News Flash

अनाथ

मी दोन वर्षांचा असताना ती मला कडेवर घेऊन इथे आली होती. मला काम द्या, मी खूप गरीब आहे, असं म्हणाली होती

मी रंगनाथ. एका मोलकरणीचा मुलगा. माझी आई भानू. ती नरहरी आणि सुभद्रा चाफेकर यांच्याकडे कामाला असते. धुणीभांडी, कपडे, साफसफाई पडेल ते काम करते.
मी दोन वर्षांचा असताना ती मला कडेवर घेऊन इथे आली होती. मला काम द्या, मी खूप गरीब आहे, असं म्हणाली होती. तिचा तो फाटका अवतार पाहून काकूंना तिची दया आली होती आणि त्यांनी तिला कामावर ठेवून घेतलं (हे मला काकूंकडूनच कळलं होतं.) आज या गोष्टीला वीस वर्षे उलटून गेलीत.
चाफेकर देवमाणूस आहेत. त्यांना मूलबाळ नाही. काकांचं औषधाचं दुकान आहे. त्यांचं घर मोठं आणि ऐसपैस आहे. घरालगत आऊट-हाऊसवजा दोन खोल्या आहेत. तिथं मी आणि आई राहातो.
चाफेकर काकूंनी आईला लहान बहीणच मानलं होतं. अर्थातच मग आम्ही चाफेकर कुटुंबीयांचा एक हिस्साच झालो आहोत.
तसं म्हणाल तर माझी आई कष्टाळू आणि शांत स्वभावाची आहे; पण का कोण जाणे मी लहान असताना ती मला खूप मारायची, अगदी क्षुल्लक कारणांवरून! तिच्या-जवळ एक छोटी पत्र्याची पेटी आहे. त्याला सदैव कुलूप लावलेलं असतं. त्या पेटीत काय आहे किंवा माझे बाबा कुठे आहेत, असले साधे प्रश्न विचारले तरी ती खूप भडकायची आणि मला बदडून काढायची- अगदी बायका धुणं धुताना कपडे बदडवतात तसं!
मी थोडा मोठा झाल्यावर तिचं मला मारणं तर थांबलं; पण मला शिव्या-शाप देणं मात्र चालूच राहिलं. ती माझ्याशी अशी का वागते हे माझ्याकरता एक कोडंच होतं?
तिच्या या अशा वागण्यामुळे असेल म्हणा, मला तिच्याबद्दल प्रेम किंवा आपुलकी कधीच वाटली नाही.
चाफेकर काकांनी मला जेव्हा शाळेत घातलं त्या वेळेसही आईनं कांगावा केला होता. म्हणाली, शिकून हे कारटं काय दिवे लावणार आहे, पण काकांसमोर तिचं काहीएक चाललं नाही.
मी मुळातच हुशार आणि त्यामुळेच माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी काकांनी घ्यायचं ठरवलं. त्यांच्या या मदतीमुळे मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. रेल्वेत मला स्टेशन- मास्तरची नोकरी लागली.
माझं पोस्टिंग चंदनगावला झालं. इथून काही मैलांवर असलेलं हे लहानसं गाव आहे. गाडीनं जायला चार तास लागतात.
मला नोकरी लागल्याचा फारसा आनंद आईला झाला नव्हता आणि चंदनगावचं नाव ऐकून तर ती एकदम चूप झाली.
गाडी चंदनगाव स्टेशनवर उभी राहिली. मी बॅग घेऊन खाली उतरलो. उतरणारा मी एकटाच प्रवासी होतो. मी येणार असं आधीच कळवलं होतं.
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर अंधारून आलं होतं.
संध्याकाळच्या त्या अंधूक प्रकाशात तो लांबलचक ओसाड फ्लॅटफॉर्म एखादी अजस्र मगर सुस्तावत पडलेली असल्यासारखा दिसत होता.
काही अंतरावर एक माणूस उभा होता. मला पाहून तो माझ्या जवळ आला.
‘‘रंगनाथ साहेब?’’ त्यानं विचारलं. मी मान हलवली.
‘‘मी दगडू, इथला गँगमॅन.’’
नावाप्रमाणेच त्याचं शरीर कणखर होतं. ठेंगणा, उन्हानं करपलेला रंग, पण शरीरयष्टी अशी की एखादा मुष्टियोद्धासुद्धा लाजेल!
एव्हाना मला पाहून डय़ुटीवरचा स्टेशनमास्तरही तिथे आला. उंच, सडपातळ, किंचित लंगडत चालणारा. वय फार नसेल, पण डोक्यावरचे सर्व केस पांढरे झालेले. ‘‘हॅलो!’’ माझ्याशी शेकहँड करत म्हणाला, ‘‘मी किशोर पेंडसे’’
दुसऱ्या दिवशी सकाळी मी डय़ुटीवर आलो. राहायला मला ‘क्वार्टर’ मिळालं होतं. स्टेशनलगतच होतं.
सुरुवातीचे काही तास कामात गेलेत. तसं फारसं काम नव्हतंच म्हणा! संपूर्ण दिवसात दोन गाडय़ा यायच्या आणि दोन जायच्या.
काम आटोपून मी प्लॅटफॉर्मवर येऊन उभा राहिलो. गाडी यायची वेळ झाली होती. एक म्हातारबुवा, एक तरुण मुलगा आणि आपल्या दोन लहान मुलांसह उभी असलेली आई-गाडीची वाट पाहात होते.
प्लॅटफॉर्मच्या अगदी एका टोकाला एक  माणूस गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला होता. मला आठवलं. काल संध्याकाळीही तो तिथंच बसलेला होता.
मी दगडूला (त्याचं खरं नाव भास्कर आहे) बोलावून त्या माणसाबद्दल विचारलं. म्हणाला, ‘‘ते मास्तरबाबा आहेत. वेडपट आहेत’’.
मी त्यांच्याजवळ गेलो. वाढलेली दाढी, विस्कळीत केस, मळके कपडे असा त्यांचा अवतार होता..
‘‘मास्तरबाबा, मी इथला नवा स्टेशनमास्तर.’’
त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्यांची नजर फार भेदक होती. जणू गोठलेले दोन निखारे. ती नजर पाहून माझ्या अंगावर शहारे आले. काही न बोलता त्यांनी नजर दुसरीकडे वळवली. माझ्याशी बोलण्याची त्यांची इच्छा नसेल कदाचित!
तुरळक वस्तीचं हे गाव आहे. माझ्या क्वार्टरपासून थोडय़ा अंतरावरच माने आजोबा राहायचे. गावात सगळेच त्यांचा आदर करत. माझेही त्यांच्याशी चांगले जमे. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो.
एकदा मी त्यांना मास्तर -बाबांबद्दल विचारले तेव्हा म्हणाले, ‘‘खूप वर्षांपूर्वी इथल्या शाळेत शिकवायला आला होता. दिनकर त्याचं नाव. गावात कुमुद नावाची एक तरुण मुलगी होती. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये शारीरिक संबंध आले आणि कुमुदला दिवस गेले.
शाळेला सुट्टय़ा पडल्या आणि मास्तर गावी निघून गेला.
अशा गोष्टी फार काळ लपून राहात नाहीत. गावात कुजबुज होऊ लागली. कुमुदनं बरीच वाट पाहिली, पण मास्तर मात्र परतलाच नाही आणि एक दिवस कुमुद अचानक नाहीशी झाली. कुठे गेली कोणालाच ठाऊक नव्हतं.

आणि अचानक एक दिवस मास्तर परत आला. कुमुदला शोध शोध शोधलं, पण ती होती कुठे सापडायला! झालं, तो दिवस आणि आजचा दिवस वेडय़ासारखा भटकत असतो.’’
इथं आता माझं मन रमायला लागलं. खास करून इथली संध्याकाळ खूप रोमांचक असायची.
अंधार पडल्यानंतर- डय़ुटी असो वा नसो- मी प्लॅटफॉर्मवर येऊन उभा राहायचो. रेल्वे लाइनच्या पलीकडे एक झोपडी होती. तिथे एक म्हातारी राहायची. संध्याकाळ झाली, की ती ओव्या म्हणायची.
मग काय- तो सरसर वाहणारा वारा, तो पक्ष्यांचा किलबिलाट, म्हातारीच्या ओव्यांचे कानावर पडणारे स्वर, दूरवर टिमटिमणारे गावातले दिवे- सर्व वातावरण कसं रहस्यमय होऊन जायचं.
आज नेहमीप्रमाणे मी डय़ुटी संपवून निघण्याच्या तयारीत होतो. पेंडसे नुकताच आला होता. एवढय़ात फोन वाजला. चाफेकर काकूंचा होता. म्हणाल्या, ‘‘सकाळी भानूला छातीत खूप दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं. डॉक्टर म्हणतात हृदयविकाराचा झटका आहे. तू येतोस का रे बाबा?’’
‘‘का रे? काय झालं?’’ पेंडसेनं विचारलं.
‘‘अरे, आईची तब्येत अचानक बिघडली, लगेच निघावं लागेल.’’ मी म्हणालो.
‘‘लगेच निघ आणि हो, इकडली काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन.’’ पेंडसेनं धीर दिला.
घरी पोहोचल्यावर बॅग घरी सोडून मी ताबडतोब हॉस्पिटलला गेलो.
आईला ‘ड्रीप’ लावलेली होती. तिचा चेहरा खूप ओढल्यासारखा दिसत होता. फार केविलवाणी दिसत होती ती. तिची ती अवस्था पाहून माझा कंठ दाटून आला.
अध्र्या रात्री ती परत खूप अस्वस्थ झाली. डॉक्टर लगेच आले. त्यांनी खूप प्रयत्न केलेत, पण काही उपयोग झाला नाही- पहाट होता होता आई हे जग सोडून निघून गेली.
सर्व अंतिम विधी आटोपले होते. मला आज दुपारच्या गाडीने परत जायचं होतं.
बॅग भरता भरता माझं लक्ष आईच्या त्या पेटीकडे गेलं. एकदा वाटलं असू दे फारसं काय असेल त्यात? पण मग विचार आला- एखादी महत्त्वाची वस्तू असली तर! मी पेटी उघडून पाहायचं ठरवलं.
घरभर पेटीची किल्ली शोधली; पण कुठेच सापडली नाही. शेवटी कुलूप तोडून मी पेटी उघडली. एक-दोन जुन्या साडय़ा, पितळेचे पेले, बांगडय़ा अशा मोजक्याच वस्तू पेटीत होत्या.
मी एक एक वस्तू पेटीतून काढत बाहेर ठेवत गेलो. पेटीच्या तळाशी एक फोटो होता- पोस्टकार्ड साइजचा, स्टुडियोत काढलेला, आईच्या तरुणपणीचा. आईच्या अलीकडच्या आणि तरुणपणीच्या चेहऱ्यात फारसा फरक पडलेला नव्हता, म्हणून मला लगेच ओळखता आला.
काही क्षण कुतूहलानं फोटोकडे पाहून फोटो मी माझ्या बॅगेत ठेवला. उरलेल्या वस्तू पेटीत भरून पेटी बंद करून ठेवून दिली.
गाडीतून उतरून मी सरळ घराच्या दिशेकडे निघालो. नजर सहज प्लॅटफॉर्मच्या टोकाला गेली. मास्तरबाबा तिथे नव्हते. गेले असतील भटकायला! मी विचार केला.
फ्रेश होऊन कपडे बाहेर काढायला म्हणून मी बॅग उघडली. बॅगेतले कपडे बाहेर काढताना फोटो जमिनीवर पालथा पडला. फोटो उचलायला म्हणून वाकलो तेव्हा लक्षात आलं फोटोच्या मागे काही तरी लिहिलेलं आहे.
फोटोमागे वळणदार अक्षरांत लिहिलेलं होतं- प्रिय कुमुदला सप्रेम भेट- दिनकर. कुमुद? आईचं नाव तर भानू होतं. कदाचित लग्नाआधीचं नाव असावं!
कुठे बरं ही नावं ऐकली आहेत? आणि मला एकदम माने आजोबांनी सांगितलेलं आठवलं.
अरे देवा! माझ्या पोटात गोळा आला.
नाही नाही हे शक्य नाही- मी स्वत:ला समजवलं. जगात असंख्य माणसं आहेत ज्यांची नावं एकसारखी असतात, पण काही केल्या मनातील विचार जाईनात. एखाद्या कुत्र्याला आपण हाड् हाड् करावं आणि शेपूट हलवून ते परत परत आपल्याजवळ यावं तसे विचार डोक्यात येऊन गोंधळ घालत होते.
त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी गावातली मंडळी आई गेल्याचं दु:ख व्यक्त करायला आली होती. सर्व निघून गेलेत. माने आजोबा मात्र थांबलेत. ‘‘नाथसाहेब, (मला इथे सर्व नाथसाहेबच म्हणत) मास्तरबाबा वारल्याचं कळलं तुम्हाला?’’
‘‘काय? कधी?’’ मी जवळ जवळ ओरडलोच.
‘‘असं बघा..’’ स्वत:शी पुटपुटत माने आजोबा म्हणाले- ‘‘म्हणजे दहा दिवस झाले असतील! मागल्या आठवडय़ात.. मंगळवारी.’’
योगायोग!
आईसुद्धा मंगळवारीच पहाटे गेली होती. ते पुढे म्हणाले, ‘‘त्यांचं मागे-पुढे कोणी नव्हतं, मग गावातल्या लोकांनीच त्यांचा अंतिम संस्कार केला. त्यांच्याजवळ नेहमी एक पिशवी असायची, मी ती ठेवून घेतली.’’ हातातली मळकी पिशवी दाखवत ते म्हणाले, ‘‘त्यात काय आहे हे पाहायची हिम्मत झाली नाही म्हणून पिशवी इथं घेऊन आलो. तुम्ही पाहा यात काय आहे ते.’’ पिशवी मला देत आजोबा म्हणाले.
मी पिशवी उलटी केली. जमिनीवर पडलेल्या वस्तूंमध्ये एक पुस्तक, छोटी डायरी, पेन, मळकी टोपी आणि एक फोटो-  पोस्टकार्ड साइजचा, स्टुडियोत काढलेला, आईच्या तरुणपणीचा!
‘‘हीच ती कुमुद जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं.’’ फोटोकडे बोट दाखवत ते म्हणाले. मला भोवळ येते की काय असं वाटलं.
थरथरत्या हाताने मी फोटो पलटून पाहिला-त्याच वळणदार अक्षरांत लिहिलं होतं-प्रिय कुमुदची आठवण म्हणून..
माने आजोबा निघून गेल्यावर मी मटकन जमिनीवर बसलो. मन अतिशय खिन्न आणि डोकं बधिर झालं होतं.
आज रंगनाथ ‘अनाथ’ झाला होता. आईच्या आत्म्याला शांती मिळेलही कदाचित- पण माझ्या आत्म्याला जिवंतपणी तरी शांती मिळणार होती का?
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:01 am

Web Title: story of orphan
टॅग : Orphan
Next Stories
1 आवाहन
2 भारतीय शास्त्रीय नृत्यशैली
3 चर्चा : मस्तानीशिवायचे बाजीराव
Just Now!
X