20 March 2019

News Flash

ओशन

चंद्रहास मास मीडियाचा पदवीधर होता.

काल्पनिक लेखनाला तर मानकरांचा विरोधच होता.

माधव गवाणकर
अनादि वासना अशा वेगळ्या रूपात, निराळ्या समकामी अंगाने उभी राहते, तेंव्हासुद्धा माणसाला जगण्याचा अधिकार, सन्मानाने आपला कल जोपासण्याचा हक्क मिळायलाच हवा.

नदीकिनारी कुणी नव्हतं आणि तरी ‘खूप जण’ होते. वनस्पती सुगंधी श्वसन करत होत्या. लाजरा ‘श्याम’ कुणाला दिसणार नाही अशा बेताने त्याचं गाणं गातच होता. प्रत्येक पाखरू आपली हद्दही सांगत असतं. दुष्काळ नसेल तर ते घरटं बांधून संसाराला लागतं.

नदीकाठी उघडय़ा अंगावर कोवळी उन्हं घेणाऱ्या चंद्रहासला कळत नव्हतं की, आपण नक्की कसं सेटल व्हायचं? आपली पदवी हा एक निर्थक कागद आहे की, धनकुंडली आहे? चंद्रहास मास मीडियाचा पदवीधर होता. स्थानिक दैनिक त्याला दरमहा चार हजार रुपयांवर बोलवत होतं. पण एकदा असं कमी वेतनाचं काम करत गेलो की, तीच फाटकी जीवनशैली बनते हा सावधगिरीचा इशारा त्या मुलांना मुंबईच्या पाहुण्याने दिला होता. मुख्य अतिथी म्हणून प्रसन्न दामले आले होते. त्यांचं भाषण चंदूने कानांत, मनात भरून घेतलं. रोज शिकवणाऱ्या माईणकर बाईंपेक्षा प्रसन्न खूपच वेगळं, नवं काही सांगत होते. त्यांना काही पुस्तकी पोर्शन पूर्ण करायचा नव्हता. ते व्यवसायातला व्यवहार सांगून गेले.

बहरत गेलेली चमकदार मुंबई चंद्रहासला गाठायची होती. कपाळ कोरलेलं असतं, सगळं आधीच ठरलेलं असतं हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. घरातल्यांचा ‘डिग्री मिळवलीस आणि तरी घरी बसून आहेस,’ असा तक्रारीचा सूर होता. ते खोटं नव्हतं, पण किडलेल्या व्यवस्थेतून वाट काढणं अवघड आहे हे कॉलेजचं तोंड कधीही न पाहिलेल्या घरच्या मंडळींना कसं सांगायचं, कोणत्या शब्दात पटवायचं ते चंद्रहासला कळत नसे. तो तसा मोठा नव्हता! आपलं लहानपण परिस्थितीने मारून टाकलं, याची जाणीव त्याचं मन कुरतडत राहायची. चिंता-काळजीचे काही उंदीर स्वप्नात चावायचे. मग चंद्रहास झोपेतून दचकून उठायचा! काही स्वप्नं तो डायरीत लिहूनही ठेवायचा. सगळीच स्वप्नं लेखी मांडावीत अशी नसत. काही मोहोर गळतो, तशी नुसतीच गळून जात. देहाचं म्हणून एक जंगल असतं. तिथं त्या स्वप्नांचा उग्र तरीही मोहक गंध त्याला जाणवत राहायचा. चंद्रहासच्या आसपास, शेजारीपाजारी वाचनसंस्कृती हा शब्द कुणाच्या गावीही नव्हता. केबल टीव्हीला चंदू बातम्या वाचायचा, पण तो तिथे रमला नाही. तिथे मानधन मिळायलाही खूप वेळ लागला. मालक टाळाटाळच करत होता. खरं तर त्या लोकल चॅनलला बातम्या दिल्यामुळे पोरींचे बरेच फोन चंद्रहासला आले. पण ‘इतक्या पोरी काय करायच्या आहेत,’ असं मनात म्हणत चंदू हसला. गालाला खळी पडली. ललाला त्याच्या गाली पडणारी खळी जाम आवडायची. ‘पुरुषाच्या गालालाही खळी शोभते बरं का!’ असं तिचं मत होतं. ही पोरं वृत्तपत्रातही वाचकांच्या पत्रव्यवहारात त्यांची मतं ठामपणे मांडू लागली होती. इंदुलकर तर आठवडय़ाला एखादं तरी पत्र वृत्तपत्रात लिहायचा. ‘फक्त पत्रांवर थांबून नकोस’ असं त्याला कार्यकारी संपादक मानकर म्हणाले. मग तो काही ‘ऑफ बीट’ बातम्याही पाठवू लागला. मानकरांचा मेसेज आला. ‘सोबत फोटो असेल तरच बातमी पाठव! विषयाचा पुरावा हवा.’ काल्पनिक लेखनाला तर मानकरांचा विरोधच होता. ‘आम्ही वर्तमानपत्र चालवतो. साहित्यपरिषद नाही,’ असं ते तोंडावर सांगायचे. ‘कृपया कविता पाठवू नये’ची सूचना रविवार पुरवणीत छापलेली असायची. त्यामुळे कवडे लोक तो पेपर घेत नसत. ‘हे लोक कवी आहेत असं फक्त त्यांना स्वत:ला वाटतं,’ असं म्हणत मानकर गडगडाटी हसायचे. त्यांचं बोलणं ऐकायलां चंदूलाही आवडायचं, पण नोकरीचा विषय निघाला की ते विषय बदलत. मोडक म्हणाला, ‘मानकर जॉब देण्यासाठी भरपूर कॅश घेतो. आपल्याकडे पैसे नाहीत हे तो ओळखून आहे.’ त्याचा हा शोध चंद्रहासला पटला नाही, पण त्याने वादही घातला नाही. आपल्या रक्तपेशींमधली खुमखुमी हळूहळू कमी होतेय हे त्याला जाणवलं.

संपूर्ण कथा वाचण्यासाठी ‘लोकप्रभा’ दिवाळी अंक आपल्या नजीकच्या स्टॉलवर उपलब्ध.

First Published on November 2, 2018 1:01 am

Web Title: story of chandrahas