News Flash

निसर्ग : मृत्यू एका समुद्राचा

विकासाच्या नावाखाली जगभरात बळी जातो तो जलाशयांचा.

माणसं निसर्गात हस्तक्षेप करून नद्यांचे प्रवाह बदलतात. नैसर्गिक तळी बुजवतात. डोंगर खोदून नेस्तनाबूत करून टाकतात. झाडांची कत्तल करतात. हे सगळं कमी होतं म्हणून की काय मध्य आशिात सात देशांनी मिळून चक्क एक समुद्रच नामशेष करून टाकला आहे.

विकासाच्या नावाखाली जगभरात बळी जातो तो जलाशयांचा. सुरुवातीला जलाशयाच्या काठावर घरे, कारखाने उभारले जातात. ते पाणी वापरले जाते. या घरा-कारखान्यांचे सांडपाणी झिरपत जलाशय अशुद्ध होऊ लागतो. कोणाचे लक्ष नाही असे पाहून हळूहळू भर टाकून जलाशयावर आक्रमण करत ‘भूमी’ निर्माण केली जाते. या अशुद्ध पाण्याचा आता काय उपयोग असा कांगावा करत तो बुजवलाच पाहिजे अशी ओरड सुरू होते. भर टाकून निर्माण केलेल्या जमिनीवर कुठे शेती, कुठे घरे, कुठे कारखाने पसरू लागतात. कालांतराने जलाशयाचे नाव फक्त शिल्लक राहते! हे सर्व जाणीवपूर्वक होत असते, पण अजाणता सात राष्ट्रांकडून चक्क एक समुद्रच नामशेष झाला आहे तो मात्र जमीन निर्माण करण्याच्या हव्यासातून नाही तर केवळ निष्काळजीपणामुळे, दूरदृष्टीच्या अभावामुळे. जिथे अरल समुद्र होता तिथे आता वाळवंट निर्माण झाले आहे आणि तेही खार जमिनीचे.

मध्य आशियातील अरल समुद्र हा होता एक विस्तृत खाऱ्या पाण्याचा जलाशय. त्याच्या प्रचंड विस्तारामुळेच त्याला जलाशय न म्हणता ‘समुद्र’ म्हणत. भूवेष्टित समुद्र असे त्याचे स्वरूप होते. १९६० साली त्याचे क्षेत्रफळ होते ६७,४९९ चौरस किलोमीटर. त्याचे खोरे उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझागस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या सात राष्ट्रांमध्ये पसरलेले होते. हा समुद्र म्हणजे जगातील चौथ्या क्रमांकाचा भूवेष्टित जलाशय होता. ५० वर्षांत त्याच्या ८२ टक्के भागाचे वाळवंट बनले आहे. अरलकुम. अलीकडच्या काळातली ती सर्वात मोठी परिस्थितिविज्ञानविषयक (एू’ॠ्रूं’) दुर्घटना आहे. ‘निसर्गविरोधात केलेला गुन्हा आहे तो’ असे इस्तंबूल येथील चित्रपट निर्माते रान्साद अस्ताई म्हणतात. त्यांनी २००३ मध्ये अरल समुद्रावर एक लघुपट निर्माण करून त्या समुद्राची दुर्दशा आणि त्याच्या किनाऱ्यावर एके काळी राहणाऱ्या नागरिकांचे हाल जगासमोर आणले होते.

अरल समुद्रात पाणी वाहून आणायच्या त्या दोन महानद्या म्हणजे अमुदर्या आणि सायर दर्या. त्यांचे पाणी वाहून आणण्याचे प्रमाण कमी होण्याची सुरुवात झाली १९२९ मध्ये. त्या वेळी अखंड सेव्हिएत रशियाचे नेतृत्व होते जोसेफ स्टॅलिन यांच्याकडे. कापसाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्याने सामूहिक शेती धोरण अवलंबिले. त्यामुळे अरल समुद्राच्या पारंपरिक पाणी व्यवस्थापनावर गदा आली. १९४० मध्ये त्याने निसर्गात बदल घडवणारी महायोजना अमलात आणली. त्यासाठी कालव्यांचे जाळे आणले. पण कालव्यांचे काम निकृष्ट होते. परिणामी पाणी गळती होऊन बाष्पीभवनामुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पाण्याच संतुलन होते. अमु दर्या आणि सायर दर्याच्या पाणलोट क्षेत्रात जैवविविधता चांगली सांभाळली जात होती. पण साठोत्तरी काळात २० ते ६० घन किलोमीटर पाणी जमिनीकडे वळवल्याने अरल समुद्रात येणारे पाणी कमी होत गेले. १९६० मध्ये समुद्र प्रत्यक्षात आटू लागला. आटण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने १९८७ मध्ये तो विखंडित झाला. उत्तरेकडे एक आणि दक्षिणेकडे एक असे दोन स्वतंत्र जलाशय दिसू लागले. सायरचे पाणी उत्तर जलाशयात तर अणूचे दक्षिण जलाशयात येत होते. १९९२ मध्ये स्थानिक प्रशासनाने एक मातीचा बंधारा घालून पाण्याची पातळी वाढवण्याचे प्रयत्न केले. ऑगस्ट २००५ मध्ये कझागस्तानने मातीच्या बंधाऱ्याच्या जागी धरण बांधले (कोक अरल) छोटय़ा जलाशयाच्या पातळीत त्यामुळे वाढ झाली. पण मोठय़ा जलाशयाची हालत बिघडतच गेली. २००० साली तो पुन्हा विभाजित झाला. पूर्वेकडचा खंड उथळ होता तर पश्चिमेकडचा काहीसा खोल. दोन्ही खंडांना जोडणारी एक घळ होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्वेकडचा उथळ खंड आटला व तिथे आरलकुम हे वाळवंट दिसू लागले.

तज्ज्ञांच्या मते पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघराज्याच्या आर्थिक धोरणापोटी समुद्र आटण्यास सुरुवात झाली. आणि नंतरच्या भौगोलिक राजकारणामुळे तर त्याचा मृत्यूच झाला. समुद्राला वेढून असणाऱ्या सात राष्ट्रांनी समुद्र वाचवण्याकरता काही प्रयत्न केलेच नाहीत. त्यात त्या भागातील राजकीय उलथापालथ, वाढत्या कट्टर इस्लामवाद्यांना व चीनच्या हितसंबंधाची धडपड यामुळे तेथील परिस्थितिविज्ञानविषयक आर्थिक आणि मानव कल्याणाला फार मोठा धक्का बसला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भक्कम असलेला मच्छीमार व्यवसाय १९८० मध्ये संपुष्टात आला. पाण्याची क्षारीयता वाढत गेल्याने स्थानिक माशांचे वाण हळूहळू मंदावत नष्टच झाल्याने हे संकट ओढवले.

या समुद्री खोऱ्यात एकेकाळी ७० सस्तन प्राणी, ३१७ पक्षी प्रजाती होत्या. त्या घटून केवळ ३२ प्राणी आणि १६० पक्षी जाती तग धरून आहेत.

समुद्रात पाणी होते तोपर्यंत या देशांच्या दरम्यान स्वस्त अशी सागरी वाहतूक होत असे. पण १९८० साली ती बंद झाली. आता तर उघडय़ा पडलेल्या जमिनीवर क्षारांचे थर दिसू लागले आहेत. तिथे कोणतेच पीक घेता येणार नाही. वाऱ्याच्या झोतामुळे सागरतीरावरच्या देशांत धूलिकणांबरोबरच क्षारकण उधळून येऊ लागले आहेत. कझागस्तान व उझबेगिस्तानच्या पूर्वीच्या किनारपट्टय़ात १० कि.मी भूसागराचे हवामान बदलून गेले आहे. उन्हाळ्याचे तापमान वाढले आहे तर हिवाळ्याचे खाली गेले आहे. तेथील लोकांचे आरोग्य बिनसले आहे. पिण्याचे पाणी जंतुसंसर्गाने व्यापले आहे. टायफॉइड, हगवण यांचे प्रमाण वाढले आहे. पंडुरोग, क्षयरोग यांचा त्रास खास करून गर्भवती महिलांना सतावतो आहे. यकृत, मूत्रपिंडाचे आजार बळावले आहेत.

पूर्वेकडचा जलखंड आटल्यावर उझबेगिस्तान सरकारने २००० कोटी खर्चाची योजना आखली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्ज घ्यावे लागेल. त्याच्या फेडीसाठी कझागस्तान, किर्गिजस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान यांना आपला वाटा उचलावा लागेल. समुद्र आटल्यावर होणारे हे प्रयत्न यशस्वी होतीलच याची खात्री नाही.

पर्यावरण रक्षणाचे लंगडे प्रयत्न अपुरे पडतात. त्यासाठी हवी असते दीर्घकालीन नीती. तीच इथे कमी पडली म्हणावे लागेल. आजची चूक भविष्यात उत्पात घडवील याचा अंदाज आला नाही. दीर्घदृष्टीअभावी त्यांनी हे संकट ओढवून घेतले. त्यांच्या नुकसानीबरोबरच जागतिक पर्यावरणहानी झाली आहे.

समुद्र आटण्यामागचा घटनाक्रम

lp55१८६०-१९०० : मध्य आशिया आपल्या प्रभावात आणण्याचा रशियन राजेशाहीचा प्रयत्न

१९२९ : जोसेफ स्टॅलिनच्या नेतृत्वाच्या सरकारचा मध्य आशियात समूह शेतीचा आग्रह

१९४० : स्टॅलिनचे कालव्यांचे जाळे

१९६० : अरल समुद्र आटण्याची सुरुवात

१९८७ : अरल समुद्र दुभंगला

१९९२ : कझाग सरकारने मातीचा बंधारा घातला

२००५ : मातीच्या बंधाऱ्याऐवजी वर्ल्ड बँकेच्या मदतीने धरण

२००० : दक्षिण खंडाचे पूर्वेकडील उथळ व पश्चिमेकडील खोलगट जलाशय विभाजन. पूर्वेकडची बाजू आटत राहिली.

२०१४ : पूर्वेकडची बाजू पूर्णत: आटून वाळवंटाची निर्मिती.
दिगंबर गाडगीळ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 1:04 am

Web Title: the aral sea crisis
टॅग : Nature
Next Stories
1 समकालीन : …मग ते असते तरी काय ?
2 संस्कृती : संक्रांतीचा संक्रमणोत्सव
3 निमित्त : माय डिअर ब्लॅक..
Just Now!
X