23 November 2017

News Flash

आरुपाचे रूप : मनाचे पापुद्रे!

ही छायाचित्रे छायाचित्रणाची प्रोसेस सांगताहेत

विनायक परब | Updated: September 8, 2017 11:48 AM

ही छायाचित्रे छायाचित्रणाची प्रोसेस सांगताहेत की, आपल्याच मनाचे पापुद्रे दाखवत आहेत, असाही प्रश्न पडतो.. हा प्रश्न पडणे हेच आयोजकांचे यश आहे आणि आपण प्रदर्शन पाहिल्याचे सार्थकही!

सहज म्हणून एका ड्रॉवरमध्ये ठेवलेली किल्ली, त्यावर पडलेला प्रकाश आणि या प्रक्रियेमध्ये खाली असलेल्या फिल्मवर उमटलेले छायाचित्र असा पहिल्या छायाचित्राचा एक अनपेक्षित प्रवास होता. प्रक्रिया लक्षात आल्यानंतर त्याचे रूपांतर छायाचित्रणाच्या शोधामध्ये झाले आणि एक अनोखे तंत्र माणसाच्या हाती गवसले. त्या आधी चित्र-व्यक्तिचित्र असा प्रकार अस्तित्वात होताच. पण कॅमेरा हाती आल्यानंतर मग माणसाने आजूबाजूचे सारे काही टिपण्याचा प्रयत्न केला. जे समोर, जसे दिसतेय; ते तसे टिपायचे असे त्याचे पहिले स्वरूप होते. मग हेच तंत्र कलात्मक हाती पडल्यानंतर त्यात अधिकाधिक प्रयोग सुरू झाले. कलात्मक छायाचित्रण किंवा समोर दिसते आहे, त्याच्या पलीकडचे असे वेगळे काही जाणवणारे चित्रण अशी एक वेगळी कलाटणी त्याला काही छायाचित्रकारांनी दिली. समोर दिसते ते आणि तसे टिपण्यात फारसे काही कौशल्य नसते. किंबहुना म्हणूनच आजही अनेक कलावंत छायाचित्रणाकडे ललित कलेचे सामथ्र्य असलेली कला म्हणून कधीच पाहत नाहीत. पण कलावंतांची नवी प्रयोगशील पिढी मात्र त्याकडे वेगळ्या समकालीन पद्धतीने पाहते आणि समकालीन पद्धतीनेच तिची मांडणी करण्याचा प्रयत्नही करते. असेच छायाचित्राची समकालीन मांडणी करणारे ‘सरफेस ऑफ थिंग्ज’ हे प्रदर्शन सध्या जिजामाता उद्यानातील भाऊ दाजी लाड संग्रहालयातील प्रदर्शन दालनामध्ये सुरू आहे. रेहाब अल्लाना यांनी याची संकल्पनात्मक मांडणी केली आहे. इथे छायाचित्रणातील वेगळे प्रयोग नक्कीच पाहायला मिळतात.

पहिला प्रयोग आहे तो श्रीनिवास कुरंगटी यांचा. १९९२ ते १९९६ हा कालखंड त्यांनी न्यूयॉर्कमध्ये व्यतीत केला. अमली पदार्थाच्या सेवनात बुडालेल्यांपासून ते समलिंगींपर्यंत अनेकांना त्यांनी जवळून पाहिले. छायाचित्रणासाठी म्हणून त्यांच्याशी जवळीक साधली, त्या दरम्यान त्यांचे आयुष्य जवळून समजूनही घेता आले. ही छायाचित्रे जशी त्यांच्या मित्रांचे आयुष्य सांगणारी आहेत, तशीच ती एका वेगळ्या प्रकारे श्रीनिवासच्या दृश्य डायरीची पानेही आहेत. ही छायाचित्रे वस्तुत व्यक्तिचित्राप्रमाणे येणारी असली तरीही ती खूप पल्याड असलेल्या आयुष्याचा वेध घेणारीही आहेत. हा वेध या साऱ्यांच्या मनातील व्यक्त-अव्यक्त, इच्छा-आकांक्षा आणि त्यांच्या मनात काय चाललं आहे याचाही आहे. काहींच्या बाबतीत मनातलं वादळ चेहऱ्यावर अनुभवताही येतं तर काहींच्या बाबतीत वादळाची चाहूलही दिसते, अनुभवता येते.

दुसरा प्रयोग आहे तो सुकन्या घोष हिचा. एक मोठी प्रवासी बॅग आणि इतर चार लाकडी पेटय़ा. त्यामध्ये काही जुनी छायाचित्रे आणि त्याशिवाय आठवणींचा गुंता असलेली वायर्सची भेंडोळी किंवा त्या लाकडी बॉक्समधील वेगवेगळ्या चकत्यांना जोडलेली काहीसा गुंता असलेली तार. हे सारे पाहत असतानाच समोरच्या पडद्यावर एक व्हिडीओ सुरू असतो. बारकाईने पाहिल्यावर लक्षात येतं की, हे सारे सुकन्याच्या कुटुंबीयांचेच फोटो आहेत, जुन्या जमान्यातील. आठवणींना जोडणारे, त्याची वेगळी आणि आधुनिक मांडणी करून त्यातून ती काही सांगू पाहतेय. कुटुंबातील घटनांची गुंतागुंत, कदाचित आलेली वादळंही. कारण त्या समोरच्या व्हिडीओमध्ये कधी एकमेकांमधला संवाद, तर कधी आवाजाचा लहानसा कल्ला छायाचित्रे पुढे सरकताना ऐकू येतो.. कधी पुढच्या दृश्यात विरून जातो.. कुटुंबाचे मन वाचण्यासारखेच काही तरी आपण या नव्या मांडणीतून अनुभवत असतो.

तिसरा प्रयोग आहे उझ्मा मोहसिन यांचा. अगदी अलीकडे म्हणजे १९८५ सालापर्यंत. छायाचित्रण हा केवळ रईसांचाच कलाप्रकार होऊन राहिला होता, त्याचे लोकशाहीकरण झालेले नव्हते. कमी किमतीत उपलब्ध झालेल्या पॉइंट अ‍ॅण्ड शूट कॅमेऱ्याने ते घडवून आणले. पण तोपर्यंत आपल्या मनातली फॅण्टसी प्रत्यक्ष छायाचित्रात उतरवण्याची संधी सामान्यांना मिळाली ती बॉक्स कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात आलेल्या ट्रिक फोटोग्राफीने. कारण ती स्वस्तात उपलब्ध होती. चंद्रकोरीवर बसलेल्या तरुणीचे फोटो हे तर गरोदरपणातील वाडी भरण्याच्या सोहळ्यात घरोघरी अनेकांनी पाहिले असतील. किंवा जत्रेमध्ये गाडीच्या लाकडी मॉडेलमागे बसलेल्या कुटुंबाचे गाडीत बसलेले छायाचित्र. पूर्वी छाती फाडणाऱ्या हनुमानासारखे शर्ट बाजूला करून आत आवडीच्या व्यक्तीचा चेहरा दाखविणारे छायाचित्रही प्रसिद्ध होते. अशीच काही ‘ट्रिक छायाचित्रे’ इथे पाहायला मिळतात. सोबत बॉक्स कॅमेराही ठेवलेला दिसतो. ज्या भारतभूषण महाजन आणि अमित महाजन यांनी आयुष्यभर हा उद्योग केला, त्यांचे प्रत्यक्ष काम दाखविणारा एक मूकपटही सोबत इथे सुरू असतो. ही छायाचित्र व्यवस्थित पाहू लागतो तेव्हा ही आधुनिक-अलीकडची आहेत हे लक्षात येते. कारण शर्ट फाडून हृदय दाखविणारा तरुण हृदयाच्या जागी इन्स्टाग्रामचा लोगो दाखवत असतो. ही सारी छायाचित्रे कृष्णधवल आहेत, पण त्याखाली शेजारी ठेवलेल्या लाल स्टॅम्पच्या माध्यमातून लाइक्स उमटवण्याची सोयही आहे. मनातली फॅण्टसी आणि प्रत्यक्ष चित्रण असा अनोखा मेळ इथे आहे. फॅण्टसीच्या माध्यमातून मनाचाच एका वेगळ्या पद्धतीने घेतलेला आधुनिक शोध.

चौथा प्रयोग आहे तो गोवा सेंटर फॉर अल्टर्नेटिव्ह फोटोग्राफीचे एडसन बेनी डायस यांनी केलेला. निगेटिव्हवर प्रोसेस करण्याची प्रक्रिया ते छायाचित्रागणिक स्पष्ट करतात. ते करताना वापरलेल्या छायाचित्रांमध्ये त्यांच्याच स्वतच्या तीन प्रतिमा एकत्र एकाच छायाचित्रात पाहायला मिळतात. तीन भावमुद्रा, तीन प्रक्रिया. मग छायाचित्रातील निगेटिव्ह टोन वाढवण्याच्या नोंदीचा संबंध मनातील निगेटिव्हिटीशी असावा का, असाही प्रश्न मनात येऊन जातो. या प्रक्रियेचे चित्रण स्पष्ट करणारी छायाचित्रे छायाचित्राची प्रोसेस सांगताहेत की, आपल्याच मनाचे पापुद्रे दाखवत आहेत, असाही प्रश्न पडतो.. हा प्रश्न या प्रदर्शनादरम्यान पडणे हेच आयोजकांचे यश आहे आणि आपण प्रदर्शन पाहिल्याचे सार्थकही!
विनायक परब : response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab

First Published on September 8, 2017 1:03 am

Web Title: surface of things photography exhibition in bhau daji lad museum