News Flash

कथा : अनोळखी

माणसांना एकदाच पाहून त्यांची ओळख ठेवणाऱ्या माणसांचं मला नेहमीच कौतुक वाटतं.

माणसांना एकदाच पाहून त्यांची ओळख ठेवणाऱ्या माणसांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. माणसाच्या मेंदूत माणसं ओळखण्याचं जे केंद्र असतं ते माझ्या डोक्यात आहे किंवा नाही याची शंका येण्याइतपत ते दुर्बल आहे. एखादा माणूस थोडय़ा थोडय़ा कालावधीनंतर सतत तीन-चार वेळा भेटला तरच माझ्या डोक्यात त्याची नोंद होते.

म्हणूनच कोणाशी नव्याने ओळख झाली की, माझ्या पोटात गोळा येतो आणि छातीत धस्स होतं. हल्ली मात्र अगदी प्रामाणिकपणे मनातली भीती न लपवता मी त्या व्यक्तीला विनंती करते- ‘‘एक सांगू का? तुम्हाला भेटून आनंदच झाला, परंतु पुढच्या वेळी भेटल्यावर कृपया आपणच ओळख दाखवा, कारण एक-दोनदा भेटूनही माणसं न ओळखता येणं ही माझी खासियत आहे. खरं तर कमजोरीच आहे.’’ पुन्हा भेट झाली तर काही माणसे त्यांचा चांगुलपणा म्हणून ओळख दाखवतात. कदाचित मीच कबूल केलेल्या माझ्या मठ्ठपणावर विश्वास ठेवून! ते आपला मोठेपणाच दाखवतात त्याचं मला कौतुकच वाटतं. काही जण मात्र ही वाट न चोखाळता माझ्यावर शिष्टपणाचा शिक्का मारून मोकळे होत असावेत.

लग्नानंतर यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले, की रस्त्यात दहा ठिकाणी हे कोणाकोणाशी बोलायला थांबत. त्यांचा पेशाच पडला ना तसा! जराशा अंतरावरच उभ्या असलेल्या मला हे विचारत, ‘‘अगं, ओळखलंस का?’’ त्यावर ‘‘सॉरी! सॉरी!’’  हेच माझं उत्तर असे आणि ते ऐकल्यावर हे माझी त्या व्यक्तीशी ओळख करून देत. अशा प्रकारे माझी फजिती करण्यात त्यांना आनंद होतो की काय, अशी दुष्ट शंकासुद्धा मनात यायला लागली; पण परमेश्वरकृपेने हळूहळू मला प्रश्न करायचं सोडून हे उत्तर देऊन मोकळे व्हायला लागले आणि मी हुश्श केलं. बहुधा यांच्या प्रश्नानंतर माझ्या डोक्यातला गोंधळ ज्या सहजपणे माझ्या डोळय़ात दिसत असे त्यावरून बोध घेऊन यांनीच त्यांच्यात बदल घडवला.

एक गंमत सांगते बरं का- काही वेळा म्हणजे- क्वचितच हो- काही माणसं मला ‘दुसरीच’ कोणी तरी समजून माझ्याशी बोलायला येतात ना तेव्हा मी अगदी आनंदून जाते. ‘ती मी नव्हेच’ हे त्यांना सांगताना ‘आपल्या जातीचंही कोणी तरी आहे’ या विचारांनी मनात खोलवर समाधान वाटतं ना!

आता वयाची सत्तरी पार केल्यावर तर माझ्या या अवगुणावर समाजमान्यतेची मोहोर उठली आहे. डोक्यावरच्या बॉबकट केलेल्या काळय़ा केसांची आणि पिनअप् केलेल्या साडीची पर्वा न करता दुकानदार, फेरीवाले, रस्ता क्रॉस करताना लाभलेले सहपादचारी खुश्शाल ‘‘आजी’’ म्हणून सुरुवात करतात हो संभाषणाची! (तेव्हा नाही म्हटलं तरी जरा वाईट वाटतं- पण वाढत्या वयाचे सगळे फायदेच कसे मिळतील?) तर असो!

एकदा मात्र या माणसं विसरण्याच्या गुणानं भलतंच वळण घेतलं. त्याचं असं झालं की, काही महिन्यांपूर्वी आम्ही दोघे इंग्लंडला माझ्या मुलाकडे गेलो. अख्खा दिवसभर विमान प्रवासाची झालेली दगदग आणि आमची वयं लक्षात घेऊन त्या दिवशी आम्ही लंडनला हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही मुलाच्या घरी आलो तेव्हा दिवस कलायच्या मार्गावर होता. जरा फ्रेश झालो- चहापाणी झालं आणि मग गच्चीवर गेलो. गच्चीतल्या बागेचं कौतुक केलं अणि बाजूच्या गच्चीवर नजर गेली. तिथे तर बरीच फुलं होती. दोन गच्च्यांमध्ये उडी मारून पलीकडे सहज जाता येईल एवढय़ाच उंचीचा कठडा होता. शेजारच्या गच्चीवर बरीच मंडळी होती. त्यांची मुलांनी ओळख करून दिली. बहुधा एक जोडपं आणि त्यांची नातवंडं वगैरे- फक्त हाय- हॅलो झालं आणि आम्ही खाली घरात आलो.

त्यानंतर आम्ही तर बरेच वेळा गच्चीवर गेलो, कपडे वाळत घालण्यासाठी, ते काढून आणण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी वगैरे. तेव्हा प्रत्येक वेळी शेजारची गच्ची शांत असायची. असेच दहा-बारा दिवस गेले. मागच्या वेळी आले होते तेव्हा मुलाला शेजारी कोण राहतं असं विचारलं होतं. तर मुलगा म्हणाला होता- ‘‘त्याच्याशी ओळख होण्याची वेळच आली नाही. बहुधा तो एकटाच राहतो वाटतं.’’ मात्र मुलाच्या स्वयंपाकघरातून बाहेर पाहिलं, तर कधीमधी एखादी बाई आणि तिचा मुलगा गच्चीत दिसत- असेच कपडे वाळत घालताना किंवा वाळल्यानंतर खाली घेऊन जाताना. ‘‘ती बाई शर्ली आहे. तिच्या नवऱ्याला कॅन्सर झाला आहे- बिच्चारी!’’ अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर कधी तरी शर्लीचा नवरा गेल्याची बातमी कळली. एकदा बोलण्याच्या ओघात शर्ली सोसायटीची सेक्रेटरी झाल्याची माहिती मिळाली. शर्लीशी मुलाचं थोडं फार बोलणं व्हायचं म्हणे. बाकी त्याच्या कोणत्याच शेजारच्यांची मला ऐकू नसुद्धा माहिती नव्हती. नाही तरी ब्रिटिश लोक कमी बोलण्याबद्दल जगप्रसिद्ध आहेतच- त्यामुळे याचं आश्चर्य वाटलं नाही.

या दिवशी नेहमीप्रमाणे हे एकटेच बाहेर गेले होते. जरा वेळाने दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं तर एक माणूस शेजाऱ्याविषयी काही तरी विचारत होता. ‘‘मला माहीत नाही.’’ असं म्हणून मी दार बंद केलं. चार वाजण्याच्या सुमारास आम्ही दोघं ऊन खायला (असलं तर) आणि स्वयंपाकातलं काहीबाही सामान आणायला बाहेर पडत असू. त्या दिवशीसुद्धा आम्ही असेच बाहेर पडलो होतो. सोसायटीच्या दाराच्या बाहेर पडून रस्त्याला लागताच एक माणूस समोर येऊन उभा राहिला. आम्हाला सांगायला लागला की, त्याला आमच्या घराच्या गच्चीवर जायचं आहे. ‘‘तुम्ही मला मदत करता का? तिथून मी माझ्या घरात जाईन.’’

आम्ही म्हटलं, ‘‘आम्ही तुला ओळखत नाही आणि मुलगा तर कामावर गेला आहे.’’ ‘‘त्याला फोन करून विचारा ना- प्लीज-’’ त्याने असं म्हटल्यावर मी मुलाला फोन केला- पण ‘‘सॉरी- मी फोन घेऊ शकत नाही,’’ असं उत्तर आलं. असं तीन वेळा झाल्यावर त्या माणसाला ‘‘सॉरी’’ म्हणून आम्ही बाहेर गेलो. सगळी खरेदी करून- मस्त ऊन खाऊन आम्ही एक-दीड तासाने परत यायला निघालो.

घराच्या जवळ आल्यावर मात्र त्या माणसाची आठवण झाली. ‘‘कोण असेल हो तो माणूस? त्याला घरात घेऊन आपल्या गच्चीवर कसं जाऊ द्यायचं- आणि त्याने आपल्याला काही केलं तर?’’ मी यांना म्हटलं. माझ्या डोक्यात भारतातल्या गुन्हेगारीची अनेक चित्रं तरळायला लागली आणि ‘अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नका’, ‘बेवारशी सामानाला हात लावू नका’ अशा शासनाकडून अनेकदा ऐकलेल्या सूचना माझ्या कानावर आदळताहेत असं वाटायला लागलं. सत्तरीच्या पुढची आमची वयं आणि भरीस भर म्हणून यांच्या दोनही गुडघ्यांचं पुन:रोपण आणि यांचं झालेलं बायपास! हे सर्व धोके लक्षात घेऊन ‘त्याला’ ‘नाही’ म्हणण्यात शहाणपण आहे असं ठरवलं.

घर अगदी जवळ आल्यावर मी म्हटलं, ‘‘पण काय हो- तो माणूस परत नाही ना येणार? थांबला नसेल ना आपली वाट पाहात?’’ म्हणतात ना- ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’. सोसायटीच्या लॉबीत ‘तो’ खरंच आमची वाट पाहात होता.

पुन्हा जवळ येऊन तो तेच म्हणू लागला. ‘‘अहो, सांगितलं ना- मुलाचा फोन लागत नाहीये.’’ मी जरा जमेल तितक्या संयमाने म्हटलं.

‘‘प्लीज, मला तुमच्या गच्चीवर येऊ द्या- तिथून मी माझ्या घरी जाईन.’’ माझं घर बहुधा आतून लॉक झालंय- कसं कोणास ठाऊक! माझ्या किल्लीने दार उघडत नाहीये.’’ तो पुन: पुन्हा म्हणत राहिला.

‘‘असं करा, या सोसायटीत तुम्हाला ओळखणाऱ्या ब्लॉकच्या माणसाकडे- म्हणजे ब्लॉकच्या मालकाकडे आपण जाऊ आणि त्यांनी सांगितलं तर आम्ही तुम्हाला गच्चीत घेऊन जाऊ.’’ मी उपाय शोधला.

‘‘ठीक आहे. आपण शर्लीकडे जाऊ.’’ तो म्हणाला. हे छानच झालं. शर्ली सेकेट्ररी होती आणि ऐकून का होईना माहितीची होती.

शर्लीने दार उघडायला जरा वेळच लावला. आमचा प्रॉब्लेम ऐकून ती म्हणाली, ‘‘मी ओळखते यांना. चांगला माणूस आहे. तुमचा शेजारी आहे. जाऊ दे त्याला तुमच्या गच्चीतून त्यांच्या गच्चीत आणि तेथून त्याच्या घरात.’’

‘‘तुम्हीपण येता का आमच्याबरोबर?’’ माझी विनंतीवजा पृच्छा. त्यावर शर्ली म्हणाली, ‘‘मला जरा काम आहे आत्ता- पण अ‍ॅलन इज परफेक्ट जंटलमॅन.’’ या तिच्या शिफारशीनंतर आम्ही त्याला गच्चीत जाऊ दिले.

इतकं सगळं रामायण घडल्यावर मुलाचा फोन आला. त्याला सर्व हकीगत सांगितल्यावर तो हसायलाच लागला. ‘‘अगं, काल (म्हणजे दहा-बारा दिवसांपूर्वी बरं का!) नव्हता का गच्चीत – ओळख करून दिली होती तुमची सगळय़ांशी. अगं! तो खरंच चांगला आहे. माझ्या घराची किल्लीसुद्धा आहे त्याच्याकडे. त्याने ठरवलं असतं तर तो माझ्या घरात येऊ शकला असता.’’ मुलगा म्हणाला.

‘‘कसा आला असता रे? तो काय तुझ्या घराची किल्ली बरोबर घेऊन फिरतो? तुझी किल्ली त्याच्याच घरात अडकली असणार ना?’’ माझं तर्कशास्त्र.

‘‘बरं, आता असं करा- त्याला आपल्याकडे कॉफी प्यायला बोलवा, लगेचच.’’ मुलाची सूचना.

‘‘बरं बाबा! सलामत रहे दोस्ताना तुम्हारा,’’ हे मनातच बरं का!

त्याला ‘‘सॉरी’’ म्हणून कॉफीला यायचं आमंत्रण दिलं. बाकरवडी- शंकरपाळे वगैरे देऊ केले. खूप गप्पा झाल्या. त्याला परत परत सॉरी म्हटल्यावर म्हणाला- ‘‘तुमचं बरोबरच होतं. तुमच्या जागी माझी आई असती ना तर तिनेही असंच केलं असतं.’’

‘‘अरे गृहस्था, माझी माणसं ओळखण्याची गोची नसती तर इतकं सगळं घडलंच नसतं.’’ मी मनात म्हटलं.

काही म्हणा- पण मी कधी नव्हे ते कसं प्रसंगावधान दाखवलं याचं मलाच आश्चर्य वाटलं आणि अभिमानसुद्धा!

आता या घटनेकडे पाहताना मला प्रश्न पडतोय की, माझं मेलीचं राहूं द्या- माझं नेहमीचंच आहे हे- पण ‘यांचं’ काय? आता ‘यांचं’पण माझ्यासारखं व्हायला लागलं तर काय करायचं?
वीणा करंदीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:15 am

Web Title: strenger
टॅग : Story
Next Stories
1 दखल
2 जंगलवाचन : चौकटीबाहेरील उडय़ा
3 प्रासंगिक : ‘नीट’च्या निमित्ताने…
Just Now!
X