23 July 2019

News Flash

‘तंदुरुस्त पंजाब’चा नवा रक्ताध्याय (पंजाब)

पंजाब राज्याने आजवर घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी ‘तंदुरुस्त पंजाब’ हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

‘तंदुरुस्त पंजाब’च्या माध्यमातून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गरजूंना मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.

गोविंद डेगवेकर – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
पंजाब राज्याने आजवर घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी ‘तंदुरुस्त पंजाब’ हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.  ‘तंदुरुस्त पंजाब’च्या माध्यमातून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गरजूंना मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.

आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहेच, पण त्यात नावीन्य आणून आणखीन जनहिताचे निर्णय घेण्याचे काम खूपच कमी वेळा होत असते. पंजाब राज्य सरकारने या वर्षांपासून सुरू केलेली ‘तंदुरुस्त पंजाब’ ही योजनेची म्हणूनच दखल घ्यावी लागेल. पंजाबमध्ये आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यास ती आता सरकारी रुग्णालयातून मोफत पुरविण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१९ पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. पंजाबमधील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गरजूंना मोफत रक्ताचा पुरवठा केला जात आहे. रक्ताच्या उपलब्धतेची माहिती

‘ई-रक्तकोष’च्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना मिळविता येणार आहे.

‘ई-रक्तकोष’ ही प्रणाली राज्यातील गरजूंना उपयोगी पडणार आहे. काही व्यक्तींना रक्तातील प्रमुख घटकांची आवश्यकता असते. अशा वेळी रक्तपेढीत जाऊन तसे घटक उपलब्ध आहेत की नाहीत, याची माहिती घेण्यास सुरुवात केली जाते. त्यानंतर मागणीनुसार ते घटक एकत्रित जमा केले जातात. हे घटक एकाच रक्तपेढीत वा नजीकच्या रक्तपेढीतही मिळतील, याची हमी देता येत नाही. यासाठी दूरवर असलेल्या आणि वाहतुकीसाठी जिकिरीच्या रक्तपेढीतून आवश्यक घटक मिळविण्यात वेळ जातो. रुग्णांच्या नातेवाईकांची ही अडचण दूर व्हावी, या उद्देशाने पंजाब सरकारच्या आरोग्य विभागाने ‘ई-रक्तकोष’ हे संकेतस्थळ तयार केले आहे. ही सेवा सर्वासाठीच मार्गदर्शक ठरणार आहे. याशिवाय रक्त वा रक्तातील प्रमुख घटक मिळविणे सुकर ठरणार आहे.

पंजाबमध्ये एकूण ११६ रक्तपेढय़ा आहेत. यातील ४६ रक्तपेढय़ा या सरकारच्या वतीने चालविण्यात येतात. सहा रक्तपेढय़ांचे काम लष्कर पाहते. तर उर्वरित ६४ रक्तपेढय़ा या खासगी संस्थांच्या माध्यमातून चालविल्या जातात. सरकारने रक्तपुरवठा सेवा ‘ऑनलाइन’ करण्याआधी संपूर्ण तयारी केली आहे. यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील रक्तपेढय़ांमधून २ लाख २६ हजार युनिट रक्त जमा करण्यात आले आहे. त्यानुसार ‘ई-रक्तकोष’वर त्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री ब्रह्म मोहिंद्र यांनी दिली.

‘ई-रक्तकोष’ हे संकेतस्थळ राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग आहे. या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात रक्ताचा पुरवठा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. सध्या या पोर्टलवर देशभरातील सर्वच सरकारी रक्तपेढींची माहिती उपलब्ध आहे. मात्र पंजाब राज्य सरकारने याचाच आधार घेत दोन पावलं पुढं टाकत मोफत रक्तपुरवठा सुरू केला आहे. पंजाब सरकारने ‘ई-रक्तकोष’च्या साहाय्याने राज्यातील रक्तपुरवठा प्रणाली अधिकाधिक वेगवान आणि रुग्णांना साह्य़कारी ठरेल यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, दीर्घकालीन व्याधी आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना रक्तातील प्रमुख घटकांची आवश्यकता असते. यात प्लेटलेट्सने समृद्ध प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि गोठवलेल्या घटकांचा  समावेश असेल. हे सारे घटक मोफत उपपब्ध करून दिले जातील. ‘तंदुरुस्त पंजाब’च्या माध्यमातून मोफत रक्तपुरवठा ही एकच सुविधा नसून हे रक्त सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये २४ तास उपलब्ध असेल, याचेही व्यवस्थापन करण्यात आले आहे. राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना सरकारी रुग्णालयात एक युनिट रक्त मिळविण्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून ३०० रुपये, तर वैद्यकीय महाविद्यालयात ५०० रुपये खर्च करावे लागत होते. खासगी रक्तपेढय़ांमध्ये हे आकडे हजाराचा टप्पा पार करतात. पण पंजाबमध्ये या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची यातून सुटका झाली आहे.

तंदुरुस्त पंजाब अभियान हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात लोकसहभागावर अधिक भर देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य ही या मोहिमेची प्रमुख संकल्पना आहे. वैयक्तिक आरोग्याची काळजी वाहता वाहता सार्वजनिक आरोग्यालाही हातभार लावण्यासाठी जनजागृती करणे हे यातील प्रमुख उद्दिष्ट आहे. यात हवेचा दर्जा, शुद्ध पाणी, सुरक्षित अन्न आणि जगण्यासाठी आवश्यक पर्यावरणाचे संवर्धन यावर भर देण्यात आला आहे. मानवाला जगण्यासाठीच्या वरील तीन प्रमुख घटकांचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत आहे आणि असे जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे अन्नभेसळ वा असुरक्षित अन्न हा मानव, पर्यावरण आणि पर्यायाने राज्याच्या विरोधात केलेला गुन्हाच आहे. या साऱ्या कृत्यांना साह्य़ करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यावर कायेदशीर कारवाई करण्याची हमी सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. अन्न भेसळीमुळे मानवी प्रजनन आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत आणि या साऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या विविध सरकारी यंत्रणांकडून हवे तेवढे यश लाभलेले नाही. म्हणूनच तंदुरुस्त पंजाबची संकल्पना पुढे आली आहे. शाश्वत मार्गाचा अवलंब हे या संकल्पनेचे मुख्य अंग आहे. याच आधारे मानवी निर्मिती क्षमतेत वाढ करण्याच्या सर्व शक्यता पडताळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक घरात स्वच्छ पाणीपुरवठा, शहरे आणि ग्रामीण भागातील हवेचा दर्जा सुधारणे. याशिवाय भेसळमुक्त अन्न पुरवण्याचा आणि त्यातून नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा करणे अशी यातील काही उद्दिष्टे आहेत.

यासाठी सरकारी यंत्रणांसमोर स्पष्ट संकल्पना आणि साध्य करता येतील, अशी उद्दिष्टे घालून देण्यात आली आहेत. जनजागृती हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणा, खासगी संस्था आणि लोकांसमोर मर्यादित वेळेत पूर्ण होतील अशी उद्दिष्टे आखण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व मोहिमेसाठी लागणारा निधी हा त्या त्या खात्यांमार्फत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून गोळा केला जाईल. त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र काही विशिष्ट उपक्रमांसाठी आवश्यकता भासल्यास निधी उभारण्यासाठी सरकार पुढाकार घेईल.

‘तंदुरुस्त पंजाब’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी पंजाब सरकारने राबविलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खात्यांतर्गत असलेला समन्वय. स्वच्छता आणि पाणीपुरवठा खाते, स्थानिक प्रशासन, वाहतूक, पर्यावरण, कृषी व फलोत्पादन, वन आणि सहकार खात्यांमध्ये वेळोवेळी समन्वय या मोहिमेत अत्यंत प्रभावी ठरलेला आहे. या अभियानाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री नेतृत्व करीत आहेत. सर्व खात्यांमार्फत एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा क्षेत्रीय अधिकारी राज्यातील नियुक्त भागात होणाऱ्या ‘तंदुरुस्त पंजाब’ अभियानातील कार्यक्रमांवर देखरेख करील.

विशेष करून दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळीचे प्रमाण खूप असते वा अशी भेसळ करणे सोपे असते. त्यामुळे अशा पदार्थाचा दर्जा तपासूनच मग त्याची खरेदी करण्याविषयी जनजागृती करण्यात येते. ही जबाबदारी प्रामुख्याने आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांत असलेल्या औषध दुकानांमध्ये विनापरवाना औषधांची विक्री केली जाते, तिला अटकाव घालण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य शिबिरे, भेसळ कशी ओळखावी, यासाठी कार्यशाळा भरविणे. ३० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत आरोग्य शिबिरे आणि तरुणांमध्ये आरोग्यदायी सवयी आणि उत्तम मानसिक आरोग्य राखण्यासाठी जागृती करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत केले जाते.

पाणीपुरवठा खात्यांतर्गत ग्रामीण भागांत शुद्ध पाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय शहरी आणि ग्रामीण भागांत उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आणि प्रत्येक घरासाठी शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वच्छता मंत्रालयाकडे सोपविण्यात आली आहे. हवेतील प्रदूषण हे केवळ औद्योगिक कारणांमुळेच होते, असे नाही. तर ‘आजारी’ (अनफिट) वाहनांमधून सोडला जाणारा ‘कार्बन मोनॉक्साइड’ आणि अन्य विषारी वायूंमुळे वातावरणातील घटकांवर परिणाम होतो. त्यातून हवेचा दर्जा खालवतो आणि श्वसनाशी संबंधित आजारांत भर पडते. त्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

एकूणच पंजाबच्या तंदुरुस्तीसाठी सुरू असलेले हे अभियान सध्या रक्तपुरवठय़ाच्या माध्यमातून जोर पकडू लागले आहे. भविष्यातदेखील त्यातून आणखीन सकारात्मक गोष्टी घडतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

First Published on March 15, 2019 1:02 am

Web Title: tandrust punjab free of cost blood in all punjab govt hospitals