18 October 2018

News Flash

अरूपाचे रूप : ससून गोदीत स्ट्रीट आर्ट

आजूबाजूच्या इमारती, त्यांच्या भिंती ग्राफिटी चित्रांनी रंगलेल्या दिसतात.

स्ट्रीट आर्ट मुंबई आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात देश-विदेशातील ६० कलावंत प्रामुख्याने स्ट्रीट आर्टिस्ट सहभागी आहेत.

समोरच्या बाजूस सागराची पूजा करणाऱ्या कोळी महिलांचे स्टेन्सिलचित्र प्रकाशमान झालेले आणि त्याच्या मागच्या बाजूस गेल्यानंतर शहरीकरणाच्या वाढत्या वेगामुळे कोळी समाजाच्या झालेल्या कोंडमाऱ्याचे चित्रण. ज्या इमारतीमध्ये ही कलाकृती पाहायला मिळते. त्या इमारतीमध्ये प्रवेश करतानाच खरे तर आपल्याला काही वेगळे पाहायला मिळणार याची चुणूक इमारतीच्या दर्शनी भागाने दिलेली असते. मुंबईच्या ससून गोदीमध्ये प्रवेश केल्यानंतर आजूबाजूच्या इमारती, त्यांच्या िभती ग्राफिटी चित्रांनी रंगलेल्या दिसतात. ज्या इमारतीमध्ये हे ससून गोदी कला प्रकल्पांतर्गत प्रदर्शन सुरू आहे त्याच्या दर्शनी भागावर याच गोदीमध्ये मासळी विक्री करणाऱ्या कोळीबांधवांची कृष्णधवल व्यक्तिचित्रे मोठय़ा आकारात पाहायला मिळतात. हेच खरे तर स्ट्रीट आर्ट या प्रकाराचे एक वैशिष्टय़ आहे. स्थानिकांच्या समस्यांच्या मांडणीबरोबरच त्यांना थेट कला प्रकाराला आणून जोडण्याचे कामही हा कलाप्रकार करीत असतो. या प्रकल्पामध्ये सहभागी देश- विदेशातील ६० कलावंत प्रामुख्याने स्ट्रीट आर्टिस्ट याच प्रकारात मोडणारे आहेत. स्ट्रीट आर्ट (स्टार्ट) मुंबई आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने या अनोख्या कला प्रकाराचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वत्र मासळीचा भरून राहिलेला वास हा ससून गोदीचा आजवरचा परिचय. मासळी असलेला परिसर जवळच आहे हे पहिल्यांदा आपल्या नाकाला जाणवते. याशिवाय आजूबाजूला मासळी व्यापाऱ्याच्या निमित्ताने झालेली घाण हा आजवरचा ससून गोदीचा दृश्य परिचय. मासळी बाजारात असतो तसा आवाजांचा कल्ला एका बाजूला अव्याहत सुरूच. मत्स्यप्रेमींचे हे आवडते ठिकाण. पण म्हणून इथे फार कुणी वेळ काढत बसत नाही. कारण परिसरात भरून राहिलेला दरुगध हैराण करीत असतो. कोळीबांधवांनाही अनेकदा तो जाणवतोच. पण पोटापाण्याचा व्यवसाय असल्याने दुर्लक्ष करणे अनेकदा भाग पडते. शिवाय हा परिसर तसा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात त्यामुळे जबाबदारी कुणाची यावरूनही प्रश्न तसेच पडून होते. पण आता मात्र या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार असून त्याची सुरुवात स्ट्रीट आर्ट (स्टार्ट) ससून गोदी प्रकल्पाच्या निमित्ताने झाली आहे. देशांतर्गत बंदरांचा विकास करून त्यांना जोडणाऱ्या सागरमाला या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचाच हा एक भाग आहे. त्या अंतर्गत देशांतर्गत बंदरांचा विकास करण्यात येणार असून त्याची आपल्याकडील सुरुवात ही ससून गोदीच्या नूतनीकरण प्रकल्पापासून होणार आहे. हे कला सादरीकरण त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. ससून गोदीला दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. ससून गोदीतील १४२ वर्षे जुन्या असलेल्या इमारतीची निवड यासाठी करण्यात आली असून आजूबाजूचा परिसर आणि इमारत स्वच्छ करून त्याला नवे रंगरूप देण्यात आले आहे. ३० कलाकृती या संपूर्ण इमारतीमध्ये विखुरलेल्या आहेत. हा परिसर भविष्यातही इतकाच चांगला राहील, असे आश्वासनही मुंबई पोर्ट ट्रस्टने कोळीबांधवांना दिले आहे.

पहाटेपासून ससून गोदीच्या धक्क्याला मासेमारी बोटी लागतात. मासे उतरवले जातात, बोली लागते आणि विक्रीला सुरुवात होते. ही धांदल दुपापर्यंत अखंड सुरू असते. कोळीबांधवांसाठी हे तसे रुटीनच. त्यात विशेष काही नाही. पण आता नूतनीकरण होणार असे म्हटल्यावर त्यांना पहिली शंका आली ती पोटावर पाय येण्याची. मात्र या प्रकल्पात कोणालाही विस्थापित केले जाणार नाही, हे पोर्ट ट्रस्टने स्पष्ट केले. त्याच वेळेस एक वेगळी सुरुवात म्हणून या प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. या प्रकल्पाची जबाबदारी घेणारी स्ट्रीट आर्ट (स्टार्ट) ही संस्था इटालियन कलावंत ज्युली चालवते. जगभरातील ६० हून अधिक देशी-विदेशी कलावंत यात जोडले गेले असून जगभरातील अनेक शहरांमध्ये त्यांनी स्थानिक विषय घेऊन असे सादरीकरण केले आहे. भारतात तर नवी दिल्लीमध्ये त्यांनी थेट डम्पिंग ग्राऊंडवरच कलात्मक सादरीकरण केले, ते अनेकांना लक्षात राहिले. ससून गोदीमधील त्यांचे सादरीकरणही तसेच लक्षात राहील असे आहे.

ससून गोदी म्हणजे दीडशेहून अधिक वर्षे मस्त्यप्रेमी मुंबईकरांसाठीचे महत्त्वाचे राहिलेले ठिकाण. मूळ मुंबईकर असलेल्या कोळी समाजाची कर्मभूमी. पण इथे मस्त्य विक्री करणाऱ्यांनी मासे नेहमी पाहिले, ते किनाऱ्यावर येईपर्यंत गतप्राण झालेलेच. आज मोबाइललाच सतत चिकटून राहिलेल्या माणसाची अवस्थाही तशीच मासेमारीच्या गळाला अडकलेल्या त्या मृतवत माशासारखीच झाली आहे का, असा प्रश्न मनात उपस्थित करणारे मांडणीशिल्प या कला प्रकल्पात गर्दी खेचते आहे. या कलाकृतीमध्ये पाहायला मिळतो तो माशाचा मोठय़ा आकाराचा टँक, त्याच्या मागच्या बाजूस मासेमारीचे गळ, त्या गळाला लागलेले.. सतत व्हिडीओ सुरू असलेले दोन मोबाइल आणि त्याच्या एका बाजूस फिरणारे जिवंत मासे. सतत मोबाइललाच चिकटलेला माणूस त्या मृतावस्थेतील माशासारखा झाला आहे का, असा प्रश्न ही कलाकृती पाहताना थेट मनात येतो.

मुंबई आणि ससून गोदी यांचा इतिहास, येथे होणारे मत्स्यविक्रीचे व्यवहार, कोळ्यांची संस्कृती, समुद्रातील वाढलेले प्रदूषण, त्याचबरोबर कोळ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या आदी विषयांवर आधारित चित्र- मांडणीशिल्प असे या प्रदर्शनाचे स्वरूप आहे. सागरातील प्लास्टिक प्रदूषणाची समस्या मांडणारे मांडणीशिल्पही तसेच प्रभावी आहे. यामध्ये सर्वत्र प्लास्टिकच्या कचऱ्याचाच वापर करण्यात आला आहे. त्याची भयानक व्याप्ती लक्षात येण्यासाठी बाजूला मोठे आरसे वापरले आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विश्वात आपण उभे असल्याचा फील पाहणाऱ्यास येतो.

मुंबईसारखीच किनारी पाश्र्वभूमी लाभलेल्या सिंगापूरमधील कलावंतांनी साकारलेली मांडणीशिल्पे अधिक प्रभावी आहेत. सिंगापूरच्या किनाऱ्याशी संबंधित सागरीकथा त्यांनी दोन भिंतींवर चित्ररूपाने साकारलेल्या असून बरोबर मधोमध सागराचा देव असलेल्या वरुणराजाला घेऊन जाणारी मकररूपी होडी शिल्परूपात साकारली आहे. स्ट्रीट आर्टच्या सर्व कल्पनांचा वापर इथे चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे. एखाद्या रसिकाला नैसर्गिक विधीची जाणीव झाल्यानंतर प्रसाधनगृहामध्ये प्रवेश करताच हीदेखील कलाकृतीच आहे का, असा प्रश्न पडावा, असे दृश्य समोर असते. पुरुषांसाठीच्या मुतारीसाठीच्या भांडय़ामध्ये थेट फुलेच पाहायला मिळतात. तर महिलांसाठीच्या मुतारीच्या रचनेत फुलांचा वापर करून लिहिलेला डर्टी हा शब्द लक्ष वेधून घेतो. तिथेच एका ठिकाणी इक्वल अशी अक्षरे आपल्याला िलगसमानतेचा संदेशही देतात. स्ट्रीट आर्टच्या क्लृप्ती वापरून साकारलेल्या या कलाकृती अवश्य अनुभवाव्यात अशाच आहेत. इथल्या इमारती आणि परिसरही या प्रकारामुळे कलेतील सहभागीत्वाचा मुद्दा घेऊनच समोर येतो. ३० डिसेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या कला प्रकल्पाचे उद्घाटन शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडले तर या संपूर्ण प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले रंग एशियन पेंट्सने कलावंतांना उपलब्ध करून दिले. सर्वाधिक मजा येईल ती या प्रकल्पांतर्गत साकारलेल्या चित्रांच्या पाश्र्वभूमीवर मासळी बाजार भरेल तेव्हा.. तेव्हा ते खऱ्या अर्थाने स्ट्रीट आर्ट झालेले असेल!
(सर्व छायाचित्रे : निर्मल हरिहरन)
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab

First Published on November 17, 2017 1:04 am

Web Title: street art in sassoon dock