जगभरात ऱ्हास होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षी-प्राण्यांचे चित्रण आणि वन्यजीवन वाचविण्यासाठी लोकजागरणाचा प्रयत्न हा सुशील गर्जे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा हेतू होता.

वाघाचे दोन छावे अशा प्रकारे उभे आहेत, त्यांची उभे राहण्याची ढब वेगळी असली तरी छायाचित्रकाराने साधलेला अँगल असा आहे की, त्यामुळे त्यांचा चेहरा एकच असल्याचा भास व्हावा. थेट अजिंठा लेणीप्रमाणेच भारतभरातील काही लेणींमधील चित्र-शिल्पांमध्ये अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते, त्याचीच आठवण व्हावी. त्याच्या शेजारीच ज्या छायाचित्रापासून प्रदर्शनाची सुरुवात होते तेही असेच उत्कंठा वाढविणारे असते. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने टिपलेल्या या छायाचित्रात पाश्र्वभूमीस त्रिकोणी डोंगर, नदीचे चमचमते पाणी आणि त्या पाश्र्वभूमीवर हत्तीची बाहय़रेखा पाहायला मिळते.. दृश्यभान असलेली अशी छायाचित्रे आणखी पाहायला मिळतील असे वाटते. त्या पठडीत मोडणारी काही छायाचित्रे आहेतदेखील.. पण वन्यजीव चित्रणाचे प्रदर्शन पाहताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमीच ध्यानात ठेवावी लागते ती म्हणजे या प्रकारच्या चित्रणामध्ये छायाचित्रकाराच्या हाती वेळ साधणे याच्या पलीकडे काहीही नसते. एरवी थोडे मागे-पुढे होत छायाचित्रणाची चौकट सुधारण्याची सोय या प्रकारात नसते. कारण वन्यजीवांचे वर्तन आपल्या हाती मुळीच नसते. असते ते केवळ शांत राहणे आणि हालचाल न करणे. कारण आपली लहानशी हालचालदेखील त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी असते. आपल्या अस्तित्वाची जाणीव होताच त्यांचे वर्तन बदलते. त्यामुळे या प्रकारचे छायाचित्रण तुलनेने संयमाची परीक्षा पाहणारे व कठीण असते. मात्र गेल्या काही वर्षांत उत्तम प्रतीचे कॅमेरे सहज व कमी किमतीत उपलब्ध झाल्याने, जंगलात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने वन्यजीव चित्रण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र वन्यजीव चित्रण मनापासून करायचे असेल आणि पुरेसा संयम असेल तर वन्यजीवांच्या वर्तनाचा तेवढाच अभ्यासही करावा लागतो. हा अभ्यास मग तुमच्या चित्रणातून जाणवतो. हे सारे लक्षात ठेवून हे प्रदर्शन पाहावे लागते.

जहांगीरच्या श्रोतृगार दालनात अलीकडेच सुशील गर्जे यांचे वन्यजीव चित्रणाचे प्रदर्शन पार पडले. हे प्रदर्शन पाहताना वन्यजीवचित्रणाच्या संदर्भातील उपरोक्त गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक होते. गर्जे मूळचे विक्रीकर विभागातील अधिकारी असून सध्या पुराभिलेख विभागामध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. भारतातील ११ हून अधिक अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने त्याचप्रमाणे केनिया, दक्षिण आफ्रिकेतील अभयारण्येही पालथी घालून त्यांनी हे चित्रण केले आहे. वन्यजीव चित्रण म्हटले की, अनेकांना शिकारीचे चित्रण पाहायचे असते. शिकार करण्यापूर्वी गवतामध्ये लपून बसलेला वाघ-बिबटय़ा, हरणाच्या दिशेने झेपावणारा वाघ.. जीव घेऊन पळणारे हरीण, अखेरीस हरणाची शिकार करून त्याचे मुंडके घेऊन जाणारा वाघ अशा अनेक छायाचित्रांचा यात समावेश होता.

जगातील सर्वात मोठे प्राण्यांचे स्थलांतरण मसाई मारा अभयारण्यामध्ये होते. हे प्राणी संपूर्ण अभयारण्य ओलांडून अनेक दिवसांचे स्थलांतरण वेगात करतात. प्रचंड मोठा प्रवाह असलेली नदी ओलांडून जातात. नदीच्या प्रवाहात अनेक जण वाहूनही जातात. तर या स्थलांतरादरम्यान शिकार झालेल्या, तुलनेने दुबळ्या असलेल्या प्राण्यांची संख्याही तेवढीच असते. लाखोंच्या संख्येने होणारे हे स्थलांतरण जगभरासाठी आजही आश्चर्याचा विषय राहिले आहे. त्या स्थलांतरणाचीही काही निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात होती. जे जे काही शक्य आहे ते ते सर्व या प्रदर्शनात मांडण्याचा गर्जे यांचा प्रयत्न होता. या प्रदर्शनाकडे केवळ छायाचित्रांचे प्रदर्शन म्हणून पाहण्याबरोबरच वन्यजीवन वाचविण्यासाठी लोकजागरण करण्याचा एक प्रयत्न म्हणून अधिक पाहावे लागते. कारण तोच गर्जे यांच्या या प्रदर्शनामागचा वेगळा व महत्त्वाचा हेतू आहे. जगभरात ऱ्हास होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षी- प्राण्यांचे चित्रण हाही या प्रदर्शनामागचा एक महत्त्वाचा हेतू होता. असे ऱ्हास होण्याच्या मार्गावर असलेले निलगिरी थार, लायनटेल मकाव, हूलॉक गिब्बन, लायन केप्ड लंगूर, पिगटेल मकाव, गोंडस पिल्लासोबतचे गोल्डन लंगूर, हूलॉक गिब्बन आणि बारशिंगा या साऱ्यांची छायाचित्रे गर्जे यांनी या प्रदर्शनात सादर केली होती. यातील एका बाजूला असलेल्या बारशिंगाचे छायाचित्र टिपताना त्यांनी दृश्यात्मक भानही चांगले राखलेले दिसते.

याशिवाय मसाईमारामधील सिंह, झाडाच्या फांदीवर उभा बिबटय़ा, संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी निघालेली सिंहीण आणि दोन छावे, छाव्यासोबत खेळणारा वाघ, एकाच फ्रेमध्ये ताडोबा इथे टिपलेले तळ्याकाठी पाणी पिणारे अस्वल आणि पलीकडे वाघ, धुळीची आंघोळ करणारा हत्ती, राजबिंडा मोर अशी एक ना अनेक छायाचित्रे या प्रदर्शनात होती. समागमात रत असलेले सिंह जोडपे, ऑस्ट्रिच ही छायाचित्रेही लक्षवेधी होती. आजूबाजूला खाक झालेल्या निसर्गात उरलेली एकमात्र सुक्या झाडाची काटकी धरून उभे असलेले माकडाचे लहान पिल्लू हे पाहताक्षणी चेहऱ्यावर हसू आणणारे आणि त्याच वेळेस वणव्याचा चटका जाणवून देणारे होते. अंबोसेली इथले मोठय़ा खडकाजवळ उभ्या हत्तीचे छायाचित्रही असेच वेधक होते. हत्तीची त्वचा आणि दगडाचा पोत असे वेगळे दृश्यभान या छायाचित्रात होते. अखेरचे छायाचित्र होते ते मछली या वाघिणीला श्रद्धांजली वाहणारे.. जनजागरणाचा गर्जे यांचा उद्देश बहुतांश सफल करणारा असा या प्रदर्शनाचा उल्लेख करता येईल.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab