-सुनिता कुलकर्णी
एप्रिलचा सगळा महिना टाळेबंदीत गेला. सगळ्यांच्याच संयमाची कसोटी होती. बहुतेकजण तिला उतरले, काहीजणांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला. आपापल्या घरी कुटुंबियांबरोबर सुरक्षित असणाऱ्यांनी आपापले छंद जोपासत, वेगवेगळे सिनेमे-वेबसिरीज बघत, नवनवे पदार्थ करून बघत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नातेवाईक- मित्रमंडळींशी संवाद साधत, सोशल मीडियावर हंगामा करत हे दिवस काढले. आता तीन मे नंतर काय? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. टाळेबंदी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

आता सगळ्यांनाच खरं तर असं घरात बसण्याचा कंटाळा आलेला आहे. पण मंडळी, हे सगळं आपल्याच भल्यासाठी आहे. आपला कंटाळा सहन करण्याच्या पलीकडे गेला असेल तर थोडा इतरांचा विचार करू या ? त्यांचं काय झालं असेल जे आपल्या घरी, आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचूच शकले नाहीत आणि कुठल्या तरी सरकारी केंद्रात अडकून पडले आहेत ? त्यांचं काय झालं असेल जे मुंबईतल्या लहान लहान वस्त्यांमध्ये एकेका खोलीत दहा- पंधरा जणांबरोबर अडकून पडले आहेत? त्यांचं काय जे हातावर पोट घेऊन जगतात आणि गेला महिनाभर छदामदेखील कमवू शकलेले नाहीत ? त्यांच्यासाठी सरकारी पातळीवरून काम सुरू आहे.

आपण एकच करायचं आहे की घराबाहेर पडायचं नाही. पण त्याचबरोबर आणखीही काही करता येईल. आर्थिक पातळीवर सगळ्यांचंच नुकसान होत असलं तरी तळच्या थरात असणाऱ्यांना आत्ताच्या घडीला थेट फटका बसतो आहे. अशा वेळी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो, की आपल्या घरी स्वयंपाक, झाडलोट, धुणीभांडी अशी काम करणाऱ्या मदतनीस स्त्रिया, मुलांना सांभाळणाऱ्या स्त्रिया, वृद्धांची देखभाल करणारे, इस्त्रीवाला, कचरा नेणारा, सुरक्षारक्षक यांना काही मदत हवी आहे का? हे आवर्जुन विचारू शकतो. गेला महिनाभर ही मंडळी घरी काम करायला येऊ शकली नसली तरी त्यांचे पगार देऊ शकतो.

मोठमोठ्या आस्थापनांनी पगार कपात जाहीर केली असली तरी असंघटित क्षेत्रातल्या या घर मदतनीसांचे पगार मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांच्या पगारांच्या तुलनेत अगदीच किरकोळ असतात. लॉकडाऊनच्या काळात ही मंडळी येऊ शकली नसली तरी त्यांचे पगार देण्यामुळे मध्यम- उच्च मध्यमवर्गीयांना फार फरक पडणार नाही, पण या घर मदतनीस मंडळींना तो मिळण्यामुळे खूप फरक पडणार आहे, हे लक्षात घ्या. काम न करता पैसे मिळणं आवडतं अशी माणसं अगदी नगण्य असतात. तुमच्या घर मदतनीसांनाही ते आवडत नसणारच, पण संकटाच्या, अडचणीच्या काळात आपल्यासाठी कुणीतरी उभं राहिलं हे ते कधीच विसरणार नाहीत. एवढं करणं ही सुद्धा आजच्या संकटाच्या काळात देशसेवाच आहे.