09 July 2020

News Flash

सिंहगणनेचे शुभवर्तमान

टाळेबंदीमुळे यंदाच्या वर्षी गुजरातमध्ये नेहमीसारखी सिंहगणना झाली नाही.

संग्रहित छायाचित्र

सुनिता कुलकर्णी

टाळेबंदीमुळे यंदाच्या वर्षी गुजरातमध्ये नेहमीसारखी सिंहगणना झाली नाही. तरीही गुजरात वनविभागाने त्यांच्याकडे असलेल्या आशियाई सिंहांची संख्या ५२३ वरून ६७४ वर गेल्याचं जाहीर केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या गोपाळ काटेशिया यांनी ही बातमी दिली आहे.

गुजरातमध्ये दर पाच वर्षांनी सिंहगणना केली जाते. यावर्षी ती ५-६ जूनदरम्यान होणं अपेक्षित होतं. पण वनविभागाची वेगवेगळ्या पदांवरील १,५०० माणसं टाळेबंदीशी संबंधित कामासाठी पाठवली गेली असल्यामुळे ती होऊ शकली नाही.
गुजरात वनविभाग सिंहगणनेसाठी त्यांच्याकडील माणसांबरोबरच वेगवेगळ्या बिगस सरकारी संघटना, प्राणीप्रेमी, प्राणीतज्ज्ञ यांना आमंत्रित करते. पण यंदा आपल्या देशात संचारबंदी तर होतीच शिवाय न्यूयॉर्कमधल्या ब्रोनोक्स या प्राणीसंग्रहालयात माणसांमुळे एका वाघाला करोनासंसर्ग झाल्याचीही बातमी असल्यामुळे ही सिंहगणना नेहमीच्या पद्धतीने करण्यात आली नाही.

पण तरीही वनअधिकाऱ्यांनी सिंहगणना केली. त्यासाठी पूनम अवलोकनाच्या कार्यक्रमाचा आधार घेण्यात आला. हा खात्यांतर्गत दर पौर्णिमेला केला जाणारा कार्यक्रम असतो. त्याअंतर्गत वनअधिकारी आणि वन कर्मचारी आपापल्या वनक्षेत्रात २४ तास सिंहाचं निरीक्षण करतात. २०१५ ची सिंहगणना करण्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणून २०१४ मध्ये हा पूनम अवलोकनाचा कार्यक्रम विकसित करण्यात आला होता.

या वर्षीही तो जूनच्या ५ तारखेला शुक्रवारी दुपारी दोन ते शनिवारी दुपारी दोन या काळात घेण्यात आला. अलीकडच्या काळात ज्या १० जिल्ह्यांमध्ये सिंहांच्या हालचाली आढळल्या होत्या त्यांचा म्हणजे १३ वनक्षेत्रांचा परिसर त्यासाठी निश्चित करण्यात आला होता.

नेहमीच्या सिंहगणनेसाठी वनविभागाचे दोन हजार कर्मचारी, प्राणीतज्ज्ञ, प्राणीप्रेमी असतात. तो एक प्रकारे मोठा सोहळाच असतो. या वेळी मात्र वनविभागाचे कर्मचारी, काही प्राणीतज्ज्ञ अशा सगळ्या मिळून १४०० जणांच्या सहाय्याने सिंहगणना करण्यात आली.

एरव्हीची सिंहगणना जंगलामधल्या पाणवठ्यांच्या परिसरात मचाणावर बसून करायची असते. तर वनविभागाचा पूनम अवलोकनाचा म्हणजेच सिंह निरीक्षणाचा कार्यक्रम हा खात्यांतर्गत असतो. त्यासाठी एकाच जागी बसून न राहता वनविभागाचे कर्मचारी त्यांच्या ठरलेल्या विभागात सिंहांचा माग घेत फिरतात. ५ जून रोजी या पद्धतीने फिरूनच या सगळ्यांनी सिंहांची संख्या वाढल्याचं नमूद केलं आहे.

गुजरातमध्ये पहिली सिंहगणना जुनागढच्या नवाबांनी १९३८ मध्ये करवून घेतली होती. त्यानंतर १९६५ पासून इथला वनविभाग दर पाच वर्षांनी सिंहगणना करतो. सहाव्या, आठव्या तसेच अकराव्या सिंहगणनेला वेगवेगळ्या कारणांमुळे पाच वर्षांपेक्षा उशीर झाला होता.

२०२० ची जनगणना यापूर्वीच्या सिंहगणनेपेक्षा महत्त्वाची होती. त्याला काही कारणंही होती. २०१० च्या जनगणनेत गुजरातमध्ये ४११ सिंह मोजले गेले होते तर २०१५ च्या जनगणनेत ५२३ सिंह मोजले गेले होते. पण या जनगणनेनंतर लगेचच अमरेलीमध्ये अचानक आलेल्या पुरात १२ सिंह मरण पावले होते. तर २०१८ मध्ये कॅनाईन डिस्टेम्पर व्हायरस तसंच बॅबेसिऑसिस या दोन आजारांच्या साथींमध्ये दोन डझनांपेक्षाही जास्त सिंह मृत्यूमुखी पडले होते. या उन्हाळ्यात देखील गीरच्या जंगलात बॅबेसिऑसिसच्या साथीमध्ये दोन डझनांच्या आसपास सिंह मरण पावल्याची बातमी होती. असं असतानाही वन विभागाने केलेल्या सिंहगणनेत सिंहांची संख्या पाच वर्षापूर्वीपेक्षा जास्त असल्याचे शुभवर्तमान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 1:13 pm

Web Title: the good news of the lion census aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 तू चुकलास सुशांत
2 ती आईला शोधतेय…
3 गुलाबो सिताबो: माणसांच्या भणंगपणाची अप्रतिम गोष्ट
Just Now!
X