20 March 2019

News Flash

नांदेडच्या तलवारींचा खणखणाट

शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये कृपाण आणि तलवारी यांची मोठी बाजारपेठ आहे.

एकेकाळी खुलेआम चालणाऱ्या या बाजारपेठेला आता अँटिकचीही झळाळी आली आहे.

सुहास जोशी
शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये कृपाण आणि तलवारी यांची मोठी बाजारपेठ आहे. एकेकाळी खुलेआम चालणाऱ्या या बाजारपेठेला आता अँटिकचीही झळाळी आली आहे.

मला पाहायचा होता तो शस्त्र बाजार असा उघडय़ावर दिसणार नव्हता. किंबहुना ते असे सहज पाहायला मिळणे जरा कठीणच होते. पण सुरुवात म्हणून तख्त सचखंडच्या समोरच असणाऱ्या कृपाण विक्रीच्या एका दुकानात गेलो. अगदी छोटीशी टपरी असावे असे हे दुकान. येथे वेगवेगळ्या आकारांतील कृपाण तर होतेच, पण त्याच जोडीला असंख्य फॅन्सी सुरेदेखील. कमांडो डॅगरसारखे सुरे तर हवे तेवढे.

पण मला तलवारच हवी असल्याने एका मोठय़ा दुकानात शिरलो. तेथे असंख्य कृपाण व अन्य वस्तू मांडून ठेवल्या होत्या. एक-दोन फॅन्सी (चायनीज) तलवारीदेखील लटकावलेल्या होत्या. येथे तलवार मिळू शकेल असं दिसत होतं. दुकानदाराकडे पूजेसाठी तलवार हवी आहे, अशी मागणी केल्यावर त्याने दोन क्षण निरखून पाहिलं.

मी काही शीख नव्हतो, त्यामुळे त्याने परत विचारले, ‘‘तलवार ले के क्या करोगे?’’

‘‘पूजेत ठेवणार.’’ माझे उत्तर तयारच होते.

‘‘कोठून आलात? आणि कसे आलात?’’ दुकानदाराचाही पुढचा प्रश्न तयार होता.

‘‘गाडीने आलो.’’ या उत्तरानंतर मग मात्र त्याने दुकानातील पोरांना तलवार काढायला सांगितली.

झगमगीत गुलाबी म्यानबंद तलवार समोर आली. एकदम चकाचक. म्यानातून तलवार बाहेर काढून बाजूला ठेवली. एकदम चकाकणारी अशी दोनेक फूट लांबीची ती तलवार. मुठीपासूनच पाते सुरुवातीला थोडे सरळ गेलेले आणि पुढे वक्राकार झाले होते.

तलवारीची किंमत होती तीन हजार रुपये; पण नेणार कशी हा प्रश्न होताच. दुकानदाराने सांगितले की, तुम्ही ही तलवार विकत घ्यायचे नक्की करा, तुम्हाला तलवार कशी घेऊन जायचे ते सांगतो. मी तलवार घ्यायचे ठरवले. तेव्हा दुकानदार बोलू लागला. ‘‘यह तलवार मने आपको बेची नही और आपने खरीदी नही. कोई आपको पकडता है तो बताना की, आप ये तलवार सायन कोळीवाडा के गुरुद्वारा में चढाने के लिये लेके जा रहे हो.. और घबराना नही, मुंबई के लोग बहुत घबराते है ऐसी बातो में. कल गाडी लेकर आ जाओ और तलवार ले लो.’’

खरं तर कायद्यानुसार त्या दुकानदाराला मला तलवार विकायला बंदी होती, पण तिथे निव्वळ व्यापार होता. त्यापुढे जणू कायद्याची भीती नव्हती.

त्याच्या दुकानात असंख्य कृपाण होते. एकूणच नांदेडमधील कृपाणांची संख्या पाहिल्यास कृपाणांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होत असणार हे नक्की होते. त्यामुळे ती उत्सुकता होतीच. त्या संदर्भात दुकानदाराकडे विचारणा केली असता त्याचे उत्तर धक्कादायक होते. तो सांगतो की, हल्ली हा सारा माल मुंबईवरून येतो आणि मुंबईला हा माल चीनमधून येतो. ‘‘अगर ये सब अपने इधर बनता तो हम इतना सस्ता बेचही नही पाते.’’

संपूर्ण लेख वाचण्यासाठी ‘लोकप्रभा’ दिवाळी अंक आपल्या नजीकच्या स्टॉलवर उपलब्ध.

First Published on November 2, 2018 1:02 am

Web Title: sword nanded