-जय पाटील
७० टक्के महिलांना मासिक पाळी का येते हे माहीत नाही. ९२ टक्के महिलांना वाटते, की पाळीत होणारा रक्तस्राव शरीरासाठी हानीकारक असतो. ५५ टक्के महिला पाळी सुरू असताना स्वयंपाकघरात पाऊलही ठेवत नाहीत. काही महिलांना आजही सॅनिटरी पॅड आणण्यासाठी तब्बल ९ किलोमीटर प्रवास करावा लागतो… टाट ट्रस्टने महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागांत केलेल्या सर्वेक्षणातील या नोंदी मासिक पाळीविषयी आजही असलेले अज्ञान अधोरेखित करतात. ही स्थिती बदलण्यासाठी टाटा ट्रस्टने मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छता आणि काळजीविषयी जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे.

मासिक पाळी हा काही लपवण्यासारखा किंवा लाजिरवाणा प्रकार नाही, हे बिंबवण्याचा प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत केला जात आहे. या विषयावर महिलांप्रमाणेच पुरुषांनाही बोलतं करण्यासाठी ट्रस्टने स्थानिक पातळीवर ‘सखीं’ची नेमणूक केली आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी चार स्तरीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुलींशी आणि महिलांशी या विषयावर संवाद साधून त्यांना योग्य माहिती देणे, किशोरवयीन मुले आणि जोडप्यांशी या विषयावर चर्चा करणे, पर्यावरणस्नेही सॅनिटरी पॅड्स तयार करणे आणि त्यांचा सातत्यपूर्ण पुरवठा सुरू ठेवण्यासाठी गाव पातळीवर पुरवठा साखळी निर्माण करणे, सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट कशी लावावी, याविषयी योग्य मार्गदर्शन करणे असे चार टप्पे यात आहेत.

या उपक्रमाअंतर्गत जुलै २०१८पासून २०० सखींना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आठ राज्यांतील सुमारे एक लाख दोन हजार २४२ महिला आणि मुलींपर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ९०० गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

टाळेबंदीमुळे दुर्गम भागांतील अनेक मुली आणि महिलांना सॅनिटरी पॅड्स मिळू शकले नाहीत आणि त्या पुन्हा कापडाची घडी वापरू लागल्या. त्यामुळे आता महिलांना घरच्या घरी पॅड्स शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिवाय काही महिला बचत गटांना कमी खर्चात आरामदायी आणि पुन्हा-पुन्हा वापरण्यायोग्य पॅड्स तयार करून विकण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्या बळावर उत्तर प्रदेशातील बचत गटांनी पंधराशे पॅड्स तयार करून त्यांची विक्री केली आहे. विविध राज्यांतल्या २० हजार महिलांना त्यासंदर्भातले प्रशिक्षण देण्यात आले आहे.