकाश पडला अरे, सुनील वाघाच्या बच्च्याबद्दल सांगतोय.

या वाघिणीची पिलं असतील ही शक्यता आमच्या लक्षात आलीच नव्हती. मोबाइलच्या प्रकाशात एक छोटंसं, गोजिरवाणं वाघाचं पिलू बघताच मनात काळजी, थोडीशी भीती, उत्सुकता अशा अनेक भावनांचा कल्लोळ उठला. त्याच उत्साहात मी त्याला पकडण्यासाठी पटपट पावलं उचलली, पण त्याने त्याची दिशा बदलली आणि ते खाली जाऊ लागलं. अंधारात त्या उतारावर त्याच्या मागे जाणं शहाणपणाचं नव्हतं. सहसा वाघीण एका वेतात किमान दोन ते तीन पिल्लांना जन्म देते, त्यामुळे अजूनही एखाददुसरा बच्चा असण्याची शक्यता असल्याने उद्या सकाळी शोध घेऊ असं म्हणत आम्ही वर जाऊ लागलो. साधारणत: पाऊण एक तासाने आम्ही वर आलो. उद्या सकाळी परत यायचंच आहे या विचाराने मी वैराटला वनरक्षकाच्या एका रिकाम्या निवासस्थानात मुक्काम करायचं ठरवलं. सुनील आणि अमलेंदूला परतवाडय़ाला परत पाठवलं.

अधिकृतरीत्या वाघांचे टी-सीरिजमध्ये नामकरण होत असले तरी वाघाचं अंग वैशिष्टय़, ठिकाणावरून त्याचं वेगळं नामकरण होत असतं. त्यानुसार आदल्या आठवडय़ात मृत पावलेल्या नराचं ‘पचांबाचा राजा’ तर या मादीचं ‘खामदारची राणी’ असं नामकरण झालेलं होतं. या राजा-राणीचा पाठोपाठ झालेला मृत्यू कशामुळे झाला असेल, राणीचे अजून बच्चे असतील का? हा बच्चा राणीचाच आहे की आणखी कोणाचा आहे? इत्यादी विचार करता करता  शारीरिक थकव्यामुळे झोप लागली. सकाळ कधी झाली हे कळलंच नाही.

रात्री दिसलेला मांजरीच्या आकाराचा तो गोंडस बच्चा नजरेसमोर येत होता. सकाळ होताच आमची वानरसेना दरीत उतरू लागली. आम्ही उत्साहाने निघालो खरे, पण समोर एक वेगळंच संकट उतरत होतं. अस्वल महाराज आपल्याच धुंदीत समोरच्या पहाडीवरून गुहेच्या दिशेने जात होते, ‘झालं.. आता त्या पिलाचं काय होतंय’ अशी धाकधूक सुरू झाली. अस्वल दूर होईपर्यंत आम्हाला काही करता येत नव्हतं. शेवटी अस्वल त्याच धुंदीत पुढे निघून गेल्यावर आम्ही गुहेपाशी आलो. पण तो बच्चा काही दिसत नव्हता. त्याचा शोध तसंच वाघिणीच्या मृत्यूबाबत काही धागेदोरे लागतात का, हे पाहण्यासाठी तो परिसर िपजायचा निर्णय घेतला. सुनील आणि अमलेंदूलाही न राहवल्याने ते परतवाडय़ावरून आले होते. आमच्या सोबत विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (रळढा) वीसेक तरुण जवान होते. सगळा परिसर िपजून काढला, पण हाती काही लागलं नाही, नाही म्हणायला बच्च्याची विष्ठा असावी असं वाटणारी एक छोटी विष्ठा मिळाली. पुढे ती विष्ठा डीएनए परीक्षणासाठी सीसीएनबी, हैदराबाद येथे पाठवली असता त्याची गुणसूत्रं मृत वाघिणीशी मिळतीजुळती असल्याचं निष्पन्न झालं. या पिल्लाचा बाप तो मृत नर वाघ असावा का ही शक्यता पडताळून पाहिली, पण त्याचं काही नातं नसल्याचं दिसून आलं.

दिवसभराच्या परिश्रमाचं चीज झालं नाही, पण रात्री काही हाती लागू शकतं या विचाराने त्या परिसरात आम्ही दहा कॅमेरा ट्रॅप लावले. इथे कॅमेरा ट्रॅपचं महत्त्व सांगायला हवं. वन्यप्राण्यांच्या नेहमीच्या फिरण्याच्या, पाणवठय़ावर जायच्या यायच्या वाटा मळलेल्या असतात. अशा वाटांवर दोन बाजूंनी जमिनीपासून एक-दीड फुटावर झाडाला कॅमेरे बांधले जातात. या कॅमेऱ्याच्या समोरून कोणीही प्राणी, पक्षी, एखादी व्यक्ती गेल्यास ती कॅमेऱ्यात कैद होते. हे कॅमेरे रात्रीही काम करत असतात. व्याघ्रगणनेसाठी हे कॅमेरे अतिशय उपयुक्त व खात्रीशीर ठरले आहेत. त्यामुळे वाघांच्या संख्येबाबत शंका घेण्यास आता फारसा वाव नसतो.

िहमत न हारता पुढचे तीन दिवस आमचं कोम्बिंग ऑपरेशन चालूच होतं, पण हाय! हाती काहीच लागत नव्हतं. कॅमेरा ट्रॅपमध्ये एका मुंगुसानेच काय तो फोटो काढून घेतला होता, आमचा ‘बाल कलाकार’ काही पुढे येत नव्हता. ३१ तारखेला एके ठिकाणी कोंबडीचे तुकडे ठेवले, त्या आमिषाने तो येतो का पाहायचं होतं. एक जून उजाडला, कोंबडी फस्त केलेली, पण तिथल्या कॅमेऱ्यात काही दिसलं नाही, मात्र गुहेजवळच्या कॅमेऱ्यात का होईना बच्चूचं पहिलं दर्शन झालं. बच्चू आमच्या हाती येत नव्हता आणि हाती आला असता तर माणसाच्या संगतीत वाढवणं म्हणजे त्याला जन्मठेप दिल्यासारखीच होणार होतं. कारण माणसाच्या संगतीत वाढलेले वन्यप्राणी जंगलात स्वत: शिकार करण्यास असमर्थ ठरतात, शिकाऱ्यांना सहजसाध्य होतात हा अनुभव आहे. त्यामुळे सर्वानुमते असं ठरलं की बच्चूला नसíगक वातावरणातच वाढू द्यावं, होता होईल तेवढी मदत व संरक्षण देऊ. या आमच्या निर्णयाने आम्हाला उत्साह आला. बच्चूला पकडण्याच्या भानगडीत न पडता त्याचं संगोपन करण्यासाठी गुहेत कोंबडी ठेवली.

या पुढच्या सात-आठ दिवसाची डायरी पाहणं गमतीशीर ठरेल.

२ जून – बच्चू कोंबडी खात असल्याचा फोटो मिळाला. परत कोंबडी ठेवली.

३ जून – बच्चू कोंबडी खात असल्याचा फोटो मिळाला. आज चार ठिकाणी कोंबडी ठेवली.

४ जून – बच्चूचा फोटो मिळाला. कोंबडी ठेवण्यात आली.

५ जून – बच्चू फोटोत आला नाही. कोंबडी ठेवली नाही.

६ जून – बच्चू गायब. परत कोंबडी ठेवली.

७ जून – ट्री पाय आणि मुंगुसाने कोंबडीचा आस्वाद घेतला. बच्चू येऊन गेला, पण त्याला कोंबडी मिळाली नाही, म्हणून जिवंत कोंबडी (प्राणी क्रूरता कायद्याची क्षमा मागून) ठेवली.

८ जून – बच्चूने जिवंत कोंबडीचा फडशा पाडला.

हाच क्रम थोडय़ा अधिक फरकाने पुढचा महिनाभर चालू होता, जवळपास रोजच बच्चूने कोंबडी खाल्ल्याचे फोटो मिळत होते. आमच्या प्रयत्नांना बच्चूने दिलेला प्रतिसाद बघून आमचा उत्साह दुणावला. पण या सगळ्या मागे आमच्या एसटीपीएफच्या जवानांचे अथक परिश्रम कारणीभूत होते. मी आठ-दहा दिवसांनी एक चक्कर मारत असे, पण काही ठरावीक जवानांची ही डय़ूटीच लावली होती की रोज दरीत उतरायचं, कोंबडी ठेवायची, कॅमेरा ट्रॅपमधून कार्ड काढायचं, रीड करून फोटो मिळवायचे. हा सगळा खटाटोप म्हणजे शारीरिक, मानसिक बळाची परीक्षा घेणारा होता. दुर्दैवाने पुढे एक अप्रिय घटना घडलीच.

१९ जूनला गुहेच्या वरच्या बाजूस पस्तलाई-वैराट रस्त्यावर तर २९ जूनला गुहेपासून दोनशे मीटरवर हवाकांडी या ठिकाणी प्रौढ वाघाच्या पायाचे ठसे मिळाले. आमच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. हा प्रौढ नर असेल तर बच्चूचं काही खरं नाही. पण नंतर फोटोवरून पडताळणी केली असता असं लक्षात आलं की ती प्रौढ वाघीण होती आणि बच्चूच्या आईच्या आधीच्या वेतातली होती, म्हणजे थोडक्यात बच्चूची मोठी बहीणच की! एकाच मातेच्या कुशीतली ही दोघं असल्याने बहिणीकडून कळत नकळत बच्चूचं संरक्षण झालं असावं असं मला मनोमन वाटतं. अर्थात कॅमेरा ट्रॅपमध्ये या दोघांचा एकत्रित फोटो कधीही न मिळाल्याने माझ्या मताला पुष्टी मिळाली नाही.

बच्चूच्या खाण्यात अनेक स्पर्धक निर्माण झाले होते, सुरुवातीला ठेवलेले कोंबडीचे छोटे तुकडे पक्षी पळवायचे म्हणून मोठे तुकडे ठेवू लागलो. पुढे अख्खी कोंबडी ठेवू लागल्यावर उदमांजर दादागिरी करून बच्चूच्या तोंडचा घास पळवत असे. एका फोटोत चक्क दिसत होतं की उदमांजर कोंबडी खात आहे आणि बच्चू आशाळभूतपणे तिच्याकडे बघतोय. हे लक्षात आल्यावर आम्ही गुहेत एक मीटर उंचीवर कोंबडी बांधायला सुरुवात केली. कोंबडी खायला सोकावलेलं उदमांजर तरीही मानेना म्हणून त्याला पकडण्यासाठी िपजरा लावण्यात आला. पण त्याचा परिणाम उलटाच झाला, बच्चूला त्यात धोका वाटला आणि तो दोन दिवस फिरकलाच नाही. शेवटी नाइलाजाने िपजरा काढून घेतल्यावर परत बच्चू निर्धास्तपणे येऊ लागला. मध्यंतरीच्या काळात आम्ही मटण देण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यात एक धोका होता की मटणाची चटक लागली तर मोठा झाल्यावर बच्चू गावातल्या शेळ्यांकडे मोर्चा वळवू शकतो, म्हणून आम्ही (खरं तर बच्चू) परत कोंबडीकडेच वळलो.

हा क्रम जुल, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातही चालू राहिला, अधूनमधून एखाददुसरा दिवस बच्चू फोटोत दिसत नसे, मात्र उदमांजर नियमितपणे येत होती. बच्चूसोबत कोंबडी शेअर करत होती किंवा एकटीच फस्त करत असे. ३० ऑगस्टला परत एका प्रौढ वाघाच्या पायाचे ठसे दिसले. आता बच्चू मोठा होत चालला होता म्हणून त्याचं डाएट वाढवायचं ठरवलं. एकाच्या जागी दोन कोंबडय़ा ठेवू लागलो. पण बच्चूबाळ इतका शहाणा होता की एक कोंबडी पूर्णपणे खाल्याशिवाय अधाशासारखं दुसरीला तोंड लावत नसे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आम्हाला काळजीत टाकून बच्चू आठवडाभर गायब झाला. बच्चू असा गायब झाला की एकीकडे काळजी वाटायची, पण तो परत आला की वाटायचं की चला आता हळूहळू याचं आपल्यावरचं अवलंबन कमी होत चाललं आहे.

बच्चू मोठा होत चालला तशी त्याची धिटाई वाढत चालली, आता बच्चू आधी खात असे आणि उदमांजर बच्चूकडे आशाळभूतपणे पाहत असे. तो गेल्यावर उरलंसुरलं खात असे. दर १५-२० दिवसांनी पस्तलाई रस्त्यावर बच्चूच्या बहिणीचा वावर जाणवत असे. हा क्रम २० नोव्हेंबपर्यंत निर्वेधपणे चालू होता.

२१ नोव्हेंबर, एसटीपीएफ जवान सुरेश कसदेकरच्या जीवनातला महाभयंकर दिवस! नेहमीप्रमाणे कसदेकर आणि आणखी एक जवान रवी इवनाते दरीत उतरत होते. आमचे एसटीपीएफचे सगळे जवान मेळघाटात लहानाचे मोठे झालेले, त्यांना आपल्यापेक्षा जंगली प्राण्यांचा वास पटकन लागतो. पण ती वेळ बरोबर नव्हती. बांबूच्या एका बेटाच्या मागे अस्वल वाळवी व शेणकिडय़ांच्या अळीच्या शोधात जमीन उकरत होतं. सुरेश-रवीचं मागील चार-पाच महिने रोजचं जाणं येणं असल्याने आता ही त्यांच्या पायाखालची वाट झाली होती. त्यामुळे सुरेश आणि रवी तसे निर्धास्तपणेच उतरत होते, सुरेश पुढे होता. त्याला बेटाच्या आड असलेलं अस्वल दिसलं नाही.

सहसा जंगली प्राणी माणसाच्या वाटेला जात नाही, पण स्वसंरक्षणार्थ ते हल्ला करू शकतात. अस्वलांची दृष्टी कमजोर असल्याने (जंगलात माणसाची तर असतेच) मेळघाटसारख्या दाट जंगलात अस्वलाशी आमनेसामने होण्याच्या दरवर्षी १५-१६ घटना घडत असतात. एखाददुसऱ्या घटनेत जीवितहानीही होते. अस्वल मागच्या दोन पायांवर उभं राहिल्यावर माणसाचं डोकं त्याच्या हाती सापडतं, त्यामुळे बहुतांशी वेळा माणसाचा चेहरा ओरबाडला जातो. अस्वलाची अणकुचीदार नखं एकदा घुसली की पूर्ण मांस ओरबाडून काढल्याशिवाय बाहेर निघत नाही. अति रक्तस्राव, जखमांमधील जंतुसंसर्गामुळे काहीवेळा प्राणहानीही होऊ शकते.

अस्वल आवाज करून धावून आल्यावर सुरेश पुढे खालच्या बाजूला पळाला तर रवी मागच्या मागे वर पळाला. अस्वलाने पाठमोऱ्या सुरेशला कवटाळल्याने सुरेशच्या कपाळावरचं मांस ओरबाडलं गेलं आणि चेहऱ्याची नाकापासूनची उजवी बाजू बाहेर लटकू लागली. अस्वलाने खाली पडलेल्या सुरेशला तिथंच कारवीच्या दाट जाळीत सोडून पळ काढला. कारवीच्या दाट जाळीमुळे सुरेश दरीत पडण्यापासून बचावला होता. अस्वल निघून गेल्यावर रवी आवाज देत देत परत खाली उतरला, त्या अवस्थेतही सुरेशने त्याला प्रतिसाद दिला. रवीने िहमत न हरता आपल्यापेक्षा उंच सुरेशला पाठीवर घेतलं आणि १०० मीटर तीव्र चढ चढून वर आला. रस्त्याच्या कडेला सुरेशला बसवून दीड दोन किलोमीटरवरच्या पस्तलाई गावाकडे धाव घेतली. तिथून एका मोटारसायकलवाल्याला सोबत घेऊन मोटारसायकलवरून सुरेशला पस्तलाई गावात नेलं आणि वैराटला वनरक्षक तायडेना ही बातमी दिली.

खरं तर त्या दरीत उतरण्यासाठी मी आणि अमरावतीचे उप वनसंरक्षक हेमंत मीणा यांनी आदल्या दिवशी ढाकणा येथे मुक्काम केला होता. पहाटेच चार वाजता आम्ही ढाकण्याहून निघालो होतो, कोहा, सिपनाखांडीमाग्रे वैराटला नुकतेच पोचलो होतो आणि ही बातमी मिळाली. माझं काळीज क्षणभर थांबल्यासारखं झालं. हे काय भयानक होऊन बसलं होतं. आम्ही लगेचच पस्तलाईकडे धाव घेतली. सुरेशची अवस्था पाहून भडभडून आलं. या पोराने बच्चूसाठी आपला जीव पणाला लावला होता. सुरेशला एका घरासमोरच्या ओटय़ावर झोपवलं होतं आणि त्याचा चेहरा झाकला होता. मी सुरेशला त्याच्या नावाने आवाज दिल्यावर त्याने हुंकार दिल्यावर मला थोडं हायसं वाटलं. आम्ही ताबडतोब सुरेशला चिखलदऱ्याच्या प्राथमिक उपचार केंद्रात घेऊन आलो.

तिथल्या महिला डॉक्टर व १०८ या तातडीच्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. त्याच रुग्णवाहिकेत सुरेशला घालून अमरावतीकडे निघालो. वाटेत परतवाडय़ाला रेंजर कॉलेजचे      डॉ. तायडे आमच्यासोबत सामील झाले, त्यांनी पूर्वी अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात काम केलं असल्याने त्यांनी तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधला होता. दरम्यानच्या काळात प्रकल्प संचालक डॉ. त्यागी यांनीही अमरावतीला जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून पुढची व्यवस्था केली होती. जिल्हा रुग्णालयात प्रकल्प संचालक डॉ. त्यागी, सिविल सर्जन डॉ. राऊत स्वत: व त्यांच्या सर्जनची टीम सज्ज उभी राहिली होती. वन्यजीवप्रेमी यादव तरटे यांनी रक्तदानासाठी युवकांना तयार करून ठेवलं होतं. डॉक्टर मंडळींनी उपचार सुरू केले, सुरेशच्या जखमा शिवण्यात आल्या. त्याला रक्त देण्यात आलं. पण सुरेशला आणखी उपचारांची आवश्यकता होती.

इथे एक सामाजिक संस्था धावून आली, रोटरी क्लब साऊथ नागपूर. ही संस्था मेळघाटात गेली २५ वर्षे नियमितपणे नि:शुल्क शस्त्रक्रिया शिबिरं घेते. रोटरी क्लबचे डॉ. कापरे आणि त्याच्या टीमने उत्स्फूर्ततेने सुरेशवर नागपूर येथे उपचार करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे अधिक वेळ न दवडता आम्ही नागपूरकडे धाव घेतली. पुढचे सहा महिने डॉ. कापरे, नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकादम, नाक-कान-घसातज्ज्ञ डॉ. वैद्य, प्लास्टिक सर्जन डॉ. कोठे, सर्जन डॉ. पाटील यांनी सुरेशवर शस्त्रक्रिया, विविध उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. आज सुरेशची दृष्टी परत आली आहे, फक्त त्याचा चेहरा अद्याप थोडा विद्रूप राहिला आहे, तेवढं वगळता तो सर्वार्थाने बरा झाला आहे. इतकंच नव्हे तर कामावरही रुजू झाला आहे. रोटरी क्लब, साऊथ नागपूर यांनी हे उपचार नि:शुल्क केले आहेत हे विशेष!

हा प्रसंग घडल्यावर पुढील दोन दिवस दरीत उतरण्याचं कोणी धाडस केलं नाही. मग नेहमीप्रमाणे कोंबडी टांगण्याचा उपक्रम चालूच ठेवला, पण जवळपास दीड महिना म्हणजे तीन जानेवारी २०१७ पर्यंत कोंबडी तशीच राहत होती किंवा उदमांजर, दुसरा एखादा प्राणी खात असे. पण बच्चू काही तिकडे फिरकत नव्हता. सुरेशच्या हल्यामुळे आमच्या उत्साहावर पाणी फिरल्यासारखं झालं होतं, त्यात बच्चूनेही आमच्याकडे पाठ फिरवली होती. आता ही चांगली गोष्ट मानायची की हार मानायची हा प्रश्न होता. पण तीन जानेवारीला बच्चूने परत गुहेत येऊन कोंबडी खायला सुरुवात केली आणि पुढे महिनाभर तो रोज येत होता, नंतर एक दोन दिवस गायब होत तो एप्रिलपर्यंत येत राहिला.

दरम्यानच्या काळात माझी अमरावतीला सामाजिक वनीकरणमध्ये बदली झाली. जूनपर्यंत मेळघाटचा कार्यभार होता, पण इतर कामांमुळे माझा बच्चूशी संपर्क तुटल्यासारखा झाला. बच्चूबद्दल मला शेवटची बातमी मिळाली फेब्रुवारी २०१८ मध्ये, तोपर्यंत बच्चू जवळपास पावणे दोन वर्षांचा झाला असल्याने त्याला आता तसा धोका नव्हता. हे आईविना पोर अंगभूत हुशारी, सावधपणामुळे इतके धोके पचवून वयात येऊ घातलं होतं. बच्चूचा सावधपणा इतका की पहिल्या दिवशी सुनीलसोबत आम्हाला त्याचं जे दर्शन झालं तेच पहिलं आणि शेवटचं! त्याच्यानंतर तो माझ्याच काय पण आमच्या एसटीपीएफ जवानांच्याही नजरेस पडला नाही की त्याची विष्ठाही दिसली नाही. कॅमेरा ट्रॅपमुळेच त्याचं वाढणं आम्ही अनुभवू शकलो. त्यातून खूप काही शिकायला मिळालं. हे संगोपन तसं अनोखंच असल्याने त्याचा परिणाम काय होतोय हे माहीत नसल्याने आम्ही त्याला फार प्रसिद्धी दिली नव्हती.

हा प्रयोग करताना आम्ही काही पथ्यं पाळली होती. बच्चूच्या जीवनात मानवी, पाळीव प्राण्यांचा कमीत कमी हस्तक्षेप, बच्चूला आयतोबा करायचं नसल्याने कोंबडीच्या रूपात खाद्याची जोड देणं, या कामाकरिता वाहून घेतलेल्या चार-पाच कर्मचाऱ्यांमुळे त्याला अवास्तव प्रसिद्धी न मिळणं, प्रकल्प संचालकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या घेतलेला रस या सर्व कारणांनी आमचा हा खटाटोप यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून त्याच्या नियमित नोंदी घेतल्याने एक चांगल्या प्रकारचं दस्तावेजीकरण झालं आणि तुमच्या पुढे ही कहाणी मांडता आली.

या कथेचा नायक बच्चूच होता. आत्मसंरक्षण करताना कोणताही धोका न पत्करणं, स्वत:चं अस्तित्व लपवून ठेवणं, लहान असताना उदमांजराची दादगिरी सहन करणं, पण थोडं मोठं झाल्यावर त्याला त्याची जागा दाखवून देणं, त्या परिसरातील इतर स्पर्धक बिबटे, अस्वलं यांच्यापासून दूर राहणं या सगळ्या उपजत गुणांमुळे तो तरला आणि ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या तत्त्वाला पुष्टीच मिळाली. मेळघाटच्या माझ्या १९ वर्षांच्या कार्यकाळातील हा सगळ्यात संस्मरणीय, रोमांचकारक व आनंददायी भाग होता असं मी अभिमानाने म्हणू शकतो.

शब्दांकन- अरिवद आपटे, वनसंरक्षक (लेखक वनसंरक्षक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:04 am

Web Title: story of a tiger cub bachuchu
Next Stories
1 आयुष्याचा पोत
2 एक शापित गंधर्व
3 जर्मनी हा नवा ब्राझील?
Just Now!
X