एक दिवस सकाळी कॉलेजात गेलेली धाकटी पद्मा घरी आलीच नाही. नानांनी सर्व मैत्रिणींकडे चौकशी केली, पण कोणाकडे पत्ता लागेना. दुसऱ्या दिवशी ‘आपण जातीबाहेर लग्न केलंय’ अशी तिची चिठ्ठी सापडली.

नानांना ही बातमी कळताच त्यांनी जावयाचा शोध घ्यावयाला सुरुवात केली. तेव्हा कळलं की, तो एअर इंडियात पायलट असून घराणे सुसंस्कृत आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम. फक्त जात वेगळी. नाव परशुराम असल्याने त्याचे परशा असे झाले.

पद्माचा संसार सुरू झाला. परशा एकुलता एक. आईवडील गावी असत. ते पुष्कळ वेळा यांच्याकडे येऊन राहात. पद्माचे व त्यांचे चांगले जमत असे. ती दोघांचेही मायेने हवं नको पाही. त्यामुळे सुनेला कोठे ठेवू कोठे नको असे होई. परशाची नोकरी चालू होतीच. राहायला मोठा बंगला, दिमतीला नोकरचाकर.

कालांतराने पद्माला मुलगा झाला. त्याचं कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर इंडियात शिक्षण झाल्यावर एम.बी.ए.साठी अजयने यूएसला जावं, अशी परशाची फार इच्छा होती; पण अजय याला तयार नव्हता. त्याला घर सोडून राहाणचं पसंत नव्हतं. त्याने खूप त्रागा केला, सांगून पाहिले. परशानेही यावर ‘‘अरे, दोन र्वष हा हा म्हणता जातील, पण तिथली डिग्री महत्त्वाची आहे. एकदा रुळल्यावर तिथल्या परिस्थितीची- हवेची सवय होईल. तुला आवडू लागेल. ग्रीन कार्ड मिळेल.’’ अजयने सर्व ऐकून घेतल्यावर आईकडे वशिला लावला. तिला सर्व प्रकारे सांगून पाहिले. मला आठवण पडेल वगैरे. पद्मानेही पुष्कळ प्रकारे सांगून कधी नव्हे ते रागावून, वादविवाद करून परशाला पटविण्याचा प्रयत्न केला; पण परशा जणू हट्टालाच पेटला होता. तिच्या डोळय़ांतले पाणीही त्याला दिसले नाही. मात्र ते पाहून अजय केविलवाणा झाला. पाठीवरून फिरलेला हात मात्र अजयला बरंच काही सांगून गेला.

अजयला तेथे एकटे वाटे. अबोल असल्याने कोणात मिसळतही नव्हता. त्याने कशी तरी दोन वर्षे काढली. भारतात आला, मात्र त्याला खूप बरे वाटले. आता आपण येथे नोकरी करू, आईजवळ राहू म्हणून आनंदात होता, पण एखादा महिना होतो न होतो तोच ‘‘यूएसला नोकरीची ऑफर आली आहे. माझ्या मित्राचीच कंपनी आहे,’’ असे सांगून परशाने त्याला परत पाठविले. वडिलांच्या हट्टापुढे त्याला मान झुकवावी लागली.

अजयला तेथे एकटे वाटे. अबोल असल्याने फारसा कोणात मिसळतही नव्हता. दिवसभर ऑफिसात वेळ जायचा. घरी आल्यावर मात्र बेचैन होई. सारखे घर आठवे. आपली माणसे नजरेसमोर येत. अगदी वैतागून जाई, पण इलाज नव्हता. मग कधी बागेत एकटाच जाऊन बसे. तिथली माणसे, खेळणारी मुले पाहून जीव रमवी. कधी लायब्ररीत जाई.

एकदा तो असाच बागेत गेला असता त्याच्या पायाशी मोठा बॉल येऊन पडला. पाठोपाठच एक चिमुरडी तो घ्यावयाला आली. त्याने तो बॉल हसतमुखाने तिला दिला. इतक्यात एक तरुणी आली व तिला घेऊन गेली. त्या चिमुरडीचे ते बाय ऽ बाय करून जाणे पाहून याचाही हात उंचावला. क्षणभर मन हरखून गेलं.

मग तो रोज त्या चिमुरडीसाठी बागेत ठरावीक जागी बसू लागला. ती तरुणीही त्या मुलीला घेऊन तेथेच येई. मग हळूहळू हसणे, गप्पा, एकमेकांची नावे यावर बोलणे झाले. अजय अगोदरच दिसायला गोरा, उंच, त्यात तिथल्या हवेमुळे त्याच्या रूपात अधिकच भर पडली होती. मात्र स्वभाव साधा, त्याला वळणे, कंगोरे नाहीत. दोघेही एकमेकाला साजेसे मग आणखी काय हवे? पहिल्या भेटीतच ती त्याला आवडली, मग रोज भेटी सुरू झाल्या. हॉटेलिंगही झाले.

बोलता बोलता वर्ष उलटले. अजयचे घर सजलेलेच होते. ती नेहमी घरी येई. कधी सोबत चिमुरडी असे, कधी एकटी येई. एकदा तिचे व तुझे नाते काय  विचारल्यावर ‘‘बहीण आहे, आईवडील वारले. मी मेक्सिकोहून आले’’ म्हणून उत्तर दिले. तीही नोकरी करत होती. अजय नेहमी ‘लग्नाचा आग्रह’ धरायचा, पण ती नेहमी टोलवाटोलवी करी. घरी मात्र राजरोसपणे येत-जात होती. अशा वेळी व्हायचे तेच झाले. दिवस राहिल्यावर तिने बहिणीलाही घरी आणले व लग्न केले.

अजयने आईवडिलांना कळविले. त्यांना आनंद झाला. सर्व विचारपूस झाली, पण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काही खरं नाही, या विचाराने पद्माने दोघांनाही बोलाविले, पण रजा, प्रकृती या कारणांनी ती आलीच नाही. दोघांनाही वाईट वाटले. मग मात्र याने भावनेच्या भरात कोणाशी लग्न केलंय या विचारानेच मनात कल्लोळ सुरू झाला. आपला मुलगा साधा सरळ आहे, पण हे काय करून बसला आहे हे पाहायला दोघंही यूएसला पोहोचले, पण तिथली परिस्थिती पाहून आपण आता आजी-आजोबा होणार या अत्यानंदात होते. त्या वेळी दोघांची चांगली बडदास्त ठेवली गेली. त्यांच्याशी नम्रतेने वागली. हवं नको ते पाहिले. दोघंही त्यांचा संसार पाहून खूश झाले. निर्धास्त मनाने परत गेले.

दोघांचा संसार सुरू झाला. तो तिला फार सांभाळायचा, कामात मदत करायचा. ती जे काही मागेल ते द्यावयाचा, पण तिच्याकडून पाहिजे तशी दाद मिळत नव्हती, प्रेम मिळत नव्हते. तुसडेपणाने वागे. झोपून तर झोपूनच राही. बहिणीचे मात्र सर्व निगुतीने करी. अजयच्या जेवणा-खाण्याकडे लक्षच नसे; पण अशा परिस्थितीत त्रास होत असेल अशा समजुतीने तो सारे सहन करी, गप्प राही.

एक दिवस सकाळी सुसानला मुलगी झाली. अजयला खूप आनंद झाला. लगेच आई-वडिलांना कळविले. त्यांनाही आनंद झाला. फोन आले. मुलीच्या सहवासात अजय रमून जावयाचा, तोच तिला जास्त सांभाळायचा. सुसान फक्त जन्म देण्यापुरतीच होती. मोलकरणीवर तिला टाकून बाहेर जात असे. दिवस दिवस बाहेरी राही. एक दिवस तर घरी आलीच नाही. असे सारखे झाल्यावर अजय बोलला तर, ‘‘मी जाणारच. माझे मित्र आहेत. तुला काय करायचे ते कर. वाटल्यास डिव्होर्स घे.’’ एवढे ऐकले मात्र अजय कोसळलाच. वाटले आपण किती प्रेम केले. सर्व सहन केले. याचे असेच उत्तर मिळायचे होते?

परत २/३ दिवस सुरळीत गेले, पण एक दिवस मात्र त्याने तिला मित्राच्या रूमवर जाताना पाहिले. तेथून दोन दिवसांनी घरी आली, तीही नशेतच. त्या वेळी मात्र अजय खूप चिडला. दोघेही भांडले. नंतर दोघींना घेऊन घराबाहेर पडली व फिर्याद दिली- ‘माझ्या बहिणीशी नवरा फाजील वागतो असा माझा संशय आहे’ व कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला.

कोर्टाची तारीख आली. हतबल झालेल्या अजयच्या बाजूचे २/३ मित्र होते. इतक्यात एक युरोपिअन अजयच्या जवळ येऊन म्हणाला ‘‘अरेरेऽ तूही चूक केलीस ना? काय मिळाले तुला? मीही तिच्यावर भाळून तिच्याशी लग्न केले. मोठी मुलगी माझी आहे. मीही तुझ्यासारखे सर्वस्व गहाण टाकले. माझ्या अगोदरही हिचे लग्न झालेले आहे. तूही आमच्यासारखाच फसलास.’’ सारे ऐकल्यावर अजय डोके धरून बसला. डोके बधिर झाले. काही सुचेना. मित्रांनी सावरले. तिला घटस्फोट मिळाला. तिने मुलींना फॉस्टर होममध्ये ठेवले, कारण यूएसला बाई जर बाहेरख्याली असेल तर मुलांना तेथे ठेवतात.

अजय आता एकटा पडलाय. त्याच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने केव्हाच बळकावले. त्याची त्याला फिकीर नाही, पण आपल्या साधेपणाचा, चांगुलपणाचा तिने फायदा घेतला याची त्याला खंत वाटते. तो आता यूएस सोडायला तयार नाही. आईवडील बोलावतात, पण तो जात नाही. हट्टाला पेटला आहे. त्याचे जेव्हा मन तेथे जायला तयार नव्हते तेव्हा परशा हट्टाला पेटला होता. आता हा.

आई सांधेदुखीने बेजार झाली आहे. सर्व असूनही घर दु:खी आहे. परशा हळहळतोय, पण-
रोहिणी पडवळ – response.lokprabha@expressindia.com